You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'32 वर्षं लागली, पण अखेरीस अपहरण झालेला माझा मुलगा सापडला'
- Author, सिंडी सुई
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्विस
ली जिंगशी तब्बल तीन दशकं आपल्या बेपत्ता मुलाचा शोध घेत होत्या. माओ यिन, असं या मुलाचं नाव.
1988 साली माओ यिन याचं अपहरण करून त्याला विकण्यात आलं होतं. ली जिंगशी यांनी आपल्याला आपला मुलगा परत मिळेल, ही आशाच सोडली होती. पण याच वर्षी मे महिन्यात त्यांना एक फोन कॉल आला आणि त्यांची तीन दशकांची प्रतीक्षा संपली.
जिंगशी आणि त्यांचे पती मध्य चीनमधल्या शांक्षी प्रांतातल्या क्षिईन शहरात रहायचे. त्यांच्या चिमुकल्याला ते दर रविवारी जवळच्याच प्राणीसंग्रहालयात किंवा एखाद्या बागेत फिरायला घेऊन जायचे.
चीनमध्ये 80-90 च्या दशकात एक अपत्य धोरणाची काटेकोर अंमलबजावणी व्हायची. त्यामुळे जिगंशी यांना एकच मुलगा होता. माओ यिनने खूप शिकावं आणि खूप मोठं व्हावं, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळेच त्यांनी माओला 'जिआ जिआ' म्हणजेच उत्कृष्ट असं टोपण नाव दिलं होतं.
जिआ जिआविषयी सांगताना जिंगशी म्हणतात, "जिआ जिआ खूप छान वागायचा. तो स्मार्ट होता, आज्ञाधारक होता, समजूतदार होता. त्याला रडायला आवडायचं नाही. तो कायम उत्साही असायचा. बघताक्षणी तो सर्वांना आवडायचा. सर्वांचा लाडका होता."
ऑफिसला जाताना माओ यिनचे आईवडील त्याला पाळणाघरात सोडायचे आणि ऑफिसमधून परत येताना त्याला घेऊन यायचे.
"आम्ही त्याच्यासोबत खेळायचो. आम्ही खूप आनंदात होतो", असं जिंगशी सांगतात.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
जिंगशी एका धान्य आयात करणाऱ्या कंपनीत नोकरी करायच्या. कापणीच्या हंगामावेळी वेगवेगळ्या गावातल्या पुरवठादारांना भेटण्यासाठी त्या बरेच दिवस घराबाहेरच असतं.
असंच एकदा कामानिमित्त बाहेरगावी गेल्या असताना एक दिवस अचानक त्यांच्या कंपनीकडून त्यांना टेलिग्राम मिळाला आणि लवकर घरी परता म्हणून कळवण्यात आल्या. त्या घाई-घाईने घरी परतल्या आणि आपला मुलगा हरवल्याची बातमी त्यांना मिळाली.
जिंगशी सांगतात, "मी माझ्या मुलाला कधीच शोधू शकणार नाही, असं मला वाटलंच नव्हतं. मला वाटलं गेला असेल इथेच कुठेतरी."
तो 1988 सालचा ऑक्टोबर महिना होता. त्यावेळी जिआ जिआ दोन वर्ष आठ महिन्यांचा होता.
जिंगशीच्या पतीने सांगितलं की, नेहमीप्रमाणे ऑफिसमधूमन परतताना त्यांनी जिआ जिआला पाळणाघरातून घेतलं आणि घराकडे परत येत असताना ओळखीच्याच एका हॉटेलातून त्याच्यासाठी पाणी आणण्यासाठी ते थांबले. त्यांनी फक्त 1 ते 2 मिनिटांसाठी जिआ जिआला एकटं सोडलं होतं. ते परतले तेव्हा तो तिथे नव्हता.
सुरुवातीला जिंगशी यांना वाटलं की, कुणाला तरी तो सापडला असेल आणि ते त्याला घेऊन पोलीस ठाण्यात नक्की जातील. पण आठवडा उलटूनही माओ यिन सापडला नाही. मग मात्र जिंगशी यांची चिंता वाढू लागली.
मुलाला शोधण्यासाठी त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्या. माओ यिनचा फोटो असलेले एक लाख पॅम्प्लेट छापले. हॉटेलच्या आसपास सगळ्यांकडे विचारपूस केली.
चीनमध्ये का वाढल्या होत्या अपहणाच्या घटना?
चीनमध्ये वाढत्या लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी 1979 साली एक मूल धोरण लागू करण्यात आलं. त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात आली. पण वारसा चालवण्यासाठी लोकांना मुलगा हवा असायचा. मात्र, एकापेक्षा जास्त अपत्य असल्यास इतर अपत्यांना कुठलाच सरकारी लाभ मिळायचा नाही. इतकंच नाही तर दुसरं अपत्य जन्माला घातल्यास मोठा दंडही आकारला जाई.
