कोरोना व्हायरस नोटा आणि मोबाईलवर 28 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो : संशोधक

कोव्हीड -19 ला कारणीभूत असणारा कोरोना व्हायरस नोटा, मोबाईल फोनच्या स्क्रीन्स आणि स्टेनलेस स्टीलच्या वस्तूंवर तब्बल 28 दिवस जिवंत राहू शकतो असं एका अभ्यासात समोर आलंय.

ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय विज्ञान संस्थेने केलेल्या एका अभ्यासात कोरोना व्हायरस वाटलं होतं त्यापेक्षा कितीतरी अधिक काळ वातावरणात जगू शकतो अशाप्रकारचे निष्कर्ष समोर आलेत. पण हे निष्कर्ष काढण्यासाठी जे प्रयोग केले ते पूर्णपणे अंधारात केले.

सूर्यप्रकाशात असणारे यूव्ही किरण व्हायरसला मारून टाकतात हे याआधी सिद्ध झालेलं आहे. संसर्गित व्यक्ती खोकली, शिंकली किंवा बोलली तर जे ड्रॉपलेट्स बाहेर पडतात, ते निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेले तर त्यांना कोव्हिड-19 चा संसर्ग होतो हे सिद्ध झालेलं आहे.

हवेतल्या कणांमुळे एखाद्याला संसर्ग होण्याची शक्यता आहे हेही सिद्ध झालेलं आहे. एखाद्या पृष्ठभागावर कोरोना व्हायरस आहे आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीला कोव्हिड -19 चा संसर्ग होऊ शकतो की नाही याबाबत संशोधकांमध्ये मतमतांतरं आहेत. पण पृष्ठभागावर हा विषाणू असला तरी त्या पृष्ठभागाला हात लागल्यानंतर संसर्ग झाल्याची उदाहरणं आहेत.

नवा अभ्यास काय सांगतो?

प्रयोगशाळेत आधी झालेल्या चाचण्यांमध्ये हे सिद्ध झालंय की कोव्हिड-19 चा विषाणू दोन ते तीन दिवस नोटा आणि काच अशा पृष्ठभागांवर जिवंत राहू शकतो. तर साधारण सहा दिवसांपर्यंत प्लॅस्टीक आणि स्टेनलेस स्टीलवर जिवंत राहू शकतो. अर्थात वेगवेगळ्या चाचण्याचे निष्कर्ष वेगळे आहेत.

पण ऑस्ट्रेलियन संस्था CSIRO च्या चाचणीत असं आढळून आलंय की कोरोना व्हायरस 'अत्यंत मजबूत' आहे. आसपासचं वातावरण साधारण 20 अंश सेल्सिअस असेल आणि खोलीत सतत अंधार असेल तर हा व्हायरस गुळगुळीत पृष्ठभाग जसं की मोबाईल फोनची स्क्रीनची काच, नोटा किंवा प्लॅस्टिकवर 28 दिवस तग धरून राहू शकतो.

याच तुलनेन फ्लूचा व्हायरस अशाच परिस्थितीत 17 दिवस तग धरून राहू शकतो. व्हायरोलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात असंही म्हटलंय की कोव्हिड-19 चा विषाणू गरम वातावरणापेक्षा थंड वातावरणात जास्त काळ जिवंत राहू शकतो. अभ्यासातून समोर आलंय की 40 अशं सेल्सियसच्या वर तापमान गेल्यानंतर काही पृष्ठभागांवर असलेला व्हायसर 24 तासांच्या आत निष्क्रिय झाला.

मतभेद कशावरून?

कार्डिफ युनिवर्सिटीच्या साधी सर्दी अभ्यास केंद्राचे माजी संचालक प्रा रॉन एक्लेस यांनी या अभ्यासावर टीका केली आहे.

