सायबर हल्लाः अमेरिकेच्या ऊर्जा विभागावर आजवरचा सर्वात मोठा सायबर हल्ला

सायबर हल्ला, अमेरिका

फोटो स्रोत, iStock

अमेरिकेच्या ऊर्जा विभागावर सायबर हल्ला झाला आहे आणि हा हल्ला आतापर्यंतच्या कुठल्याही सायबर हल्ल्यापेक्षा मोठा असल्याचं अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने सांगितलं आहे.

अमेरिकेच्या अण्वस्त्रांची देखरेख ही या विभागाची मुख्य जबाबदारी आहे. मात्र, हॅकिंगचा शस्रास्त्र गोदामावर कुठलाही परिणाम झाला नसल्याचंही विभागाने स्पष्ट केलं आहे.

दुसरीकडे मायक्रोसॉफ्ट या टेक कंपनीनेदेखील आम्हाला आमच्या सिस्टिममध्ये धोकादायक सॉफ्टवेअर सापडल्याचं सांगितलं.

रशियाने हा हल्ला केला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. रशियाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

सायबर हल्ला, अमेरिका

फोटो स्रोत, Reuters

गेल्या रविवारी अमेरिकेच्या कोषागार आणि वाणिज्य विभागावर सायबर हल्ला झाल्याची माहिती उघड झाली होती. जवळपास महिनाभरापासून हा हल्ला सुरू होता आणि रविवारी त्याची माहिती मिळाल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं.

दरम्यान, या सायबर हल्ल्यावर राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी अजूनतरी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मार्च 2020 मध्ये सुरू झाला सायबर हल्ला

दुसरीकडे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सायबर सुरक्षेला बायडन प्रशासन सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचं म्हटलं आहे.

बायडन म्हणाले, "सर्वात आधी विरोधकांना सायबर हल्ला करण्यापासून रोखायला हवं. आम्ही हे करू आणि याला आमचं प्राधान्य असणार आहे. अशाप्रकारचे हल्ले करणाऱ्यांना मोठी नुकसान भरपाई द्याावी लाागेल. शिवाय, अमेरिकेच्या सहकारी आणि मित्र राष्ट्रांशी चर्चा करून एकत्रितपणे हे लागू करण्यात येईल."

सायबर सिक्युरिटी इन्फ्रास्ट्रक्चर एजन्सी (सीसा) ही अमेरिकेची सर्वोच्च सायबर एजन्सी आहे. गुरुवारी या हल्लाविषयी बोलताना 'हा हल्ला परतवून लावणं अत्यंत क्लिष्ट आणि आव्हानात्मक असेल', असं सीसाने म्हटलं आहे.

अमेरिकेतील रशियन दूतावास

फोटो स्रोत, EMBASSY OF RUSSIA IN THE USA

फोटो कॅप्शन, अमेरिकेतील रशियन दूतावास

या हल्ल्यामुळे 'महत्त्वाच्या पायाभूत स्ट्रक्चरचं नुकसान' झाल्याचं सीसाने सांगितलं. तसंच या सायबर हल्ल्यामुळे फेडरल एजंसी आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांच्या सुरक्षेलाही बाधा पोहोचली. या नुकसानीमुळे 'गंभीर धोके' निर्माण झाल्याचं सीसाचं म्हणणं आहे.

मार्च 2020 मध्येच हॅकिंग सुरू झालं होतं, असंही सीसाने सांगितलं. मात्र, या हल्ल्यात कोणती माहिती चोरण्यात आली, याचा अजून पत्ता लागलेला नाही. 'मालवेअरमुळे केवळ बिझनेस नेटवर्कचं नुकसान झाल्याचं' प्रवक्त्या शायलीन हायन्स यांनी म्हटलं आहे.

अण्वस्त्राची सुरक्षा करणाऱ्या नॅशनल न्युक्लिअर सिक्युरिटी अॅडमिनिस्ट्रेशन म्हणजेच NNSA च्या सुरक्षा ऑपरेशन्सचं कुठलंही नुकसान झालं नसल्याची माहितीही त्यांनी दिली .

