मेलबर्नमध्ये टीम इंडिया अजिंक्य; ऑस्ट्रेलियावर 8 विकेट्सनी विजय

आठवडाभरापूर्वी 36 धावात गारद होण्याचं भूत मानगुटीवर उतरवत भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत ऐतिहासिक विजय साकारला. भारतीय संघाने चौथ्या दिवशी 8 विकेट्सनी विजय साजरा केला.

मेलबर्न क्रिकेट मैदानावरचा भारतीय संघाचा हा चौथा विजय आहे.

भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियातला हा आठवा विजय आहे. या दमदार विजयासह भारतीय संघाने अॅडलेड पराभवाची परतफेड करत बॉर्डर-गावस्कर मालिकेत 1-1 बरोबरी केली आहे. शतकी खेळी साकारणाऱ्या अजिंक्य रहाणेला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 200 विकेट्स गुंडाळल्यानंतर भारतीय संघाला 70 धावांचे लक्ष्य मिळालं. मयांक अगरवाल आणि चेतेश्वर पुजारा झटपट बाद झाले. मात्र पदार्पणावीर शुभमन गिल आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी कोणतीही पडझड होऊ न देता दिमाखदार विजय साकारला. गिलने 35 तर रहाणेने 27 धावांची खेळी केली.

कशी जिंकली कसोटी

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. अजिंक्य रहाणेचे आक्रमक नेतृत्व आणि त्याला सर्वच गोलंदाजांनी दिलेली साथ यामुळे भारतीय संघाने पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव 195 धावांत गुंडाळत मॅचवर घट्ट पकड मिळवली.

जसप्रीत बुमराहने 4 तर रवीचंद्रन अश्विनने 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजने पदार्पणात प्रतिभेची चुणूक दाखवताना दोन विकेट्स घेतल्या.

रहाणेची दिमाखदार शतकी खेळीऑस्ट्रेलियाच्या चांगल्या बॉलिंगसमोर भारतीय संघाची एकाक्षणी 64/3 अशी अवस्था होती. मात्र तंत्रशुद्ध कौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अजिंक्य रहाणेने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत भारतीय संघाला संकटातून बाहेर काढलं.

अजिंक्यने आधी ऋषभ पंत आणि नंतर रवींद्र जडेजासह महत्त्वपूर्ण भागीदारी केली. चांगल्या गोलंदाजीसमोर, आव्हानात्मक खेळपट्टीवर फलंदाजी कशी करावी याचा वस्तुपाठ सादर करत रहाणेने 112 धावांची खेळी केली. जडेजाने 57 धावा केल्या.

दमदार सांघिक प्रदर्शनअनुभवी गोलंदाज उमेश यादव दुखापतग्रस्त होऊनही भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 200 धावांतच गुंडाळला. मोहम्मद सिराजने 3 तर जसप्रीत बुमराह, रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. यावरून भारतीय गोलंदाजांचं वर्चस्व दिसून येतं. रहाणेने या डावातही आक्रमक नेतृत्व करताना गोलंदाजांना साथ दिली.

हा विजय खास का?

प्रतिष्ठेच्या अशा बॉर्डर-गावस्कर मालिकेतल्या पहिल्या मॅचमध्ये 36 धावात ऑलआऊट झाल्याने भारतीय संघाला नामुष्कीला सामोरं जावं लागलं होतं. भारतीय संघाची कसोटीतली ती नीचांकी धावसंख्या होती.

कसोटीवर चांगली पकड मिळवलेली असताना अवघ्या एका तासात भारताची फलंदाजी पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली होती. मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय फलंदाज निरुत्तर ठरले होते.

कोणाला काही कळायच्या आत भारतीय संघ अवघ्या 36 धावात गारद होऊन परतला होता. नीचांकी धावसंख्येवर गुंडाळल्यानंतर भारतीय संघाने डे-नाईट कसोटी गमावली. वनडे आणि ट्वेन्टी-20च्या आक्रमणामुळे भारतीय फलंदाजांना कसोटी प्रकारासाठी लागणारं तंत्रकौशल्य नाही अशी टीका झाली होती.

अंतिम अकराच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. 36 धावांत खुर्दा उडाल्यानंतर कोणत्याही संघातील खेळाडूंचं खच्चीकरण होऊ शकतं. मात्र भारतीय संघव्यवस्थापनाने भारतीय खेळाडूंचं तसं होणार नाही याची काळजी घेतली. अॅडलेड कसोटीत झालेल्या चुका टाळण्यासाठी सखोल सत्र आयोजित करण्यात आले.

पॅटर्निटी लिव्हवर जात असल्यामुळे मेलबर्न कसोटीत भारताचा आधारस्तंभ विराट कोहली खेळत नाहीये. प्रमुख फलंदाज आणि कर्णधार नसतानाही भारतीय संघाने विजयाचा पराक्रम केला आहे.

कोहलीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि ऑस्ट्रेलियात धावा करायला आवडतात. मात्र विराटची पत्नी अनुष्का गरोदर आहे. प्रसूती काळात तिच्याबरोबर राहता यावं यासाठी विराट मायदेशी परतला आहे.

अॅडलेड कसोटीत भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या हाताला दुखापत झाली. पॅट कमिन्सचा चेंडू हातावर आदळल्याने शमीच्या हाताला फ्रॅक्चर झालं. यामुळे शमी उर्वरित मालिकेत खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. विकेट्स पटकावणं आणि धावा रोखणं या दोन्ही आघाड्यांवर वाकबगार शमीचं नसणं भारतीय संघासाठी मोठा धक्का होता.

मेलबर्न कसोटीसाठी भारतीय संघात दोन बदल होणं क्रमप्राप्त होतं. विराट कोहली आणि मोहम्मद शमी या कसोटीसाठी नसतील हे स्पष्ट झालं होतं. मात्र भारतीय संघाने आणखी दोन बदल केले.

यामुळे अॅडलेड ते मेलबर्न या संक्रमणात भारतीय संघात चार घाऊक बदल झाले. सलामीवीर पृथ्वी शॉऐवजी शुभमन गिलला पदार्पणाची संधी देण्यात आली.

विकेटकीपर वृद्धिमान साहाऐवजी ऋषभ पंतला समाविष्ट करण्यात आलं. विराट कोहलीच्या ऐवजी राहुलला संधी मिळेल अशी चिन्हं असताना भारतीय संघाने अष्टपैलू रवींद्र जडेजाला समाविष्ट केलं.

शमीऐवजी मोहम्मद सिराजला पदार्पणाची संधी देण्यात आली. एवढे बदल होऊनही भारतीय संघाच्या खेळण्यात आणि जिंकण्यासाठीच्या प्रयत्नात बदल झाला नाही. भारतीय संघाने नेहमीच्या त्वेषाने खेळ करत बाजी पलटवली.

इशांत शर्मा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि या सामन्यात उमेश यादवही दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय संघाने अश्विन-जडेजा-बुमराह आणि सिराज अशा आक्रमणासह सामना जिंकला.

अजिंक्यची कर्णधार म्हणून विजयी हॅट्ट्रिकविराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने याआधी दोन कसोटीत भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. धरमशाला, बेंगळुरू आणि मेलबर्न अशा तिन्ही कसोटीत रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विजय मिळवला. रहाणेचं नेतृत्व भारतीय संघासाठी फलदायी ठरलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)