ते म्हणतात, "हा विषाणू 28 दिवसांपेक्षा जास्त काळ पृष्ठभागांवर तग धरून राहू शकतो असं म्हणणं म्हणजे लोकांमध्ये अनाठायी भीती पसरवण्यासारखं आहे. जेव्हा संसर्गित व्यक्ती खोकते, शिंकते त्यावेळेस जे ड्रॉपलेट्स बाहेर पडतात ते ताजे असल्यामुळे सक्रिय असतात. असे सक्रिय ड्रॉपलेट्स जर कोणत्या पृष्ठभागावर जमा झाले आणि ते सक्रिय असतानाच त्यांच्याशी लगेच दुसऱ्या व्यक्तीचा संबंध आला तर पृष्ठभागाव्दारे संसर्ग व्हायची शक्यता असते. पण या अभ्यासात ताजे ड्रॉपलेट्स वापरले गेलेले नाहीत."

या अभ्यासात ज्या धोक्यांचं वर्णन केलंय त्याचा खऱ्या आयुष्याशी 'फारच थोडा' संबंध आहे असंही ते म्हणतात.

काही दिवसांपूर्वी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये प्राध्यापक असणाऱ्या मोनिका गांधी यांनी म्हटलं होतं की "कोरोना व्हायरस पृष्ठभागांवरून पसरत नाही."

हात आणि मोबाईल फोनची स्क्रीन वारंवार स्वच्छ करण्याची गरज

बीबीसीचे विज्ञान प्रतिनिधी पल्लव घोष या अभ्यासाचं विश्लेषण करताना सांगतात की, "कोव्हिड-19 मुख्यत्वे हवेतून पसरतो. हवेत असणारा व्हायरस साधारण तीन तास सक्रिय राहातो. पण पृष्ठभागांवरचा व्हायरस किती काळ सक्रिय राहतो याविषयी मतभेद आहेत.

या अभ्यासात कोरोना व्हायरस नोटा किंवा फोनचे स्क्रीन्स अशा गुळगुळीत पृष्ठभागांवर 28 दिवसांपेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकतो असं समोर आलं आहे. पण हेही लक्षात घ्यायला हवं की या प्रयोगाचं वातावरण विषाणूला अनुकूल असं होतं. खऱ्या आयुष्यात सतत अंधार, सूर्यप्रकाश किंवा कोणत्याही प्रकारची यूव्ही किरणं नसणं आणि सतत 20 सेल्सिअस तापमान असणं अशी परिस्थिती सलग नसणार. त्यामुळे याचे निष्कर्ष खऱ्या आयुष्यात बदलू शकतात."

तरीही या अभ्यासाने हात सतत धुणं किंवा आपण ज्या पृष्ठभागांना सतत स्पर्श करतो असे पृष्ठभाग वारंवार निर्जंतूक करणं या गोष्टींचं महत्त्व पुन्हा एकदा ठसवलं आहे.

या अभ्यासाचं महत्त्व

CSIRO चे प्रमुख लॅरी मार्शल म्हणतात की, "कोणत्या पृष्ठभागावर हा व्हायरस किती काळ सक्रिय राहू शकतो हे लक्षात आल्यानं आपण या व्हायरसच्या प्रसाराचा जास्त चांगल्या प्रकारे अंदाज बांधू शकतो आणि लोकांचा बचाव करू शकतो."

तो पुढे असंही म्हणतात की, "या अभ्यासातून हा व्हायरस थंड तापमानात स्टेनलेस स्टीलवर किती काळ सक्रिय राहू शकतो हे लक्षात आलं. यामुळे जगभरातली शीतगृह किंवा मांसाच्या फॅक्टऱ्या इथे हा व्हायसर वाऱ्यासारखा का पसरला हे समजायला मदत होईल."

CSIRO च्या अभ्यासाकांच्या मते कोरोना व्हायरस ताज्या आणि फ्रोजन अन्नावरही सक्रिय राहू शकतो.

पण जागतिक आरोग्य संघटनेच्या मते अजून तरी अन्न किंवा अन्नाचं पॅकेजिंग याव्दारे कोणाला संसर्ग झाल्याचं उदाहरण समोर आलेलं नाही, पण तरीही त्यांनी याबाबत काय काळजी घ्यावी याचे निर्देश दिलेले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)