डोनाल्ड ट्रंप : राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतर जेलमध्ये जाऊ शकतात?

0
भाजप+
0
राजद+
0
इतर

सर्व निकाल

भाजप+
राजद+
इतर
निकाल नाही

सर्व मतदारसंघ

डोनाल्ड ट्रंप

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे निकाल लागले आहेत आणि अमेरिकन जनतेने जो बायडन यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड केली आहे.

डोनाल्ड ट्रंप यांना अध्यक्षपदाची दुसरी संधी मिळाली नाही. पण त्यांच्याठी हा केवळ निवडणुकीतला पराभव नसून त्यांना आणखी काही अडचणींना तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केल्यानुसार ट्रंप यांच्या कार्यकाळात झालेल्या कथित घोटाळ्याच्या चौकशीवरून त्यांच्या अडचणींमध्ये भर पडू शकते. अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासोबत त्यांना कठीण आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.

राष्ट्राध्यक्ष पदावर असताना त्यांच्याविरोधात अधिकृत कारवाई केली जाऊ शकत नव्हती.

पेस विद्यापीठातील घटनात्मक कायद्याचे प्राध्यापक बॅनेट गर्शमन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "डोनाल्ड ट्रंप यांच्याविरुद्ध फौजदारी खटला चालवला जाण्याची शक्यता आहे."

प्राध्यापक बार्नेट गर्शमन यांनी न्यूयॉर्कमध्ये एक दशक सरकारी वकील म्हणून काम केलं आहे. ते सांगतात, "ट्रंप यांच्यावर बँकेची फसवणूक, हवाला, निवडणुकीतील फसवणूक असे गंभीर आरोप केले जाऊ शकतात. माध्यमांमध्ये आतापर्यंत केवळ आर्थिक बाबींचा उल्लेख केला जात आहे."

अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार डोनाल्ड ट्रंप यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. यामध्ये वैयक्तिक कर्ज आणि त्यांच्या उद्योगांसंदर्भात आर्थिक अडचणींचा समावेश आहे.

डोनाल्ड ट्रंप

फोटो स्रोत, Getty Images

न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आगामी चार वर्षांत ट्रंप यांना 30 कोटी डॉलरहून अधिक कर्ज फेडायचं आहे. सध्या ट्रंप यांची वैयक्तिक आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नाही. त्यात आता ट्रंप राष्ट्राध्यक्षपदावर नसल्याने कर्जदार त्यांना सवलत देण्याची शक्यताही कमी आहे.

डोनाल्ड ट्रंप राष्ट्राध्यक्ष होते त्यामुळे कथित आर्थिक घोटाळा प्रकरणात ते अडचणीत आले नाहीत, पण आता त्यांच्यासाठी कठीण काळ येऊ शकतो असे त्यांच्या टीकाकारांना वाटते.

ट्रंप यांनी फेटाळले आरोप

आपण विरोधकांच्या कटाला बळी पडल्याचा दावा ट्रंप सातत्यानं करत आले आहेत. राष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी आणि पदावर असताना आपल्यावर करण्यात आलेले गैरव्यवहाराचे आरोप तथ्यहीन असल्याचं ट्रंप यांचं म्हणणं आहे.

स्वतःविरोधातले सर्व आरोप ट्रंप यांनी फेटाळून लावले आहेत. आपल्या प्रशासनावर करण्यात आलेल्या घोटाळ्यांच्या आरोपांच्या चौकशीतून तसंच यावर्षाच्या सुरुवातीला चालविण्यात आलेल्या महाभियोग प्रक्रियेतून आपण निर्दोष मुक्त झाल्याचं ते सांगतात.

अर्थात, या सर्व चौकशी प्रक्रिया राष्ट्राध्यक्षांना मिळालेल्या घटनात्मक संरक्षणाच्या चौकटीत पार पडल्या होत्या. न्याय विभागानं वारंवार हे स्पष्ट केलं होतं की, राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात पदावर असताना गुन्हेगारी स्वरूपाचे खटले चालवत येत नाहीत.

तज्ज्ञांनी बीबीसी मुंडोशी (बीबीसीची स्पॅनिश भाषेतील सेवा) बोलताना म्हटलं होतं की, डोनाल्ड ट्रंप यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी या तपासांचा आधार घेतला जाऊ शकतो.

