'पॉर्न साईटवर जेव्हा मी माझ्यावर झालेल्या बलात्काराचा व्हीडिओ पाहिला'

- Author, मेघा मोहन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी रोज कलेंबाने एक ब्लॉग पोस्ट लिहिली होती. यामध्ये ती 14 वर्षांची असताना तिच्यावर झालेल्या बलात्काराच्या दुर्देवी अनुभवाबद्दल लिहिलं होतं.
हे दुष्कर्म करणाऱ्या व्यक्तीने अत्याचार करतानाचा व्हीडिओ एका पॉर्न साईटवर टाकला. रोजने त्या पॉर्न साईटविरुद्ध संघर्ष करत तो व्हीडिओ काढून टाकायला लावला. ब्लॉग पोस्टनंतर अनेकींनी तिच्याशी संपर्क करत असाच अनुभव त्यांनाही आल्याचं सांगितलं.
इशारा: या बातमीत काही कटू अनुभवांचं वर्णन आहे.
आता 25 वर्षांची असलेली रोज त्या अनुभवाबद्दल सांगत होती.
माझ्यावर जिथं उपचार होत होते त्या रुग्णालयातल्या रुममध्ये एक नर्स आली आणि त्या मला धीर देऊ लागल्या. तुझ्या बाबतीत जे घडलं ते अतिशय दुर्देवी आहे. हे सांगताना त्यांचा आवाज कापत होता. माझ्या मुलीवरही बलात्कार झाला होता असं नर्स म्हणाल्या.
रोज यांनी नर्सकडे बघितलं. नर्सचं वय चाळिशी पार नसावं असं रोजच्या मनात आलं.
जे घडलं त्याच्या 24 तासांनंतर रोजला पुन्हा त्या आठवणींनी घेरलं. भावनाशून्य पोलीस आणि क्लिनिकमधले डॉक्टर यांना रोजने जे घडलं ते सांगितलं. रोज सांगत होती त्या घटनेला, करणाऱ्याला कायदेशीर भाषेत Alleged crime किंवा कथित गुन्हा असं म्हटलं जात होतं.
अनेक तासांचा तो क्रूर आणि हिंसक अनुभव रोज सांगत असताना त्याचं वर्णन कथित असं केलं जात होतं. रोजचे वडील आणि आजी यांचा अपवाद वगळता बाकी नातेवाईकांनी रोजवर विश्वासही ठेवला नाही.
नर्सची गोष्ट वेगळी होती त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला असं रोज सांगते.
कोणीतरी मी काय म्हणतेय यावर विश्वास ठेवला. असं कुणीतरी आहे जे मला समजून घेतलं याचा मला मोठा आधार वाटला. नवं आयुष्य सुरू करता येऊ शकता हा विश्वास मिळाला.
मात्र पॉर्न वेबसाईटवर तो अत्याचार पाहणाऱ्या शेकडो आणि हजारो प्रेक्षकांकडून कोणतीही मला सहानुभूती मिळाली नाही.

दहा वर्षांनंतर रोज आपल्या कंबरेपर्यंत रुळणाऱ्या केसांकडे बाथरुममधल्या आरशात पाहात होती. आज आपल्या सुंदर केसांबरोबर ती खेळत होती. अत्याचारानंतरच्या काही महिन्यात असं करणं तिच्या मनातही आलं नसतं. घरातले सगळे आरसे तिने ब्लँकेटने झाकून ठेवले होते. ती स्वत:ला आरशात पाहूच शकत नव्हती.
या घटनेला 11 वर्षं उलटली आहेत. स्वत:ची काळजी घेण्यासाठी तिने रुटीनमध्ये काही गोष्टी पक्क्या केल्या आहेत.
केसांची काळजी घेणं हे त्याचाच एक भाग आहे. केस विंचरणे, भांग पाडणे हे तिच्यासाठी जणू काही ध्यानधारणेसारखं आहे. आपले केस सुंदर आहेत याची तिला जाणीव आहे. लोक तिला त्याविषयी चांगलं बोलत राहतात. दरदिवशी संध्याकाळी ती स्वत:साठी 'कको' नावाचं पेय बनवते. चॉकलेटचा हा सगळ्यांत प्युअर फॉर्म असतो. वेदना कमी करण्याची ताकद या गोष्टींमध्ये आहे असं रोज सांगते. जे काही करावं वाटतं ते ती डायरीत लिहून ठेवते.
मी एक उत्तम ड्रायव्हर बनले आहे, रॉबर्टशी माझं लग्न झालं आहे आणि मला बाळ होईल ही माझी स्वप्नं आहेत असं ती सांगते.
ओहायोमध्ये लहानपणापासून राहिलेल्या रोजसाठी झोपायला जाण्यापूर्वी फेरफटका मारणं नेहमीचं होतं. फिरता फिरता डोक्यातला गोष्टींचा निचरा होतो असं तिला वाटत असे. खुल्या हवेत फिरण्याची तिला सवय होती.
2009 मधली ती संध्याकाळ रोझसाठी नेहमीसारखीच होती.

