You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : लग्नाला 20 जणांना परवानगी, जमले 10 हजार वऱ्हाडी
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मोठ्या सभा-समारंभांना परवानगी दिली जात नाहीय. लग्नांमध्ये सुद्धा किती पाहुणे असावेत याची मर्यादा आखण्यात आलीय.
यामुळे शेकडो पाहुण्यांच्या उपस्थितीत होणारे लग्न समारंभ आता जास्तीत जास्त 50 पाहुण्यांच्या हजेरीत होताना दिसतायेत. अगदी जवळचे असे नातेवाईक केवळ उपस्थित राहतात.
मात्र, मलेशियात एका जोडप्याच्या लग्नात झालेला गोंधळ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलाय. या लग्नात केवळ 20 पाहुण्यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, उपस्थित किती राहिले? तर तब्बल 10 हजार पाहुणे!
आता तुम्हाला वाटू शकतं की, 10 हजार पाहुणे म्हणजे कायद्याची पार पायमल्लीच केली असेल. पण तसं नाहीय. या हजारो पाहुण्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळूनच समारंभात सहभाग नोंदवला.
मलेशियातल्या टेंकू मोहम्मद हाफिज आणि ओसियाने अलाहिया या जोडप्याचं हे लग्न होतं.
गाड्यांचा ताफा
हे नवविवाहित जोडपं मलेशियाची राजधानी क्वालालंपूरच्या दक्षिणेकडील पुत्राजायमध्ये एका सरकारी भव्य इमरातीबाहेर उभे राहिले. त्यानंतर एका एका कारमधून पाहुणे येत गेले आणि या जोडप्याला आशीर्वाद देऊ लागले.
एकाही पाहुण्याने कारच्या बाहेर पाऊल ठेवला नाही. वधू-वराच्या जवळ कार आल्यानंतर कारचा वेग कमी केला जाई आणि काचा खाली करून कारमधूनच आशीर्वाद दिले जात होते. या जोडप्यानेही दुरूनच आशीर्वाद, सदिच्छा स्वीकारल्या आणि आभार मानले.
अशाप्रकारे कारमधूनच आशीर्वाद देत असल्याने रस्त्यावर गाड्यांचा मोठा ताफा दिसत होता. मात्र, यामुळे सोशल डिस्टन्सिंगचं योग्य ते पालन करण्यात यश आलं.
पंगती बसल्या की नाही?
आता कुणी लग्न समारंभात आलंय म्हटल्यावर जेवणा-खावणाचा प्रश्न आलाच. मग या लग्नात जेवणाचं काय नियोजन करण्यात आलं होतं?
या लग्नात 10 हजार पाहुण्यांना जेवणही देण्यात आलं आणि त्यावेळीही नियमांचं काटेकोर पालन करण्यात आलं.
मलेशियातील माध्यमांच्या वृत्तानुसार, जेव्हा पाहुण्यांच्या गाड्या जोडप्याला आशीर्वाद देऊन पुढे निघत होत्या, तेव्हा पुढे आधीच तयार करण्यात आलेले जेवणाचे पॅकेट्स त्यांना दिले जात होते. कारच्या खिडकीतूनच पाहुणे जेवणाचे पॅकेट्स घेत होते.
या 10 हजार पाहुण्यांना जोडप्याला आशीर्वाद देऊन इमारतीतून बाहेर पडण्यासाठी साधारण तीन तासांचा अवधी गेला.
हे नवविवाहित जोडपं कोण आहे?
ज्याप्रकारे या लग्नाची एकूण पद्धत नेहमीसारखी नव्हती, तसंच हे नवविवाहित जोडपंही सर्वसामान्य नव्हतं.
टेंकू मोहम्मद हाफिजचे वडील टेंकू अदनान हे मलेशियातील मोठे राजकीय नेते आहेत आणि माजी केंद्रीय मंत्रीसुद्धा आहेत.
त्यांनीच मुलाच्या लग्नाचे फोटो फेसबुकवर शेअर केले आणि लिहिलं की, "मला सांगितलं गेलंय की, इथं सकाळी दहा हजार कार पोहोचल्या आहेत. मी आणि माझे कुटुंबीय या उपस्थितीने भारावून गेलो आहोत. आताच्या स्थितीला समजून सर्व नियमांचे पालन करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानतो."
दरम्यान, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी टेंकू अदनान हे पाच लाख डॉलर (3 कोटी 68 लाख रुपये) च्या भ्रष्टाचारप्रकरणी दोषी आढळले. त्यांना दंडासह 12 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलीय.
मलेशिया कोरोनाच्या नव्या लाटेचा सामना करतोय. आतापर्यंत मलेशियात कोरोनाचे 92 हजार रुग्ण आढळले असून, 430 जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)