बालपणीच मातृत्वाचं ओझं वाट्याला आलेल्या मुलींची व्यथा

फोटो स्रोत, Thinkstock
- Author, विनिशिअस लेमोस
- Role, बीबीसी ब्राझिल
दहा बारा वर्षं हे वय कोणत्याही लहान मुलाचं किंवा मुलीचं खेळण्याचं वय असतं. पण या वयात लैंगिक अत्याचाराला बळी पडणं आणि त्यानंतर मातृत्वाच्या ओझ्याखाली भरडलं जाणं काही मुलींच्या नशिबी आलं आहे.
बलात्कारादरम्यान हिंसाचार झाल्यामुळे अनेक मुली या मृत्यूच्या दाढेतून परत आल्या पण त्यांना नंतर कळलं की त्या गरोदर आहेत. ब्राझिलमध्ये गर्भपाताला परवानगी नसल्यामुळे त्यांच्यावर मातृत्व लादलं गेलं.
वर्तमान आणि भविष्य दोन्ही अंध:काराच्या गर्तेत असलेल्या या मुली आपली व्यथा देखील सांगू शकत नाहीत की त्याविरोधात आवाजही उठवू शकत नाही.
मेलानिआ अमोरिम यांनी स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीच्या दिवसात त्यांच्याकडे अल्पवयातील गरोदर मुलीची केस समोर आली.
पक्षाघात झालेली 13 वर्षांची मुलगी होती. तिची आई घरात काम करत असताना तिच्यावर बाहेर बलात्कार झाला होता.
ब्राझीलच्या उत्तर-पश्चिम भागातल्या हॉस्पिटलमध्ये गर्भपातासाठी नेण्यात आलं. मात्र ड्युटीवर असलेल्या कोणत्याही डॉक्टराला ही गर्भपाताची प्रक्रिया करायची नव्हती.
त्या मुलीची आई धुणीभांडी करायची. तिने मुलीला घराबाहेर उन्हात खेळायला सोडलं. तिथे तिच्यावर अत्याचार करण्यात आला असं डॉ. अमोरिम यांनी सांगितलं.
हॉस्पिटलमध्ये तिला स्पर्श करण्यासही कोणी तयार नव्हतं. आम्ही गर्भपाताच्या विरोधात आहे असं त्यांचं म्हणणं होतं. मी तेव्हा खूपच तरुण होते, पण मी गर्भपाताची प्रक्रिया पार पाडली. त्या मुलीचा जीव मी वाचवू शकते हा विश्वास मला होता. बलात्कार पीडित म्हणून तो तिचा हक्क होता असं मला वाटलं असं डॉ. अमोरिम यांना वाटलं. हे सांगताना त्यांना हुंदका दाटून आला.

फोटो स्रोत, Reprodução
गेल्या 30 वर्षांमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करताना डॉ. अमोरिम यांनी अल्पवयीन मुलींच्या गरोदरपणाच्या अनेक केसेस हाताळल्या आहेत. बलात्कारानंतर गर्भार राहणाऱ्या मुलींच्या केसेस हा त्यांच्या अभ्यासाचा विषय झाला.
दिवसाला चार बलात्कार
10 वर्षीय मुलीवर तिच्या काकांनी सातत्याने बलात्कार केला. ती मुलगी गरोदर राहिली. तिच्या गर्भपाताच्या प्रकरणाने संपूर्ण ब्राझीलमध्ये खळबळ उडाली होती. दक्षिणेकडच्या एस्पिरिटो सँटो राज्यातील साओ मॅट्युस शहरात हा प्रकार घडला.
गर्भपातासाठी त्या मुलीला शेजारच्या जिल्ह्यात न्यावं लागलं तेव्हा ते प्रकरण मोठं झालं. उजव्या विचारसरणीच्या काही लोकांनी त्या मुलीची वैयक्तिक माहिती ऑनलाईन जाहीर केली. न्यायालयात गर्भपात रोखण्याचेही प्रयत्न झाले. धार्मिक संघटनांनी निदर्शनही केली. त्या मुलीला ज्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं तिथे घुसण्याचाही काही कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला.