फोटो स्रोत, Rose Kalemba
अचानकच एक माणूस समोर आला. धारदार हत्याराचा धाक दाखवत त्याने रोजला गाडीत कोंबलं. गाडीत एक दुसरा माणूसही बसला होता. तो साधारण विशीतला असावा. शहरात आसपास रोजला त्याने पाहिलं होतं. ते दोघे रोझला गाडीत बसवून शहराच्या दुसऱ्या टोकाला घेऊन गेले. पुढचे 12 तास त्या दोघांनी 14 वर्षांच्या रोजवर बलात्कार केला. तिसऱ्या माणसाने या अत्याचाराचं चित्रीकरण केलं.
रोजला प्रचंड धक्का बसला. तिला धड श्वासही घेता येत नव्हता. रोजला बेदम मारहाण करण्यात आली होती. डाव्या पायावर तिला भोसकण्यातही आलं होतं. तिचे कपडे रक्ताने माखले होते. लवकरच तिची शुद्ध हरपली.
जेव्हा ती शुद्धीवर आल्या तेव्हा एका माणसाने लॅपटॉप उघडला आणि तिला अन्य महिलांवरच्या अत्याचाराचे व्हीडिओ त्याने दाखवले. हल्ला करणारे श्वेतवर्णीय होते. त्या व्हीडिओतील काही पीडिताही श्वेतवर्णीय होत्या. मात्र अनेकजणी कृष्णवर्णीय होत्या.
त्यानंतर त्या माणसाने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. रोज यांना अवसान गोळा करून त्याच्याशी बोलायला सुरुवात केली.
आमची ओळख सांगणार नाहीस ना असं वदवून घेण्यात आलं. मग त्यांनी रोजला पुन्हा गाडीत टाकलं आणि घरापासून तासाभराच्या अंतरावर टाकून दिलं.
चालत चालत ती घरापर्यंत कशाबशी आली. तिने आरशात पाहिलं तिच्या डोक्यातून रक्त वाहत होतं.
रोजचे वडील रॉन आणि घरातल्या काही माणसांची दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. भोसकण्यात आलेल्या जखमेतून रक्त वाहत होतं. तिने आपली दर्दभरी कहाणी घरच्यांना सांगितली.

फोटो स्रोत, Rose Kalemba
माझ्या बाबांनी पोलिसांना कॉल केला. त्यांना मला धीर दिला. मात्र बाकीचे लोक मी रात्री घराबाहेर का पडले यावरून माझ्यावर शंका घेऊ लागले.
इमर्न्जसी रूममध्ये पुरुष डॉक्टर आणि पुरुष पोलीस अधिकारी होते. त्यांनी अगदी तटस्थ आणि व्यावसायिक पद्धतीने मला प्रश्न विचारले. त्यांनी मला सहानुभूती दाखवली नाही, जराही कणव दाखवली नाही.
जे घडलं ते तुमच्या सहमतीने सुरू झालं का? असा प्रश्न विचारण्यात आला. गोष्टी रात्री हाताबाहेर गेल्या का असा त्यांच्या प्रश्नाचा रोख होता. रोज अवाक झाली.
माझं शरीर ठणकत होतं. जागोजागी जखमा झाल्या होत्या, रक्त वाहत होतं आणि मला हा प्रश्न विचारण्यात आला.
रोज यांनी अर्थातच नाही असं सांगितलं. जे घडलं त्याच्या धक्क्यातून ती अद्याप सावरलेली नव्हती. हल्ला कोणी केला हे माहिती नसल्याचं तिने सांगितलं. तपासासाठी पोलिसांना कोणतेही धागेदोरे मिळाले नाहीत.
रोजला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून सोडण्यात आलं. तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. आपण सर्वसाधारण आयुष्य जगू शकतो हे त्यांना कळत नव्हतं. तिच्या भावाने तिला आधार दिला.

