डोनाल्ड ट्रंप यांचे माजी सल्लागार लाचखोरीच्या आरोपात अटकेत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष स्टीव्ह बॅनन यांचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन यांच्यावर लाचखोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. मेक्सिको बॉर्डरवर डोनाल्ड ट्रंप यांना भिंत बांधायची होती.

या भिंतीसाठी पैसे गोळा करण्याची मोहीम अमेरिकेत सुरू होती त्या दरम्यान लोकांकडून आलेले पैसे स्वखर्चासाठी वापरल्याचा बॅनन यांच्यावर आरोप आहे.

ब्रिटबार्ट या न्यूज वेबसाइटची जबाबदारी सांभाळल्यानंतर स्टीव्ह बॅनन यांनी ट्रंप यांच्या निवडणूक प्रचारामध्ये सहभाग घेतला. ब्रिटबार्ट ही वेबसाइट उजव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

ट्रंप यांचे जावई जेरेड कुशनर यांना ते नकोसे झाले होते. बॅनन यांना बडतर्फ करण्यासाठी ते प्रयत्न करत होते असं म्हटलं जातं. प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याच्या वर्षानंतर म्हणजेच 2017 मध्ये त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.

डोनाल्ड ट्रंप यांच्यासाठी का महत्त्वाची आहे ही भिंत?

संकटापासून वाचायचं असेल तर मेक्सिको सीमेवरील भिंतीसाठी पैसा गोळा करा, असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केलं होतं.

मेक्सिकोतून कामगारांचे लोंढे अमेरिकेत येतात. त्यामुळे अमेरिका-मेक्सिको बॉर्डरवर भिंत घालूत असं डोनाल्ड ट्रंप यांनी निवडणुकीपूर्वी म्हटलं होतं. निवडून आल्यानंतरही या भिंतीवरून अमेरिकेत बराच वाद निर्माण झाल्याचं पाहायला दिसलं.

ट्रंप यांनी अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याठी 1 बिलियन डॉलरचा (6884 कोटी 85 लाख) निधी मंजूर केला होता. "संरक्षण विभागाला रस्ते आणि सीमा बांधण्याचा आणि ड्रग्सची तस्करी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सीमेवरचा मार्ग बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे." असं ट्रंप यांच्या कार्यालयाने म्हटलं होतं.

ट्रंप यांच्या या निर्णयामुळे अमेरिकन संसदेत गदारोळ झाला होता.

अमेरिकेत काही महिन्यांवरच निवडणुका आल्या आहेत. निवडणुकाच्याच तोंडावर ट्रंप यांच्या माजी सल्लागाराला अटक झाली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)