महिला आरोग्य: महिलांना आपली गर्भधारणा नियंत्रित करता आली तर काय होईल?

महिला

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रेचल न्युअर
    • Role, बीबीसी फ्युचर

जवळपास हजार वर्षं समाजाने महिलांना पुरुषांपेक्षा कमी समजलं आहे. आजही स्थिती वेगळी नाही. त्यांच्या शरीर रचनेपासून त्यांच्या बुद्धीपर्यंत प्रत्येक गोष्टीलाच दुय्यम स्थान दिलं गेलं आहे. अनेक पुरुष शास्त्रज्ञांनी देखील महिलांना त्यांच्याच चष्म्यातून पाहिलं आहे.

पुरुषाचे शुक्राणू

न्यूझिलंडच्या ख्राईस्टचर्च युनिव्हर्सिटीतल्या पॅट्रीस रोझेनग्रेव्ह याबद्दल म्हणतात, "एकेकाळी असा समज होता की गर्भधारणेमध्ये मादीच्या अवयवांची गरज फक्त पुरुषाचे शुक्राणू स्वीकारायला लागते. तिच्या शरीरात असे काहीही अवयव नसतात ज्यांमुळे गर्भधारणा होऊ शकेल. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कोणत्याही प्राण्याचे शुक्राणू त्या प्रजातीच्या मादीच्या शरीरात गेले की गर्भधारणा होणारच. यातला निर्णायक मुद्दा शुक्राणू असतो. म्हणजे पर्यायाने पुरुषांशी निगडित असतो."

अनेक शतकं प्रचलित असणाऱ्या या समजाला आता कुठे छेद मिळाला आहे. अनेक प्रजातींमधल्या माद्या कशा आपल्या पिल्लांच्या जन्मात महत्त्वाची भूमिका बजावतात याची आश्चर्यकारक माहिती शास्त्रज्ञांना आता मिळायला लागली आहे.

कोरोना
लाईन

उदाहरणार्थ, मादी सालमन मासा आपल्या गर्भाशयातल्या द्रवामुळे शरीरात प्रवेश करणाऱ्या शुक्राणूचा वेग कमी किंवा जास्त करू शकते.

म्हणजेच तिच्या पसंतीच्या नराकडून तिला गर्भधारणा करून घेणं सोपं जातं. मादी उंदीर आणि रानकोंबड्या आपल्यासारख्याच जीन्स असणाऱ्या नरांकडून होणारी गर्भधारणा थांबवू शकतात म्हणजे एकाच प्रकारच्या जीनपुलमुळे पिल्लांमध्ये वैगुण्य येणार नाही.

इतकंच नाही, ड्रोसोफिलीया नावाच्या माशीच्या शरीरात एक स्वतंत्र अवयव असतो ज्यात नरांचे शुक्राणू साठवता येतात. या साठवलेल्या शुक्राणूंमधून कोणता गर्भधारणेसाठी वापरायचा हे ती ठरवू शकते.

यातलं काहीही मानवाच्या वाटेल आलेलं नसलं तरी महिलांचं त्यांच्या गर्भधारणेवर गर्भनिरोधक गोळ्या, सेक्सनंतर घ्यायच्या इमर्जन्सी गोळ्या आणि गर्भपात यामुळे थोडं का होईना नियंत्रण आहे.

सालमन मासा

फोटो स्रोत, Alamy

गर्भधारणा महिलाच नियंत्रित करू शकल्या तर?

पण ही साधनं प्रत्येकीलाच उपलब्ध नाही. जिला आहेत, तिलाही याचा पूर्ण उपयोग होईलच याची खात्री नाही. अनेकींना गर्भनिरोधाची साधनं उपलब्ध नाहीत तर अनेक ठिकाणी गर्भपातावर कायदेशीर बंदी आहे. इतरही अनेक कारणं आहेत, भावनेच्या आवेगात येऊन केलेल्या कृती अंगाशी येतात, देहविक्रय करणाऱ्या महिलांना काँडम वापरू नये म्हणून दबाव टाकला जातो.

