कोरोना व्हायरस: घरी आणि ऑफिसमध्ये असताना कोरोनाला दूर ठेवण्यासाठी 5 महत्त्वाचे उपाय

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, डेव्हिड शुकमन
    • Role, बीबीसी न्यूज सायन्स एडिटर

शुद्ध खेळती हवा कोरोनाला दूर ठेऊ शकते का? जाणून घेऊया

हवा खेळती राहील अशी प्रशस्त रचना ही घरी राहून कोरोनाला दूर ठेवण्यात महत्त्वाची आहे. थंडी काही दिवसातच सुरू होईल. थंडी आणि कोरोना यामुळे अनेकजण घरी राहणंच पसंत करतील.

कोरोना व्हायरसला दूर ठेवण्यासाठी सातत्याने हात धुणं, सॅनिटायझर लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे आपल्याला अनेक महिने सांगण्यात आलं आहे. आपण ते पाळतही आहोत.

परंतु शास्त्रज्ञ, अभियंत्यांच्या मते आपण कोणत्या हवेत वावरतोय, आपल्या श्वासागणिक शरीरात काय जातं आहे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा मुलं शाळेत जाऊ लागतील आणि अधिकाधिक माणसं ऑफिसला जाऊ लागतील तेव्हा या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील.

चांगलं वायूविजन कसं कळीचं ठरतं, कसं ते पाच मुद्यांनिशी पाहूया.

1. कोंदट हवा असेल तर वेळीच निघा

तुम्ही एखाद्या खोलीत गेलात आणि हवा शिळी आहे असं जाणवलं तर वायूविजनामध्ये काहीतरी गडबड आहे असं समजावं.

स्वच्छ मोकळी हवा खेळती नसेल तर कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

नवीन संशोधनानुसार, दाटीवाटीच्या ठिकाणी जिथे हवा कोंडून राहते तिथे कोरोना विषाणू हवेच्या माध्यमातून पसरण्याची शक्यता असते. विषाणू अतिसूक्ष्म स्वरुपात हवेत रेंगाळतो.

कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर कामाच्या ठिकाणांसाठी एक नियमावली जाहीर करण्यात आली. त्यानुसार प्रत्येकाला 10 लिटर शुद्ध मोकळी हवा मिळायला हवी असं नमूद करण्यात आलं होतं. आता थंडीच्या दिवसात ही गोष्ट खूपच महत्त्वाची ठरणार आहे.

म्हणूनच एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलात आणि कोंदट असल्याचं जाणवलं तर तिथून बाहेर पडा, असं चार्टर्ड इन्स्टिट्यूशन ऑफ बिल्डिंग सर्व्हिसेस इंजिनियर्सचे तांत्रिक संचालक डॉ. हायवेल डेव्हिस यांनी सांगितलं.

कोरोना
लाईन

सातत्याने शुद्ध खुली हवा मिळत राहणं हे आवश्यक आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.

कोरोनाबाधित व्यक्ती इमारतीत असेल आणि तुम्ही बरीच मोकळी हवा तिथे सोडू शकलात, तर त्या संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या माध्यमातून दूषित झालेली हवा तुम्ही नीट करण्याचं काम करत आहात. अन्य लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता तुम्ही कमी करत आहात.

2. एसीची रचना जाणून घ्या

ऑफिसमध्ये, दुकानांमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवलेली असते. परंतु ती कोणत्या स्वरुपाची आहे हे समजून घ्या.

स्प्लिट एअर कंडिशनर म्हणजे भिंतीवर पांढरा बॉक्स बसवलेला असतो. हा एसी सभोवतालातली हवा घेतो, थंड करतो आणि सोडतो.

दुसऱ्या शब्दात सांगायचं तर हा एसी हवा उष्ण ते थंड अशी करून देतो. थोड्या वेळासाठी अशा एसी आहे अशा ठिकाणी जायला हरकत नाही पण जास्त काळ तिथे थांबू नका. चीनमध्ये एका रेस्तराँमध्ये झालेल्या संशोधनानुसार कोरोनाचा संसर्ग होण्यासाठी अशा प्रकारचा एसी कारणीभूत ठरला.

कोरोना एसी

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, एसी

एका ग्राहकाला कोरोनाचा संसर्ग झाला होता. परंतु त्याला हे माहिती नव्हतं. कारण त्याला लक्षणं दिसत नव्हती. शास्त्रज्ञांच्या मते, तो तिथे असताना त्याने श्वास घेतला, सोडला त्यावेळी विषाणू पसरला. एसीमुळे विषाणूचे कण भवताली असणाऱ्या माणसांच्या दिशेने गेले. याचा परिणाम म्हणजे अन्य नऊजणांना कोरोनाचा संसर्ग झाला. डॉ. डेव्हिस पुन्हा एकदा खुल्या स्वच्छ हवेचं महत्त्व प्रतिपादन करतात.

जर बाहेरून खुली हवा मोठ्या प्रमाणावर आत आली असती तर कोरोनाच्या विषाणूला अटकाव झाला असता आणि कमी लोकांना संसर्ग झाला असता असं त्यांना वाटतं.

3. मोकळ्या हवेचं गुणोत्तर

आधुनिक प्रकारच्या इमारतींमध्ये काचा सील केलेल्या असतात मग नवीन खुली हवा कशी खेळती राहणार? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.

