अॅस्ट्राझेंका : कोरोना लशीमुळे रक्ताच्या गाठी होण्याची भीती नाही-WHO

अॅस्ट्राझेनका लशीच्या सुरक्षितेवरून जगात काही ठिकाणी लशीकरण मोहीम थांबवण्यात आली आहे.

जगाला विळखा घालणाऱ्या कोरोनावर वर्षभरातच लस तयार झाली. अस्ट्राझेनका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी संयुक्तपणे कोव्हिशिल्ड लस तयार केली. या लशीचं उत्पादन भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया इथे होतं आहे.

देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण टप्पा सुरू झाला आहे. मात्र आता लशीच्या सुरक्षिततेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. काही देशांना अल्प कालावधीसाठी लसीकरण मोहीम थांबवली आहे. बुल्गारिया नावाच्या देशाने हे पाऊल उचललं आहे.

थायलंडमध्ये रक्त साकळल्याच्या तक्रारीनंतर लसीकरण थांबवलं गेलं आहे. युरोपीय मेडिसिन्स एजन्सीने गंभीर परिस्थिती उदभवली नसल्याचं म्हटलं आहे. थायलंडचे पंतप्रधान लस टोचून घेणार होते मात्र तूर्तात थायलंडमधली लसीकरण मोहीम स्थगित करण्यात आली आहे.

डेन्मार्क, नॉर्वे, आईसलँडसह युरोपातल्या काही देशांमध्ये लशीच्या वापराला हंगामी काळासाठी स्थगिती देण्यात आली आहे. युरोपात 50लाखाहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. 30 प्रकरणांमध्ये रक्त गोठल्याची तक्रार समोर आली आहे.

सावधानतेचा उपाय म्हणून इटली आणि ऑस्ट्रियात लशीच्या काही टप्प्यातल्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. एस्टोनिया, लॅटव्हिया, लक्झेंबर्ग यांनीही लशीच्या वापरावर निर्बंध आणले आहेत.

दक्षिण कोरियात लस घेतल्यानंतर दोघांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते आहे.

दरम्यान ऑस्ट्रेलियाने अस्ट्राझेनका लशीचा उपयोग सुरूच ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. रक्त गोठण्यासारखी कोणतीही तक्रार आली नसल्याचं ऑस्ट्रेलियाच्या प्रशासनाने सांगितलं.

लशीमुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. लशीमुळे रक्तात गुठळ्या होतात यासंदर्भात ठोस शास्त्रीय पुरावा समोर आलेला नाही. नैसर्गिक पद्धतीने रक्ताची गुठळी होऊ शकते.

थायलंडमध्ये सार्वजनिक लसीकरणाला सुरुवात होणार होती, पण अॅस्ट्राझेंकाच्या लशीमुळे रक्ताच्या गाठी होतात, अशा बातम्या पसरल्यामुळे इथलं लसीकरण लांबलं आहे. प्रत्यक्षात असं होत असल्याचे काहीही पुरावे आढळलेले नाहीत.

थायलंडचे पंतप्रधान शुक्रवारी लस घेऊन इथल्या लसीकरण्याच्या मोहिमेची सुरुवात करणार होते. पण तो कार्यक्रम आता रद्द झाला आहे.

डेन्मार्क आणि नॉर्वेसारख्या देशांनी आपल्याकडचा लसीकरणाचा कार्यक्रम थांबवल्यानंतर आता थायलंडनेही तो पुढे ढकलला आहे.

जवळपास 50 लाख युरोपियन लोकांना आतापर्यंत अॅस्ट्राझेंकाची लस मिळालेली आहे. या 50 लाख लोकांपैकी 30 लोकांनी रक्ताच्या गाठी तयार होत असल्याची तक्रार केली आहे.

युरोपियन मेडिसीन्स एजेन्सीनी गुरुवारी म्हटलं की, या लशीमुळे रक्ताच्या गाठी तयार होत असल्याचं निदर्शनास आलेलं नाही. पुढे त्यांनी असंही म्हटलं की या लशीच्या "फायद्यांच्या तुलनेत धोके नगण्य आहेत."

या लशीच्या सुरक्षिततेच्या चाचण्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत, त्यांचा अभ्यास होतोय असं अॅस्ट्राझेंकाने म्हटलं आहे.

थायलंडने काय म्हटलं?

देशाच्या कोव्हिड-19 लशीच्या समितीचे सल्लागार पियाकसोल साकोल्सतयाडोर्न यांनी म्हटलं की, "अॅस्ट्राझेंकाच्या लशीचा दर्जा चांगला असला तरी काही देशांनी त्यांचं लसीकरण लांबवलं आहे. आम्हीही ते पुढे ढकलत आहोत."

