डोनाल्ड ट्रंप यांना कोरोना झाल्यामुळे अमेरिकेतील निवडणुकीवर काय परिणाम होईल?

डोनाल्ड ट्रंप, कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत नुकतीच एक उलथापालथ झाली. अमेरिकेतल्या निवडणुकांच्याबाबत आतापर्यंत हे अनेकदा लिहिण्यात आलंय. पण यावेळी जे घडलंय ते यापूर्वी कधीही घडलं नव्हतं.

अध्यक्षीय निवडणुकांच्या केवळ 32 दिवसांआधी डोनाल्ड ट्रंप यांना कोव्हिड 19 झालाय. ते 74 वर्षांचे आहे आणि या रोगासाठीच्या 'हाय-रिस्क' वयोगटात मोडतात.

लक्षणं सौम्यं असली तरी उपचारादरम्यान त्यांना क्वारंटाईन व्हावं लागेल. म्हणजेच निवडणुकीवर किमान त्यांच्या बाजूने तरी परिणाम झालेला आहे.

अध्यक्षीय निवडणुकीसाठीच्या प्रचाराचं काय?

राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी प्रचारासाठी गेल्या काही आठवड्यांमध्ये मिनेसोटा, पेन्सेलव्हेनिया, व्हर्जिनिया, जॉर्जिया, फ्लोरिडा आणि नॉर्थ कॅरोलिनाला भेट दिली होती. पण आता मात्र प्रचार थांबलेला आहे.

ट्रंप यांना स्वतःला प्रचार करता येणार नाही. यापूर्वी अनेकदा त्यांनी त्यांचे कुटुंबीय वा ज्येष्ठ सहकाऱ्यांची अशा कामांसाठी मदत घेतलेली होती.

पण यातले अनेक जण सध्या संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आल्याने क्वारंटाईन आहेत. त्यामुळे त्या पातळीवरही ट्रंप यांचा प्रचार थांबलेला आहे.

टाऊन हॉल पद्धतीने होणारा, प्रेक्षकांच्या प्रश्नांचीही उत्तरं देणारा वादविवादाचा पुढचा कार्यक्रम - 'प्रेसिडेन्शियल डिबेट' 15 ऑक्टोबरला फ्लोरिडामध्ये होऊ घातलाय, पण त्याबद्दलही शंका निर्माण झालेली आहे. कदाचित हा कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होईल. पण त्यावेळी ट्रंप यांची तब्येत कशी असेल यावर हे अवलंबून असेल.

निवडणुकीचं वेळापत्रक बदलता येईल का याविषयीची चर्चा सुरू झालेली आहे पण यासाठी काँग्रेसच्या दोन्ही सदनांमध्ये बहुमत मिळावं लागेल. शिवाय काही राज्यांमध्ये अर्ली व्होटिंगला - आगाऊ मतदानाला सुरुवात झालेली आहे.

निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीसमोर यावेळी अनेक आव्हानं होती.

कोरोनाची जागतिक साथ आणि त्यातून निर्माण झालेलं आर्थिक संकट, जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूनंतर वर्ण आणि वंशभेदाच्या विरोधात आणि पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या विरोधात अमेरिकेतल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये अनेकदा हिंसक झालेली आंदोलनं आणि निदर्शनं, इतर अनेक लहान अडचणी आणि वाद होऊनही अध्यक्षपदाची शर्यत सुरळीत सुरू होती.

जो बायडन

फोटो स्रोत, Getty Images

राष्ट्रीय पाहण्यांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन गेले काही महिने आघाडी कायम राखून आहेत. त्यांची आघाडी फार मोठी नसली तरी महत्त्वाच्या स्विंग स्टेट्समध्ये त्यांना कौल मिळताना दिसतोय.