फोटो स्रोत, Getty Images
ब्राझीलच्या कायद्यानुसार बलात्कार पीडितेला तसंच महिलेच्या आरोग्याला धोका असेल तेव्हाच गर्भपाताची परवानगी आहे. न्यायाधीशांनी त्या लहानग्या मुलीच्या गर्भपाताला परवानगी दिली होती. तिच्यावर वयाच्या सहाव्या वर्षापासून तिचे काकाच अत्याचार करत होते.
डॉ. अमोरिम यांच्या मते अशा केसेस ब्राझीलमध्ये आता दुर्मीळ राहिलेल्या नाहीत. त्यांचा अनुभव तसं सांगतो.
ब्राझीलमधील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत, 10 ते 14 वयोगटातील मुलींच्या गर्भपाताच्या दिवसाला किमान सहा केसेसची नोंदणी केली जाते.
लैंगिक अत्याचाराची आकडेवारी याहूनही भयंकर आहे. ब्राझिलियन पब्लिक सेफ्टी फोरमने केलेल्या अभ्यासानुसार तेरापेक्षा कमी वयाच्या चार मुलींवर दर तासाला बलात्कार होतो.
अल्पवयीन मुलींसाठी धोकादायक गरोदरपण
त्या मुलींना हॉस्पिटलमध्ये आणलं जातं तेव्हा त्या तीव्र धक्क्यात असतात. त्यांनी टोकाचं शारीरिक आणि मानसिक छळाचा सामना केलेला असतो. त्या घाबरलेल्या असतात.

फोटो स्रोत, Marcello Casal Jr./ABr
दहा वर्षीय बलात्कार पीडितेला वाचवताना माझ्या मनात राग, चीड अशा भावना उफाळून येतात असं डॉ. अमोरिम यांच्या मनात दाटून येतात.
इतक्या लहान वयातलं गरोदरपण अतिशय धोकादायक मानलं जातं. युनिसेफच्या अभ्यासानुसार, 15 पेक्षा कमी वयाच्या असताना मूल जन्माला घालणाऱ्या मुलींच्या मृत्यूची शक्यता पाच पटींनी अधिक असते.

अमेरिकन जर्नल ऑफ ऑब्स्ट्रेक्स अँड गायनकॉलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात लॅटिन अमेरिकेतील तरुण वयात गरोदर होणाऱ्या बायकांचा अभ्यास करण्यात आला. 15 किंवा त्यापेक्षा कमी वयात गरोदर राहणाऱ्या मुलींना गंभीर स्वरुपाचा अॅनिमिया होण्याची शक्यता सर्वाधिक असते.
मुलाच्या जीवाला धोका
अल्पवयीन मुलीने जन्म दिलेल्या बाळाचा नवजात अर्भक असतानाच मृत्यू होण्याची शक्यता असते. 10 ते 15 या वयोगटात मुलाला जन्म द्यावा लागणाऱ्या मुलींच्या बाबतीत रक्तदाब प्रचंड वाढण्याची आणि कोमात जाण्याची शक्यताही तीव्र असते.
" मी 10 वर्षांच्या गरोदर मुली, ज्यांना गरोदरपणात किंवा बाळाला जन्म देताना फिट्स येतात आणि ज्यांच्या श्वासनलिकेत नळी टाकावी लागली होती, किंवा ज्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं होतं, ज्या मरणाच्या दारातून परत आल्या होत्या, अशा मुलींवर उपचार केले होते. अशा फिट्सने कधी कधी जीव ही जाऊ शकतो.
पण मी उपचार केलेल्या मुलींपैकी कोणी मृत्युमुखी पडलं नाही. बाळंतपणात ज्या फिट्स येतात, त्यामुळे मुलीचा मृत्यू होण्याची मोठी शक्यता असते.

