मेगन मर्कल यांची प्रिन्सेस डायनांशी सतत तुलना का केली जाते?

मेगन मर्कल आणि प्रिन्सेस डायना यांची कायम तुलना होत असते. ओप्रा विन्फ्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्येही प्रिन्स हॅरी यांनी नेकदा त्यांच्या आईचा - प्रिन्सेस डायना यांचा उल्लेख केला. शिवाय ससेक्सचे ड्यूक आणि डचेस असणाऱ्या हॅरी आणि मेगन यांच्या मुलाखतीतल्या अनेक गोष्टी चर्चेत आहेत.

राजघराण्यामध्ये दाखल होत असतानाच्या दडपणाबद्दल आपण डायनांच्या मित्रमंडळींपैकी एकाशी बोलल्याचं सांगताना मेगन मर्कल म्हणाल्या, "कारण...हे दडपण काय असू शकतं, हे दुसरं कोण समजू शकतं?

राजघराण्यातल्या या दोघींच्या अनुभवातलं साम्य आता दाखवलं जातंय.

मेगनसोबत कुटुंबातून बाहेर पडत, 'सीनियर रॉयल्स' ची भूमिका सोडण्याआधी इतिहासाची पुनरावृत्ती होतेय की काय, अशी भीती आपल्याला वाटत होती, असं प्रिन्स हॅरी यांनी म्हटलं.

युकेमधल्या टॅब्लॉईड्सनी ज्याप्रकारे आपल्या पत्नीबद्दल कव्हरेज केलं त्याची तुलना हॅरी यांनी डायनांबाबतच्या टॅब्लॉईड्सच्या वर्तनाशी केली. अशी तुलना त्यांनी यापूर्वीही केली होती.

वार्तांकनाच्या दोन बाजू

प्रिन्सेस डायनांना जगातील सर्वांत प्रसिद्ध महिला म्हटलं जायचं. आणि त्यांचं समाजकार्य आणि खासगी आयुष्य या दोहोंबद्दल अनेकदा वर्तमानपत्रात हेडलाईन्स झळकत.

"राजघराण्यात इतर कोणाहीपेक्षा डायना प्रसिद्ध झाल्या. त्यांना जगभर ओळखलं जाई आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची प्रसिद्धी होती," बीबीसीच्या रेडिओ वनच्या न्यूजबीट कार्यक्रमात बोलताना राजघराण्याविषयी लेखन करणाऱ्या लेखिका केटी निकोल यांनी सांगितलं.

पण डायनांना मिळणारी प्रसिद्धी ही नेहमीच सकारात्मक नसायची, हे देखील त्या सांगतात.

"माध्यमांतून डायनांवर टीकाही होत असते. त्या जगातल्या सर्वाधिक फेमस व्यक्ती होत्या आणि प्रिन्स विल्यम आणि हॅरींच्या आयुष्यावर कायम पापाराझ्झींची नजर असे."

त्यानंतर डायनांनी काही माध्यमांना खासगी आयुष्याबद्दल सांगणाऱ्या मुलाखती दिल्या आणि त्यांना ही प्रसिद्धी हवी असल्याची, प्रकाशझोत आपल्याकडे वळवण्याची इच्छा असल्याची टीका त्यांच्यावर काहींनी केली.

राजघराण्यामध्ये सहभागी होताना मेगन यांनी त्यांचा खासगी ब्लॉग बंद केला आणि या मुलाखतीच्या आधी त्यांनी दिलेल्या बहुतेक मुलाखती या त्यांच्या समाजकार्याबद्दलच्या होत्या.

पण मेगन आणि हॅरी परस्पर विरोधी विधानं करत असल्याचं काहीचं म्हणणं असल्याचं केटी सांगतात.

'शांतपणे आयुष्य जगणं'

माध्यमांचं आपल्याकडे सतत लक्ष असल्याचा त्रास होत असल्याने आपण 'राजघराण्यातील ज्येष्ठ व्यक्ती' हे पद आणि जबाबदारी सोडत असल्याचं जानेवारी 2020मध्ये मेगन आणि हॅरी या जोडप्याने म्हटलं होतं.

