जो बायडन : अमेरिकेत कसं होईल सत्तेचं हस्तांतरण?

डोनाल्ड ट्रंप- जो बायडन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जो बायडन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील.

राष्ट्राध्यक्षीय स्थित्यंतराच्या काळात व्हाइट हाऊसमध्ये कोणती लगबग सुरू असते..

ट्रंप यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शेवटच्या खुणा बुधवारी पुसल्या जातील आणि बायडन दाम्पत्य व्हाइट हाऊसमध्ये प्रवेश करेल. टेबलांची आवराआवर केली जाईल, खोल्यांची साफसफाई केली जाईल आणि राष्ट्राध्यक्षांचे सहाय्यक म्हणून राजकीय नियुक्त्यांसह नवीन चमू दाखल होईल.

राष्ट्राध्यक्षपदी नवीन व्यक्ती दाखल झाल्यावर सरकारचं पूर्ण रूपच पालटून जातं- व्हाइट हाऊसमधील बदल हा त्याचा एक भाग आहे.

ट्रंप यांच्या सत्ताकाळात व्हाइट हाऊसमधील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व राहिलेले, धोरणविषयक सल्लागार स्टीफ मिलर गेल्या आठवड्यात एकदा संध्याकाळी वेस्ट विंग भागात फेरफटका मारत होते. ट्रंप यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांच्यासाठी भाषणं व धोरणं तयार करून देण्यात मिलर यांचा सहभाग राहिला होता.

व्हाइट हाऊसमधून सामान हलवायला सुरूवात झाली आहे.
फोटो कॅप्शन, व्हाइट हाऊसमधून सामान हलवायला सुरूवात झाली आहे.

राष्ट्राधक्ष्य ट्रंप यांच्या आरंभिक चमूपैकी मोजकेच लोक शेवटपर्यंत टिकले- मिलर त्यापैकीच एक. तर, त्या दिवशी संध्याकाळी एक बैठक होणार होती, त्या संदर्भात आपल्या सहकाऱ्यांशी गप्पा मारत ते एका भिंतीला टेकून उभे होते. त्यांना कुठे जायची काही घाईगडबड असल्याचं दिसत नव्हतं.

सर्वसाधारणपणे वेस्ट विंग भागात वर्दळ असते, पण त्या दिवशी हा भाग निर्जन झाला होता. फोनचा घणघणाट होत नव्हता. रिकाम्या कार्यालयांमधली टेबलं कागदांनी अस्ताव्यस्त झाली होती, पत्रांचे लिफाफे उघडलेलेही नव्हते. जणू काही लोक घाईघाईने तिथून निघून गेलेत आणि ते परत येणारच नाहीत, अशी अवस्था झाली होती. सहा जानेवारीला कॅपिटलमध्ये झालेल्या दंगलीनंतर डझनभर ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी व सहकाऱ्यांनी राजीनामा दिला. मिलर यांच्यासारखे काही निष्ठावान टिकून राहिले.

संभाषण संपत आल्यावर मिलर यांनी त्यांच्या सहकाऱ्याचा निरोप घेतला. आता पुढे कुठे जाणार, असं मी विचारल्यावर ते हसले. "इथून परत ऑफिसात जाणार," ते म्हणाले आणि निवांत चालत हॉलच्या दुसऱ्या बाजूला गेले.

'वाट खूप अवघड आहे'

शपथविधीच्या दिवशी मिलर यांच्या कार्यालयातही आवराआवर केली जाईल. ते व त्यांचे सहकारी तिथे काम करत होते, याच्या खाणाखुणा पुसल्या जातील, आणि बायडन यांचा चमू त्या जागेत सक्रिय होईल.

वेस्ट विंग भागातील कार्यालयांमधील आवराआवर आणि दोन राष्ट्राध्यक्षांमधील स्थित्यंतर, ही परंपरा कित्येक शतकांपासून सुरू आहे. ही प्रक्रिया कायम स्नेहशीलच असते, असं नाही.

