You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डॅनियल पर्ल कोण होते, ज्यांच्यासाठी अमेरिका झालीय पाकिस्तानवर नाराज
पाकिस्तानमधील उर्दू वर्तमानपत्रांमध्ये या आठवड्यात सरकार आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांसह अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्ल हत्या प्रकरणातला आरोपी सईद शेख याच्या सुटकेच्या बातम्या चर्चेत आहेत.
हे डॅनियल पर्ल हत्या प्रकरण नेमकं काय आहे, ते आधी पाहूया.
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्ल हत्येतील आरोपी कट्टरतावादी अहमद उमर सईद शेख याच्यासह चार जणांची सुटका केलीय. वॉल स्ट्रीट जर्नलचे ब्युरो चीफ डॅनियल पर्ल यांची 2002 साली हत्या करण्यात आली. ते पाकिस्तानातील कट्टरतावादी गटांवर बातमी करण्यासाठी गेले होते. खालच्या कोर्टानं उमर सईदसह चार जणांना अपहरण आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती.
मात्र, 2020 च्या एप्रिल महिन्यात सिंध कोर्टाने शेख आणि त्याच्या साथीदारांना डॅनियल पर्लच्या केवळ अपहरणासाठीच दोषी ठरवलं आणि शिक्षाही कमी केली. मात्र, हे चारही जण अपहरणाची शिक्षा आधीच भोगले होते. त्यामुळे कोर्टाने त्यांच्या सुटकेचे आदेश दिले होते.
डॅनियल पर्लच्या कुटुंबीयांनी या कोर्टाच्या या आदेशाला विरोध केल्यानंतर पाकिस्तानी सरकारने या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. मात्र, पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाने 29 जानेवारीला दिलेल्या निर्णयाविरोधात दाखल याचिका फेटाळत सुप्रीम कोर्टाने आरोपींच्या सुटकेचे आदेश दिले.
जंग या वृत्तपत्रातील वृत्तानुसार, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकेन यांनी म्हटलंय की, अमेरिका उमर शेखविरोधात अमेरिकेत कारवाई करण्यासाठी तयार आहे. ते पुढे म्हणाले, उमर शेख आणि त्याच्या साथीदारांना शिक्षा देण्यासाठी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा झालीय. ब्लिंकेन यांनी उमर शेखच्या सुटकेच्या निर्णयाला पाकिस्तानसह जगभरात दहशतीचे शिकार बनणाऱ्यांचा अपमान म्हटलंय.
सिंधमधील राज्य सरकारने उमर शेखच्या सुटकेच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केल्याचेही जंग वृत्तपत्राने म्हटलंय.
पाकिस्तानचे अॅटर्नी जनरलने एक निवेदन जारी केलं आणि त्यात म्हटलंय की, या प्रकरणी सिंध सरकार आणि केंद्र सरकार पूर्णपणे सोबत आहे. सिंधमध्ये पाकिस्तान पिपल्स पार्टीचं सरकार, तर केंद्रात इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाचं सरकार आहे.
नवा-ए-वक्त या वृत्तपत्रानुसार, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी शुक्रवारी (30 जानेवारी) अमेरिकेच्या नव्या परराष्ट्रमंत्र्यांशी पहिल्यांचा चर्चा केली. शाह महमूद कुरैशी यांनी त्यांना सदिच्छा दिल्या आणि दोन्ही देशांमधील संबंध अधिक चांगले करण्यावर भर देण्याचा विश्वास व्यक्त केला, असंही नवा-ए-वक्तमधील वृत्तात म्हटलंय.
याच वृत्तपत्रानुसार, या चर्चेदरम्यान अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटलं की, डॅनियल पर्ल प्रकरणात कायद्याचं पालन करणं दोन्ही देशांच्या हिताचं आहे.
डॅनियल पर्लसोबत नेमकं काय झालं?
वॉल स्ट्रीट जर्नलचे दक्षिण आशियाचे ब्युरो चीफ डॅनियल पर्ल हे 2002 मध्ये अचानक बेपत्ता झाले.
पर्ल हे कराचीत इस्लामी कट्टरतावादी कृत्य आणि रिचर्ड रीड यांच्यातील संबंध तपासण्यासाठी आले होते. रीड याने बुटांमध्ये बॉम्ब लपवून प्रवासी विमानात स्फोट घडवण्याचा प्रयत्न केला होता.
पर्लची बाजू मांडणाऱ्यांनी आरोप केला की, शेखने पर्लला एका मौलवीला भेटवण्याची ऑफर दिली होती.
पर्ल बेपत्ता झाल्यानंतर पाकिस्तानी आणि अमेरिकन वृत्तसंस्थांना ईमेल आले आणि त्यात काही मागण्या होत्या. यात अमेरिकेतील तुरुंगात बंद असलेल्या पाकिस्तानी कैद्यांसोबत चांगल्या व्यवहाराची मागणी करण्यात आली होती.
एका महिन्यानंतर कराचीतल्या अमेरिकेच्या दूतावासात 38 वर्षीय डॅनियल पर्ल यांच्या हत्येचा व्हीडिओ पाठवण्यात आला होता.
अहमद उमर सईद शेख कोण आहे?
1973 साली लंडनमध्ये जन्मलेला शेख हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकला आहे. याआधी त्यानं स्वतंत्र शाळेतून शिक्षण घेतलं होतं.
शेखने पदवीचं शिक्षण पूर्ण केलं नाही. पहिल्या वर्षात असताना शेखने बोस्नियाच्या मदतीसाठी अभियान राबवलं होतं. मात्र, तिथे जायला तो अयशस्वी ठरला.
1994 साली शेखला भारतात अटक करण्यात आली होती. चार पर्यटकांच्या अपहरणाचे आरोप त्याच्यावर होते. या पर्यटकांमधील एक ब्रिटिश, तर एक अमेरिक नागरिकही होते.
1999 साली जेव्हा कट्टरतावाद्यांनी इंडियन एअरलाईन्सच्या IC-814 विमानाचं अपहरण केलं होतं आणि अपहरणकर्त्यांनी ज्या कट्टरतावाद्यांना सोडण्याची मागणी केली होती, त्यात अहमद उमर सईद शेखही होता.
अमेरिकेतील 9/11 हल्ल्यातील एका कट्टरतावाद्याच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्याचा आरोपही शेखवर असल्याचं अमेरिकन माध्यमांनी म्हटलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)