You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फ्रान्सः पॅरिसमध्ये हल्लेखोरानं शिक्षकाचं डोकं कापलं
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये शुक्रवारी (16 ऑक्टोबर) एका शिक्षकावर हल्लेखोराने चाकूने हल्ला केला आणि त्याचं डोकं कापलं.
हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न करताना त्याच्यावर गोळीबार करण्याची वेळ पोलिसांवर आली. पोलिसांनी या हल्लेखोराचं नाव अद्याप जाहीर केले नाही.
ज्या शिक्षकाचे हल्लेखोराने डोके कापले, त्या शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना 'शार्ली एब्दो'मध्ये प्रसिद्ध झालेले मोहम्मद पैगंबर यांचं व्यंगचित्र दाखवलं होतं, अशी माहिती मिळते आहे.
स्थानिक वेळेनुसार, संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला असून, दहशतवादविरोधी पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं.
फ्रान्सचे शिक्षणमंत्री ज्या मायकल ब्लँकर यांनी ट्वीट करून म्हटलं की, "एका शिक्षकाला ठार करणं म्हणजे सरळ सरळ फ्रान्सवर हल्ला करण्यासारखं आहे."
इस्लामिक दहशतवादाला आपल्या एकतेमधूनच उत्तर देऊ शकतो, असंही ते म्हणाले.
फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन यांनी हल्ल्याच्या घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि या घटनेप्रकरणी 'क्रायसिस सेंटर'ही बनवलं गेलं.
फ्रान्सच्या संसदेत सर्व सदस्यांनी उभं राहून शिक्षकाला श्रद्धांजली अर्पण केली. 'अत्यंत क्रूर दहशतवादी हल्ला' असं फ्रान्सच्या खासदारांनी या हल्ल्याचं वर्णन केलं आहे.
हल्ल्याबाबत आणखी काय माहिती देण्यात आली आहे?
हल्लेखोराने चाकूने शिक्षकावर हल्ला करत, शिक्षकाचं डोकं कापलं. हल्ल्यानंतर हल्लेखोर पळून जाण्याच्या बेतात होतात. मात्र, पोलिस सावध होत त्याचा पाठलाग करू लागले.
हल्लेखोराला शरण येण्यास सांगितलं गेलं. मात्र, त्याने ते ऐकलं नाही, शिवाय पोलिसांना धमकी दिली. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करणं भाग पडलं आणि त्यात हल्लेखोर ठार झाला.
हल्ल्याचं घटनास्थळ पूर्णपणे सील करण्यात आलं असून, तपास सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळाच्या परिसरात न येण्याचं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं आहे.
हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले शिक्षक कोण होते?
फ्रान्समधील वृत्तपत्र 'ले मोंदे'च्या माहितीनुसार, हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले शिक्षक इतिहास आणि भूगोल हे दोन विषय शिकवत असत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विषयावर वर्गात चर्चा करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना शार्ली एब्दोमध्ये प्रकाशित झालेलं मोहम्मद पैगंबर यांचं व्यंगचित्र दाखवलं होतं.
फ्रेंच माध्यमांच्या माहितीनुसार, या महिन्याच्या सुरुवातीलाच काही पालकांनी शिक्षकाबाबत तक्रारही केली होती.
शिक्षकावरील हल्ल्यानंतर शार्ली एब्दोनं ट्वीट करून म्हटलंय की, "असहिष्णुतेच्या नव्या टोकावर आपण पोहोचलोय आणि असं वाटतंय की, आपल्या देशात दहशतवाद पसरवण्यापासून आपण रोखण्यास असमर्थ ठरतोय."
बीबीसीचे पॅरिसस्थित प्रतिनिधींच्या मते, "व्यंगचित्र दाखवल्यामुळे हा हल्ला झाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाल्यास फ्रान्समधील नागरिकांना हा मोठा धक्का असेल. ते केवळ या हल्ल्याला क्रूर मानणार नाहीत, तर वर्गात शिकवलं म्हणून शिक्षकाला मारलं गेलं, अशा पद्धतीचा क्रूर हल्ला म्हणून ते लक्षात ठेवतील."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)