कोरोना व्हायरसच्या जागतिक साथीची परिस्थिती ट्रंप यांनी ज्याप्रकारे हाताळली त्यावरून या प्रशासनाला जनतेने फारसं वाखाणलेलं नाही. त्यामुळे या विषाणू आणि रोगाकडे लक्ष वेधून घेणारी कोणतीही घटना ट्रंप यांच्या पुन्हा निवडून येण्याच्या शक्यतेवर परिणाम करणारी आहे. शिवाय ट्रंप यांनी कोव्हिड 19 ला अनेकदा गांभीर्याने न घेता त्याविषयी विधानं केली होती आणि ते सगळं लोकांना आठवण्याची शक्यता आहे.

मास्क वापरण्याबद्दल आणि त्यांच्याइतक्या मोठ्या रॅलीज न घेतल्याबद्दल पहिल्या डिबेटदरम्यान ट्रंप यांनी जो बायडन यांची अनेकवेळा थट्टा केली होती.

ट्रंप म्हणाले होते, "मी त्यांच्याप्रमाणे मास्क वापरत नाही. तुम्ही कधीही त्यांना पाहिलं तर त्यांनी मास्क लावलेला असतो."

डोनाल्ड ट्रंप, कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

तसं पहायला गेलं तर राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी काही वेळा सोशल डिस्टंसिंगचं महत्त्वं आणि या कोरोना व्हायरसा गांभीर्याने घेण्याबद्दल बोलून दाखवलं खरं. पण अनेकदा त्यांनी वैज्ञानिकदृष्ट्या न पटणारी वक्तव्यंही केली. हा व्हायरस 'जादूने गायब होईल' असंही म्हणत त्यांनी आक्रमकरित्या निर्बंध लादणाऱ्या वा पावलं उचलणाऱ्या, त्यांना अपेक्षित वेगाने उद्योग आणि शाळा खुल्या न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर टीका केली होती.

ट्रंप यांनी याआधी केलेल्या या सगळ्या कॉमेंट्स आता पुन्हा डोकं वर काढतील आणि त्यांनी या जागतिक साथीकडे पुरेशा गांभीर्याने पाहिलं की नाही याविषयीच्या शंका उपस्थित केल्या जातील.

डेमोक्रॅट्सना कोणता धोका?

देशात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना अमेरिकेतील जनतेने राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला.

कोरोनाच्या संसर्गाबाबत ट्रंप यांना कठोर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असताना त्यांना आणि पत्नीलाच कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. अशा स्थितीत त्यांना संपूर्ण देशातून सहानुभूती प्राप्त होऊ शकते. त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणारे अनेकजण पुढे येतील.

अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 2 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. पीडित कुटुंबांना याबाबत आरोप-प्रत्यारोप करणं, बरं वाटणार नाही.

बायडेन यांच्या टीमसाठी या परिस्थितीला कसं सामोरं जावं, याचं आव्हान उभं राहू शकतं.

जो बायडन

फोटो स्रोत, Getty Images

डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बायडेन यांनी गेले काही दिवस जोखीम कमी करण्याच्या हेतू जास्त समोर येणं टाळलं. यावरून ते तळघरात लपून बसल्याची टीका रिपब्लिकन पक्ष आणि स्वतः राष्ट्राध्यक्षांनी केली होती.

गेल्या काही दिवसांपासून ते बाहेर पडले, वैयक्तिक भेटी-गाठी आणि प्रचारासाठी रेल्वे प्रवास आदी गोष्टी ते करताना दिसत आहेत. कोरोना काळातही ट्रंप लोकांची वैयक्तिक भेट घेतात, यावरून त्यांनी पूर्वी टीका केली होती. पण आता तेच दारोदारी जाऊन मतदारांची भेट घेताना दिसत आहेत.

राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्यावर उपचार सुरू असताना बायडेन आपला प्रचार स्थगित करण्याची चिन्ह नाहीत. पण सध्याचं प्रचारतंत्रच वापरावं किंवा नाही, याबाबत त्यांना विचार करावा लागेल.

ट्रंप यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर बायडेन यांनी ट्वीट करून त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या होत्या.

डोनाल्ड ट्रंप, कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

आपल्या ट्वीटमध्ये बायडेन म्हणतात, "जिल आणि मी माझ्या सदिच्छा राष्ट्राध्यक्ष ट्रंप आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रंप यांना पाठवल्या आहेत. त्यांच्या व कुटुंबीयांच्या सुदृढ आरोग्यासाठी आपण प्रार्थना करूया."

बायडेन त्यांच्या डेमोक्रेटिक पक्षासाठी एक मैलाचा दगड ठेवू पाहत आहेत. पण त्यांच्यासाठी ही लढाई इतकी सोपी असणार नाही.

सुप्रीम कोर्टातील नियुक्तीवर परिणाम?

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर वॉशिंग्टनच्या व्हाईट हाऊसला मोठा धक्का बसला आहे.

अमेरिकन संसदेने (काँग्रेस) निवडणुकीच्या प्रचाराकरिता सदस्यांना वेळ दिला होता. सध्या संसद दोन आघाड्यांवर काम करताना दिसत आहे. एक म्हणजे, कोव्हिड-19च्या संकटकाळात जाहीर करण्यात आलेल्या मदतनिधीचं वाटप आणि दुसरी गोष्ट म्हणजे, ट्रंप यांनी नियुक्त केलेल्या अॅमी कोनी बॅरेट यांना अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीपदाची जबाबदारी देण्याची प्रक्रिया पार पाडणं.

प्रशासनातील ट्रंप यांचे निकटवर्तीय अधिकारी या कामात सहभागी झाले आहेत.

कोषागार सचिव स्टीव्ह म्नूचिन यांनी गुरुवारी (1 ऑक्टोबर) अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्याशी शेवटची चर्चा करण्याचा प्रयत्न केला.

डोनाल्ड ट्रंप, कोरोना

फोटो स्रोत, POOL/GETTY IMAGES

व्हाइट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मेदोज आणि उपराष्ट्राध्यक्ष माइक पेंस यांच्यासमवेत बॅरेटने बुधवारी सिनेटच्या रिपब्लिकन सदस्यांची भेट घेतली. या सदस्यांच्या मतांवरूनच बॅरेट यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्बत होणार आहे.

म्नूचिन, मिडोस आणि पेंस यांची चाचणी निगेटिव्ह आली असती तरी अद्याप काहीच स्पष्ट नाही. त्यामुळे बॅरेट यांची निवडप्रक्रिया तूर्तास सोपी नाही.

त्यामुळे सध्यातरी अध्यक्षीय निवडणुकीनंतरच त्यांची नियुक्ती होईल, अशी चिन्ह आहेत. यात ट्रंप यांना पराभवाचा सामना करावा लागला, तर चित्र वेगळं दिसू शकतं.

याचे इतर परिणाम काय होतील?

ट्रंप यांच्या कोरोनाग्रस्त होण्यामुळे इतर राजकीय परिणाम काय होऊ शकतात? हे मुख्यत्वे अमेरिकन सरकार उच्चपदस्थ पातळीवर व्हायरस किती पसरला आहे, शिवाय राष्ट्राध्यक्षांनी कोरोनावरील उपचारांना कसा प्रतिसाद दिला, यावर अवलंबून आहे.

राजकीय अस्थैर्यामुळे पुन्हा चित्र बिघडू शकतं. याचा अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होऊ शकतो.

डोनाल्ड ट्रंप, कोरोना

फोटो स्रोत, Reuters

ट्रंप यांच्या निदानानंतर कोरोना व्हायरसच्या संकटाकडे एका वेगळ्या स्वरूपात पाहिलं जाऊ शकतं. मतदारांनी वैयक्तिकरित्या मतदान करण्याऐवजी मेल-इन पद्धतीचा वापर करून मतदान करावं, यासाठी प्रोत्साहन दिलं जाऊ शकतं.

या सर्वांमुळे निकाल लागण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. निवडणूक तुल्यबळ झाल्यास निकालावरून कायदेशीर लढाईसुद्दा होऊ शकते.

या सर्व कारणांमुळे यंदाच्या वर्षी राजकीय वादळ येण्याची शक्यता आहे. शिवाय आणखी विचित्र परिस्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)