काही महिन्यांनंतर रोझ इंटरनेटवर सर्फिंग करत होत्या. तिच्या शाळेतले अनेकजण एक लिंक शेअर करत होते. तिलाही टॅग करण्यात आलं होतं. क्लिक केल्यानंतर पॉर्न साईट उघडत होती. त्या साईटचं नाव होतं-पॉर्नहब. त्यांना जे समोर दिसलं त्याने तिला शिसारी आली. तिच्यावर झालेल्या अत्याचाराचेच व्हीडिओ ती पाहत होती.
त्या व्हीडिओची नावंही थरकाप उडेल अशी होती. किशोरवयीन मुलगी रडतीये आणि तिला मार बसतोय. किशोरवयीन मुलगी उद्ध्वस्त होताना, तरुणीचं कौमार्य कसं भंग होत आहे पाहा असे हेडिंग त्या व्हीडिओला होते.
काही व्हीडिओ तर असे होते की ज्यात मी बेशुद्ध आहे आणि माझ्यावर बलात्कार होतोय.
या व्हीडिओंबद्दल घरच्यांना सांगायचं नाही असं मी ठरवलं. अनेक नातेवाईक तसेही तिच्याविरोधात होते. व्हीडिओबद्दल त्यांना सांगणं म्हणजे पायावर कुऱ्हाड मारुन घेण्यासारखं होतं.
काही दिवसातच शाळेतल्या सगळ्यांनी हा व्हीडिओ पाहिल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
माझा छळ करण्यात आला नाही तर मी स्वत:हूनच हे ओढवून घेतलं असं अनेकांचं म्हणणं होतं. मी पुरुषांना नादाला लावलं असं लोक म्हणत.
अनेक मुलांच्या पालकांनी त्यांना माझ्यापासून दूर राहायला सांगितलं होतं. मी त्यांनाही नादाला लावेन असं त्या पालकांना वाटलं. मी त्या मुलांवर बलात्कार केल्याचा आरोप करेन असं त्यांच्या पालकांना वाटलं.
पीडितेला दोष देणं सोपं असतं असं रोज व्यथित मनाने सांगतात.
2009 वर्षात रोज यांनी पॉर्नहब या वेबसाईटला अनेक इमेल केले. माझ्यावर अत्याचाराचे व्हीडिओ साईटवरून काढून टाका अशी मागणी त्यांनी या इमेलद्वारे केली होती.
मी त्यांना विनंती केली. माझं वय लहान आहे, माझ्यावर अत्याचार झाला आहे, प्लीज साईटवरून हा व्हीडिओ काढून टाका असं त्यांनी म्हटलं होतं. पण कोणत्याही मेलला उत्तर मिळालं नाही. व्हीडिओ साईटवर दिसतच राहिले.
नंतर नंतर रोज यांना निर्विकार वाटू लागलं. भावनारहित झाल्यासारखं वाटू लागलं.
कोणत्याही अनोळखी व्यक्तीला भेटताना, त्याच्याकडे पाहताना त्याने ते व्हीडिओ पाहिले असतील अशी भीती रोजला वाटत असे.
त्यांनी ते व्हीडिओ पाहिले असतील का? माझ्यावरचा अत्याचार पाहून त्यांची वखवख शमली असेल का? असे प्रश्न माझ्या मनात येत.
तिला स्वतःकडे पाहण्याचीही शरम वाटत असे. म्हणूनच घरातले सगळे आरसे तिने ब्लँकेटने झाकून टाकले होते. सकाळी दात घासल्यानंतर ती काळोखातच तोंड धुत असे. कोणीतरी आपले व्हीडिओ पाहत असेल अशी अनामिक भीती तिच्या मनात दाटलेली असे.
त्यानंतर तिला एक कल्पना सुचली. वकील असल्याचं भासवत एक नवीन इमेल आयडी तयार केला. अत्याचाराचा व्हीडिओ टाकल्याप्रकरणी पॉर्नहबवर कायदेशीर कारवाई करू असा आशया इमेल त्यांनी पाठवून दिला.
अवघ्या 48 तासांत सगळे व्हीडिओ साईटवरून गायब झाले.
काही महिन्यांनंतर रोज यांचं समुपदेशन सत्र सुरू झालं. अत्याचार करणारी माणसं कोण आहेत हे त्यांनी मानसोपचार तज्ज्ञाला सांगितलं. त्याने यासंदर्भात पोलिसांना ही माहिती दिली. मात्र त्यांनी व्हीडिओबद्दल घरच्यांना किंवा पोलिसांना सांगितलं नाही.
पोलिसांनी रोज आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवून घेतले. अत्याचार करणाऱ्यांनी रोझ यांनीच सेक्सकरता सहमती दर्शवल्याचा युक्तिवाद केला. त्या पुरुषांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मात्र अल्पवयीन मुलीला मारहाण तसंच तिच्याशी लैंगिक संबंध ठेवल्याप्रकरणी त्यांना शिक्षा मिळाली.
अत्याचार करणाऱ्यांना आणखी कठोर शिक्षा मिळावी यासाठी पुढे प्रयत्न सुरू ठेवण्याएवढी ऊर्जा रोज आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे नव्हती.