पुरुष महिलांवर बलात्कार करतात आणि कित्येक महिलांना सेक्सच्या बाबतीत काहीही अधिकार, त्याविषयी मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नसतं. सेक्स कधी व्हावा, कुठे व्हावा, किती वेळा व्हावा याबद्दल त्या काहीही बोलू शकत नाहीत किंवा मत व्यक्त करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत नको असणाऱ्या गर्भधारणेचं प्रमाण नक्कीच वाढतं.

पण समजा वर उल्लेख केलेल्या प्राण्यांसारखीच आपली गर्भधारणा 100 टक्के नियंत्रित करण्याची क्षमता महिलांना मिळाली तर? म्हणजे आपण कधी गरोदर व्हायचं, कोणत्या वयात, कोणत्या परिस्थिती आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे कोणाकडून (विशेषतः बलात्कारासारख्या घटनांमध्ये) हे महिलाच नियंत्रित करू शकल्या तर?

सगळ्यांत पहिला बदल म्हणजे न ठरवता राहिलेल्या गर्भधारणा टळतील. 2012 च्या आकडेवारीनुसार, जगातल्या एकूण गर्भधारणांपैकी 40 टक्के अनप्लॅन्ड असतात. अमेरिकेत हे प्रमाण 45टक्के आहे. गर्भनिरोधकांच्या साधनांनावर महिलांचं अवलंबून असणं कमी होईल, म्हणजे तो खर्च वाचेल.

लहान बाळ

फोटो स्रोत, Getty Images

गर्भपात कमी होतील?

जवळपास 50 कोटी महिलांनी आपल्या आयुष्यात कधी ना कधी गर्भनिरोधक गोळी घेतलेली असते. त्याचे साईडइफेक्टही असतात. काही महिलांना डिप्रेशन, रक्ताच्या गाठी होणं, मायग्रेन, अस्वस्थता असे त्रास होतात. कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेचेही दुष्परिणाम आहेत. कधी कधी यात महिलेचा जीवही जाऊ शकतो.

महिलांना आपली गर्भधारणा नियंत्रित करण्याची क्षमता मिळाली तर गर्भपाताला विरोध करणाऱ्यासाठीही हा एक सकारात्मक बदल असेल कारण गर्भपात कमी होतील. त्याहून महत्त्वाचं म्हणजे सध्या धोकादायक परिस्थितीत, काही ठिकाणी कायद्याची नजर चोरून जे गर्भपात होतात ते संपतील आणि महिलांना सुरक्षित राहाता येईल.

अनधिकृत गर्भपाताच्या वेळी होणाऱ्या गुंतागुंतींमुळे जगभरात दरवर्षी 50 कोटी डॉलर्स खर्च होतात आणि जवळपास 13 टक्के मातामृत्यू होतात.

महिलांना आपली गर्भधारणा नियंत्रित करता यायला लागली की जन्मदरातही घट होईल. याने लोकसंख्या कमी होईलच असं नाही, कारण कित्येक महिलांची इच्छा असू शकते की आपल्याला भरपूर मुलं व्हावीत पण तरीही ज्यांची इच्छा नाही अशांवरचं दडपण कमी होईल.

आता या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या म्हणजे कमी अनप्लॅन्ड गर्भधारणा, कमी मुलं आणि कमी धोकादायक गर्भपात. तर या सगळ्याचा फायदा महिलांचं आयुष्य सुधारण्यात होईल आणि पर्यायाने समाजातही सकारात्मक बदल घडतील.

'नव्या संधींचे दरवाजे खुले होतील'

लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिनमध्ये प्रोफेसर असणाऱ्या सुझन मेह्यू म्हणतात, "जी गोष्ट महिलांना सदैव मागे ओढत आलीये मग त्यांचं शिक्षण असो, करिअर किंवा आरोग्य, तीच तुम्ही काढून टाकलीत तर महिलांना अनेक नव्या संधींचे दरवाजे खुले होतील. सतत मुलं जन्माला घालणं, जन्माला आलेल्या मुलांची काळजी घेणं यामुळे महिला मागे पडत आहेत."

