सेक्ससाठी महिलेचं शरीर नेहमीच तयार असतं का?

- Author, महजोबा नौरोजी
- Role, बीबीसी फारसी
'माझ्या आईचा साखरपुडा 12व्या वर्षी झाला होता. 14व्या वर्षी तिला नवऱ्याकडे पाठवून देण्यात आलं.'
माहेरातून सासरी गेली त्यावेळी ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे विकसित झालेली नव्हती.
माझ्या आईने तारुण्याबाबत पाहिलेली स्वप्नं कधीच पूर्ण होऊ शकली नाहीत.
तिच्या आशा-आकांक्षा दबूनच राहिल्या.
फिरोजा (बदललेलं नाव) सांगतात, "खरं सांगायचं हा माझ्या वडिलांचासुद्धा निर्णय नव्हता. माझी आई तिचं शिक्षण सुरू ठेवू शकली नाही."
फिरोजा आपल्या आई-वडिलांच्या 14 अपत्यांपैकी सर्वांत शेवटची मुलगी आहे. ती अफगाणिस्तानातील काबूलमध्ये एका विद्यापीठात शिक्षण घेत आहे.
फिरोजा सांगतात, "माझ्या आईने खूपच कमी कालावधीत 14 मुलांना जन्म दिला. माझे वडिलसुद्धा आईशी अत्यंत क्रूरपणे वागायचे.
"14 मुलांना जन्म देण्याची क्षमता माझ्या आईमध्ये नव्हती. माझे वडिल लैंगिक संबंध ठेवताना कधीच सुरक्षितता बाळगायचे नाहीत. त्यांनी कधीच प्रोटेक्शन वापरलं नाही. सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून लैंगिक संबंध सुरू ठेवले."
"परिणामी, माझ्या आईने 14 मुलांना जन्म दिला. ती स्वतः आजारी राहू लागली."
"माझ्या वडिलांनी मला शिक्षण सोडायला सांगितलं नाही. पण त्यांनी माझ्या आईला अत्यंत वाईट वागणूक दिली," असं फिरोजा सांगतात.
त्या पुढे सांगतात, "मी माझ्या भावंडांमध्ये सर्वांत लहान आहे. माझ्या जन्माच्या वेळी आई खूप कमजोर बनली होती. ती माझी देखभाल करू शकत नव्हती. त्यामुळे मला आईचं प्रेम योग्य प्रकारे मिळू शकलं नाही. आतासुद्धा आई आजारीच असते. तिला नेहमी माझ्या वडिलांचं म्हणणं ऐकावं लागतं."
इस्लाममध्ये आज्ञाधारक असण्याचा अर्थ काय?
फजलुर्रहमान फकीही हेरातमधील एका विद्यापीठात इस्लामिक स्टडीज विषयाचे प्राध्यापक आणि संशोधक आहेत.
ते सांगतात, "एखाद्याचे आज्ञाधारक असणं म्हणजे त्याला स्वतःबाबत अधिकार सोपवणं. याअंतर्गत पती-पत्नी यांच्या नात्यात पत्नीने पतीसोबत राहणं, त्याच्याजवळ झोपणं, वगैरे गोष्टी पतीचा अधिकार ठरतात. यामध्ये पत्नीला लज्जास्पद वाटता कामा नये. तिने याचा विरोधही करू नये."

फोटो स्रोत, Wakil kohsar
इस्लामिक न्यायशास्त्रानुसार, महिला पतिसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास नकार देते, त्यावेळी ती पतीची अवज्ञा ठरते.
महिलेने शरीरसंबंधांना नकार दिल्यास काय परिणाम?
फजलुर्रहमान याबाबत सांगतात, "महिलेने नेहमी पतीला उपभोग आणि आनंद देण्यासाठी सज्ज राहावं. यासाठी वेळ, स्थान आणि इतर कोणत्याही गोष्टींचं बंधन नसावं.
त्यांच्या मते, "पत्नीने असं न केल्यास, पतीच्या परवानगीशिवाय घराबाहेर पडल्यास इस्लामिक नियमांनुसार, पती तिच्या देखभालीसाठी जबाबदार राहत नाही. पत्नीने त्याची अवज्ञा केली तर अशा वेळी तो दुसरं लग्न करू शकतो."
महिलेचं शरीर सेक्ससाठी नेहमी तयार असतं का?
ब्रिटनमध्ये महिला अधिकारांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. एव्हिड डिहार यांच्या मते, "मुलांमध्ये कमी अंतर राखल्यास स्तनदा मातांच्या दृष्टीने ते धोकादायक असतं. महिला सतत गरोदर राहिल्यास त्यांच्यात अॅनेमियाची समस्या दिसू शकते. त्यांचं शरीर कमजोर बनतं. गर्भधारणा आणि बाळंतपण यादरम्यान आईचं शरीर आपली संपूर्ण ऊर्जा यासाठी खर्ची घालतं. त्यामुळे महिलांना अशक्तपणा येतो."

