UAE आणि इस्रायलचे संबंध 48 वर्षांनंतर पूर्वपदावर?

संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख खलिफा बिन जायेद यांनी 1972चा इस्रायल बहिष्कार कायदा रद्द करत असल्याची घोषणा केली. जुना कायदा रद्द झाल्याने युएई आणि इस्रायल यांच्यात आता कोणतेही आर्थिक, व्यापारी करार होऊ शकतात.

युएईतील सरकारी न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, शेख खलिफा बिन जायेद यांनी आपल्या फर्मानात लिहिलं की इस्रायलवर बहिष्कार घालणारा 1972 मधील कायदा क्रमांक 15 रद्द करण्यात येईल.

हे फर्मान महत्त्वाचं का?

अमेरिका आणि इस्रायल सरकारचं शिष्टमंडळ अबूधाबीला पोहोचण्या 48 तास आधी ही घोषणा करण्यात आली आहे. अमेरिका, इस्रायल आणि युएई यांच्यात एक करार होण्याची शक्यता आहे. याद्वारे इस्राइल आणि युएई यांच्यातील संबंध पूर्वपदावर यायला मदत होईल.

अमेरिका आणि इस्रायलचं शिष्टमंडळ इस्रायली विमान सेवेच्या एआई971ने अबूधाबीला उतरलं. इस्रायलची राजधानी तेल अवीवहून युएईला येणारं हे पहिलंच विमान आहे.

फर्मानानुसार, युएईत राहणारा कोणताही माणूस आणि कंपनी इस्रायलस्थित व्यक्ती तसंच कंपनीशी वाणिज्य करार करू शकते.

इस्रायलमध्ये तयार झालेल्या वस्तू, उत्पादनांना युएईत आणण्याची, विक्रीची परवानगी असेल.

विश्लेषकांच्या मते, शेख यांचं ताजं फर्मान औपचारिक आणि प्रतीकात्मक आहे. गेल्या दोन दशकांमध्ये इस्रायल आणि युएई यांच्यातील व्यापारी संबंध वाढतच आहेत.

इस्रायली अधिकाऱ्यांच्या मते, गेल्या 20 वर्षांत कमीत कमी 500 इस्रायली कंपन्यांनी युएईत व्यापारी करार केले आहेत.

डोनाल्ड ट्रंप यांनी केली मध्यस्थी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या मध्यस्थीने दोन्ही देशांमधील व्यापारी, राजनयिक संबंध अधिक दृढ होतील असं युएई आणि इस्रायलतर्फे 13 ऑगस्टला सांगण्यात आलं होतं.

युएई आणि इस्रायल यांच्यातील या सामंजस्याने मध्य पूर्वेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समीकरणच बदलून जाणार आहे.

युएईने शांततेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकलं आहे. मध्य पूर्व क्षेत्रात स्थिरता येण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. दोन्ही देशांना आर्थिक आणि व्यापारी आगेकूच करण्यासाठी हे निर्णायक ठरेल असं इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गबी अश्केनाजी यांनी म्हटलं आहे.

इस्रायलच्या चॅनेल 13 टीव्हीनं म्हटलंय की, द्विपक्षीय व्यापार सुरू झाल्यास दरवर्षी चार अब्ज अमेरिकन डॉलरची उलाढाल होऊ शकते. मात्र, लवकरच हा आकडा तीन ते चारपट वाढू शकतो. मात्र, सरकारी अधिकाऱ्यांनी या आकड्यांना दुजोरा दिलेला नाही.

'त्यांचा पैसा, आमचा अनुभव'

इस्रायलयचे कृषिमंत्री एलन शूस्टर यांनी सांगितलं, "इस्रायल अशा संभाव्य संयुक्त-योजनांवर काम करतंय, ज्यातून संयुक्त अरब अमीरातमधील खाद्य सुरक्षा अधिक चांगली होईल. म्हणजे, इस्रायल युएईला वाळवंटात शेती करण्यासंदर्भात मदत करेल आणि खाऱ्या पाण्याला पिण्यालायक बनवण्यासाठीही मदत करेल."

इस्रायलचा पैसा आणि आमच्या अनुभवासोबत दोन्ही देश चांगली कामगिरी करू शकतात, असा विश्वास काही दिवासांपूर्वीच एलन शूस्टर यांनी एका इस्रायली एफएम चॅनेलशी बोलताना व्यक्त केला होता.

संरक्षण, वैद्यकीय क्षेत्र, पर्यटन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात इस्रायल आणि युएई एकत्रित काम करेल, असं दोन्ही देशांचे अधिकारी म्हणाले.

इस्रायल आणि युएई यांमध्ये गेली अनेक वर्षं हवाई वाहतूक झाली नाहीय. त्यामुळे सोमवारी येणारं विमान सौदी अरेबियावरून येईल का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण सौदी अरेबिया आणि इस्रायलमध्ये कुठलेच अधिकृत संबंध नाहीत.

मे महिन्यात एतिहाद एअरवेजचं एक मालवाहू विमान युएईवरून तेल अवीवमध्ये (इस्रायल) गेलं होतं. या विमानातून पॅलेस्टियनसाठी कोरोनाशी लढण्यासाठी काही साहित्य होतं. युएईहून इस्रायलला गेलेलं हे पहिलं अधिकृत विमान असल्याचं म्हटलं गेलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)