You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना मुंबई : 5 हॉटस्पॉट कोणते?
मुंबईत बुधवारी (24 मार्चला) 5 हजारपेक्षा जास्त नवीन कोरोनारुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे.
मुंबईत कोरोनासंसर्ग पसरल्यापासून ही सर्वोच्च संख्या आहे.
पालिकेच्या माहितीनुसार, 2088 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 6 रुग्णांचा मृत्यू झालाय.
मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार,
- मुंबईत कोरोनारुग्ण बरे होण्याचे दर 90 टक्के आहे.
- 17 ते 23 मार्च दरम्यान कोरोनारुग्ण वाढीचा दर 0.79 टक्के आहे.
- कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा डबलिंग रेट 84 दिवसांवर आहे.
- मुंबई शहरात 39 अक्टिव्ह कंटेनमेंट झोन तयार करण्यात आलेत.
- 432 इमारती सील करण्यात आल्या आहेत.
मुंबईत कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरतोय. पण, कोरोनाबाधितांचा मृत्यू होण्याचा दर कमी असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
मुंबईतील कोणत्या भागात कोरोना संसर्ग जास्त पसरतोय हे जाणून घेण्यासाठी आम्ही मुंबई महापालिकेच्या वेबसाइटला भेट दिली.
मुंबईतील हॉटस्पॉट कोणते?
के-वेस्ट
विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम, ओशिवारा, जुहू, सांताकृज वेस्ट, डी. एन. नगर, आंबोलीचा परिसर या वॉर्डमध्ये येतो. या वॉर्डचा डबलिंग रेट म्हणजे रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 63 दिवस आहे.
या वॉर्डमध्ये वेगवेगळ्या इमारतीतील 964 मजले सील करण्यात आले आहेत. मुंबईतील सर्वांत जास्त 121 इमारती या भागात सील करण्यात आल्या आहेत. या वॉर्डमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर 1.10 टक्के आहे.
एम-वेस्ट
चेंबूर, चुनाभट्टी, नेहरूनगर, टिळकनगर, आरसीएफ हा मध्य मुंबईचा भाग आहे. या वॉर्डचा डबलिंग रेट म्हणजे रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 67 दिवस आहे. गेल्या सात दिवसात सरासरी 120 पेक्षा जास्त रुग्ण या भागात आढळून आले आहेत.
या वॉर्डमधील 52 इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने इमारती सील करण्यात आल्यात. तर 293 इमारतींमधील मजले सील करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकने दिली आहे.
पी-एस
गोरेगाव, बांगूरनगर, आरे कॉलनी, दिंडोशी, मालाड हा उत्तरमुंबईचा भाग आहे. या वॉर्डमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर 1.07 टक्के आहे. गेल्या सात दिवसातील रुग्णसंख्या सरासरी 160 आहे.
एच-वेस्ट
या वॉर्डमध्ये पश्चिम मुंबईतील विभाग येतात. या भागात रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा डबलिंग रेट 67 दिवस आहे. या भागात वांद्रे, खार आणि सांताकृजचा भाग येतो. या विभागात कोरोनारुग्णवाढीचा दर 1.05 टक्के आहे. सरासरी 121 रुग्ण दररोज या भागात आढळून येत आहेत.
के-इस्ट
विलेपार्ले पूर्व, अंधेरी पूर्व, सहार, एमआयडीसी, जोगेश्वरी पूर्वचा भाग या वॉर्डमध्ये येतो. या भागातील रुग्णसंख्या 0.99 टक्के आहे.
पालिकेच्या माहितीनुसार, वाढती रुग्णसंख्या पाहाता आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. मुंबईत 8851 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत आयसीयू बेड्स 1559 तर 978 व्हॅन्टिलेटर बेड्स उपलब्ध आहेत.
मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, 24 पैकी 16 वॉर्डमध्ये रुग्णवाढीचा कालावधी हा 100 दिवसांपेक्षा कमी आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)