ट्रंप यांच्या टीमनं पॅकिंग सुरू केलं आहे

फोटो स्रोत, Reuters

1869 साली महाभियोगाद्वारे हटवण्यात आलेले दुसरे एक राष्ट्राध्यक्ष, डेमोक्रेटिक पक्षाचे अँड्र्यू जॉन्सन यांनी रिपब्लिकन पक्षाचे युलिसस एस ग्रँट यांच्याकडे दुर्लक्ष करून शपथविधीकडे पाठ फिरवली होती. जॉन्सन यांना कार्यालयातून हटवण्याच्या प्रक्रियेला पाठिंबा दिलेल्या ग्रँट यांना याचं फारसं आश्चर्य वाटलं नाही.

परंतु, यावेळी स्थित्यंतरामधील कटुता आणखी लक्षणीय आहे. सर्वसाधारणतः ही प्रक्रिया निवडणुकीनंतर लगेच सुरू होते, पण ट्रंप यांनी निकाल स्वीकारायला नकार दिल्यामुळे काही आठवडे उशिराने ही प्रक्रिया सुरू झाली. बायडन यांच्या शपथविधी समारंभाला आपण उपस्थित राहणार नसल्याचं ट्रंप यांनी म्हटलं आहे. शपथविधी टाळून ते बहुधा फ्लोरिडामधील त्यांच्या मालकीच्या मार-अ-लागो क्लबमध्ये जातील.

तरीही, आधीसारखंच आताही सत्तांतर होतंच आहे. "व्यवस्था स्वतःची पकड टिकवून आहे," असं प्रिन्स्टन विद्यापीठातील अमेरिकी इतिहासाचे प्राध्यापक सीन विलेन्ट्झ म्हणतात. "वाट खूप अवघड आहे, धक्केही बसतायंत, पण तरीही स्थित्यंतर होतंच आहे."

सर्व काही अत्यंत सुरळीत असतानाही स्थित्यंतराशी संबंधित दळणवळणाची प्रक्रिया छाती दडपवून टाकणारी असते. यात माहिती व कर्मचारी यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात हस्तांतरण होतं.

ट्रंप प्रशासनाने राजकीय स्तरावरून नियुक्त केलेल्या 4000 कर्मचाऱ्यांपैकी स्टिफन मिलर हे एक- केवळ एक. अशा अनेकांना स्वतःची नोकरी गमवावी लागेल आणि त्यांच्या जागी श्री. बायडन यांनी नियुक्त केलेल्या व्यक्ती येतील.

डोनाल्ड ट्रंप ऑफिस

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रंप

सर्वसाधारणतः अशा स्थित्यंतरादरम्यान दीड लाख ते तीन लाख लोक या जागांसाठी अर्ज करतात, असं सेंटर फॉर प्रेसिडेन्शिअल ट्रान्झिशन या संस्थेच्या आकडेवारीवरून दिसतं. वॉशिंग्टनमधील ही संस्था निःपक्षपाती आहे. अशा सुमारे 1,100 जागांसाठी सिनेटकडून शिक्कामोर्तब घ्यावं लागतं. या सर्व जागा भरण्यासाठी काही महिने, अगदी वर्षंही लागतात.

धोरणात्मक कागदपत्रं, टिपणपुस्तिका आणि राष्ट्राध्यक्षांच्या कामाशी संबंधित वस्तू यांना राष्ट्रीय अभिलेखागाराकडे पाठवलं जाईल, तिथे पुढील 12 वर्षं ही कागदपत्रं व वस्तू गोपनीय ठेवल्या जातील. खुद्द राष्ट्राध्यक्षांनीच त्यातील काही भाग आधी उघड करायचा निर्णय घेतला, तरच या नियमाला अपवाद केला जातो.

