You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : लहान मुलांमध्ये ही लक्षणं दिसल्यास सतर्क व्हा
- Author, जेम्स गॅलघर
- Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी
लहान मुलांमध्ये अतिसार, उलटी आणि पोटदुखी ही कोरोना संसर्गाची लक्षणं असू शकतात, असा ब्रिटीश संशोधकांचा दावा आहे.
क्विंस युनिव्हर्सिटी बेलफास्टमध्ये कोरोना विषाणू आणि लहान मुलं या विषयावर संशोधन सुरू आहे. या संशोधकांच्या मते कोरोना विषाणूची जी लक्षणं सांगितली जात आहेत त्यात या नवीन लक्षणांचाही समावेश करायला हवा.
सध्या कोरोना विषाणूची तीनच अधिकृत लक्षणं आहेत - ताप, खोकला, गंध आणि चव जाणे. यापैकी कुठलंही लक्षण असणाऱ्या व्यक्तीला होम आयसोलेशनचा सल्ला देण्यात आला आहे. तसंच त्या व्यक्तीला कोव्हिड-19 चाचणी करण्यासही सांगण्यात आलं आहे.
मात्र, लहान मुलांबाबत ब्रिटीश संशोधक करत असलेल्य या अभ्यासावरून लक्षणांच्या यादीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संशोधनात जवळपास एक हजार लहान मुलांचा समावेश करण्यात आला. मेडरिक्स या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनानुसार 992 मुलांपैकी 68 मुलांच्या शरिरात कोरोना विषाणूविरोधातल्या अँटीबॉडीज आढळल्या.
ज्या मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत त्यातल्या निम्म्या मुलांमध्ये कोव्हिड-10 ची लक्षणंही आढळली आहेत. मात्र, यापैकी एकाही मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडली नाही.
या संशोधन कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. टॉम वॉटरफिल्ड सांगतात, "चांगली बाब म्हणजे विषाणूमुळे मुलांची प्रकृती फार ढासळली नाही. मात्र, त्या संक्रमित मुलांकडून विषाणू इतर किती मुलांपर्यंत पोहोचला, हे आपल्याला माहिती नाही. आमच्या संशोधनात मुलांमध्ये अतिसार आणि उलट्या ही लक्षणं म्हणून दिसली. यांचा अधिकृत लक्षणांच्या यादीमध्ये समावेश करण्याचा आमचा विचार आहे."
अमेरिकेतल्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने कोव्हिड-19 च्या लक्षणांमध्ये मळमळ, उलटी आणि अतिसार यांचा समावेश केलेला आहे.
यापूर्वी ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्विसने कोरोना विषाणूची तीन लक्षणं सांगितलेली आहेत.
ही लक्षणं आढळताच तुम्ही सतर्क होऊन सर्व ती काळजी घ्यायची आहे. यात वैद्यकीय सल्ला घेण्याचाही समावेश आहे.
तीन लक्षणं कुठली?
सारखा खोकला येणं - कोरोनाची लागण झालेली असल्यास सारखा खोकला येऊ शकतो. एकदा खोकल्याची उबळ आली की, जवळपास तासभर किंवा त्याहून अधिक वेळेसाठी खोकला येऊ शकतो. 24 तासात तीन किंवा त्याहून जास्त वेळा अशी उबळ येऊ शकते. खोकल्यामध्ये कफ असल्यास तेसुद्धा काळजीचं कारण असू शकतं.
ताप - या विषाणूमुळे थंडी वाजून ताप येताना दिसतो.
गंध आणि चव जाणे - तज्ज्ञांच्या मते खोकला आणि ताप याव्यतिरिक्त हेदेखील कोरोना विषाणूची लागण झाल्याचं महत्त्वाचं लक्षण असू शकतं, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
त्यामुळे तुम्हाला किंवा तुम्ही ज्यांच्यासोबत रहाता त्यापैकी कुणाला यातलं एकही लक्षण आढळल्यास घरीच आयसोलेट व्हा, जेणेकरून इतर कुणाला संसर्ग होऊ नये.
अमेरिकेतल्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) या संस्थेच्या म्हणण्यानुसार थंडी वाजणे, थरथरणे, अंगदुखी आणि घसा खवखवणे हीसुद्धा कोरोना विषाणूची लागण झाल्याची लक्षणं असू शकतात.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणं दिसायला सरासरी पाच दिवसांचा वेळ लागतो, असं मानलं जातं. काही जणांमध्ये यापेक्षा कमी कालावधीसुद्धा लागू शकतो.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार विषाणू शरीरात जाणं आणि लक्षणं दिसणं, यात 14 दिवसांचाही वेळ लागू शकतो.
हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज कधी भासते?
ज्या लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे त्यापैकी बहुतांश लोक घऱी आराम केल्याने आणि पॅरासिटॅमॉलसारख्या दुखणं कमी करण्याचं औषध घेऊन बरे होऊ शकतात.
श्वास घ्यायला त्रास होत असेल तेव्हाच हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज असेत. रुग्णाच्या फुफ्फुसांची तपासणी करून संसर्ग वाढला आहे का, रुग्णाला ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज आहे का, हे डॉक्टर ठरवतात.
भारतात आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या वेबसाईटवर कोरोना संसर्गाशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध आहे. ब्रिटनचे नागरिक NHS111 च्या वेबसाईटवर कोरोना संबंधी माहिती मिळवू शकतात.
