You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिका निवडणूक 2020: ट्रंप यांच्यासाठी अटीतटीची राजकीय लढाई
- Author, निक ब्रायंट
- Role, बीबीसी न्यूज, वॉशिंग्टन
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षीय निवडणूक ही या वर्षातील सर्वांत महत्त्वाची बातमी ठरेल. सर्व प्रसारमाध्यमांचं लक्ष याच बातमीवर केंद्रित झालेलं असेल; हजारो मैलांवरून प्रसारमाध्यमं या जत्रेत सहभागी होतील; आपल्याला आपल्या कुटुंबांपासून दूर नेणारा हा लोकशाहीचा देदिप्यमान सोहळा असेल, अशा कल्पनांनी 2020 या वर्षाची सुरुवात झाली.
अमेरिकेतील राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचं मतदान तोंडावर आलं आहे. या निवडणुकीचा प्रचार सुरू झाला त्या वेळी पहिली मोठी बातमी आली ती बर्नी सँडर्स यांना हृदयविकाराचा झटका आल्याची.
डेमॉक्रेटिक पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले 78 वर्षीय बर्नी सँडर्स यांना लास वेगासमध्ये प्रचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आला. अथकपणे सुरू राहणाऱ्या या प्रचाराच्या वेळापत्रकासोबत धावण्याची ताकद (डेमॉक्रेटिक पक्षाचे उमेदवार) जो बायडेन यांच्यात आहे का, असाही प्रश्न नंतर उपस्थित करण्यात आला. सत्तरीतल्या उमेदवारांचीच गर्दी असलेल्या या निवडणुकीमध्ये प्रमुख उमेदवारांची मरणाधीनता हा चर्चेचा एक मुख्य विषय ठरला.
पण 2,25,000 हून अधिक अमेरिकी नागरिकांच्या मृत्यूची बातमी या सगळ्यावर मात करून प्रसारमाध्यमांचा अवकाश व्यापून टाकेल, याची किंचितशीही कल्पना आपल्याला त्या वेळी नव्हती.
आपण जग बदलून टाकणाऱ्या निवडणुकीसाठी वार्तांकन करणार आहोत, असं आपल्याला- म्हणजे पत्रकारांना वाटत होतं. कदाचित गेल्या 50 वर्षांमधील ही सर्वांत महत्त्वाची निवडणूक असेल. पण इतिहास इतकं विलक्षण आणि प्राणघातक वळण घेईल याचा अंदाज मात्र आपल्यापैकी फारशा कोणाला आला नाही.
2020 एखादं वर्ष इतकं अर्थपूर्ण होऊन जावं अशी वेळ 1939 नंतर आताच आलेली आहे.
आधुनिक जागतिक राजकारणामध्ये स्मरणरंजन हा एक प्रेरक घटक आहे, पण नजिकच्या भूतकाळाची इतकी ओढ वाटल्याचं आपण क्वचितच पाहिलं असेल. दहा महिन्यांपूर्वी आपल्यापैकी बहुतेकांनी वुहान हा शब्दही ऐकला नसेल. दहा महिन्यांपूर्वी हस्तांदोलन करणं ही सौहार्दाची खूण होती, धोक्याची नव्हे.
दहा महिन्यांपूर्वी टी-शर्ट, गाड्यांवर लावायचे स्टीकर आणि फलक या सगळ्या आपल्या (अमेरिकेतील नागरिकांच्या) राजकारणाच्या स्वाभाविक खुणा होत्या, पण आता आपण मास्क घातलाय की नाही यावरून आपला राजकीय कल कळून येतो.
चार वर्षांपूर्वी डोनाल्ड ट्रंप यांच्या राजकीय प्रतिभाशक्तीतून निपजलेली 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' ही घोषणा सर्वांना भावूक करत होती. ट्रम्प यांनी स्वतः यासंबंधीच्या काळाचा काही नकाशा स्पष्ट केलेला नव्हता, त्यामुळे अमेरिका नक्की कधी महान होती हे ठरवण्याची कामगिरी मतदारांनाच पार पाडायची होती. त्यामुळे ट्रम्पसमर्थकांनी स्वप्नातली साम्राज्यं उभारायचा ऐतिहासिक परवानाच स्वतःकडे घेऊन टाकला- अनेकदा यात रंगवलेला प्रदेश केवळ अमूर्त पातळीवरच अस्तित्वात होता.
