पाकिस्तानचं JF-17 थंडर विमान भारताच्या रफालला टक्कर देऊ शकेल का?

    • Author, सना आसिफ दार
    • Role, बीबीसी उर्दू, इस्लामाबाद

पाकिस्तानच्या वायूदलाने JF-17 या अत्याधुनिक लढाऊ विमानाच्या ब्लॉक थ्रीची तयारी सुरू केली आहे.

चीनच्या मदतीने बनवण्यात आलेली JF-17 बी विमानं नुकतीच पाकिस्तानला सोपवण्यात आली.

डबल सीटर JF-17 बी विमान पाकिस्तानच्या वायूदलात सहभागी करून घेण्यासाठी बुधवारी (30 डिसेंबर) एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याचवेळी JF-17 ब्लॉक थ्री विमानांचं उत्पादनही सुरू करण्यात आलं.

JF-17 बी विमानांचं वैशिष्ट्य काय?

पाकिस्तान वायू दलाचे प्रवक्ते अहमर रजा यांनी याबाबत बीबीसीला माहिती दिली.

ते सांगतात, "पाकिस्तान लष्करात समाविष्ट करण्यात आलेल्या नव्या JF-17 बी मॉडेल विमानात दोन सीट आहेत. त्यांचा वापर प्रामुख्याने प्रशिक्षणासाठी केला जाईल. या विमानाची क्षमता आधीच्या JF-17 विमानांसारखीच असेल.

नव्या विमानांमध्ये मिसाईल आणि रडारसुद्धा आधीच्याच विमानांसारखे आहेत. नव्या मॉडेलमध्ये फक्त एक सीट वाढवण्यात आली आहे. दुसरा पायलटसुद्धा आता या विमानात बसू शकेल. या विमानाचा वापर आम्ही प्रामुख्याने प्रशिक्षणासाठी करणार आहोत.

या विमानामुळे पाकिस्तानच्या वायू दलाची शक्ती वाढेल, असं तिथल्या लष्कराचं म्हणणं आहे. हे विमान प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी उपयुक्त आहेच, पण सर्व प्रकारच्या युद्ध मोहिमांमध्ये यांचा वापर केला जाऊ शकतो.

ब्लॉक-थ्री म्हणजे काय?

JF-17 बी लष्करात समाविष्ट करताना JF-17 थंडर विमानांच्या ब्लॉक थ्रीच्या कामाचंही उद्घाटन करण्यात आलं.

पाकिस्तान वायूदलाच्या माहितीनुसार JF-17 विमान सर्वात आधुनिक मॉडेल असेल. हे विमान वायू दलाच्या कारवाईत अत्यंत उपयुक्त ठरू शकेल.

JF-17 ब्लॉक-थ्री हे चौथ्या जनरेशनचे फायटर जेट असतील.

ब्लॉक थ्री ही JF-17 ची पुढची आवृत्ती आहे. यामध्ये नवे रडार लावण्यात येतील. या विमानांमध्ये नव्या आणि आधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर केला जाईल. मिसाईलही यामध्ये असतील. विमानामुळे पाकिस्तानची युद्धक्षमता ही प्रत्येक बाजूने आणखी सक्षम होईल.

ब्लॉक-थ्री विमानं येत्या एक ते दीड वर्षांत तयार होतील, असं प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.

ब्लॉक-थ्री प्रकारच्या JF-17 विमानात अॅक्टिव्ह इलेक्ट्रॉनिकली सेकेंड्री रडार असेल. अत्याधुनिक मिसाईल असतील. हवेतून जमिनीवर आणि हवेतून हवेत मारा करू शकणाऱ्या शस्त्रास्त्रांचा समावेश असणार आहे.

रफाल विमानांशी तुलना

JF-17 ब्लॉक थ्री विमानं भारताच्या रफाल विमानांपेक्षा उत्तम असतील, असा दावा केला जात आहे.

पाकिस्तान वायू दलाचे प्रवक्ते याबाबत म्हणतात, "रफाल विमानांच्या तुलनेत JF-17 वरचढ आहेत. ब्लॉक थ्री मध्ये अनेक गोष्टी रफालपेक्षा अधिक चांगल्या असतील. रफालला टक्कर देऊ शकेल, असं हे विमान आहे.

स्ट्रॅटजिक स्टडीज ऑफ एअर युनिव्हर्सिटीचे प्रमुख आदील सुल्तान यांच्या मते, "पूर्णपणे 100 टक्के असं म्हणता येणार नाही."