रुग्णाला श्वास घ्यायला खूप त्रास होत असेल तर भारत सरकारच्या +91-11-23978046 या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा 24 तास सुरू असणाऱ्या 1075 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकतात. देशातल्या वेगवेगळ्या राज्यांनीही आपल्या नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर सुरू केले आहेत.
तर ब्रिटनमध्ये 999 हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे.
आयसीयूमध्ये काय करतात?
हॉस्पिटलमधल्या ज्या वॉर्डात अत्यंत गंभीर रुग्णांना ठेवतात त्याला अतिदक्षता विभाग किंवा इंटेंसिव्ह केअर युनिट (ICU) म्हणतात.
इथे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या तोंडावर ऑक्सिजन मास्क लावून किंवा नाकातून ट्युब टाकून त्यांना ऑक्सिजन पुरवला जातो.
अत्यंत गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवतात. व्हेंटिलेटरच्या मदतीने थेट फुफ्फुसांनाचा ऑक्सिजन पुरवठा केला जातो. यासाठी रुग्णाच्या तोंडात नळी टाकतात किंवा नाक किंवा घशाला छिद्र करून तिथून फुफ्फुसांना ऑक्सिजन पुरवठा केला जातो.
कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास काय करावे?
कोरोना संसर्गाची सौम्य लक्षणं असल्यास त्यांनी स्वतःला घरातच सेल्फ आयसोलेट करायला हवं.
तज्ज्ञांच्या मते कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास थेट हॉस्पिटलमध्ये जाणं टाळलं पाहिजे. मात्र, गरज असेल तर डॉक्टरांनी जरूर संपर्क करावा.
कोरोना विषाणू संसर्गापासून स्वतःचा बचाव कसा कराल?
कोरोना विषाणू किंवा कोव्हिड-19 पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नियमितपणे हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवावे.
कोरोना विषाणूचा संसर्ग असलेली व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा तिच्या तोंडावाटे किंवा नाकावाटे अत्यंत अतिसूक्ष्म तुषार हवेत पसरतात. या कणांमध्ये कोरोना विषाणू असतात.
संक्रमित व्यक्तीच्या जवळ गेल्याने हे विषाणूयुक्त कण श्वासावाटे आपल्याही शरीरात प्रवेश करू शकतात.
दुसरं म्हणजे कोरोना विषाणू असलेले तुषार एखाद्या पृष्ठभागावर पडल्यास अशा संक्रमित पृष्ठभागाला हात लावल्यास तुमच्या हाताला ते विषाणू चिकटतात. असे हात तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावल्यास नाक, तोंड किंवा डोळ्यावाटे हे विषाणू आपल्या शरीरात जातात.
त्यामुळे खोकताना किंवा शिंकताना टिशू पेपरचा वापर करायला हवा. हात न धुता चेहऱ्याला स्पर्श करू नये आणि कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणं टाळावं. या उपायांनी आपण कोरोना विषाणूच्या संपर्कात येण्यापासून स्वतःचा बचाव करू शकतो.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते फेस मास्क प्रभावी सुरक्षा देत नाहीत.
कोरोना विषाणू किती घातक आहे?
कोरोना विषाणूग्रस्तांच्या तुलनेत मृतांची संख्या बघितली तर मृत्यूदर खूपच कमी आहे. खरंतर या आकडेवारीवर पूर्णपणे विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. मात्र, तरीही आकडेवारीनुसार कोरोनाचा मृत्यूदर केवळ 1 ते 2 टक्के इतकाच आहे.
56,000 कोरोनाग्रस्तांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासाच्या आधारे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे -
- कोरोना विषाणूमुळे 6% लोकांची प्रकृती गंभीररित्या ढासळली. यात फुफ्फुसं निकामी होणे, सेप्टिक शॉक, ऑर्गन फेल्युअर आणि मृत्यूचा धोका होता.
- 14% लोकांमध्ये गंभीर लक्षणं आढळली. यात श्वास घ्यायला त्रास होणे आणि वेगाने श्वासोच्छावास असे त्रास आढळून आले.
- 80% लोकांमध्ये संसर्गाची सौम्य लक्षणं आढळली. उदाहरणार्थ ताप आणि खोकला. अनेकांना न्युमोनियाचाही त्रास झाला.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे वयोवृद्ध व्यक्ती, दम्यासारखा श्वासाचा आजार असणारे, डायबेटिज आणि हृदयाशी संबंधित आजार असणारे गंभीररित्या आजारी पडण्याची शक्यता जास्त आहे.
रुग्णाला श्वासोच्छावासात मदत करणे आणि त्याच्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे, (जेणेकरून रुग्णाचं शरीर स्वतःच कोरोना विषाणूचा सामना करेल) हाच यावरचा उपचार आहे.
कोरोना विषाणूप्रतिबंधक लसीवर अजून संशोधन सुरू आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास तुम्हाला सेल्फ आयसोलेट होण्याचा सल्ला दिला जातो.
पब्लिक हेल्थ इंग्लंडने म्हटलं आहे की, आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे, असं वाटणाऱ्यांनी लगेचच डॉक्टर, फार्मसी आणि हॉस्पिटलमध्ये जाणं टाळावं. फोनवरूनच सल्ला घ्यावा.
जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील कुठले खबरदारीचे उपाय करायला हवे, याची सविस्तर माहिती दिलेली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)