बॅनेट गर्शमन यांनी याबद्दल म्हटलं, "त्यांच्यावर मतदारांसोबत विश्वासघाताचे आरोप लावण्यात येऊ शकतात, याची आम्हाला आधीपासूनच कल्पना आहे. कारण अमेरिकेच्या अॅटर्नींनी मॅनहॅटनसंदर्भात ट्रंप हे मायकल कोहेन यांच्यासोबत कटातील भागीदार असल्याचं म्हटलं होतं.

डोनाल्ड ट्रंप यांचे माजी वकील मायकल कोहेन यांच्याविरोधात झालेल्या चौकशीचीही आठवण करून दिली जात आहे.

पॉर्न अभिनेत्री स्टॉर्मा डॅनियल्स

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, पॉर्न अभिनेत्री स्टॉर्मा डॅनियल्स

2018 साली मायकल कोहेन यांना निवडणुकीतील गैरव्यवहार प्रकरणी दोषी ठरविण्यात आलं होतं. डोनाल्ड ट्रंप यांच्यासोबत अफेअर असल्याचा दावा करणारी पॉर्न अभिनेत्री स्टॉर्मा डॅनियल्सला 2016 सालच्या निवडणुकीत पैसे देण्याचा आरोप मायकल कोहेन यांच्यावर करण्यात आला होता.

मायकल कोहेन यांच्या चौकशीदरम्यान अधिकृतरित्या सांगण्यात आलं होतं की, राष्ट्राध्यक्षपदाचे एक उमेदवार (यासाठी 'इंडिव्हिजुअल 1' हा शब्द वापरण्यात आला होता.) गैरव्यवहारांमध्ये थेट गुंतले होते.

अमेरिकन माध्यमांनी हा कथित उमेदवार डोनाल्ड ट्रंप असल्याचं म्हटलं होतं. अमेरिकन माध्यमांमध्ये यासंबंधीच्या बातम्या खूप गाजल्या होत्या.

मूलर रिपोर्ट

बॅनेट गर्शमन सांगतात की कथित मूलर रिपोर्टमधील निष्कर्ष पाहिले तर ट्रंप यांच्यावर न्यायालयीन प्रक्रियेत अडथळा आणल्याचा आरोपही लावण्यात येऊ शकतो.

रॉबर्ट मूलर

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, रॉबर्ट मूलर

2019 मध्ये स्पेशल काउंसिल रॉबर्ट मूलर यांनी 2016 साली झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रशियन हस्तक्षेपासंबंधीच्या तपासाचा अहवाल सादर केला होता.

या अहवालात ट्रंप यांना 'क्लीन चीट' देण्यात आली होती. ट्रंप यांची प्रचार टीम आणि रशियामध्ये व्यवहार झाल्याचे कोणतेही सबळ पुरावे मिळाले नसल्याचं या अहवालात म्हटलं होतं.

अर्थात, डोनाल्ड ट्रंप यांनी चौकशीत अडथळे आणण्याचे प्रयत्न केल्याचं या अहवालात म्हटलं होतं. ट्रंप यांनी मूलर यांना पदावरून हटविण्याचाही प्रयत्न केला होता.

मूलर यांनी त्यावेळी म्हटलं होतं की, न्यायालयीन प्रक्रियेत बाधा आणल्याबद्दल डोनाल्ड ट्रंप यांच्यावर महाभियोग चालविण्यात यावा की नाही याचा निर्णय अमेरिकन संसदेनं घ्यायला हवा. कारण राष्ट्राध्यक्षांवर सामान्य कायदेशीर प्रक्रियेद्वारे खटला दाखल केला जाऊ शकत नाही.

त्यावेळी संसदेनं ट्रंप यांच्याविरोधात महाभियोग चालविला नाही. मात्र काही महिन्यांनंतर एका वेगळ्या प्रकरणात ट्रंप यांच्याविरोधात महाभियोग चालविण्यात आला.

आपले राजकीय विरोधक जो बायडन यांच्याविरोधात चौकशी सुरू करावी म्हणून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप ट्रंप यांच्यावर करण्यात आला होता.

जो बायडन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, जो बायडन

डिसेंबर 2019 साली डेमोक्रॅट्सचं बहुमत असलेल्या हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हजमध्ये ट्रंप यांच्याविरोधात महाभियोग चालवला गेला. मात्र फेब्रुवारी 2020 मध्ये रिपब्लिकन्सचं बहुमत असलेल्या सिनेटनं त्यांना निर्दोष ठरवलं.

डोनाल्ड ट्रंप हे ज्यांच्यावर महाभियोग चालविण्यात आलेले अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष होते.