बीबीसी सिक्युरिटी प्रतिनिधी गॉर्डन कोरेरा यांचे विश्लेषण

"कुणा-कुणावर हा सायबर हल्ला झाला, याची यादी मोठी आहे आणि ती वाढतेच आहे. अनेक सरकारी विभागांसोबतच खाजगी कंपन्या आणि संस्थासुद्धा त्यांच्या सिस्टिमवर हल्ला झाला आहे का आणि असल्यास कोणती माहिती चोरली गेली, याचा तपास करत आहेत. या संपूर्ण तपासासाठी अनेक महिने लागू शकतात."

"या हल्ल्याचा अवाका खूप मोठा असू शकतो. मात्र, या हॅकिंगचा परिणाम काय होईल, याची नेमकी माहिती या क्षणाला कुणालाही नाही. सिस्टिम डॅमेज करण्यासाठी हा हल्ला केल्याचं सध्यातरी वाटत नाही आणि म्हणूनच हेरगिरीचं हे एक क्लासिक उदाहरण ठरू शकतं. ज्यात माहिती टार्गेट करून चोरण्यात आली. पुढच्या तपासातच अधिक माहिती स्पष्ट होईल."

"अमेरिकेसाठी ही परिस्थिती थोडी अधिक गुंतागुंतीची असण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे स्वतः अमेरिका अशा प्रकारची हेरगिरी करते आणि यावेळी सुरक्षेच्या बाबतीत अमेरिका कमी पडली. त्यांना हॅकरचा शोधही घेता आला नाही आणि हँकिंग थांबवताही आलं नाही."

हँकिंगविषयी

सध्या बरीच माहिती मिळाली नसली तरी जी काही माहिती हाती लागली आहे ती चिंता वाढवणारी असल्याचं नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलं आहे.

हॅकर्सने टेक्सासमधल्या सोलरविंड या आयटी कंपनीच्या नेटवर्क मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचा वापर करून कॉम्प्युटर नेटवर्क तोडल्याचं सीसाचं म्हणणं आहे.

सोलरविंडच्या 10 हजार ग्राहकांनी हॅकर्सने मालवेअर टाकलेलं अपडेट डाउनलोड केलं. या आठवड्याच्या सुरुवातीलाच अमेरिकेच्या एजंसीना सोलरविंड अनइन्स्टॉल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

मात्र, सोलरविंड व्यतिरिक्त हॅकर्सने इतर काही पद्धतीचा वापर करून डेटा चोरला का, याचाही सीसा तपास करतेय.

सायबर हल्ला, अमेरिका, जो बायडन

फोटो स्रोत, Reuters

दुसरीकडे आपल्या 40 ग्राहकांवर सायबर हल्ला झाल्याचं मायक्रोसॉफ्टचं म्हणणं आहे. यात सरकारी एजंसी, थिंक टँक, बिगर-सरकारी संस्था आणि आयटी कंपन्यांचा समावेश आहे. यातले 80% ग्राहक अमेरिकी आहेत. अमेरिकेव्यतिरिक्त कॅनडा, मॅक्सिको, स्पेन, यूके, इस्रायल आणि बेल्जिअमचाही यात समावेश आहे.

'हल्ल्याची व्याप्ती आणि परिणाम बघता हा हल्ला उल्लेखनीय म्हणावा लागेल', असं मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष ब्रॅड स्मिथ यांनी म्हटलं आहे. हा सामान्य सायबर हल्ला नाही. या हल्ल्याने केवळ अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगासाठी गंभीर तांत्रिक त्रुटींची शक्यता उघड केल्याचं ते म्हणाले.

एफबीआय आणि सीसा यांनी सार्वजनिकरित्या कुणावरही संशय व्यक्त केला नसला तरी या सायबर हल्ल्यामागे रशियाचा हात असावा, असं वृत्त अमेरिकेतल्या अनेक वृत्तपत्रांनी काही अधिकाऱ्यांच्या हवाल्याने छापलं आहे.

अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने या सायबर हल्ल्यामागे रशियाचा कोजी बिअर किंवा APT-29 हे हॅकिंग ग्रुप असल्याचा संशय व्यक्त केला आहे. याच हॅकिंग ग्रुपने बराक ओबामा यांच्या कार्यकाळात राज्य विभाग आणि व्हाईट हाऊसचे ई-मेल हॅक केले होते, असंही वृत्तपत्राने म्हटलं आहे.

मात्र, सोमवारी रशियाच्या अमेरिकेतील उच्चायुक्तालयाने सोशल मीडियावर एक पत्रक प्रसिद्ध करत अशाप्रकारच्या कुठल्याही आरोपाचं खंडन केलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)