पण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केलं की, थायलंडमध्ये आलेल्या अॅस्ट्राझेंका लशींची युरोपात दिल्या जाणाऱ्या लशींबरोबर निर्मिती झालेली नाही. दोन्ही उत्पादन बॅच वेगवेगळ्या आहेत. आशियातल्या लोकांना रक्ताच्या गुठळ्यांचा त्रास झाल्याचं ऐकिवात नाही असंही त्यांनी पुढे म्हटलं.

अॅस्ट्राझेंकाच्या 1,17,300 लशींची तुकडी 24 फेब्रुवारीला थायलंडमध्ये आली. याबरोबर चीनच्या 2,00,000 कोरोनाव्हॅक लशीही आल्या.

थायलंडमध्ये जवळपास 30,000 हून अधिक लोकांना कोरोनाव्हॅक लस देण्यात आलेली आहे. लोकांना कोरोनाव्हॅक लशी देणं सुरूच राहिल असं थायलंडने म्हटलं आहे.

इतर देश काय करत आहेत?

यूकेमध्ये मेडिसीन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजेन्सीने म्हटलंय की, अॅस्ट्राझेंकाच्या लशीमुळे समस्या निर्माण होत असल्याचा काहीही पुरावा नाही. त्यामुळे लोकांनी ठरल्याप्रमाणे लस घ्यायला जायला हवं.

या एजेंन्सीनुसार अॅस्ट्राझेंका लशीचे 1 कोटी 10 लाख डोस यूकेमध्ये आतापर्यंत देण्यात आले आहेत.

ऑस्ट्रेलियात अॅस्ट्राझेंकाचे 3 लाख डोस देण्यात आले आहेत आणि त्यांनीही म्हटलंय की ते लसीकरण सुरू ठेवणार.

ऑस्ट्रेलियाच्या गृहखात्याचे मंत्री पीटर डटन यांनी म्हटलं की, "या क्षणी डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं आहे की ही लस सुरक्षित आहे. त्यामुळे आम्हाला लसीकरण थांबवायचं नाही. आता शांत डोक्याने विचार करायची गरज आहे."

फिलिपिन्सच्या आरोग्य खात्यानेही म्हटलंय की लसीकरण थांबवण्याचं 'काही कारण' नाही.

दक्षिण कोरियातही ठरल्याप्रमाणे लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे, पण काहींच्या मनात लशीविषयी शंका आहे. जवळपास 7 लाख 85 हजार लसीचे डोस इथे आलेले आहेत.

इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की लस दिल्यानंतर काही दिवसात झालेल्या आठ व्यक्तींच्या मृत्यूशी लशीचा काहीही संबंध नाही. लस आणि या मृत्यूंमध्ये काही दुवा आढळलेला नाही.

पण डेन्मार्क, नॉर्वे आणि आईसलँडने तात्पुरता लसीकरणाचा कार्यक्रम थांबवला आहे.

इटली आणि ऑस्ट्रियाने खबरदारी म्हणून लशीच्या काही विशिष्ट बॅचेस वापरायच्या थांबवल्या आहेत.

युरोपियन मेडिसीन्स एजेन्सीने आधी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की, "डेन्मार्कने खबरदारीचा उपाय म्हणून लसीकरणाचा कार्यक्रम थांबवला आहे. लस मिळाल्यानंतर ज्यांनी रक्ताच्या गाठी झाल्याच्या तक्रारी केल्यात, त्या तक्रारीचं कारण शोधण्यासाठी तपास चालू आहे. या तपासात डेन्मार्कमधल्या एका व्यक्तीच्या मृत्यूचं कारण शोधण्याचेही प्रयत्न चालू आहेत."

लस कशी काम करते?

अॅस्ट्राझेंकाची लस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने बनललेली आहे. ही लस सामान्य सर्दी-पडशाच्या एका कमकुमत व्हायरसपासून तयार केली आहे जो व्हायरस चिंपांझी माकडांमधून आला आहे. हा व्हायरस कोरोना व्हायरससारखा दिसावा म्हणून त्यात बदल केले आहेत. पण या व्हायसरमुळे कोणी आजारी पडू शकत नाही.

लशीद्वारे हा व्हायरस शरीरात गेल्यानंतर तो खऱ्या कोरोना व्हायरसशी कसं लढायचं हे आपल्या प्रतिकारशक्तीला शिकवतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)