आफ्रिकी महिला

फोटो स्रोत, Getty Images

महिलांना घराबाहेर पडता आलं म्हणजे त्या सार्वजनिक जीवनात सक्रिय होतील. सरकार, नोकरशाहीतला त्यांचा सहभाग वाढेल.

"असं झालंच तर आपल्याला अजून चांगलं, सगळ्यांचा विचार करणारं, शांततेचा पुरस्कार करणारं सरकार मिळेल आणि समाजही. या समाजाचं उद्दिष्ट फक्त जास्तीत जास्त पैसा कमावणं आणि शस्त्रास्त्र बाळगणं एवढाच नसेल," मेह्यू म्हणतात.

आपल्या गर्भधारणेवर संपूर्ण नियंत्रण आलं तर महिला चाळिशीत किंवा पन्नाशीत गरोदर राहाण्याचं प्रमाणही वाढेल. याचा एक किंचिंत धोका आहे की डाऊन सिंड्रोम असलेली मुलं जन्मू शकतात.

पुरुषांना काही हक्क राहील?

पण लहान वयात गरोदर असणं, विशीच्या आधीच तीन-चार मुलं जन्माला घालणं यामुळेही जन्माला आलेल्या मुलांमध्ये व्यंग असण्याची शक्यता असतेच आणि समजा वर उल्लेखलेल्या माशासारखं कोणाच्या शुक्राणूंमुळे गरोदर राहायचं ही क्षमता महिलांमध्ये आली तर? किंवा महिला पुरुषांचे शुक्राणू साठवून नंतर त्यातलं कुठलं वापरायचं हे ठरवू शकल्या तर? यासगळ्यात पुरुषांना काही हक्क राहील का मग?

वेस्टर्न ऑस्ट्रेलिया युनिवर्सिटीमधल्या रिने फायरमॅन सांगतात, "एक शक्यता म्हणजे चांगल्या क्वालिटीचे शुक्राणू कोणते यावरून पुरुषांमध्ये स्पर्धा लागेल. चांगल्या दर्जाचे स्पर्म म्हणजे महिलांसाठी एक संपन्न रिसोर्स ठरेल."

महिला

फोटो स्रोत, Getty Images

दुसरं म्हणजे आपलं मुलं आपलंच आहे की नाही याविषयी पुरुषांच्या मनात अविश्वास वाढेल आणि पॅटर्नटी टेस्टचं प्रमाण पण वाढेल. मोठ्या काळानंतर कदाचित पुरुषांच्या शरीरात अशी व्यवस्था तयार होईल की ज्यायोगे आपल्या पार्टनरच्या शरीरात आपले शुक्राणू गेल्यानंतर ते तिथे असणारे इतर शुक्राणू मारून टाकू शकतील किंवा आपल्याच शुक्राणूमुळे गर्भधारणा होईल अशी व्यवस्था करू शकतील.

कोलंबिया युनिव्हर्सिटीत प्राध्यापक असणाऱ्या वेंडी चाकविन सांगतात, "याचा अर्थातच नातेसंबंधांवर परिणाम होईल. काही पुरुषांना महिलांना स्वतःच्या शरीरावर पूर्ण हक्क आहे हे रूचणार नाही. त्यांना हा त्यांच्या सत्तास्थानाला धोका वाटेल. कदाचित त्यामुळे महिलांना पूर्णपणे बंधनात ठेवण्याचे रस्ते शोधले जातील किंवा महिला किती स्वार्थी आहेत हेही दाखवलं जाईल. आता आपल्या समोर जे जगाचं चित्र आहे ते पूर्णपणे बदलून जाईल. समाजाची मानसिकता बदलावी लागेल आणि आपण एका वेगळ्याच जगात राहायला सुरुवात करू."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)