You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे निधन
सार्वकालीन महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचं निधन झालं. ते 60 वर्षांचे होते.
बॉलवर नियंत्रण मिळवण्याची हातोटी, अफलातून पदलालित्य आणि गोल करण्यातलं अद्भुत कौशल्य यामुळे मॅराडोना यांचं नाव दिग्गज फुटबॉलपटूंच्या मांदियाळीत घेतलं जातं.
दिएगो मॅराडोना यांच्या नेतृत्वात खेळणाऱ्या अर्जेंटिनाने फुटबॉल विश्वविजेतेपदावर नाव कोरलं होतं.
मॅराडोना यांनी कारकीर्दीत 491 मॅचमध्ये 259 गोल केले. विसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू असं त्यांचं वर्णन करण्यात येत असे.
अर्जेंटिनाचे मिडफिल्डर म्हणून जगभरात नावलौकिक कमावलेल्या मॅराडोना यांना कार्डिअक अरेस्टचा त्रास झाला.
नोव्हेंबर महिन्यात मॅराडोना यांच्या मेंदूतील रक्ताच्या गुठळ्या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून काढण्यात आल्या होत्या. मद्यसेवनाची सवय सुटावी यासाठी त्यांच्यावर उपचार सुरू होते.
5 फूट 5 इंच उंचीमुळे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कमी असल्याने मॅराडोना यांचं बॉलवर नियंत्रण मिळवून प्रतिस्पर्ध्यांच्या तावडीतून निसटून गोल करणं यामध्ये मॅराडोना यांची खासियत होती.
30 ऑक्टोबर 1960 रोजी त्यांचा जन्म अर्जेंटिनातल्या ब्युनॉस आयर्समध्ये झाला होता. अत्यंत गरीब वातावरणात बालपण गेलेल्या मॅराडोना यांना फुटबॉलचा ध्यास होता.
मॅराडोनाचं याचं कौशल्य अर्जेंटिनाच्या ज्युनियर टीमच्या कोचच्या लक्षात आलं. त्यातूनच मॅराडोना यांनी अर्जेंटिनाच्या ज्युनियर संघासाठी खेळायला सुरुवात केली.
1986च्या वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यातली मॅच मॅराडोना यांच्या गोलमुळे संस्मरणीय ठरली. इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यातील युद्धाची या मॅचला पार्श्वभूमी होती.
मॅराडोना यांनी केलेला गोल त्यांच्या हाताला लागून गोलपोस्टमध्ये गेला. फुटबॉलमध्ये बॉल हाताला लागणं नियमबाह्य मानलं जातं. परंतु रेफरींनी हा गोल अर्जेंटिनाला बहाल केला. या गोलमध्ये माझं डोकं आणि थोडा दैवाचा हात आहे असं मॅराडोना यांनी म्हटलं. हा गोल फुटबॉलविश्वात 'हँड ऑफ गॉड' म्हणून प्रसिद्ध आहे.
दरम्यान 22 ऑगस्ट 2005 रोजी हा गोल मुद्दामहून हाताने गोलपोस्टमध्ये ढकलल्याचा खुलासा मॅराडोना यांनी केला होता. फुटबॉल विश्वातल्या नामुष्कीकारक घटनांमध्ये या प्रसंगाची नोंद झाली.
या गोलनंतर चार मिनिटात मॅराडोनाने आणखी एक गोल केला. त्याला फिफाने गोल ऑफ द सेंच्युरी किताबाने गौरवलं.
मॅराडोना बार्सिलोना आणि नेपोली या क्लबसाठी खेळले. मॅराडोना अविभाज्य घटक असलेल्या नेपोली क्लबने सीरी ए स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं.
सध्या जिम्नेशियाया इस्ग्रिमा या अर्जेंटिनातल्या फुटबॉल क्लबचे प्रशिक्षक म्हणून काम पाहत होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)