व्हेंटिलेशन सिस्टमवर तुम्ही अवलंबून असता. खोलीतली किंवा त्या वातावरणातली कोंदट हवा ओढून गच्चीवर असणाऱ्या एअर हँडलिंग युनिटद्वारे सोडली जाते. तिथेच बाहेरची खुली हवा आत ओढण्याचं काम केलं जातं आणि ही हवा त्या बंदिस्त वातावरणात सोडली जाते.

कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन अधिकाअधिक नवीन शुद्ध हवा बंदिस्त वातावरणात सोडण्याचं आवाहन करण्यात येतं.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

100 टक्के शुद्ध नवीन हवा असेल तर उत्तमच असं प्राध्यापक कॅथ नोक्स सांगतात. ते लीड्स विद्यापीठात कार्यरत असून, सरकारच्या पर्यावरण विषयक सल्लागार समितीवरही आहेत. बीबीसीशी वैयक्तिक पातळीवर बोलताना त्यांनी शुद्ध मोकळ्या हवेचं महत्त्व विषद केलं.

जेवढी जास्त खुली हवा इमारतीत असेल तेवढं कोरोना विषाणू पसरण्याचं प्रमाण कमी असेल. व्हेंटिलेशन सिस्टम इमारतीचं व्यवस्थापन करणाऱ्यांच्या हाती असतं. इमारतीचे मालक त्यांची नियुक्ती करू शकतात.

100 टक्के खुली मोकळी हवा खेळती ठेवण्यासाठी थंडीत हवा तापवावी लागते आणि उन्हाळ्यात गरम करावी लागते आणि त्यासाठी ऊर्जा लागते.

4. फिल्टरमध्ये विषाणू नाही हे तपासून घ्या

आधुनिक व्हेंटिलेशन प्रणालीत, फिल्टर बसवलेले असतात पण ते फुलप्रूफ आहेत ना याची शहानिशा करून घ्या.

अमेरिकेत, ओरॅगन आरोग्य आणि शास्त्र विद्यापीठात संशोधकांना असं आढळलं की फिल्टरने कोरोना विषाणूंना रोखलं मात्र काहींमध्ये हे विषाणू फिल्टरमध्ये न अडकता बाहेर पडले.

कोरोना एसी

फोटो स्रोत, Getty Images

प्राध्यापक केव्हिन व्हॅन डर वेलमबर्ग यांच्या मते, फिल्टरची पाहणी केली तर त्या इमारतीत कोरोना संसर्ग झालेला व्यक्ती काम करतोय की नाही ते लक्षात येऊ शकतं.

दक्षिण कोरियात 11व्या मजल्यावरच्या कॉल सेंटरमध्ये एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या माध्यमातून 90हून अधिक कोरोनाचा संसर्ग झाला. फिल्टर्सची नियमितपणे तपासणी केली तर विषाणूला वेळीच आळा घालता येऊ शकतो.

फिल्टरचा डेटा तपासला तर विषाणूला कुठे बाहेर हाकलायचं आणि कसं रोखायचं हे ठरवता येऊ शकतं असं डॉ.वेमलेनबर्ग यांना वाटते. ते या प्रकल्पाचे मुख्य आहेत.

5. ताज्या हवेचा तुटवडा

या क्षेत्रातील कोणत्याही जाणकाराशी बोला. ताजी हवा हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचं तो तुम्हाला सांगेल.

परंतु हे तितकंसं सोपं नसल्याचं या कामाचं व्यवस्थापन करणारी व्यक्ती सांगू शकेल.

निक विर्थ हे फॉर्म्युला वन रेसिंग कारच्या डिझायनिंगचं काम करत असत. सुपरमार्केट्स आणि फूड प्रोसेसिंग युनिट्समध्ये हवा खेळती कशी ठेवावी याचं मार्गदर्शन करतात.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

कोरोनाबाधित व्यक्ती खिडकीशी असेल तर त्याच्या उच्छवासातून विषाणू खालच्या मजल्यावरच्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तुम्ही खिडकी उघडलीत, हवा कुठे जाते? असं ते विचारतात. हवेचा झोत ज्या ठिकाणी असतो तिथे लोकांनी असू नये.

अधिकाअधिक ताजी हवा ही चांगलीच पण ही हवा आडव्या पद्धतीने वाहत असेल आणि त्यात विषाणू असतील तर त्याचा परिणाम होऊ शकतो.

यासंदर्भात प्राध्यापक कॅथ नोक्स यांना विचारलं. त्यांच्या मते मोकळी ताजी हवा विषाणूला काटशह देण्याचं प्रमाण बाकीपेक्षा कमी जोखमीचं आहे.

उघड्या खिडकीच्या माध्यमातून आणखी माणसांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. पण त्याची शक्यता आणि तीव्रता कमी असते असं त्यांना वाटतं.

यासंदर्भात अनेक मतमतांतरं आहेत कारण कोरोना विषाणूविषयी अनेक गोष्टी आपल्याला अजूनही ठाऊक नाहीत.

पण एक नक्की की आपण जी हवा श्वासावाटे घेतोय ती शुद्ध, ताजी असणं आवश्यक आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)