आपल्या मुलीबाबत हे काय घडलं याचा रॉन कलेंबा सातत्याने विचार करतात. काय केलं असतं तर हा सगळा प्रकार थांबवता आला असता याचा ते विचार करतात. हल्ल्यानंतर मुलीमध्ये अमूलाग्र बदल झालेत असं रॉन यांना वाटतं. ती अतिशय हुशार विद्यार्थी होती पण नंतर ती कधीकधीच शाळेत जाऊ लागली असं ते सांगतात.
रॉन नियमितपणे घराजवळच्या एका बागेत जातात. आम्ही त्यांना तिथेच भेटलो. रॉन आणि रोज एकत्रितपणे या बागेत येतात. बायबलमधील काही उताऱ्यांचं वाचन करतात. भूतकाळात काय घडलं याचा ते विचार करत नाहीत.
अख्ख्या जगाने तिचा विश्वासघात केला. तिने जे भोगलं आहे त्याचं वर्णन शब्दात होऊ शकत नाही. प्रत्येक टप्प्यावर तिला प्रचंड सोसावं लागलं आहे.

रॉन यांना पॉर्नहब या साईटबद्दल गेल्या वर्षीच कळलं. रोज यांनी ब्लॉग लिहून स्वत:वर झालेल्या अत्याचाराबद्दल, पॉर्नहबवरील व्हीडिओबद्दल लिहिलं होतं. आपल्या मुलीवर झालेला बलात्कार वेबसाईटवर हजारो लोकांनी पाहिल्याचं त्यांना कळलं. यामुळे शाळेत अनेकांनी तिला त्रास दिल्याचंही त्यांना पहिल्यांदाच कळलं.
रॉन यांनी त्यांच्या लहानपणीची आठवण मला सांगितली. "मी आठवीत असताना आमच्या वर्गात एक मुलगी होती. तिला मारहाण होत असे. आमच्यापैकी कोणीही काहीही बोलत नसे," असं रॉन सांगतात.
"मला तिची तेव्हाची अवस्था आठवून विदीर्ण वाटलं. तिच्या खच्चीकरणात माझाही सहभाग आहे असं तिला वाटणं साहजिक आहे. कारण तेव्हा मी बघ्याची भूमिका घेतली होती. खरंतर काही विशिष्ट मुलंच तिला त्रास देत असत पण आम्ही सगळे तिच्याविरुद्ध आहोत असं तिला वाटत असे. तिच्यावर अत्याचार होत असताना आम्ही निमूटपणे बघत असू. आम्ही काहीही न करणं हे तिला कसं वाटलं असेल हे आठवूनही मला वाईट वाटतं," रॉन सांगतात.
रोजच्या मनातही आपल्या वर्गमित्रांबद्दल असंच काही असेल का?
रोजसाठी हा प्रसंग खूप कठीण होता. ते व्हीडिओ डिजिटल फॉरमॅटमुळे हजारो लोकांसमोर गेले. वखवखलेल्या लोकांनी ते व्हीडिओ पाहून आपली भूक शमवली असेल याचा विचार ते करत होते.

