कोरोना औषधः कोरोनाविर औषधाला रशियात मंजुरी, पुढच्या आठवड्यापासून दुकानात उपलब्ध होणार

फोटो स्रोत, YURI SMITYUK
कोरोना व्हायरसची सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांसाठी अँटी-व्हायरल औषधाला मंजुरी दिली आहे. कोरोनाविर' (Coronavir) असे या औषधाचे नाव आहे. 'आर-फार्म' नामक कंपनीने हे औषध तयार केलं आहे.
पुढच्या आठवड्यापासून 'कोरोनाविर' हे औषध रशियातल्या दुकानांमध्ये उपलब्ध होईल, अशी माहिती आर-फार्म कंपनीनं दिली आहे.
'प्रिस्क्रिप्शन ड्रग' म्हणून या औषधाला मंजुरी मिळाल्यानं डॉक्टरांचा सल्ला आणि शिफारस औषध खरेदीसाठी बंधनकारक असेल. डॉक्टरांच्या परवानगीनंतरच औषध खरेदी करता येईल.

फोटो स्रोत, YEGOR ALEYEV
याआधी म्हणजे मे महिन्यात रशियातच आणखी एका अशाच औषधाला मंजुरी देण्यात आलीय. 'एव्हिफाविर' (Avifavir) असं त्या औषधाचं नाव होतं.
तिसऱ्या टप्प्यात 168 रुग्णांवर चाचणी
कोरोनाविर आणि एव्हिफविर ही रशियातली दोन्ही औषधं जपानमध्ये तयार करण्यात आलेल्या 'फेव्हिपिरविर' (Favipiravir) या औषधाच्या फॉर्म्युल्यावर आधारित आहेत.
फेव्हिपिरविरसुद्धा अँटी-व्हायरल औषध असून, जपानमध्ये या औषधाचा वापर फ्लू आणि इतर साथीच्या आजारांवर औषध म्हणून केला जातो.

फोटो स्रोत, ALEXANDER DEMIANCHUK
आर-फार्म कंपनीच्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 168 रुग्णांवर चाचणी केल्यानंतरच 'कोरोनाविर' औषधाला मंजुरी मिळाली आहे.
रशियन सरकारच्या अहवालानुसार, कोरोनाची लागण झाल्याने हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या रुग्णांवर चाचणीसाठी जुलैमध्ये 'कोरोनाविर' औषधाला परवानगी देण्यात आली होती.
सर्वात आधी औषध किंवा लस बनवण्याची स्पर्धा
कोरोनावरील औषध बनवल्याची घोषणा करत रशिया जागतिक स्तरावर स्वत:ला 'ग्लोबल लीडर' म्हणून पुढे आणू पाहते, असं जाणकारांना वाटतं.
याआधी रशियानं कोरोनाला रोखण्यासाठी 'स्पुटनिक-5' नावाची लस बनवली होती आणि ही लस इतर देशांमध्ये वापरासाठी देण्यासाठी मंजुरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.

फोटो स्रोत, MIKHAIL KLIMENTYEV
रशियातील कोरोनावरील लस भारतात आणण्याची तयारीही सुरू आहे.
रशा डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड (RDIF) ने स्पुतनिक-5 लशीच्या वैद्यकीय चाचणी आणि 10 कोटी डोसच्या वितरणासाठी हैदराबादस्थित डॉ. रेड्डीज लॅब (DRL) सोबत करार केला आहे.
तसंच, या लशीच्या उत्पादनासाठी भारतातील पाच मोठ्या उत्पादकांसोबत चर्चाही सुरू आहे. हे उत्पादन केवळ भारतासाठी नव्हे, तर जगभरासाठी असेल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )








