You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
समलैंगिक लग्नाची गोष्ट: हमीरपूरच्या दोघींनी नवऱ्यांना घटस्फोट देऊन एकमेकींशी लग्न केलं
- Author, समीरात्मज मिश्र
- Role, बीबीसी प्रतिनिधी, हमीरपूरहून
उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्याच्या मुख्यालयापासून जवळपास 80 किलोमीटर अंतरावरील राठ तालुका. इथल्या अभिलाषा आणि दीपशिखा या तरुणींनी एकत्र येत दांपत्य जीवनाला सुरुवात केली आहे.
25 वर्षांची अभिलाषा आणि 21 वर्षांची दीपशिखा यांचं लग्न त्यांच्या आई-वडिलांनी दुसरीकडे करून दिलं होतं. पण या दोघी एकमेकींच्या प्रेमात इतक्या आकंठ बुडाल्या होत्या की, अगोदर त्यांनी एकत्र राहायला सुरुवात केली आणि नंतर लग्न केलं.
"आम्ही एकमेकींना गेल्या 6 वर्षांपासून ओळखतो आणि आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आमच्या घरच्यांनाही याबद्दल माहिती होती. त्यामुळेच मग त्यांनी आमची लग्नं आमच्या इच्छेबाहेर लावून दिली. माझ्या लग्नाला तीन वर्षं झाली होती. मी माझ्या पतीला याबाबत सांगितलं आणि नंतर घटस्फोट घेतला. गेल्या महिन्यात मी आणि दीपशिखानं लग्न केलं," अभिलाषा सांगते.
पण दीपशिखाचं तिच्या पतीपासून घटस्फोटाचं प्रकरण अजून प्रलंबित आहे. ती पतीसोबत राहत नाही.
"माझ्या आई-वडिलांनी घरातून हाकलून लावलं आहे आणि नाते-संबंध तोडले आहेत. अभिलाषाच्या वडिलांनी आम्हाला राहायला जागा दिली आहे," दीपशिखा सांगते.
माध्यमांमुळे बदनामी
लग्नानंतर या दोघी राठ इथल्या पठानपुरा भागात अभिलाषाच्या वडिलांच्या घरी राहत आहेत. आम्ही त्यांच्या घरासाठीचा रस्ता विचारल्यावर एका तरुणाने उत्तर होतं, "तेच का, जिथं दोन मुलींनी लग्न केलं आहे?"
त्याच्या चेहऱ्यावरील हावभावातूनही बरंच काही स्पष्ट होत होतं.
अभिलाषाच्या घरी पोहोचल्यानंतर आम्ही या दोघी आणि अभिलाषाच्या वडिलांशी चर्चा केली. काही क्षणातच तिच्या घरासमोर लोकांची गर्दी जमली, तेव्हा मात्र दीपशिखानं बोलायला नकार दिला. "मीडियामुळे आमची बदनामी होत आहे," तिची तक्रार होती.
"ज्या दिवशी आम्ही लग्न केलं आणि कचेरीत नोंदणीसाठी गेलो, तेव्हापासून लोक आमच्याकडे वेगळ्याच नजरेनं पाहात आहेत. यामुळे आम्ही घराच्या बाहेरही निघत नाही. आम्ही दोघीही शिकलेल्या आहोत. कुठे नोकरी मिळाली तर आम्हाला दुसरीकडे जाऊन राहता येईल. तसंच कुणावर अवलंबून राहायचं कामही पडणार नाही," दीपशिखा सांगते.
शेजारच्या गावांतील दोघी
दीपशिखा सध्या B.A.चं शिक्षण घेत आहे तर अभिलाषाचं B.A. पूर्ण झालं आहे. सध्या तरी त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचं कोणतही साधन उपलब्ध नाही आणि त्या अभिलाषाच्या वडिलांवर अवलंबून आहेत.
अभिलाषाचे वडील अजय प्रताप सिंह हे गुडगावमध्ये एका खासगी संस्थेत नोकरीला आहेत. "दोघींनी मंदिरात जाऊन लग्न केलं आणि त्यानंतर त्या घरी परतल्या, तेव्हा मला हे समजलं," ते सांगतात.
"माझ्या मुलीनं घटस्फोट घेतला होता. पण या दोघींच्या नात्याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. त्या दिवशी दोघी जेव्हा गळ्यात माळा टाकून घरी आल्या तेव्हा मला हे कळालं. त्या दोघींनी एकत्र राहायचा निर्णय घेतला होता, मग आम्ही काय करू शकतो?" ते म्हणाले.
या दोघी स्वत:च्या पायावर उभं राहत नाही तोवर त्यांना घरीच ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. "मला यात काहीच अडचण वाटत नाही. तसंच कोण काय विचार करतं, याबद्दल परवा नाही."
"अभिलाषाच्या घरच्यांकडून मला खूप मदत मिळत आहे. अन्यथा आमचं एकत्र राहणं खूपच कठीण झालं असतं," असं दीपशिखा सांगते.
दोन्ही मुली आसपासच्या गावांत राहणाऱ्या आहेत. बाहेरचं जग म्हणाल तर त्यांनी आतापर्यंत फक्त राठ हे तालुक्याचं ठिकाण आणि हमीरपूरचं जिल्हा मुख्यालय, एवढंच काय ते बघितलं आहे. तेही समलैंगिक संबंधांना सामाजिक आणि कायदेशीररीत्या योग्य ठरवण्यासाठीच.
बेधडक अंदाज
या मुलींची सामाजिक जडणघडण बघितल्यास समलैंगिक संबंधांवर त्या इतक्या बेधडपणे बोलू शकतात, यावर विश्वास ठेवणंही अवघड जातं.
"सुप्रीम कोर्टानं समलैंगिक संबंधांना कायदेशीर ठरवलं असतानाही आमच्या लग्नाची नोंद होत नाहीये. अजून तसा आदेश आलेला नाही, असं अधिकारी सांगतात," अभिलाषा सांगते.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाशी संबंधित कोणताही शासन निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला नाही, असं हमीरपूर जिलह्यातील नोंदणी कार्यालयातील कर्मचारी सांगतात.
निबंधक कार्यालयातील सब-रजिस्ट्रार रामकिशोर पाल सांगतात की, "राठ क्षेत्रात राहणाऱ्या दोघी कार्यालयात आल्या आणि त्यांनी एकमेकींच्या गळ्यात माळा घालून लग्न केलं. पण समलैंगिक लग्नाच्या नोंदणीसाठी सध्यातरी आमच्याकडे कोणताही अधिकृत फॉरमॅट उपलब्ध नाही. त्यामुळे अजून त्यांच्या लग्नाची नोंद होऊ शकलेली नाही."
"सुरुवातीला याबाबत सांगताना अथवा काही पाऊल उचलताना मला भीती वाटायची. पण गेल्या वर्षी महोबा इथल्या दोन मुलींनी समलैंगिक लग्न केलं. त्यानंतर आम्ही लग्न करायचा निर्णय घेतला आणि सर्व प्रकारच्या विरोधाला झुगारून लग्न केलं," अभिलाषा सांगते.
हमीरपूरमधील स्थानिक पत्रकार अरुण श्रीवास्तव सांगतात की, "बुंदेलखंडसारख्या ठिकाणी समलैंगिक संबंधांवर चर्चा करणं खूप मोठी गोष्ट आहे. यात असं लग्न करणं तर क्रांतिकारी पाऊलच आहे. जेव्हापासून ही बातमी आली आहे कित्येकांना तर यावर विश्वासच बसत नाहीये. इतकंच काय तर लग्नाची नोंदणी करायला या मुली आल्या, तेव्हा यांच्याकडे लोक विस्मयकारक नजरेनं पाहात होते. "
असं असलं तरी, कुणी काहीही म्हणो, आपण मात्र अखेरच्या श्वासापर्यंत एकमेकींबरोबर राहायचं, असा या मुलींनी निर्धार केला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)