कोरोना व्हायरस फ्लूप्रमाणेच कायमस्वरुपी राहील, असं शास्त्रज्ञांना का वाटतं?

कोरोना व्हायरस पूर्णपणे नष्ट होणार नाही, तो आपल्यातच राहणार असल्याचं मत युके सरकारच्या सायंटिफिक अॅडव्हायजरी ग्रुप फॉर इमर्जन्सीजचे (SAGE) सदस्य सर मार्क वॉलपोर्ट यांनी नोंदवलं आहे.

कोरोना व्हायरस जगातून नष्ट होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो, असं वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख डॉ. टेड्रोस अॅधेनॉम घेब्रेयेसूस यांनी केलं होतं.

त्यांच्या या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवरच मार्क यांनी कोरोना आपल्यातून जाणार नसल्याचं म्हटलं आहे.

मार्क यांच्या मते लोकांनी वेळोवेळी लसीकरण करून घेणं हाच त्यावरचा एकमेव उपाय असेल.

शुक्रवारी (21 ऑगस्ट) जागतिक आरोग्य संघटनेच्या जिनिव्हा येथील मुख्यालयात माध्यमांशी बोलताना डॉ. टेड्रोस अॅधेनॉम घेब्रेयेसूस म्हणाले, "आशा आहे की दोन वर्षांच्या आत कोरोनाच्या संकटातून बाहेर येऊ."

1918 मध्ये आलेली स्पॅनिश फ्लूची साथ संपण्यासही दोन वर्षांचा काळ लागला होता, असंही डॉ. घेब्रेयेसूस यांनी म्हटलं होतं.

"1918 च्या तुलनेत जगाची लोकसंख्या कितीतरी पटीनं वाढली आहे. त्यामुळे ही जागतिक साथ रोखण्यासाठी लसीकरण हाच पर्याय आहे. अर्थात, लशीमुळे कोरोनाही देवीप्रमाणे नष्ट होईल, असं समजणं गैर आहे," असं मार्क यांनी म्हटलं.

कोरोना फ्लूप्रमाणे आपल्यामध्ये राहील आणि ठराविक काळानं लसीकरण करून घेणं आवश्यक असेल.

"सध्या जग पूर्वीपेक्षा जास्त एकमेकांशी जोडलेलं आहे. अशा स्थितीत व्हायरस पसरण्यासाठी जास्त वाव मिळतो. पण सध्या तंत्रज्ञानानेही प्रगती केली आहे, त्यामुळे कमी वेळेत कोरोना नष्ट करण्याची आपल्याकडे क्षमता आहे," असं घेब्रेयेसूस म्हणाले.

आपल्या भाषणादरम्यान घेब्रेयेसूस यांनी राष्ट्रीय एकता आणि जागतिक एकता या मुद्द्यांवर भर दिला.

1918 मध्ये पसरलेल्या स्पॅनिश फ्लूमुळे सुमारे 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 8 लाख जण मृत्यूमुखी पडले असून 2 कोटींहून जास्त लोकांना या विषाणूची लागण झालेली आहे.

PPE किट्सच्या भ्रष्टाचारासंबंधी प्रश्नानांही उत्तरं

डॉ. टेड्रोस यांनी आपल्या पत्रकार परिषदेदरम्यान पीपीई किट्सच्या भ्रष्टाचारसंबंधित प्रश्नांनाही उत्तरं दिली.

"आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून लोकांची सेवा करत आहेत. ते आपल्या कामादरम्यान या पीपीई किटचा वापर करतात. पीपीई किटमध्ये भ्रष्टाचार होत असल्यास हा गंभीर गुन्हा आहे, माझ्या मते तर ही हत्याच आहे," असं ते म्हणाले.

दरम्यान, डॉ. घेब्रेयेसूस यांनी विविध देशांच्या कोरोना स्थितीचा आढावा घेऊन संबंधित प्रश्नांवर चर्चाही केली.

दक्षिण आफ्रिकेत पीपीई किटची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्याशिवाय केनियाची राजधानी नैरोबीमध्ये याच मुद्द्यांवरून आरोग्य कर्मचारी संपावर गेले होते.

या समस्या लवकरात लवकर सोडवण्यात याव्यात, अशी सूचना घेब्रेयेसूस यांनी केली आहे.

यावेळी डॉ. घेब्रेयेसूस यांनी मेक्सिकोमधील कोरोना स्थितीबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार, मेक्सिकोमध्ये आतापर्यंत 60 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, कोरोना मृत्यूच्या बाबतीत मेक्सिको जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)