समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता द्या, पोप फ्रान्सिस यांची भूमिका

समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता देण्यात यावी, अशी भूमिका पोप फ्रान्सिस यांनी घेतले आहे. या प्रकारची भूमिका इतिहासात पहिल्यांदाच व्हेटिकनच्या पोपने घेतली आहे.

इव्हगेनी आफिनेव्हस्की यांनी पोप फ्रान्सिस यांच्या जीवनावर आधारित 'फ्रान्सेस्को' (Francesco) ही डॉक्युमेंट्री दिग्दर्शित केली आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये त्यांनी व्हेटिकनचे कायदे आणि आपल्या पूर्वीसूरींपासून भिन्न अशी ही मतं मांडली आहेत. बुधवारी रोम चित्रपट महोत्सवात ही डॉक्युमेंट्री प्रदर्शित करण्यात आली.

यात पोप फ्रान्सिस म्हणतात, "समलिंगी लोकांना कुटुंबात राहण्याचा अधिकार आहे. तीही ईश्वराची मुलं आहेत आणि त्यांनाही कुटुंब असण्याचा अधिकार आहे. या कारणावरून कुणालाही बाहेर फेकता कामा नये किंवा त्यांचं जगणं असह्य करता कामा नये."

"यासाठी त्यांना कायदेशीर मान्यता मिळण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांना कायद्याचं संरक्षण मिळेल," असं पोप म्हणाले.

"अशा कायद्यासाठी आपण तयार" असल्याचं ते म्हणाले. हे म्हणताना त्यांनी बुनोस एरिसचे आर्चबिशप असतानाच्या त्यांच्या भूमिकेचा दाखला दिला. त्यावेळी त्यांनी समलिंगी विवाहांना विरोध केला होता. मात्र, समलिंगी जोडप्यांना काही कायदेशीर अधिकार असायला हवेत, असं मत त्यावेळी त्यांनी मांडलं होतं.

या डॉक्युमेंट्रीमध्ये पोप फ्रान्सिस दोन समलिंगी पुरूषांना स्थानिक चर्चमध्ये त्यांच्या मुलांचं संगोपन करण्यासाठी प्रोत्साहित करत असल्याचंही दाखवलं आहे.

पोप फ्रान्सिस यांनी या डॉक्युमेंट्रीमध्ये एलजीबीटी समुदायाविषयी जी भूमिका मांडली आहे ती यापूर्वीच्या त्यांच्या भूमिकेपेक्षा वेगळी आहे.

समलिंगी संबंधांना सामान्य विवाहाप्रमाणे कायदेशीर मान्यता दिल्यास ते 'मानववंशावर आघात' करण्यासारखं ठरेल, असं पोप फ्रान्सिस यांनी 2013 साली आलेल्या On Heaven and Earth या पुस्तकात म्हटलं होतं.

इतकंच नाही तर समलिंगी जोडप्यांना मूल दत्तक घेण्याची परवानगी दिल्यास 'त्याचा मुलांवर वाईट परिणाम होईल… प्रत्येक व्यक्तीला तिचं व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी पुरूष वडील आणि स्त्री आईची गरज असते.' असं म्हटलं होतं.

पुढच्याच वर्षी पोप फ्रान्सिस यांनी समलिंगी जोडप्यांना पाठिंबा दर्शवल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, पोप आणि व्हेटिकन चर्चविषयी अधिकृत बातम्या देणाऱ्या Holy See Press ने या वृत्ताचं खंडन केलं होतं.

तर 2018 साली ख्रिश्चन धर्मगुरूंमधील समलिंगी संबंधांविषयी आपल्याला 'चिंता वाटत असल्याचं' आणि हा 'गंभीर विषय' असल्याचं ते म्हणाले होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)