फोटो स्रोत, Getty Images
एव्हिड पुढे सांगतात, "बाळंतपणानंतर महिलेचं शरीर पूर्वीप्रमाणे होण्यासाठी सहा ते आठ आठवड्यांचा कालावधी लागतो. ऑपरेशनने बाळंतपण झाल्यास यासाठी जास्त कालावधीही लागण्याची शक्यता असते."
मासिक पाळीदरम्यान महिलांच्या हार्मोन्समध्ये अनेक चढ-उतार पाहायला मिळतात. त्यांच्या मते, "हार्मोनमधील या चढ-उतारांचा परिणाम वागणुकीवर होतो. याचा परिणाम शारीरिक क्षमतेवरसुद्धा होतो. यामुळे शरीरसंबंधांची इच्छा कमी किंवा जास्त होऊ शकते.
पतीने अशा स्थितीत पत्नीच्या वागणुकीतील बदलांचं निरीक्षण करून तिला समजून घेतल्यास त्यांच्यातील नातेसंबंध उत्तम राहतात. पुढे ते अतिशय चांगल्या पद्धतीने शरीरसंबंध प्रस्थापित करू शकतात.
"हार्मोन्समधील हे बदल समजून घेतल्यास एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे, कोणतीही महिला नेहमीच सेक्ससाठी तयार नसते. तिला प्रत्येकवेळी शारीरिक गरजेसाठी उपलब्ध म्हणून गृहीत धरण्यात येऊ नये," एव्हिड सांगतात.
त्या सांगतात, "अनेकवेळा नवजात बालकांच्या मातांना मुलांच्या देखभालीसाठी रात्रभर जागावं लागतं. त्यांची झोप होत नाही. थकवा येतो. त्यामुळे काही काळ त्यांची लैंगिक संबंधांची इच्छा कमी होते."
"दुसरीकडे, गरोदरपणात तयार झालेले हार्मोन मुलांच्या जन्मानंतर हळूहळू कमी होऊ लागतात. अशावेळी हार्मोनच्या असंतुलनाने स्वभावात चढ-उतार पाहायला मिळू शकतात."

फोटो स्रोत, dr. edward
डॉ. डिहार यांच्या मते, "अशा स्थितीत पतीने पत्नीला समजून घेणं, घरगुती कामांमध्ये तिला मदत करणं, या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्याचप्रमाणे, मेनोपॉजदरम्यानसुद्धा महिलांमध्ये असे हार्मोनचे बदल पाहायला मिळतात. या सर्व गोष्टींची माहिती पुरुषांना असणं गरजेचं आहे."
"मेनोपॉज म्हणजे फक्त मासिक पाळी बंद होणं नव्हे. या कालावधीत महिलांची झोप बिघडू शकते. एका गोष्टीवर लक्ष केंद्रीत करता येत नाही. थकवा, अशक्तपणा जाणवतो. डोकेदुखीची समस्या येते. मांसपेशी किंवा हाडं दुखणे यांच्यासारख्या समस्या वाढू शकतात. ही तक्रार वाढत जाते. यादरम्यान महिलेने शरीरसंबंध ठेवणं तिच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकते. शिवाय मानसिक धक्कासुद्धा बसू शकतो."
डॉ. डिहार सांगतात, "पुरुषांनी ही गोष्ट समजून घ्यावी. हार्मोन्समधील चढ-उतार तांत्रिकदृष्ट्या ही गोष्ट महिलांच्या नियंत्रणात नाही. हा शारीरिक रचनेचा भाग आहे. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्यासह पतीने लक्ष देण्याची गरजही असते."
दुसरा सल्ला
धार्मिक बाबींवर विश्वास असलेल्या लोकांच्या मते, प्रत्येक धर्म आणि संस्कृती वेगवेगळ्या पद्धतीने परिभाषित करता येऊ शकते.
अनुयायांसाठी एकच अर्थ आहे, असा कोणताही धर्म नाही.
मोहम्मद मोहिक अफगाणीस्तानातील एक संशोधक आहेत. मुस्लीम समाजातील विविधतेवर ते लिहितात. या विषयावर त्यांची अनेक पुस्तकं आणि लेख प्रकाशित झाले आहेत.

