जो बायडन यांचं भारताशी असलेलं नातं काय आहे?

जो बायडन, कमला हॅरिस, भारत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जो बायडन
    • Author, मुरलीधरन विश्वनाथन
    • Role, बीबीसी तामीळ प्रतिनिधी

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या कमला हॅरिस यांची नाळ भारतातील तामिळनाडू या राज्याशी जोडलेली आहे. मात्र, राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या जो बायडन यांचं तामिळनाडूशी काही नातं आहे?

डेमोक्रॅटीक पक्षाने जो बायडन यांना राष्ट्राध्यक्ष आणि कमला हॅरिस यांना उपराष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं. त्यावेळी लंडनच्या किंग्ज कॉलेजमधले व्हिझिटींग प्रोफेसर टीम वालासी- विलसे यांनी 'गेटवेहाऊस डॉट इन' या वेबसाईटवर प्रकाशित आपल्या लेखामध्ये जो बायडन यांचेही नातेवाईक चेन्नईत असू शकतात असे संकेत दिले होते.

आता, जो बायडन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. त्यामुळे टिम यांचा लेख चर्चेचा विषय ठरतो आहे.

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष असताना जो बायडन जुलै 2013 साली मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी, माझे पूर्वज या शहरात राहिले असं वक्तव्य केलं होतं. 2015 साली वॉशिंग्टन डीसीमध्ये केलेल्या एका भाषणात बायडन यांनी त्यांच्या पणजोबांचे वडील ईस्ट इंडिया कंपनीत कॅप्टन होते अशी माहिती दिली होती.

1972 साली सिनेटर म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना मुंबईतून लिहिण्यात आलेल्या एका पत्रात ही माहिती मिळाली होती.

जॉर्ज बायडन यांचं वंशज

ज्या व्यक्तीने त्यांना हे पत्र पाठवलं, त्यांचं नाव देखील 'बायडन' असल्याची माहिती जो बायडन यांनी दिली होती. त्यावेळी त्यांनी या पत्राकडे फारसं गांभीर्याने लक्ष दिलं नव्हतं. वॉशिंग्टनमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान, त्यांनी मुंबई शहरात बायडन आडनावाचे पाच लोक राहत असल्याची माहिती दिली होती.

पत्र

ईस्ट इंडिया कंपनीत कॅप्टन पदावर कार्यरत असलेल्या जॉर्ज बायडन यांचे ते वंशज असल्याची माहिती, त्यांनी दिली होती.

टिम विलासे यांनी आपल्या लेखात या सर्व संदर्भांची माहिती दिली आहे. टिम विलासे यांच्या माहितीनुसार, भारतात बायडन नावाच्या व्यक्तीचा रेकॉर्ड नाही. मात्र, ईस्ट इंडिया कंपनीत विलियन हेनरी बायडन आणि ख्रिस्तोफर बायडन नावाच्या दोन व्यक्तींनी काम केल्याचा उल्लेख ते करतात.

टिम विलासे यांच्या दाव्यानुसार, विलियन आणि ख्रिस्तोफर बायडन भाऊ-भाऊ होते. त्यांनी इंग्लंडहून चीनला जाणाऱ्या एका बोटीवर चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम केलं होतं.

भारताचा प्रवास

त्याकाळी दक्षिण अफ्रिकेच्या 'केप-ऑफ-गुड होप' ला वळसा घालून भारतात येणं अत्यंत जोखमीचं मानलं जायचं. मात्र, जोखमीसोबत या प्रवासात मोठा फायदा मिळत असे. त्यामुळे अनेकांना हा प्रवास करण्यात रस होता.

विलियन हेनरी बायडन पुढे जाऊन 'एना रॉबर्टसन' या बोटीचे कॅप्टन बनले. त्यानंतर त्यांनी गंगा आणि थालिया या बोटींवर कॅप्टन म्हणून काम केलं. 51 वर्षाचे असताना त्यांचं रंगूनमध्ये निधन झालं.

जो बायडन

ख्रिस्तोफर बायडन त्यांचे मोठे भाऊ. ते चेन्नईमध्ये रहात होते. या शहरात ते एक नावाजलेलं व्यक्तिमत्व होतं. 1807 मध्ये त्यांनी 'रॉयल जॉर्ज' नावाच्या बोटीवर काम करण्यास सुरूवात केली. त्यानंतर 1818 मध्ये त्यांना बोटीवर महत्त्वाचं पद देण्यात आलं.

साल 1821 मध्ये ख्रिस्तोफर बायडन 'प्रिन्सेस शेरले ऑफ वेल्स' या बोटीचे कॅप्टन बनले. त्यानंतर 'रॉयल जॉर्ज' चे कॅप्टन म्हणूनही त्यांनी काम केलं. 1819 मध्ये त्यांचं हैरिट फ्रीथ यांच्याशी लग्न झालं. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा होता.