फोटो स्रोत, Thinkstock
अशा पद्धतीने जन्माला आलेल्या मुलांचं वजन वाढत नाही. त्यांच्या वाढीला मर्यादा राहते. अनेक मुलं वेळेआधीच जन्माला येतात असं डॉ. अमोरिमा सांगतात.
तेरा किंवा त्यापेक्षा कमी वयात बाळाला जन्म देणं मुलींसाठी धोकादायक असू शकतं कारण त्यांचं शरीर विकसित होत असतं.
त्यांचं शरीर पूर्ण विकसित झालेलं नसतं, त्यांच्या अवयवांची पूर्ण वाढ झालेली नसते. त्यांचं ओटीपोट पूर्ण विकसित झालेलं नसतं. प्रसूतीकळा सहन करण्याची क्षमता कमी राहते असं डॉक्टर सांगतात.
अल्पवयात मुलांना जन्म देण्यापेक्षा गर्भपात हा तुलनेने सुरक्षित पर्याय असल्याचं डॉक्टर स्पष्ट करतात.
अगदी लहान वयात जन्म देण्यापेक्षा कायदेशीर रीत्या झालेला गर्भपात त्या मुलींचं आरोग्य नीट राखू शकतो असं डॉक्टर सांगतात. डॉ. अमोरिम कॅम्पिना ग्रॅन्डे फेडरल विद्यापीठात प्राध्यापकही आहेत.

फोटो स्रोत, iStock
मुलाला जन्म देताना महिलेच्या जीवाला धोका निर्माण होतोच, लहान मुलींच्या बाबतीत हा धोका अधिक असतो.
कायदेशीर विचार केला तर वैद्यकीय नियंत्रणाखाली करण्यात आलेला गर्भपात त्या मुलींसाठी सुरक्षित असतो.
सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे छुप्या पद्धतीने करावं लागणारा असुरक्षित गर्भपात.
बालविवाहाची पद्धत अजूनही रुढ असलेल्या देशांमध्ये महिलांच्या आरोग्याचा अभ्यास करण्यात आला. या देशांमध्ये महिलांमध्ये मूत्राशय आणि योनीमार्गाच्या जखमा मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

फोटो स्रोत, Reprodução
लहान वयात मुली गरोदर राहतात. वैद्यकीय मदतीविना त्यांची प्रसूती केली जाते. बाळ बाहेर येताना आईच्या अवयवांना फाडून बाहेर येतं असं डॉक्टरांनी सांगितलं.
लैंगिक अत्याचार पीडित महिलांना या धक्क्यातून सावरण्यासाठी डॉ. अमोरिम मदत करतात. स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून सहा वर्षांची मुलगी ते 92 वर्षांची महिला अशा सर्व वयोगटाच्या महिलांना मानसिक आधार देण्याचं काम त्यांनी केलं आहे.
कुठल्याही वयाची महिला बलात्कारापासून सुरक्षित असं नाही. कोणत्याही वयाची मुलगी, महिला यांना समाजात संरक्षणच नाही असं डॉक्टर सांगतात.
मुली लहान असताना त्या गरोदर राहत नाहीत. परंतु लहान वयातच त्यांच्यावर अत्याचाराला सुरुवात होते. त्यांना मासिक पाळी यायला सुरुवात होते तोपर्यंत अत्याचार सुरूच राहतो. त्यावेळी त्या गरोदर राहण्याची शक्यता वाढते असं त्या सांगतात.
कायदेशीर गर्भपात करता येतो हेच अनेक मुलींना माहिती नसतं.
गरोदर राहिलेल्या सगळ्याच मुलींचा गर्भपात होत नाही. बलात्कार पीडित लहान मुलींना त्यांच्या मुलाला जन्म देण्यापूर्वी थोडा वेळ आधी हॉस्पिटलमध्ये आणलं जातं.
डॉ. अमोरिम सांगतात की वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच, 17व्या वर्षी महिलेच्या मृत्यूचं प्रकरण हाताळल्याचं डॉक्टर सांगतात.
वेगळी केस
साओ मॅट्युस शहरात दहा वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराचं प्रकरण वेगळं होतं असं डॉ. अमोरिमा यांना वाटतं कारण त्या मुलीचं नाव आणि ज्या हॉस्पिटलमध्ये त्या मुलीला दाखल करण्यात आलं होतं ते जाहीर करण्यात आलं होतं.
त्या हॉस्पिटलमध्ये गर्भपाताची प्रक्रिया पूर्ण केली जाणार होती. हा गर्भपात कायद्याने मान्य होता. त्यामुळे त्या मुलीची माहिती आणि वैयक्तिक तपशील गोपनीय राखणं आवश्यक होतं याकडे डॉक्टर लक्ष वेधतात. त्या मुलीची माहिती जाहीर कशी झाली याची चौकशी व्हायला हवी. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. मुलीची माहिती जाहीर करणाऱ्या माणसाला ही गोपनीय माहिती मिळालीच कशी?