स्थानिक आणि संघीय पातळीवरील आरोप

संघीय कायद्यांच्या उल्लंघनाप्रकरणी राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रंप स्वतःलाच माफ करू शकतात. पण, अमेरिकेच्या इतिहासात आजपर्यंत अशी स्थिती कधीच निर्माण झाली नव्हती.

अर्थात, पदावरून दूर झाल्यावर एखाद्या राष्ट्राध्यक्षावर गुन्हेगारी स्वरुपाचा खटला चालवण्याची वेळ आली असता होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांना माफी दिल्याच्या घटना घडल्या आहेत.

1974 साली असं घडलं होतं. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी वॉटरगेट प्रकरणानंतर राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांच्या सरकारमध्ये उपाध्यक्ष असलेले जेराल्ड फॉर्ड राष्ट्राध्यक्ष बनले आणि त्यांना पूर्ण माफी दिली होती.

रिचर्ड निक्सन

फोटो स्रोत, Getty Images

कॉन्झर्व्हेटिव्ह पॉलिटिकल रिसर्च सेंटर अमेरिकन एंटरप्राइज इन्स्टिट्यूटमध्ये तज्ज्ञ असलेले नॉर्मन ऑर्नस्टीन सांगतात, "डोनाल्ड ट्रंप यांच्यावर संघीय आरोप झाल्यानंतर ते स्वतःला माफ करतील ही शक्यता फार कमी आहे."

आणि आता निवडणूक हरल्यानंतर तर ते आता स्वतःला माफी देऊ शकत नाहीत.

अशा परिस्थितीत तज्ज्ञ एक शक्यता वर्तवतात, जी प्रत्यक्षात येणं कठीण आहे.

20 जानेवारी 2021 ला आपला कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच ट्रंप राजीनामा देतील आणि सध्या उपराष्ट्राध्यक्ष असलेले माइक पेन्स राष्ट्रपती बनतील. त्यानंतर माइक पेन्स ट्रंप यांना संघीय गुन्ह्यांसाठी माफी देऊ शकतात.

बॅनेट गर्शमन सांगतात की डोनाल्ड ट्रंप यांना संघीय आरोपांसोबत स्थानिक पातळीवरील आरोपही सहन करावे लागू शकतात अशी शक्यता अमेरिकन माध्यमांनी वर्तवली आहे.

त्यांच्यावर राष्ट्राध्यक्ष बनण्याआधी रिअल इस्टेटमध्ये गैरव्यवहार केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणांमध्ये संघीय प्रकरणांप्रमाणे माफी मिळत नाही.

एक राजकीय निर्णय

तज्ज्ञांच्या मते पुरावे मिळाल्यानंतरही प्रशासन ट्रंप यांच्यावर कारवाई करेलच असं नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय हा राजकीय असेल.

वॉटरगेट प्रकरणातही असंच घडलं होतं. रिचर्ड निक्सन यांच्यावर खटला चालवल्यामुळे वॉटरगेट प्रकरण लांबतच जाईल. असं होऊ नये म्हणून निक्सन यांना माफी देण्यात आली होती.

ट्रंप यांच्यावरील आरोपांसदर्भात 6 ऑगस्टला दिलेल्या एका मुलाखतीत जो बायडन यांनी म्हटलं होतं की, जर ते राष्ट्राध्यक्ष बनले तर डोनाल्ड ट्रंप यांच्याविरोधात खटले चालवायला ते विरोध करणार नाहीत आणि त्याला उत्तेजनही देणार नाहीत. ते हा निर्णय न्यायपालिकेवर सोडतील.

बॅनेट गर्शमन सांगतात की पूर्वीच्या खटल्यांमुळे सुनावणी सुरू व्हायला महिन्यांपासून अनेक वर्षं लागू शकतात.

तज्ज्ञांच्या मते जर डोनाल्ड ट्रंप त्यांच्यावरील आरोपांप्रकरणी दोषी सिद्ध झाले तर त्यांना अनेक वर्षांसाठी शिक्षा होऊ शकते.

नॉर्मन ऑर्नस्टीन यांच्यामते न्यूयॉर्कचे अभिवक्ता डोनाल्ड ट्रंप यांच्याविरोधातील आपली चौकशी सुरू ठेवू शकतात. सध्या ट्रंप यांची परिस्थिती अडचणीची आहे आणि त्यांना या गोष्टीची पुरेपूर कल्पना आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)