2020 हे जगाच्या इतिहासातलं आतापर्यंतचं सगळ्यांत वाईट वर्ष आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
आपल्या आतापर्यंतच्या आयुष्यात सध्याचं वर्ष अतिशय आव्हानात्मक होतं. अनेक अडचणी, निराशा यांनी भरलेलं हे वर्ष होतं.
कोरोना संकटामुळे 2020 हे वर्ष लोकांना कायम स्मरणात राहील. आतापर्यंतचं सर्वांत वाईट वर्ष म्हणून हे वर्ष आगामी कित्येक वर्षांत ओळखलं जाऊ शकतं. पण इतिहासात अशी अनेक वर्षे येऊन गेली आहेत. त्यांच्या तुलनेत सध्याचा काळ इतकाही वाईट म्हणावा असा नाही.
2020 मध्ये कोव्हिड-19 ने झालेले मृत्यू
जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार 17 डिसेंबर 2020 पर्यंत जगभरात 7.45 कोटी जणांना कोरोनाची लागण झाली. आतापर्यंत जगभरात 16 लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पण जगातली ही सर्वांत मोठी साथ नाही. यापेक्षाही वाईट साथीच्या संकटांना जगाने तोंड दिलं आहे.
या सगळ्या साथीच्या रोगांमध्ये ब्लॅक डेथचं नाव समाविष्ट आहे. युरोपात या 1346 सालात या साथीला सुरुवात झाली. त्यानंतर या आजाराने युरोपात अडीच कोटी तर जगभरात 20 कोटी जणांचा मृत्यू झाला.
स्पॅनिश आणि पोर्तुगीज प्रवासींमुळे 1520 सालादरम्यान अमेरिकेत देवी रोग पसरला. यामुळे अमेरिकेतील मूळ निवासींपैकी 60 ते 90 टक्के नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पहिल्या महायुद्धातून परतणाऱ्या सैनिकांमुळे 1918 मध्ये स्पॅनिश फ्लू पसरला. त्या काळात स्पॅनिश फ्लूमुळे पाच कोटी मृत्यू झाले. हा आकडा त्यावेळच्या जगाच्या लोकसंख्येच्या तीन ते पाच टक्के होता.
तसंच 1980 पासून सुरू झालेल्या एड्स या रोगाने आतापर्यंत 3.2 कोटी लोकांचा जीव घेतला आहे.
2020 मध्ये अनेकांनी आपली नोकरी गमावली
कोरोना साथीमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. जगभरातील लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. अनेकांच्या तोंडचा घास या साथीने पळवला.
पण जगातील सध्याचा बेरोजगारीचा दर इतकाही वाईट नाही. 1929 ते 1933 दरम्यान आतापर्यंतची सर्वांत मोठी मंदी होती. 1933 हे वर्ष बेरोजगारीच्या बाबतीत सर्वांत वाईट वर्ष मानलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
जर्मनीत तीनपैकी एक व्यक्ती त्यावेळी बेरोजगार होता. याच परिस्थितीत लोकांना आकर्षित करणारी आश्वासनं देणाऱ्या अडॉल्फ हिटलर यांचा उदय झाला होता.
आप्तस्वकियांचा विरह
या वर्षातला सर्वाधिक काळ आपण घरातच घालवला ही वस्तुस्थिती आहे. आपण आपल्या आप्तस्वकियांना भेटू शकलो नाही. पण इ. स. 536 मध्येही बहुतांश लोक आपल्या घरातून बाहेर पडू शकले नव्हते.
हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीमधील मध्यकालीन इतिहास विषयाचे तज्ज्ञ मायकल मॅककॉर्मिक यांच्या मते, "युरोप, मध्य-पूर्व आणि आशियातील बहुतांश परिसरात एक गूढ धुकं सलग 18 महिने कायम पसरलेलं असायचं.
तो त्यावेळचा सर्वांत वाईट काळ होता. गेल्या 2300 वर्षातील सर्वांत थंड दशकाची ती सुरुवात होती. पीके उद्धस्त झाली होती. लोक भूकेने मरत होते.

फोटो स्रोत, Getty Images
शक्यतो आईसलँड किंवा उत्तर अमेरिकेत झालेल्या ज्वालामुखीच्या विस्फोटामुळे हे झालेलं असू शकतं. संपूर्ण उत्तर गोलार्धात याचे परिणाम दिसून आले होते.
ज्वालामुखीतून बाहेर पडलेला धूर थंड हवेच्या माध्यमातून युरोप आणि पुढे आशियात पसरल्याचंही मानलं जातं.
2020 मध्ये लोकांना टॉयलेट पेपर जमा करण्यास भाग पडलं होतं. पण आपल्याकडे टॉयलेट पेपर तरी होतं. पण तो काळ आठवा, जेव्हा रोममध्ये शौच प्रक्रियेनंतर स्वच्छतेसाठी स्पंज लावलेल्या दंडुक्याचा वापर केला जात असे.
2020 मध्ये आपण सुट्टीवर जाऊ शकलो नाही
पर्यटनाच्या दृष्टीने 2020 हे वर्ष अत्यंत वाईट ठरलं आहे. पण आपल्या पूर्वजांबाबत एकदा विचार करा.
1 लाख 95 हजार वर्षांपूर्वी मानवाला प्रवास करताना किती अडचणी येत होत्या. त्या काळात दहा हजार वर्षांपर्यंत थंडी आणि दुष्काळ असायचा. या कालावधीला मरीन आयसोटोप स्टेज 6 असं म्हटलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन ओरिजीन पुरातत्व विषयाचे प्राध्यापक कर्टिस मरीन यांच्या मते, या काळात पडणाऱ्या दुष्काळाने आपल्या प्रत्येक प्रजातीला नष्ट केलं होतं. त्यावेळी फक्त आफ्रिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरचीच मानव प्रजात वाचू शकली होती. या भागाला गार्डन ऑफ इडन नावाने ओळखलं जातं. याठिकाणी मानवाने समुद्री भोजनाच्या साहाय्याने गुजराण केली.
2020 मध्ये पोलिसांची क्रूरताही लक्षात राहील
अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूनंतर पोलिसांची क्रूरता चव्हाट्यावर आली. दुर्दैवाने ही काय नवी गोष्ट नाही. 1992 च्या एप्रिल महिन्यात लॉस एंजिलिस मध्ये चार श्वेतवर्णीय पोलिसांना एका कृष्णवर्णीय वाहनचालकाच्या हत्येप्रकरणी निर्दोष मुक्त केल्यानंतर दंगल उसळली होती.