फोटो स्रोत, Rose Kalemba
पुढच्या काही वर्षात रोज डिजिटल विश्वात हरवून गेली.
तिने सोशल मीडियावर लिहायला सुरुवात केली. ब्लॉगपोस्ट लिहायला सुरुवात केली. कधी त्या स्वत:च्या नावाने लिहितात तर कधी टोपणनावाने.
गेल्या वर्षी इंटरनेट सर्फिंग करत असताना त्यांना पॉर्नहबविषयी पोस्ट पाहायला मिळाल्या. प्रेक्षक पॉर्नहबचं कौतुक करत होते. पॉर्नहबने बऱ्याच लोकांना सहकार्य केल्याच्या बातम्या येत होत्या. मधमाशांच्या संवर्धन उपक्रमाला भरघोस मदत, ऐकायला अडचण असलेल्या प्रेक्षकांना सुविधा, घरगुती हिंसाचाराला बळी पडणाऱ्या महिलांसाठी निधी, तसंच तंत्रज्ञान क्षेत्रात काम करू पाहणाऱ्या महिलांना 25,000 डॉलर्सची स्कॉलरशिप यामुळे प्रेक्षकांनी पॉर्नहबवर कौतुकाचा वर्षाव झाला होता.
2019 मध्ये पॉर्नहबला 42 अब्ज लोकांनी भेट दिली. त्यांच्या प्रेक्षकसंख्येत 8.5 बिलिअनची वाढ झाली. दैनंदिन सरासरी प्रेक्षकसंख्या 115 मिलिअन एवढी तर दर सेकंदाला 1,200 लोकांनी पॉर्नहब सर्च केलं.
तुम्ही सोशल मीडियावर असाल तर पॉर्नहबला तुम्ही चुकवूच शकत नाही. त्यांनी पॉर्नला वेगळंच व्यासपीठ मिळवून दिलं आहे. मात्र माझ्यासारख्या अत्याचार भोगलेल्या महिलांचे व्हीडिओ आजही पॉर्नहबवर आहेत. त्या महिलांवर बलात्कार झाला आहे आणि त्या महिलांना त्याची माहिती देखील नसते.
व्हायरल झालेल्या ब्लॉगपोस्टमध्ये रोज यांनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल लिहिलं आहे. वकील असल्याचं भासवेपर्यंत पॉर्नहबने माझ्या विनंतीला धुडकावून लावलं याबाबत त्यांनी सविस्तरपणे लिहिलं. असंख्य महिलांनी तसंच काही पुरुषांनी या पोस्टला प्रतिसाद दिला. लैंगिक अत्याचाराचे व्हीडिओ पॉर्नहबवर आहेत असं त्यांनी सांगितलं.
रोज यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात जाणून घेण्यासाठी बीबीसीने पॉर्नहबशी संपर्क साधला. त्यांनी एका निवेदनाद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे.
बीबीसीला दिलेल्या निवेदनात पॉर्नहबने म्हटलं आहे की, "हे गंभीर स्वरुपाचे आरोप 2009 मधील घटनेसंदर्भातील आहेत. पॉर्नहब साईट आता वेगळ्या लोकांकडून चालवली जाते. त्यामुळे तेव्हा नक्की काय घडलं आणि तेव्हाची कार्यपद्धती कशी होती याविषयी मला माहिती नाही. साईटची मालकी बदलल्यानंतर पॉर्नहबने कंटेटसंदर्भात कठोर नियम लागू केले आहेत. अल्पवयीन मुलामुलींवर झालेल्या अत्याचाराची कुठेही वाच्यता होऊ नये तसंच त्यांना त्रास होऊ नये यासाठी पॉर्नहबकडून काळजी घेतली जाते. कंटेटची शहानिशा करण्यासाठी पॉर्नहबने वोबाईल नावाचं थर्ड पार्टी सॉफ्टवेअर अंगीकारलं आहे."