मुंबई आणि कोलंबो

ख्रिस्तोफर बायडन 1830 साली 'प्रिन्सेस शेरले ऑफ वेल्स' चे कॅप्टन म्हणून निवृत्त झाले. लंडनजवळच्या ब्लॅकहीथ शहरात जाऊन ते राहू लागले. त्यांनी एक पुस्तकही लिहिलं होतं. 41 वर्षाचे असताना निवृत्त झालेल्या बायडेन यांनी 'व्हिक्ट्री' नावाची एक बोट विकत घेऊन मुंबई ते कोलंबो असा प्रवास केला होता.

'व्हिक्ट्री' नावाची बोट बायडेन यांच्यासाठी फायदेशीर ठरली होती किंवा नाही याबाबत काहीही माहिती उपलब्ध नाही. 'मार्कस केमडन' नावाच्या बोटीतून ते आपली पत्नी आणि मुलींसोबत चेन्नईला आले होते. या प्रवासादरम्यान त्यांची एक मुलगी आजारी पडून तिचा मृत्यू झाला.

जो बायडन, कमला हॅरिस, भारत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जो बायडन नात आणि मुलगा हंटर बायडन यांच्यासोबत

ख्रिस्तोफर बायडन चेन्नईला आल्यानंतर एका शिपींग इंडस्ट्रीत मॅनेजर म्हणून रूजू झाले. चेन्नईमध्ये 19 वर्षाच्या वास्तव्यात, बायडेन यांनी बोट सुरक्षा मुद्द्यांचे सल्लागार म्हणून काम केलं.

प्रवासादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या नाविकांच्या विधवा पत्नी आणि कुटुंबीयांसाठी त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम केले.

1846 मध्ये त्यांचा मुलगा होराटियो चेन्नईत दाखल झाला. चेन्नईच्या आर्टिलरी (दारूगोळा) विभागात तो कर्नल पदावर होता. ख्रिस्तोफर बायडेन यांचं 25 फेब्रुवारी 1858 साली चेन्नईमध्ये निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर सेंट जॉर्ज कॅथेड्रलमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या आठवणी प्रित्यर्थ सेंट जॉर्ज कॅथेड्रलमध्ये एक दगड ठेवण्यात आला आहे.

त्यानंतर, त्यांची पत्नी लंडनला परत गेली आणि 1880 पर्यंत तिथेच राहिली. त्यांची माहिती देणारी काही कागदपत्र केंब्रिज विद्यापीठात उपलब्ध आहेत. ख्रिस्तोफर बायडन यांच्या आणखी कोणत्या पत्नीची माहिती यात उपलब्ध नाही.

जो बायडन यांनी सांगितल्याप्रमाणे, भारतात कोणीही जॉर्ज बायडन नाहीत. टिम विलासे आपल्या लेखात लिहितात, जर बायडन यांचे कोणी पूर्वज असतील तर ते ख्रिस्तोफर बायडन यांच्याशी संबंधित असले पाहिजेत.

बीबीसीशी बोलताना टिम विलासे सांगतात, "काही वर्षांपूर्वी मी चेन्नईच्या सेंट जॉर्ज कॅथेड्रलमध्ये ठेवण्यात आलेल्या त्या दगडाचा फोटो घेतला होता. मी याचा विचार करत होतो की, त्यांच्या आणि जो बायडन यांचा काही संबंध असू शकतो का? त्यानंतर मला असं लक्षात आलं की, जो बायडन यांनी म्हटलं होतं की, त्यांचे पूर्वज इर्स्ट इंडिया कंपनीत कॅप्टन होते. त्यानंतर मी याबाबत आधिक माहिती गोळा करण्यास सुरूवात केली."

"खूप पुस्तकं आणि कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर मी या निर्कषाला पोहोचलो की, दोन व्यक्ती या वर्णनात योग्य बसतात. विलियम बायडन आणि ख्रिस्तोफर बायडन. ख्रिस्तोफर बायडन यांच्याबद्दल अभ्यास केल्यानंतर असं दिसून आलं की, त्यांच्या मनात भारत आणि भारतीयांबद्दल खूप आदर होता. त्यांना भारतात सम्मान मिळाला."

टिम म्हणतात, "जो बायडन यांना ख्रिस्तोफर बायडन यांचा अभिमान वाटू शकतो. त्यांच्या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला त्यांच्यातील माणूसकी दिसून येते. यावरून असं दिसून येतं की खराब राजकीय व्यवस्थेतही चांगले लोक होते. जो आणि ख्रिस्तोफर यांच्यात काहीही नातं असो, त्यांना त्यांचा अभिमान नक्कीच वाटू शकतो."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)