फोटो स्रोत, Getty Images
साओ मॅट्युस शहरातील हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर 8 ऑगस्टला ती दहा वर्षांची मुलगी गरोदर असल्याचं स्पष्ट झालं. दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचाराच्या या प्रकरणाची चर्चा राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर झाली. सरकारी मंत्र्यांना विचारणा झाली.
त्या प्रांताची राजधानी असलेल्या व्हिटोरिया इथल्या सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी गर्भपात करण्यास 14 ऑगस्ट रोजी नकार दिला. त्यानंतर हे प्रकरण चिघळलं. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेली गर्भपाताची 22 आठवड्यांची मुदत उलटून गेली आहे.
मुलीची प्रकृती सुधारली आणि आरोपीला अटक
मुलीचा गर्भपात करण्यास नकार देण्यामागे तांत्रिक कारणं होती. नियमांचा प्रश्न नव्हता असं हॉस्पिटलने स्पष्ट केलं आहे.
तीन दिवसांनंतर, 1650 किलोमीटर अंतरावरच्या रेसिफे नावाच्या शहरात त्या मुलीच्या गर्भपाताची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
गरोदर महिलेचा गर्भपात कायद्याच्या चौकटीत राहून करण्याची जबाबदारी प्रत्येक हॉस्पिटलवर आहे. एस्पिरिटो सँटोकडून गर्भपाताला अधिकृत परवानगी मिळेपर्यंत हॉस्पिटलने प्रतीक्षा केली. तोपर्यंत गर्भ वाढला असा दावा हॉस्पिटलने केला.
दरम्यान गर्भपातानंतर त्या मुलीची प्रकृती स्थिर आहे. तिच्यावर अत्याचार करणाऱ्या काकाला 18 ऑगस्टला दुसऱ्या राज्यात पळून जात असताना अटक करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
लैंगिक अत्याचाराचा सामना कराव्या लागलेल्या प्रत्येक मुलीला मानसिक आधार मिळायला हवा असं डॉ. अमोरिमा यांना वाटतं.
बलात्काराचा मानसिक घाव कायमस्वरुपी राहतो. भेदरलेल्या स्थितीत या मुलींना हॉस्पिटलमध्ये आणलं जातं. त्या लहान मुली असतात, आई होण्याची क्षमता असलेल्या स्त्रिया नाहीत.
अत्याचाराचं प्रतीक स्वत:च्या गर्भात असावं असं त्यांना वाटत नाही. त्यांना मानसिक आधार मिळाला तर पुढचं आयुष्य त्या सन्मानाने जगू शकतात.
अनेक वर्ष लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितांवर उपचार केल्यानंतरही डॉ. अमोरिमा यांचा संताप कमी झालेला नाही. तुम्हाला असं वाटत असेल की अनेक वर्ष अशी प्रकरणं पाहून माझं मन बोथट झालं असेल पण तसं जराही नाही. परंतु एस्पिरिटो सँटो प्रकरणात राग फक्त बलात्कार आणि त्याच्या परिणामांचा नाही. त्या मुलीवर अनेक वर्ष अत्याचार होत होता. कायद्याने तिला गर्भपाताचा हक्क दिला होता मात्र समाजाने तोही हिरावून घ्यायचा प्रयत्न केला. राग त्याचा होता असं डॉक्टर सांगतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








