कोरोना लस : कोव्हिडपासून 90 टक्के संरक्षण देणारी 'ही' नवीन लस कोणती?

फोटो स्रोत, Reuters
- Author, जेम्स गल्लाघर
- Role, बीबीसी आरोग्य प्रतिनिधी
जवळपास 90 टक्के लोकांचा कोव्हिड-19 पासून बचाव करणारी पहिली लस विकसित झाल्याचं प्राथमिक विश्लेषणातून समोर आलं आहे.
फायझर आणि बायो N टेक यांनी ही लस विकसित केली असून 'हा विज्ञान आणि मानवतेसाठी महान दिवस' असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
या लसीची चाचणी सहा देशांतील 43,500 लोकांवर करण्यात आली आहे. या चाचणीमधून सुरक्षाविषयक कोणतेही प्रश्न निर्माण झाले नसल्याचं लस विकसित करणाऱ्या कंपनींनी म्हटलं आहे.
या लसीला तात्काळ मान्यता मिळावी यासाठी महिनाखेरीपर्यंत अर्ज करण्याचं कंपनीचं नियोजन आहे.
फायझर आणि बायोNटेक या कंपन्यांनी विकसित केलेल्या लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर सात दिवसांमध्ये 90% संरक्षण मिळाल्याचं आढळलं आहे. अमेरिका, जर्मनी, ब्राझील, अर्जेंटिना, दक्षिण आफ्रिका आणि तुर्की या 6 देशांतल्या 43,500 लोकांवर या लशीची चाचणी घेण्यात येतेय. या लोकांना 3 आठवड्यांच्या अंतराने या लशीचे 2 डोस देण्यात आले.९० टक्के यश तर मिळालंच, शिवाय कोणामध्येही लशीच्या सुरक्षिततेविषयीची कोणतीही काळजीची बाब आढळली नाही. फायजरचे अध्यक्ष डॉ. अल्बर्ट बोअर्ला यांनी म्हटलंय, "हे जागतिक आरोग्य संकट संपवण्यासाठी लोकांना एक अत्यंत गरजेचं संशोधन पुरवण्याच्या दृष्टीने आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
सध्या डझनभराहून अधिक लशी चाचण्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आहेत, पण स्पष्ट परिणाम दाखवणारी ही पहिली लस आहे.
RNA लस काम कशी करते?
बायोNटेकची ही लस RNA प्रकारची लस आहे. यामध्ये कोरोना व्हायरसच्या जेनेटिक कोडचा एक असा भाग निवडतात ज्यावरून आपल्या पांढऱ्या पेशींना हे समजतं की कोणत्या प्रकारची रोग प्रतिकारशक्ती तयार करायची आहे. हा जिनेटिक कोड लशीच्या रूपाने आपल्या शरीरात सोडतात. मग प्रतिकारशक्ती विकसित होते. त्यामुळे नंतर खऱ्या कोरोनाने हल्ला केला तरी आपलं शरीर सज्ज असतं.

या वर्षाखेरीपर्यंत लशींचे 50 दशलक्ष डोस तयार करण्यात यश मिळेल असा फायझरला विश्वास आहे. 2021 पर्यंत 1.3 अब्ज लशींचे डोस तयार केले जातील, असाही फायझरचा अंदाज आहे.
अर्थात, यामध्ये काही आव्हानंही आहेत. कारण लस साठवून ठेवण्यासाठी अतिशीत म्हणजे उणे 80 अंश सेल्सियसपेक्षाही कमी तापमानाची आवश्यकता असते. या लशीमुळे निर्माण झालेली प्रतिकारशक्ती किती काळ टिकते हा पण प्रश्न आहे.
फायझरचे अध्यक्ष डॉ. अल्बर्ट बौरला यांनी म्हटलं की, हे जागतिक आरोग्य संकट संपवून जगभरातील लोकांना दिलासा देण्याच्या दृष्टिनं आम्ही एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे."
बायोन्टेकच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या प्राध्यापक उगुर साहिन यांनी चाचणीचं वर्णन 'मैलाचा दगड' म्हणून केलं.
युकेनं 30 दशलक्ष डोस आधीच मागवले आहेत. या लशीला अमेरिकेत मान्यता मिळाली तरी भारतामध्ये मान्यता मिळण्यासाठी त्यांना स्वतंत्र प्रक्रिया करावी लागेल. शिवाय या लसीच्या निर्मिती वा वितरणासाठी अजून भारतातल्या कोणत्याही कंपनीशी करार करण्यात आलेला नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