झोपेत तरुणीवर अत्याचार, दारू प्यायलेल्या मुलीवर अत्याचार, तरुणीवर हल्लाबोल अशा नावाचे व्हीडिओ तुमच्या साईटवर कसे असा प्रश्न आम्ही पॉर्नहबला विचारला. कंपनीने ठरवलेल्या नियमांचं पालन करणारा मजकूर साईटवर आहे. काही लोकांना तो मजकूर आक्षेपार्ह वाटू शकतो. ते याविरोधात दादही मागतात असं पॉर्नहबने सांगितलं.
2015मध्ये पॉर्नहबने आक्षेपार्ह वाटणाऱ्या कंटेटबाबत फ्लॅगिंग टॅब जारी केला. मात्र अत्याचाराचे व्हीडिओ आजही पॉर्नहबवर आहेत.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात फ्लोरिडातल्या 30 वर्षांच्या माणसाने ख्रिस्तोफर जॉन्सनने 15 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. याचा व्हीडिओ त्याने पॉर्नहबवर टाकला. या माणसावर गुन्हा दाखल करण्यात आला.
या खटल्यासंदर्भात पॉर्नहबने बीबीसीला दिलेल्या निवेदनात म्हटलं की आक्षेपार्ह कंटेट आढळून आल्यास आम्ही ते काढून टाकतो. यासंदर्भात आम्ही तेच केलं.
गेल्या वर्षी पॉर्नहबने 'गर्ल्स डू पॉर्न' नावाचं चॅनेल बंद केलं. व्हीडिओ चित्रीकरणासाठी बळजबरी केल्याचा आरोप 22 महिलांनी या चॅनेलवर केला होता. चॅनेल चालवणाऱ्याविरोधात सेक्स ट्रॅफिकिंगचे आरोप निश्चित करण्यात आले.
दहा वर्षांपूर्वी माझ्याबरोबर जे घडलं ते आता कुणासोबत होत नाही असं कुणीच ठामपणे सांगू शकत नाही, रोज सांगते.
अजूनही असे प्रकार घडत असल्याचं अनेक महिलांनी माझा ब्लॉग वाचून सांगितलं.
पॉर्न साईटवरचे व्हीडिओ आखातात तसंच आशिया खंडातील नेटिझन्स पाहत असतील याची पीडितेला जराही कल्पना नसते.
रोज यांना इमेल करणाऱ्या एका महिलेशी आम्ही बोललो. एका महिलेवर झालेला अत्याचार एका साईटवर दाखवण्यात येत होता. मात्र ही साईट पॉर्नहबइतकी लोकप्रिय नव्हती. त्या महिलेने साईटला इमेल करून व्हीडिओ हटवण्याची विनंती केली. व्हीडिओखालच्या कमेंट्स सेक्शनमध्येही त्या महिलेने कमेंट नोंदवली.

तो व्हीडिओ डाऊनलोड करून अन्य साईटवरही टाकण्यात आल्याचं त्या महिलेनी सांगितलं.
त्या वेबसाइटच्या वकिलांनी बीबीसीकडे आपली भूमिका मांडली. आपल्या क्लायंट्सना अशा परिस्थितीची कल्पना नव्हती असं त्यांनी सांगितलं.
आम्ही त्यांना त्या व्हीडिओची लिंक दाखवली तसंच स्क्रीनशॉटही दाखवले. काही दिवसांनंतर हा व्हीडिओ साईटवरून काढून टाकण्यात आला.