बदलाचा दिवस

ट्रंप यांच्या कार्यकाळातील शेवटच्या आठवड्यात एके दिवशी राष्ट्राध्यक्षांचे माध्यम सचिव कायली मॅकएननी यांच्या कार्यालयाचं दार अर्धवट उघडं होतं.

राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचं समर्थन करणाऱ्या उच्चपदस्थांमध्ये मॅकएननी यांची गणना होते. अतिशय सफाईदार वावर असलेल्या कायली अचूक संभाषण साधतात आणि अनागोंदी असेल तरीही त्या स्वतःची मनःशांती टिकवून ठेवतात.

त्याही आता व्हाइट हाऊसचा निरोप घेण्याच्या तयारीत असल्या, तरी त्यांचं कार्यालय अतिशय निगुतीने लावलेलं आहे. त्यांच्या टेबलावर एक आरसा आहे आणि 'फायरप्लेस'साठी वापरायची लाकडं स्वच्छ प्लास्टिकमध्ये बांधून ठेवलेली आहेत.

सर्वसाधारणतः राष्ट्राध्यक्षीय स्थित्यंतराचे शेवटचे दिवस "नियंत्रित अनागोंदी"चे असतात, असं 'व्हाइट हाऊस, द रेसिडन्स' या पुस्तकाच्या लेखिका केट अँडरसन ब्राउझर म्हणतात.

व्हाइट हाऊसमधलं फर्निचर- यात ओव्हल ऑफिसमधलं 'रिझोल्यूट डेस्क', इतर बहुतेकशा कलाकृती, चिनीमातीच्या व इतर वस्तू यांचा समावेश होतो- सरकारी मालकीच्या आहेत आणि त्या याच आवारात राहतील. पण सभागृहामध्ये टांगलेली विद्यमान राष्ट्राध्यक्षाची छायाचित्रं, व तत्सम इतर वस्तू काढून ठेवल्या जातील आणि नवीन मंडळींसाठी व्हाइट हाऊस नव्याने तयार होईल.

हिरवळीवर नाचणारी मुलं

कर्मचाऱ्यांनी काही वस्तू आधीच इमारतीतून बाहेर न्यायला सुरुवात केली आहे. मोठ्या टाचांचे बूट घातलेली एक कर्मचारी महिला मेलानिआ ट्रंप यांची अनेक छायाचित्र ईस्ट विंगमधून बाहेर नेत आहे. प्रचंड मोठ्या आकारामुळे ही छायाचित्रं 'जम्बो' म्हणून ओळखली जाऊ लागली होती, आता ती राष्ट्रीय अभिलेखागारामध्ये जातील, असं ती सांगते.

ट्रंप यांचं वैयक्तिक सामान- त्यांचे कपडे, दागदागिने व इतर वस्तू त्यांच्या नवीन निवासस्थानी नेल्या जातील. बहुधा ते फ्लोरिडामधील मार-अ-लागो इथे राहायला जाण्याची शक्यता आहे.

मग ही जागा व्यवस्थितपणे स्वच्छ केली जाईल.

राष्ट्राध्यक्ष ट्रंप, त्याचप्रमाणे श्री. मिलर आणि व्हाइट हाऊसमधील इतर डझनभर कर्मचाऱ्यांना गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना विषाणूची लागण होऊन गेली. त्यामुळे 132 खोल्या असलेल्या या सहा मजली इमारतीचा कोपरान्-कोपरा साफ केला जाईल. हात धरण्यासाठीच्या रेलिंगपासून ते लिफ्टच्या बटणांपर्यंत आणि स्वच्छतागृहातील वस्तूंपर्यंत सगळं काही साफ करून निर्जंतुकीकरण केलं जाईल, असं सार्वत्रिक सेवा प्रशासनाच्या प्रवक्त्याने सांगितलं. व्हाइट हाऊसमधील अंतर्गत देखभालीचं काम ही संस्था करते.