1980च्या दशकात रेगन राष्ट्राध्यक्ष होते त्या काळातील अमेरिका महान होती असं काहींना वाटत होतं. व्हिएतनाम युद्धातील नामुष्की, वॉटरगेट प्रकरण आणि इराणमधील अमेरिकी दूतावासासंदर्भातील ओलीस प्रकरण, अशा प्रदीर्घ राष्ट्रीय दुःस्वप्नांचा कालखंड उलटून 1980च्या दशकात देशाला पुन्हा उभारी आली. तर, पन्नासचं दशक महान अमेरिकेचं होतं, असंही काहींना वाटतं. पन्नासच्या दशकानंतर आफ्रिकी-अमेरिकी नागरिकांना संपूर्ण नागरी अधिकार मिळाले, स्त्रीमुक्ती चळवळीने पुरुषसत्ताक समाजाला आव्हान दिलं, इत्यादी. त्यामुळे याआधीच्या काळातली अमेरिका महान होती, असं या मंडळींना वाटत असतं.
परंतु, विद्यमान प्रचाराच्या अखेरच्या आठवड्यांमध्ये डोनाल्ड ट्रंप यांनी अधिक स्पष्टपणे काळाचा मुद्दा स्पष्ट केला. त्यांनी विशिष्ट तारीखच दिली आहे. भूतकाळाकडे जाताना नक्की कुठवर जायचं, हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. "प्लेगची साथ येण्यापूर्वी"ची अमेरिका महान होती, असं ते प्रचारसभांमध्ये वारंवार सांगत आहेत. ती साथ येण्यापूर्वी अमेरिकेची अर्थव्यवस्था जगात सर्वांत शक्तिशाली होती, असं ते म्हणतात.
'मेक अमेरिका ग्रेट अगेन अगेन' अशी नवीन घोषणा या निवडणुकीत वापरण्याचा विचार ट्रंप यांनी केला होता. पण हा स्वतःलाच टोमणा मारल्यासारखा प्रकार झाला असता- कोव्हिड-19 संकट हाताळण्यात त्यांना अपयश आल्यामुळे त्यांचं राष्ट्राध्यक्षपद कसं डळमळीत झालंय, याची आठवण या घोषणेतून अप्रत्यक्षरित्या करून दिली गेली असती.
कोरोना विषाणू उद्भवण्यापूर्वी डोनाल्ड ट्रंप यांच्यासाठी राजकीय चिन्हं पूरक होती. ते महाभियोग खटल्यातून मोकळे झाले होते. राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांना मिळणारा कौल सर्वाधिक उच्चांकी गेला होता.
अर्थव्यवस्था शक्तिशाली झाल्याची बढाई मारणं त्यांना शक्य होतं आणि सत्तारूढ असण्याचे लाभ घेणंही त्यांना शक्य होतं- पहिल्यांदाच निवडून आलेल्या राष्ट्राध्यक्षाच्या बाबतीत हे दोन घटक जुळून येत असतील, तर त्या आणखी चार वर्षांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता अधिक ठळक होते.
रिअॅलिटी शोमध्ये जाऊन आलेली (ट्रम्प यांच्यासारखी) व्यक्ती अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक कधीच जिंकू शकणार नाही, अशा भ्रामक समजुतीवर 2016 सालच्या निवडणुकीचं वार्तांकन आधारलेलं होतं. या वर्षाच्या सुरुवातीला, डोनाल्ड ट्रम्प हरणारच नाहीत या समजुतीची झालर वार्तांकनाला होती.
आयोवा व न्यू हॅम्पशायर इथल्या मतदारांनी ट्रम्प यांचे मुख्य प्रतिस्पर्धी जो बायडेन यांच्या सभा पाहिल्यावर त्यांना बायडेन यांचा शारीरिक दुबळेपणा अधिकाधिक जाणवला.