2009 मध्ये रोज यांच्याबाबतीत जे घडलं ते अनेक पॉर्न साईट्सवर दाखवलं जातं. हे पॉर्नहबपुरतं मर्यादित नाही असं केट इस्कास यांनी सांगितलं. पॉर्न साईट्सच्या कंटेटची पडताळणी करणाऱ्या 'नॉट युअर पॉर्न' संघटनेकरता केट काम करतात.
छोट्या स्वरूपाच्या, स्थानिक पातळीवरच्या पॉर्न साईट्सचं आम्ही काहीच करू शकत नाही. मात्र पॉर्नहबसारख्या साईटला जाब विचारता येतो. त्यांना कोणताच कायदा लागू होत नाही त्यामुळे त्यांना प्रश्न विचारणे आवश्यक आहे असं केट सांगतात.
रिव्हेंज पॉर्नोग्राफी हा प्रकार रूढ होतो आहे. यामध्ये संमतीविना एखाद्या व्यक्तीचे फोटो इंटरनेटवर शेअर केले जातात.
2015 पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये अशा पद्धतीचा कंटेट तयार करणे हा गुन्हा आहे. या गुन्ह्याअंतर्गत दोषी आढळल्यास दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मात्र अशा स्वरुपाचा कंटेट प्रसिद्ध करणाऱ्या साईट्सवर कोणत्याही कारवाईची तरतूद नाही.
चित्त विचलित करणारा आणि आक्षेपार्ह कंटेट आपल्या साईटवर आहे याची पॉर्न वेबसाईट्सला कल्पना असते असं केट सांगतात. फँटसी रोल प्ले अॅक्टिंग, फेक प्रॉडक्शन तसंच खऱ्या अत्याचाराचं चित्रीकरण याविरोधात आम्ही काही करू शकत नाही.
केट यांनी त्यांच्या 16वर्षीय मैत्रिणीचा व्हीडिओ पॉर्नहबवर पाहिला. त्यानंतर त्यांनी त्यांनी 'नॉट युअर पॉर्न'ची सुरुवात केली. युकेतील 50 महिलांनी सांगितलं की आमचे व्हीडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आले. यापैकी तीस महिलांचे व्हीडिओ पॉर्नहबवर टाकण्यात आले आहेत, अशी माहिती केट देतात.
पॉर्नहब तसंच अन्य वेबसाईट्स त्यांच्या प्रेक्षकांना व्हीडिओ डाऊनलोड करण्याचा पर्याय देतात. त्यामुळे व्हीडिओ साईटवर काढून टाकण्यात आला तरी प्रेक्षकांना नंतर तो व्हीडिओ पाहता येऊ शकतो. युकेत अशा कंटेटवर बंदी यावी यासाठी 'नॉट युअर पॉर्न' पुढाकार घेत आहे. हा कायदा अंमलात आल्यास परवानगीविना पॉर्नोग्राफिक कंटेट इंटरनेटवर शेअर करणं गंभीर गुन्हा असेल.

आपलं भविष्य चांगले असेल असा रोज यांना वाटतं. वयाच्या विशीत त्यांना बॉयफ्रेंड मिळाला. त्याचं नाव रॉबर्ट. रॉबर्टने नेहमीच आधार दिल्याचं रोज सांगतात. अत्याचाराच्या कटू आठवणी विसरण्यासाठी रॉबर्टने मदत केल्याचं त्या आवर्जून सांगतात.

फोटो स्रोत, Rose Kalemba
रॉबर्ट आणि त्यांचं लग्न लवकरच होईल आणि त्यांना मुलगी होईल असं त्यांना वाटतं. बेला नावाचा तिचा कुत्रा तिच्यासाठी भावनिक आधार आहे.
बेलाला पाहत मी लहानाची मोठी झाले. हे कुत्रे आक्रमक असतात अशी समजूत आहे. पण ते तितकेच गोड असतात. माणसांनी त्यांना त्रास दिला तरच ते आक्रमक होतात असं रोज सांगते.
मला आयुष्यभरासाठी शिक्षा मिळाली. मी ग्रोसरी स्टोअरमध्ये खरेदीला गेले तरी तिथे येणाऱ्या कुणीतरी माझा व्हीडिओ पाहिला असेल अशी मला धास्ती वाटते. मात्र आता गप्प बसायचं नाहीये असं ती सांगते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