त्यानंतर ते आधी कॅनडाला आणि मग कॅलिफोर्नियाला रहायला गेले. ते राजघराण्यातले सक्रीय सभासद म्हणून परतणार नसल्याचं नुकतंच जाहीर करण्यात आले.

पण केटी यांच्यामते, "युकेमध्ये असताना त्यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल सांगितलं नाही, त्यापेक्षा कितीतरी अधिक त्यांनी अमेरिकेत स्थायिक झाल्यापासून जाहीर केलेलं आहे."

राजघराण्यातले सक्रीय सदस्य म्हणून काम सोडल्यानंतर या जोडप्याने स्पॉटिफायवर एक पॉडकास्ट सुरू केला, नेटफ्लिक्ससोबत करार केला आणि जेम्स कॉर्डन आणि ओप्रा विन्फ्रे यांना मुलाखती दिल्या.

"शांतपणे आयुष्य जगण्यासाठी जर यांनी घराणं सोडलं तर मग ते जेम्स कॉर्डन आणि ओप्रा विन्फ्रेंना मुलाखती देत त्यांच्या मुलाबद्दलची माहिती का देत आहेत, असा सवाल लोक करतातयत," केटी म्हणतात.

"माध्यमांना टाळण्यासाठी ब्रिटनबाहेर पडण्याचं कारण अनेक लोकांना पटत नाहीये कारण युके असताना हॅरी आणि मेगन जेवढे दिसत नव्हते, त्यापेक्षा अधिक आता ते दिसत आहेत," केटी सांगतात.

नेटफ्लिक्स आणि स्पॉटिफायसोबत करार करण्याचा आपला बेत नव्हता, पण आपल्या कुटुंबाने 2020च्या सुरुवातीला आपल्यासोबतचे आर्थिक संबंध जवळपास संपुष्टात आणल्याचं हॅरींनी ओप्रांना सांगितलं.

प्रिन्सेस डायनांचा मृत्यू आणि पापाराझ्झी

"त्या जिथे कुठे जात, तिथे भरपूर पत्रकार आणि फोटोग्राफर्स त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून असत," जेम्स ब्रुक्स सांगतात.

प्रिन्स हॅरी यांचं माध्यमांबद्दलचं मत प्रिन्सेस डायनांच्या मृत्यूपासूनचं असावं, असं जेम्स यांना वाटतं.

"हॅरी आणि विल्यम यांना माध्यमाबद्दल काय वाटतं यावर त्यांच्या आईच्या मृत्यूची छाया आहे कारण त्यांच्या दृष्टीने त्यांच्या आईला पापाराझ्झींनी पछाडलं होतं," ते सांगतात.

31ऑगस्ट 1997 रोजी पॅरिसमधल्या एका रस्तायवरच्या बोगद्यात झालेल्या कार अपघातात प्रिन्सेस डायना यांचा मृत्यू झाला. प्रिन्स हॅरी त्यावेळी 12 वर्षांचे होते.

डायनांच्या कारचे चालक हेन्री पॉल यांनी त्यावेळी मद्यप्राशन केल्याचं आढळलं तर या कारचा पापाराझ्झींनी मोटरसायकलवरून पाठलाग केला होता.

डायव्हरचा निष्काळजीपणा आणि पापाराझ्झी यांच्यामुळे डायनांचा मृत्यू झाल्याचं चौकशीदरम्यान आढळलं होतं.

2017मध्ये बीबीसीच्या एका डॉक्युमेंटरीदरम्यान प्रिन्स हॅरी यांनी त्यांच्या आईचा मृत्यू आणि त्यातली पापाराझ्झींची भूमिका याविषयीचं त्यांचं मत मांडलं होतं.

"ज्या लोकांनी तिचा त्या बोगद्यापर्यंत पाठलाय केला, तेच लोक ती कारच्या मागच्या सीटवर मरणासन्न अवस्थेत असताना फोटो काढत होते, हे पचवणं सगळ्यात कठीण आहे."