फोटो स्रोत, M mohiq
त्यांच्या मते, "दोन व्यक्ती एकमेकांसोबत जीवन घालवणार आहेत, त्यांनी एकमेकांचा सन्मान करायला हवा. पती-पत्नी यांचं नातं नेहमी परस्पर सहकार्य आणि भावनिक ओढ यांच्यावर आधारित असावं. कायदेशीररीत्या पती-पत्नी यांना बसून बोलण्याचा अधिकार आहे. एकमेकांच्या सहमतीने पती-पत्नींचा नातेसंबंध ठरवता येऊ शकतो."
"महिलेने पतीची प्रत्येक गोष्ट ऐकली पाहिजे. याबाबत पुरुषांना अमर्याद अधिकार मिळायला हवेत," असं त्यांना वाटतं.
फिरोजा कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचल्या?
फिराजा यांच्या आईने 14 मुलं जन्माला घालण्यास नकार दिला असता, तर तिच्यासोबत काय घडलं असतं?
तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आले असते, पतीने दुसरं लग्न केलं असतं, तलाक देण्यात आला असता आणि पोटा-पाण्याचा खर्च देणं बंद केलं असतं.
इस्लामी कायद्यानुसार, तिचं आणि मुलांचं जेवण, कपडे आणि इतर खर्च पतीने केला होता. त्यामुळे मुलांचा ताबासुद्धा पतीला मिळाला असता.

फोटो स्रोत, LAURENE BOGLIO
फिरोजा सांगतात, "लहानपणी लग्न झालेली एक महिला पुढे शिक्षण घेऊ शकली नाही. तिच्याकडे कोणतंच स्वातंत्र्य नव्हतं. तिच्याकडे आपल्या पतीच्या लैंगिक गरजा भागवण्याशिवाय इतर कोणताच पर्याय शिल्लक राहत नाही."
फिरोजा यांच्या मते, "इस्लामच्या वास्तविक व्याख्येत महिलांना प्रचंड सन्मान आहे. त्यांना राणीचा दर्जा मिळतो. पण अफगाणिस्तानात महिलांची स्थिती बरोबर नाही."
अफगाण समाजात महिलांना शिक्षणाचा अधिकार नाही. त्यांना आपली पसंती-नापसंती दर्शवण्याचा अधिकार नाही. त्यांना शारीरिक दंड केला जातो. इथं हे सगळं इस्लामच्या नावाने केलं जातं. पण इस्लाममध्ये असं काहीही नाही. या सगळ्या गोष्टी अफगाणिस्तानातील प्रचलित परंपरा आणि संस्कृतीमुळे अस्तित्वात आहेत.
अफगाणिस्तानात आपल्या पतीची प्रत्येक गोष्ट आज्ञा म्हणून पाळण्यास नाईलाज असलेली फिरोजा यांची आई एकटी नाही. तिच्यासारख्या हजारो महिला हा अन्याय निमूटपणे सहन करत आहेत.
त्यांना आपली स्वप्नं पूर्ण करायची आहेत. शिक्षण घेऊन डॉक्टर बनायचं आहे. आपला पती स्वतः निवडायचा आहे.
त्या सांगतात, "पुरुषी इच्छांचं पालन करणं ही एक घृणास्पद टोळी संस्कृती आहे. सध्याच्या काळात हे योग्य नाही. ही परंपरा महिलांना बदनाम करते. पुरुषांना महिलांच्या शोषणाचा अधिकार देते."
"पुरुषांना असे अमर्याद अधिकार देण्याला माझा पूर्ण विरोध आहे. हा प्रकार महिलांचे हक्क आणि समानतेविरुद्ध आहे. परस्पर सहकार्याने कुटुंब बनवण्याच्या सगळ्या शक्यता यामुळे धुळीत मिळतात," फिरोजा सांगतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