ते सांगतात, "आपण प्रत्येक गोष्टीची तुलना भारत-पाकिस्तानच्या संदर्भाने करतो. प्रत्येक विमानाचं वेगळं वैशिष्ट्य असतं. JF-17 ब्लॉक थ्री वर लावलेल्या मिसाईल्स आणि रडार रफालपेक्षा चांगले आहेत. त्यामुळे रफालपेक्षा ही विमानं चांगली आहेत, असं म्हटलं जाऊ शकतं.

पण विमानांची तुलना करत असताना ते तयार करताना लागणारा वेळ आणि इतर गोष्टीही पाहायच्या असतात.

JF-थंडरची वैशिष्ट्ये काय?

निवृत्त एअर मार्शल मकसूद अख्तर यांनी पाकिस्तानच्या JF-17 बी विमानांचं महत्त्व समजावून सांगितलं. निर्यात करण्याच्या दृष्टीकोनातून ही विमानं खूप महत्त्वाची ठरू शकतात.

आम्ही कोणत्याही विमानांबद्दल सांगायचो, तेव्हा प्रशिक्षणासाठी दोन सीट असावेत, असं आम्हाला सांगितलं जायचं. नवी विमानं त्याच पद्धतीने बनवण्यात आली आहेत.

इतर देशांना विकण्यासाठी बनवण्यात आलेल्या विमानांचं प्रदर्शनही बुधवारच्या कार्यक्रमात लावण्यात आलं होतं.

हे विमान पाकिस्तान स्वतः बनवत असल्यामुळे त्यांच्यासाठी याचं महत्त्व खूप जास्त आहे. चीनच्या मदतीने त्यांनी हे विमान बनवण्याची क्षमता विकसित केली. तज्ज्ञांच्या मते हे विमान बहुआयामी, हलकं आणि फोर्थ जनरेशनचं एअर क्राफ्ट आहे.

विमानाची निर्मिती, अपग्रेडेशन आणि ओव्हरहॉलिंग इत्यादी गोष्टी पाकिस्तानमध्येच होईलल.

JF-17 थंडर विमान F-16 प्रमाणेच कमी वजनाचं आणि कोणत्याही हवामानात जमीन आणि हवेतून मारा करू शकणारं बहुआयामी विमान आहे.

हे विमान लांबच्या अंतरावर मारा करणाऱ्या मिसाईलसुद्धा बसवण्यात आलेले आहेत. याच क्षमतेचा उपयोग करून JF-17 थंडर विमानाने बालाकोट घटनेनंतर भारताचं मिग विमान पाडलं होतं.

या मिसाईलची मारक क्षमता 150 किलोमीटर असल्याचं सांगितलं जातं. हे मिसाईल चित्रपटात दाखवल्याप्रमाणे आपल्या लक्ष्याचा पाठलाग करतात.

JF-17 विमानांवर काम कधी सुरू झालं?

या विमानांची कहाणी 1995 ला सुरू झाली. त्यावेळी पाकिस्तान आणि चीनदरम्यान एक करार झाला होता.

विमानाची पहिली चाचणी 2003 मध्ये झाली. त्यानंतर पाकिस्तानी वायू दलाने 2010 मध्ये पहिल्यांदाच हे विमान आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतलं होतं.

मिग विमान बनवणारी रशियन कंपनी मिकोयानसुद्धा या उपक्रमात सहभागी झाली. मिराज, एफ-7 आणि ए-5 या विमानांच्या ठिकाणी JF-17 थंडर लष्करात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

पाकिस्तानच्या JF-17 बी विमानाच्या एंट्रीची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.

सोशल मीडियावर या विमानांचं खूप कौतुक होताना दिसत आहे.

मित्रां अय्यूब नामक एका व्यक्तीने JF-17 चा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

"गाढ झोप घ्या. पाकिस्तानी हवाईदल आपल्या सुरक्षेसाठी जागं आहे," असं ते म्हणाले.

JF-17 विमान ही राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण बाब आहे. यामुळे आपण अधिक शक्तिशाली बनलो आहोत, असं शेन एव्हन यांनी म्हटलं.

पाकिस्तानची शक्ती कमी लेखण्याचा प्रयत्न करू नका, असं झरून नामक वापरकर्त्याने म्हटलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)