नकारात्मक वार्तांकन

पण "पापाराझ्झी डायनांचा ज्याप्रकारे पाठलाग करत त्याप्रकारे मेगन यांच्यामागे ते जात नाहीत," असं केटी यांना वाटतं.

पण मेगन यांच्यावर टीका करणाऱ्या सततच्या वार्तांकनाला हॅरी कंटाळले असावे, असं त्या म्हणतात.

"त्यांच्या बायकोची नकारात्मक प्रतिमा उभी करायला खतपाणी घालत असल्याचं वाटणाऱ्या पत्रकारांवर ते हल्ला करतायत. मेगन करत असलेल्या खर्चाबद्दलच्या अनेक नकारात्मक बातम्या आल्या होत्या. यामध्ये करदात्यांच्या पैशांतून घराचं नूतनीकरण केल्याच्याही बातम्या होत्या."

3.3 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा हा खर्च नंतर या जोडप्याने स्वतः केला.

"शिवाय डचेस वापरत असलेल्या हजारो पाऊंड्सच्या डिझायनर कपड्यांच्या किंमतींचीही चर्चा झाली. त्यांच्या लग्नाच्या वेळीही चर्चा झाल्या. मेगन यांना सेंट जॉर्ज चॅपलमध्ये एअर फ्रेशनर हवे होते अशा चर्चा होत्या. त्यानंतर टियारावरून वाद झाल्याचं म्हटलं गेल. मेगन आणि केट यांच्यामध्ये प्रिन्सेस शार्लटच्या कपड्यांवरून वाद झाल्याचंही सांगितलं जात होतं."

पण लग्नाआधी ड्रेसवरून झालेला वाद उलट असल्याचं मेगन यांनी ओप्रांना सांगितलं.

"फ्लॉवर गर्लच्या ड्रेसवरून लग्नाच्या काही दिवस आधी केट नाराज झाली होती आणि त्यामुळे मला रडू कोसळलं," मेगन यांनी सांगितलं. पण केट यांनी नंतर माफी मागितली आणि फुलं आणि चिठ्ठी पाठवल्याचं मेगननी सांगितलं.

केट एक चांगली व्यक्ती असून या बातम्यांमधली चूक सुधारण्याची त्यांची कदाचित इच्छा असावी, असं त्या म्हणाल्या.

स्पॉटलाईटची सवय?

पण हॅरी यांच्याशी लग्न करण्यापूर्वीच मेगन या सेलिब्रिटी होत्या, आणि त्यामुळे त्यांना स्पॉईटलाईटची सवय असायला हवी, प्रिन्सेस डायनांच्या बाबत ही गोष्ट वेगळी होती, असं काहींचं म्हणणं आहे. पण केटी यांना हे पटत नाही.

"माझ्यामते जरी त्या लग्नापूर्वी सेलिब्रिटी असल्या तर त्याची तुलना राजघराण्यात असण्याशी केली जाऊ शकते, असं मला वाटत नाही. त्या सेलिब्रिटी होत्या पण त्या अँजेलिना जोली किंवा निकोल किडमन यांच्यासारख्या लोकप्रिय नव्हत्या. आपण इतक्या मोठ्या प्रमाणातली लोकप्रियता यापूर्वी अनुभवलेली नाही, असं त्यांनी स्वतःच म्हटलंय."

केटी पुढे सांगतात, "माझ्या मते राजघराण्यातल्या इतर सदस्यांवर जितकं लोकांचं लक्ष असतं, तितकंच मेगन यांच्यावरही होतं. लोकांची स्मरणशक्ती कमी असते. पण डचेस ऑफ केंब्रिजनाही टॅब्लॉईड्समुळे त्रास झाला होता."

लोकांना या जोडप्याबद्दल जाणून घेण्यात रस असला तरी त्यासाठीही एक मर्यादा असल्याचं केटी म्हणतात, "शाही कुटुंबाबद्दल बातमी देणं हे माध्यमांचं काम आहे. पण हे वार्तांकन योग्य आणि निष्पक्ष असायला हवं."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)