You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानात ब्लॅकआऊट, संपूर्ण देशातली बत्ती गुल
पाकिस्तानात शनिवारी (9 जानेवारी) रात्री उशिरा संपूर्ण देशाची बत्ती गुल झाली.
पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्रालयानं ट्वीटद्वारे दिलेल्या माहितीनुसार, पॉवर ट्रान्समिशन सिस्टमच्या फ्रिक्वेंसीमध्ये अचानक 50 ते 0 ने घट झाली आणि त्यामुळे देशव्यापी ब्लॅकाऊट झालं.
शनिवारी रात्री 11.41 वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे वीज गेल्याची घटना घडली, अशीही माहिती ऊर्जा मंत्रालयानं दिली.
पाकिस्तान सरकारकडून नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच, या वीज बिघाडाचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रियांनुसार, कराची, इस्लामाबाद, लाहोर, पेशावर, रावळपिंडीसह देशातील सर्वच प्रमुख शहरांमधील वीजपुरवठा बंद झाला होता.
आज मिळालेल्या माहितीनुसार, काही शहरांमधील वीजपुरवठा सुरू झाला आहे.
पाकिस्तानमधील वीजपुरवठा बंद पडल्याची बातमी आजूबाजूच्या देशांमध्ये पसरली आणि तिथेही चर्चा सुरू झाली. भारतात तर ट्विटरवर #Blackout हॅशटॅगच ट्रेंड होऊ लागला.
पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री शिबली फराज यांनी एनटीडीसीच्या यंत्रणेत बिघाड असल्याचं सांगितलं आणि दुरुस्ती करून वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही सांगितलं.
सुरुवातीला ऊर्जा मंत्रालयाकडून वीजपुरवठा कधी सुरू होईल, याबाबत काही सांगितलं जात नव्हतं. मात्र, काही वेळानं ऊर्जामंत्री अयुब खान यांनी सांगितलं की, माझ्या स्वत:च्या देखरेखीत काम सुरू आहे.
ऊर्जा मंत्रालयानं अयुब खान दुरुस्तीच्या कामाची पाहणी करत असतानाचा फोटोही ट्वीट केला.
सुरुवातीला शांतता राखण्याचं आवाहन करणाऱ्या ऊर्जा मंत्रालयानं नंतर सांगण्यास सुरुवात केली की, हळूहळू वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल आणि तसं कळवण्याच येईल.
रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ऊर्जा मंत्रालयानं माहिती दिली की, लकरच क्रमाक्रमानं वीज येण्यास सुरुवात होईल. त्यानंतर रात्री 1.45 वाजता एनटीडीसीच्या संगजनी आणि मर्दन ग्रीडमध्ये वीज आल्याची माहिती देण्यात आली.
त्यानंतर शाही बाग ग्रीड आणि बहरिया टाऊनमध्येही वीज आल्याची माहिती दिली गेली. त्याचसोबत, इस्लामाबाद इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीच्या ग्रीडमध्येही पुन्हा वीजपुरवठा सुरू झाल्याची माहिती देण्यात आली.
वीजपुरवठा खंडीत झाल्याच्या घटनेवर ट्विटरवर अनेक प्रतिक्रिया पाहण्यास मिळाल्या. काही चिंता व्यक्त करणाऱ्या होत्या, तर काही विनोदी सुद्धा होत्या.
त्यातल्याच काही निवडक प्रतिक्रिया :
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)