पण, या कठोर नियमामुळे चीनमध्ये लहान मुलांचं अपहरणाच्या घटना वाढू लागल्या. मात्र, जिंगशी यांना यातलं काहीही माहिती नव्हतं. त्या सांगतात, "टीव्हीवर बेपत्ता मुलांच्या बातम्या यायच्या तेव्हा मला असं कधीच वाटलं नाही की, या मुलांचं अपहरण झालं असावं. मला कायम वाटलं की ती हरवली आहेत."
सुरुवातीला त्यांनी मुलगा हरवण्याचा सगळा दोष नवऱ्याला दिला. मात्र, पुढे त्यांच्या लक्षात आलं की आरोप करून काहीही होणार नाही. ती त्यांची चूक होती. पुढे दोघांनी एकत्रितपणे मुलाचा शोध घेतला. पण, मुलगा सापडलाच नाही. शेवटी चार वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला.
पण जिंगशी यांनी मुलाचा शोध घेणं थांबवलं नाही. दर शुक्रवारी ऑफिसमधून त्या थेट रेल्वेने त्या ठिकाणी जायच्या जिथे माओ यिन हरवला होता. आसपासच्या भागात शोधायच्या, विचारपूस करायच्या आणि रविवारी संध्याकाळच्या ट्रेनने घरी परतायच्या.
अशाच शोध घेताना एक दिवस जिंगशी यांना कळलं की, एका जोडप्याने माओ यिनसारख्याच दिसणाऱ्या मुलाला दत्तक घेतलं आहे. त्या लगेच बसने त्या शहरात गेल्या. तिथून दुसरी बस पकडून जवळच्या एका गावात गेल्या.
गावातले लोक संध्याकाळी शेतातून घरी परतण्याची त्यांनी वाट बघितली. मात्र, तेव्हा त्यांना कळलं की ते जोडपं मुलाला घेऊन पुन्हा क्षिईन शहरात गेलेत. त्या लगेच गावातून निघाल्या आणि पहाटे पहाटे शहरात पोहोचल्या. तासनतास पायपीट करून ते जोडपं ज्या फ्लॅटमध्ये राहत होते तो फ्लॅट शोधून काढला. पण दोन दिवसांपूर्वीच ते दुसऱ्या शहरात गेल्याचं त्यांना कळलं. पुन्हा त्या तिथून निघाल्या रात्री त्या शहरात पोहोचल्या. पुन्हा ते जोडपं कुठल्या हॉटेलमध्ये थांबलं असावं म्हणून सगळी हॉटेल्स पालथी घातली. मात्र, ते जोडपं त्या हॉटेलमधूनही गेलं होतं.
एव्हाना मध्यरात्र झाली होती. तरीही जिंगशी बस पकडून त्या जोडप्याच्या आईवडिलांच्या गावी गेल्या. पण तिथेही ते नव्हते. मग त्यांनी त्या महिलेच्या माहेरी जायचं ठरवलं. पण एव्हाना त्या खूप थकल्या होत्या. सलग तीन दिवस, दोन रात्र त्या जाग्याच होत्या. नीट जेवल्याही नव्हत्या. मग त्यांनी तिथेच थोडी विश्रांती घेतली आणि पुन्हा त्या जोडप्याला शोधायला निघाल्या. त्यांना ते जोडपं मिळालं. पण तो मुलगा त्यांचा नव्हता.
जिंगशी सांगतात, "मला खात्री होती ते बाळ जिआ जिआच असेल. मी खूप निराश झाले होते. या घटनेचा माझ्यावर खूप परिणाम झाला. त्यानंतर मला सारखा माझ्या मुलाचा आवाज ऐकू यायचा."
ढासळती मानसिक अवस्था
सकाळी उठल्यावर डोक्यात पहिला विचार मुलाचाच यायचा आणि रात्री झोपतानाही त्याचाच विचार. स्वप्नातही तोच दिसायचा. जिंगशी यांची मानसिक स्थिती ढासळत होती.
त्या डॉक्टरांकडे गेल्या. डॉक्टरांनी सांगितलं शरीराच्या जखमा भरता येतील. पण मनावरचे घाव त्यासाठी स्वतःच प्रयत्न करायला हवे.
जिगशी सांगतात, "त्या रात्री मला एक क्षणही झोप लागली नाही. माझ्या मनात विचारांचा काहूर माजलं होतं. मला वाटलं, हे असं करून चालणार नाही. मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवलं नाही तर मला वेड लागेल. मला वेड लागलं तर मी माझ्या मुलाचा शोध घेऊ शकणार नाही आणि तो परतला आणि त्याने मला अशा अवस्थेत बघितलं तर त्याला किती वाईट वाटेल."