फोटो स्रोत, Getty Images
यानंतर अनेक दिवस हिंसा होत राहिली. त्यामध्ये 54 जणांचा मृत्यू झाला. शहराचं एक बिलियन डॉलरचं नुकसान झालं होतं. लॉस एंजिलिसच्या दक्षिण-मध्य भागात आणीबाणी लागू करावी लागली होती.
बैरुत स्फोट
लेबनॉनची राजधानी बैरुत शहरातील एका बंदरात 4 ऑगस्टला एक स्फोट झाला. यामध्ये 2750 टन अमोनियम नायट्रेट चुकीच्या पद्धतीने साठवून ठेवण्यात आलं होतं. या स्फोटात 190 जणांचा मृत्यू झाला. तर 6 हजारपेक्षा जास्त जण जखमी झाले.
तज्ज्ञांच्या मते, आजपर्यंतच्या इतिहासात हा सर्वांत मोठा बिगर-आण्विक स्फोट होता. हा TNT एक किलो टनच्या बरोबरीचा होता. म्हणजेच हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बचा 20वा भाग.
पण डिसेंबर 1984 मध्ये भारताच्या भोपाळ शहरात केमिकल कारखान्यात झालेल्या वायूगळतीला कोण विसरू शकतं. आधुनिक इतिहासात ती सर्वात मोठी औद्योगिक दुर्घटना मानली जाते.
या अपघातात 3500 जणांचा काही दिवसांत मृत्यू झाला तर त्यानंतर काही वर्षांनी 15 हजार लोक फुफ्फुसांच्या आजारांनी मृत्यूमुखी पडले, अशी माहिती भारत सरकारने दिली आहे. वर्षानुवर्षे या वायूगळतीचे परिणाम दिसून येत होते.

फोटो स्रोत, Getty Images
वणव्यात कोट्यवधी प्राणी मृत्युमुखी
यावर्षीच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियातील जंगलात वणवा लागला होता. डिसेंबरच्या अखेरीस त्याची सुरुवात झाली होती.
या वणव्यात तीन बिलियन प्राणी वणव्यामुळे मारले गेले. तसंच 33 लोकही आगीत मृत्युमुखी पडले.
या आगीमुळे ऑस्ट्रेलियातील वन्यजीवन उद्ध्वस्त झाल. जंगलातील वणव्याने प्राण्यांच्या अधिवासावरही परिणाम झाला. यामध्ये लाखो सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, सर्प आणि बेडूक यांच्यासारख्या जीवांचं प्रचंड नुकसान झालं.
पण 1923 च्या सप्टेंबर महिन्यात जपानमध्ये आलेल्या भूकंपात 1 लाख 40 हजार जणांचा मृत्यू झाला होता. ही आकडेवारीच भय निर्माण करणारी आहे. ते चित्र किती विदारक असेल, विचार करा.

फोटो स्रोत, Getty Images
2020 मधल्या सकारात्मक गोष्टी
अनेक अर्थांनी 2020 हे वर्ष आव्हानात्मक राहिलं. पण या वर्षात काही चांगल्या गोष्टीही घडताना दिसल्या. या वर्षातील सकारात्मक गोष्टींचा ठेवा आपण येत्या काळात पाहू शकतो.
या वर्षात महिलांचं राजकारणातलं प्रतिनिधीत्व वाढलं. महिलेकडून नेतृत्व केलं जात असलेल्या देशांची संख्या यावर्षी वाढली. 1995 मध्ये अशा देशांची संख्या 12 होती. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार संसदेत महिलांचं प्रतिनिधीत्व 2020 मध्ये वाढलं आहे. हे आता 25 टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे.
कमला हॅरीस यांच्या रुपाने पहिल्यांदाच एक महिला अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून आली. या पदापर्यंत पोहोचणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय दक्षिण आशियाईसुद्धा आहेत.
जगभरात वांशिक भेदभावाविरुद्ध आंदोलनं झाली. जगाने यामध्ये सहभाग नोंदवला, ही भविष्यासाठी सकारात्मक बाब आहे.
पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून अनेक कंपन्यांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचं आश्वासन दिलं.
नासाने ऑक्टोबर महिन्यात चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाणी उपलब्ध असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे भविष्यातील मोहिमांना मदत मिळू शकते.
पण यावर्षात कोव्हिड साथीने आपल्याला खूप काही शिकवण दिलं. यात सर्वांत महत्वाची शिकवण म्हणजे स्वच्छता. आता लोक वेळोवेळी हात धुताना दिसून येतात, हे विशेष.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