नव्याने येणारं कुटुंब सर्वसाधारणतः काही नवीन सजावट करतं. व्हाइट हाऊसमध्ये आल्यानंतर काहीच दिवसांमध्ये श्री. ट्रंप यांनी लोकानुनयी राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन यांचं पोर्ट्रेट ओव्हल ऑफिसमध्ये लावून घेतलं. त्यांनी कार्यालयातील पडदे, कोच व गालिचेही बदलून घेतले आणि त्याऐवजी सोनेरी रंगाचे पडदे, कोच इत्यादी बसवून घेतले.

शपथविधीच्या दिवशी उप-राष्ट्राध्यक्ष पेन्स व त्यांची पत्नी आपली निवासस्थानं सोडतील आणि त्यांची जागा कमला हॅरिस व त्यांचे पती डोउग एमहॉफ घेतील. नेव्हल ऑब्झर्वेटरी मैदानापासच्या एकोणिसाव्या शतकातील अधिकृत निवासस्थानी ते राहायला येतील. व्हाइट हाऊसपासून ही जागा दोनेक मैल अंतरावर आहे.

समाप्ती

धोरणविषयक सल्लागार स्टिफन मिलर वेस्ट विंगमध्ये रेंगाळत राहिले असले, तरी इतरांनी बाहेर पडायची तयारी केली आहे. व्हाइट हाऊसमधील इतर लोक जाड मॅनिला लिफाफे, फ्रेम केलेली छायाचित्रं आणि पिशव्या भरत होते.

"आज माझा शेवटचा दिवस आहे," एक माणूस हसत सांगतो- व्हाइट हाऊसच्या उत्तरेकडल्या हिरवळीवर त्याच्या मुलांचं छायाचित्र तो काढून ठेवत होता. त्याच्या खांद्यावर आटोकाट भरलेली बॅग अडकवलेली आहे.

राष्ट्रीय सुरक्षा विभागाच्या काही अधिकाऱ्यांना वेस्ट विंगसमोर छायाचित्र काढायचं होतं, त्यांनी मला त्यासाठी विनंती केली, "मरिन गार्ड दिसेल असं बघा," एक अधिकारी मला म्हणाला. राष्ट्राध्यक्ष ओव्हल ऑफिसमध्ये असतील तेव्हा दाराजवळ एक मरिन गार्ड उभा असतो, त्या संदर्भात हा उल्लेख होता. अधिकारी उत्साहात होते, त्यांचे थट्टाविनोद सुरू होते, कॅमेराकडे बघून चेहऱ्यावर खास भाव आणत होते.

व्हाइट हाऊसमधील राजकीय स्तरावरच्या नियुक्त्या झालेले हे कर्मचारी आनंदी असण्याला एक कारण होतं. अनेक आठवडे ते दोलायमान अवस्थेत होते. त्यांचा बॉस निवडणुकांची वैधता नाकारत होता, पण त्यांना आपला कार्यकाळ संपल्याचं लक्षात आलं होतं. आता त्यांना उघडपणे स्वतःच्या भवितव्याविषयी नियोजन करणं शक्य होणार होतं. ते जवळपास खिदळत होते.

गडद रंगाचा सूट घातलेला एक कर्मचारी आधीच नियोजन करून तयार होता. तळमजल्यावरच्या पाम रूम या बैठकीच्या जागेत त्याला त्याचा एक सहकारी भेटला. "चल, भेटू मग नंतर," तो उजळ चेहऱ्याने म्हणाला. शपथविधी झाल्यानंतर भेटू, असं तो सुचवत होता. तोवर ते दोघेही व्हाइट हाऊसमधील नोकरीतून बाहेर पडलेले असतील. नंतर ते कुठे भेटतील, याबद्दल त्याने अंदाज बांधला. "ग्रीक बेटांवर किंवा दुसरं कुठेतरी भेटू, अशी आशा."

"होय, होय. नक्कीच," त्याचा सहकारी हसत म्हणाला. त्यांनी एकमेकांना टाळ्या दिल्या आणि ते आपापल्या वाटेने निघून गेले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)