त्यानंतर जिंगशी यांनी निराश न होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आणि सगळं लक्ष मुलाचा शोध घेण्यावर केंद्रित केलं.
पुढे जिंगशी यांना कळलं की, केवळ त्याच नाही तर त्यांच्या शहरात आणि इतर शहरातही असे कितीतरी पालक आहे ज्यांची मुलं हरवली आहेत. जिंगशी यांनी त्या सर्व पालकांसोबत मिळून काम करायला सुरुवात केली. हे नेटवर्क चीनमधल्या जवळपास सर्वच प्रांतात पसरलं. सगळे एकमेकांना बेपत्ता मुलांच्या पॅम्प्लेट्सने भरलेली बॅग्ज पाठवत आणि मग त्या शहरात जो प्रतिनिधी असायचा तो शहरभर ती पॅम्प्लेट्स चिकटवायचा. पण या नेटवर्कचा जिंगशी यांना काहीही उपयोग झाला नाही.
मुलाचा शोध घेण्यासाठी त्यांनी स्वतः 10 प्रांत पालथे घातले होते.
29 मुलांचा शोध घेण्यात यश
जिंगशी यांचा मुलगा बेपत्ता होऊन 19 वर्ष लोटली होती. त्या आता 'बेबी कम होम' या वेबसाईटसाठी काम करत होत्या. त्या सांगतात, "आता मला एकटं वाटत नव्हतं. माझ्यासारखे अनेक जण होते. ते एकमेकांची मुलं शोधण्यासाठी मदत करायचे. मला वाटायचं माझा मुलगा सापडला नसला तरी मी इतरांना त्यांची मुलं शोधण्यात मदत करू शकते. ही माझ्यासाठी खूप समाधानाची बाब होती."
या कामातून त्यांनी स्वतः 29 बेपत्ता मुलं शोधून काढली होती. मुलं आणि त्यांच्या आई-वडिलांच्या भेटीच्या क्षणाविषयी सांगताना जिंगशी म्हणतात, "मला वाटायचं, इथे माझा मुलगा का नाही? पण मी जेव्हा इतर पालकांना आपल्या मुलाला मिठीत घेताना बघायचे तेव्हा मला त्यांच्यासाठी खूप आनंद व्हायचा. शिवाय मला असंही वाटायचं की, त्यांच्या आयुष्यात हा दिवस आला आहे तर माझ्याही आयुष्यात असा दिवस नक्की येईल. मला आशा वाटायची."
मात्र, त्या सांगतात की, प्रत्येकच दिवस आशादायी नसायचा. बरेचदा निराशा दाटून यायची. मग मी स्वतःलाच समजवायचे की खचून गेले तर जगणंच कठीण होऊन बसेल. मग मला धीर यायचा.
जिंगशी यांनी सांगितलं, "त्यांच्या आईलाही जिआ जिआ परत येईल, अशी आशा होती. 2015 साली तिचं निधन झालं. पण मरणाच्या आधीही तिच्या मनात जिआ जिआचा विचार होता. तिने एक दिवस मला सांगितलं की तिला जिआ जिआ परतल्याचं स्वप्न पडलं. ती म्हणाली - तब्बल 30 वर्षांनंतर तो परतला होता."
"माझी आई 15 जानेवारी 2015 ला गेली. लुनार कॅलेंडरनुसार तो जिआ जिआचा वाढदिवस होता. मला वाटलं जणू हा ईश्वरी संकेत आहे. देवाला मला हे सांगायचं असावं की, जिने मला जन्म दिला आणि ज्याला मी जन्म दिला या दोघांनाही विसरू नको."
2009 साली चीन सरकारने डीएनए डेटाबेस तयार करायला सुरुवात केली. यात ज्या पालकांची मुलं बेपत्ता झाली ते पालक आणि ज्या मुलांना असा संशय आहे की त्यांचं अपहरण करण्यात आलं, ती मुलं स्वतःच्या डीएनएची माहिती देऊ शकतात. या उपक्रमातून हजारो मुलांना आपले खरे आई-वडील भेटले.
जिंगशी सांगतात की, अपहरण झालेल्यांमध्ये मुलांचं प्रमाण लक्षणीय होतं. मुलबाळ नसलेले किंवा मुलीच असलेले पालक अपहरण करून आणलेल्या मुलांना विकत घ्यायचे. यातले बरेच जण गावाखेड्यात राहणारे होते.
यावर्षी एप्रिल महिन्यात त्यांना एक लीड मिळाली. अनेक वर्षांपूर्वी एका मुलाचं क्षिईन शहरातून अपहरण झालं होतं, अशी बातमी त्या लीडने दिली. सोबत त्या तरुण मुलाचा फोटोही होता. जिंगशी यांनी तो फोटो पोलिसांना दिला. पोलिसांनी फेस रेकॉग्निझन तंत्रज्ञानाच्या मदतीने तो तरुण 700 किमी लांब चेंगडू शहरात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांनी त्याला भेटून डीएनए चाचणी करायला सांगितलं. 10 मे रोजी त्या डीएनए चाचणीचा अहवाल आला आणि आमचे डीएनए मॅच झाले.
पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा डीएनए चाचणी झाली आणि या चाचणीचेही निकाल सकारात्मक आहे. आता मात्र तो तरुण माझाच मुलगा होता, यात शंका उरली नव्हती.
जिंगशी सांगतात, "माझ्या हातात डीएनएचे निकाल आले तेव्हा कुठे माझा विश्वास बसला मला माझा मुलगा अखेर सापडला. तब्बल 32 वर्षं आणि 300 चुकीच्या लीडनंतर मला माझा मुलगा परत भेटला होता."
18 मे ही त्याला भेटण्याची तारीख ठरली. जिंगशी नरव्हस होत्या. त्यांना बघून त्यांचा मुलगा कसा वागेल, याचा अंदाज त्या घेत होत्या. तो आता मोठा झाला होता. त्याचं लग्न झालं होतं आणि स्वतःचा इंटेरिअर डेकोरेशनचा व्यवसाय होता.
जिंगशी सांगतात, "भेटण्याआधी मला खूप चिंता लागून होती. कदाचित तो मला ओळखणार नाही किंवा मला स्वीकारणार नाही किंवा त्याच्या मनातून माझ्या सगळ्या आठवणी मिटल्या असतील. मी त्याला मिठी मारल्यावर त्याने ती स्वीकारली नाही तर. मला खूप खजील व्हायला होईल. ज्या मुलाचा मी इतकी वर्षं शोध घेतला त्याने माझं प्रेम, माया स्वीकारलंच नाही तर."
जिंगशी यांच्या स्वतःच्या मुलाचं अपहरण झालं होतं आणि त्या अशा मुलांना शोधण्याचं काम करत असल्यामुळे जेव्हा ही बातमी प्रसार माध्यमांना कळाली तेव्हा ती मोठी बातमी ठरली.
भेटीच्या दिवशी ही भेट चायना सेंट्रल टेलिव्हिजनने (CCT) ही भेट लाईव्ह दाखवली. या व्हीडियोत जिआ जिआ एका दारातून येताना दिसतो. जिंगशी यांना बघताच तो आई म्हणून हाक मारतो आणि धावत जाऊन जिंगशी यांना मिठी मारतो. आई-वडील आणि मुलगा तिघांनाही या भावुक क्षणी अश्रू अनावर होतात.
पुढे जिंगशी यांना कळलं की, जिआ जिआला अपहरणाच्या वर्षभरानंतर सिचुआन प्रांतातल्या अपत्य नसलेल्या जोडप्याने 6000 युआन म्हणजे आजचे 840 डॉलर्सला विकत घेतलं होतं. जिआ जिआने सांगितलं की त्याने काही दिवसांपूर्वीच जिंगशी यांना टीव्हीवर बघितलं होतं आणि त्याला जिंगशी खूप मनमिळाऊ वाटल्या होत्या.
जिंगशी यांनी त्याला त्याचे बालपणीचे फोटो दाखवले. जिंगशी म्हणतो, "मला फारसं आठवत नाही. पण कदाचित मी असाच दिसत होतो."
जिआ जिआचा पत्ता ज्या व्यक्तीने सांगितला त्या व्यक्तीला स्वतःची ओळख गुप्त ठेवायची असल्याने ती व्यक्ती कॅमेऱ्यासमोर आली नाही.
पुढे जिआ जिआ जवळपास महिनाभर काही काळ आई आणि काही काळ वडिलांबरोबर राहिला. जिंगशी सांगतात, "आम्ही त्याला त्याचे बालपणीचे फोटो दाखवले. पण त्याला फारसं काही आठवत नाही. मला याचं वाईट वाटलं."
जिंगशी पुढे सांगत होत्या, "मला वाटत होतं ते दिवस पुन्हा परत यावे. मी त्याला कडेवर उचलून घ्यावं. 32 वर्षांचा गॅप भरून निघावा."
जिआ जिआ आताही चेंगडूमध्ये राहतो आणि जिंगशी क्षिईनमध्ये. त्याला पुन्हा आपल्याकडे बोलवून त्याचं आयुष्य मला अवघड करायचं नाही, असं जिगंशी सांगतात. त्या म्हणतात, "जिआ जिआ आता मोठा झाला आहे. त्याचे स्वतःचे विचार आहेत. त्याचं लग्न झालं आहे. त्यामुळे तो सुखात रहावा, एवढीच माझी इच्छा आहे. आता मला माहिती आहे की माझा मुलगा कुठे आहे आणि तो जिवंत आहे, एवढंच माझ्यासाठी खूप आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)