माजी समाजवादी बर्नी सँडर्स हे डेमॉक्रेटिक पक्षाकडून दुसरे प्रमुख इच्छुक उमेदवार होते, पण त्यांना अमेरिकेतील नागरिक कधीतरी मत देतील का? ट्रम्प यांना दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपद मिळेलच, हा विश्वास कल्पनारंजित असेलही कदाचित, पण सँडर्स यांना मतं मिळतील ही तर कल्पनातीतच गोष्ट आहे, असा सूर लावला गेला होता.
मग अर्थातच सगळं बदलून गेलं. कोव्हिडमुळे बायडेन यांना अदृश्यतेचा आडोसा मिळाला. अनेकदा बोलताना अडखळणाऱ्या, अशक्त बिडेन यांना हा आडोसा उपयुक्त होता. डोनाल्ड ट्रंप यांनी युद्धकालीन राष्ट्राध्यक्षासारखी धुरा हाती घेतली, पण या युद्धात अमेरिकेचा लवकरच पराभव व्हायला लागला होता.
तर, 2020 म्हणजे 2016च्या निवडणुकीचीच पुनरावृत्ती आहे, हे निरीक्षण अगदीच सर्वसामान्य असलं, तरी नोंदवणं आवश्यक आहे.
आता ट्रम्प हे प्रस्थापित आहेत, बंडखोर नाहीत. त्यांना बचावात्मक पवित्रा घ्यावा लागेल अशी स्थिती आहे. त्यांच्या विरोधातील उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यासारखं तिरस्काराचं लक्ष्य ठरलेला नाही, तर कनवाळू आजोबा, सर्वांना आवडणारा वृद्ध मनुष्य, अशी प्रतिमा असलेले बायडेन त्यांच्या विरोधात आहेत.
बायडेन यांचं तेजस्वी स्मित हेच एक मूल्यवान राजकीय अस्त्र ठरलं आहे, त्याचप्रमाणे त्यांना असलेला वैयक्तिक दुःखाचा दीर्घ अनुभवही त्यांच्या पथ्यावर पडणारा आहे. 2020 साली ट्रंप यांच्या बाजूने कललेले डेमॉक्रेटिक पक्षाचे लोक कमी आहेत, आणि बिडेन यांच्या बाजूने कललेले रिपब्लिकन पक्षाचे लोक जास्त आहेत, यालाही बायडेन यांची ही अस्त्रं अंशतः कारणीभूत आहेत.
आपल्या समर्थकांच्या तक्रारी मांडण्याची डोनाल्ड ट्रंप यांची क्षमता चार वर्षांपूर्वी विशिष्ट तल्लखता बाळगून होती: कोणी बोलू धजत नसलेल्या गोष्टी ते बोलतायंत, असं मानलं जात होतं. पण विद्यमान निवडणुकीमध्ये त्यांनी स्वतःची निराशाच जास्त व्यक्त केली आहे.
'चिनी विषाणू'शी लढावं लागल्याबद्दल ते स्वानुकंपेच्या सुरात संताप व्यक्त करत आहेत; डॉ. अँथनी फाउसी यांच्यासारख्या सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांवर टीका करत आहेत; ज्या राज्यांमधील टाळेबंदीमुळे ट्रम्प यांच्या अर्थव्यवस्थेला बाधा पोचली अशा राज्यांच्या डेमॉक्रेटिक पक्षाच्या गव्हर्नरांना लक्ष्य करत आहेत; आणि नेहमीप्रमाणे प्रसारमाध्यमांबद्दल तक्रार करत आहेत.
आपण ओबामाविरोधी व हिलरीविरोधी आहोत, अशा रितीने प्रचार केल्यामुळे 2016 साली ट्रंप यांना यश मिळालं. आता जो बायडेन यांना मतदानामध्ये आघाडी मिळतेय, त्याचं एक कारण ते ट्रंपविरोधी भूमिकेत आहेत, हेदेखील आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)