You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बैरुत स्फोट: लेबननच्या बंदरापर्यंत कसा पोहोचला अमोनियम नायट्रेटचा साठा?
लेबननच्या सरकारने म्हटलंय की बैरूतमध्ये झालेल्या स्फोटाचं कारण शहरातल्या पोर्ट (बंदर) भागात असणारा 2750 किलोग्रॅम अमोनियम नायट्रेटचा साठा होतं. हा साठा तिथे आला कुठून?
शहराला लागून असणाऱ्या एखाद्या गोदामात कोणत्याही सुरक्षेच्या उपाययोजनांशिवाय ज्वलनशील आणि स्फोटक साहित्य गेल्या सहा वर्षांपासून ठेवलं होतं, ही बाब शहरातले लोक मान्यच करायला तयार नाहीत.
स्फोट झालेलं अमोनियम नायट्रेट हे केमिकल पोर्ट भागातल्या गोदामात कसं आलं यावर अजून सरकारने काही स्पष्टीकरण दिलेलं नाही पण सहा वर्षांपूर्वी एक जहाज इतक्याच वजनाचं अमोनियम नायट्रेट घेऊन बैरूतमध्ये आलं होतं.
ही गोष्ट नोव्हेंबर 2013 ची आहे. अमोनियम नायट्रेटची खेप घेऊन बैरूतच्या बंदरावर पोहचणाऱ्या जहाजावर पूर्व यूरोपातला देश मॉल्डोवाचा झेंडा लावला होता. या जहाजाचं नाव होतं 'एमवी रोसुस'. हे जहाज रशियाच्या मालकीचं होतं, आणि त्याच वर्षी ते जॉर्जियाच्या बातुमीहून मोझाम्बिकमधल्या बेईराकडे निघालं होतं.
बैरूतच्या बंदरावर
अमोनियम नायट्रेट दिसायला लहान लहान गोळ्यांसारखं असतं. खत म्हणून याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. जर फ्युअल ऑईलमध्ये अमोनियम नायट्रेट मिसळलं तर त्यापासून स्फोटक तयार होतं, ज्याचा उपयोग खाणकाम तसंच बांधकाम उद्योगात केला जातो.
जहाज उद्योगाच्या बातम्यांकडे लक्ष ठेवणारी बेवसाईट 'शिपिंगअरेस्टेड डॉटकॉम' च्या 2015च्या एका रिपोर्टनुसार पूर्व भूमध्य समुद्रातून जाणाऱ्या 'एमवी रोसुस'मध्ये काहीतरी 'तांत्रिक समस्या' निर्माण झाली होती आणि त्यामुळे या जहाजाला बैरूतच्या बंदरावर थांबाव लागलं.
'शिपिंगअरेस्टेड डॉटकॉम'वर हा लेख लेबननच्या त्या वकिलांनी लिहिला होता ज्यांनी या जहाजाच्या चालक दलाची बाजू कोर्टात मांडली होती. वकिलांचं म्हणणं होतं की बंदराच्या अधिकाऱ्यांनी 'एमव्ही रोसुस' ची तपासणी केली आणि त्याच्या पुढच्या समुद्रप्रवासाववर बंदी घातली होती.
एमवी रोसुसला गळती
या जहाजाचे रशियन कॅप्टन बोरिस प्रोकोशेव आणि आणखी तीन लोक सोडून इतर क्रू मेंबर्सला आपआपल्या देशात परत पाठवून दिलं. थांबवलेले तीन लोक युक्रेनचे होते. बोरिस प्रोकोशेव यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सशी बोलताना सांगितलं की, "जहाजाला गळती लागली होती, तरी जहाज प्रवास करू शकण्याच्या परिस्थितीत होतं."
त्यांनी सांगितलं की जहाजाच्या मालकाने तेव्हा एमवी रोसुसला बैरूतला पाठवण्याचा निर्णय घेतला कारण त्यावेळेस मालक आर्थिक अडचणीत सापडला होता आणि बैरूतमध्ये जहाजावर अवजड मशिनरी अतिरिक्त कार्गो म्हणून चढवायची होती.
पण जहाजाचं चालक दल त्या अतिरक्त सामानाला सुरक्षितरित्या जहाजावर चढवू शकलं नाही, आणि जहाजाचा मालक बंदराचं भाडं देऊ शकला नाही त्यामुळे लेबेनॉनच्या अधिकाऱ्यांनी एमवी रोसुस हे जहाज जप्त केलं.
बैरूतचं कोर्ट
वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार यानंतर काही दिवसांनी या जहाजाच्या मालकाचा जहाजातला इंटरेस्ट गेला आणि त्यांनी या जहाजाला बेवारस सोडून दिलं. यातल्या मालातही मालकाला काही रस नव्हता पण कर्जदारांना मात्र जहाजात अजूनही रस होता.
दरम्यान, चालक दलाचे सदस्य अजूनही जहाजावरच अडकून पडले होते आणि त्यांच्याकडचं खाण्यापिण्याचं सामानही संपत चाललं होतं. वकिलांनी सांगितलं की या प्रकरणी तात्काळ सुनावणी व्हावी म्हणून त्यांनी कोर्टात धाव घेतली.
चालक दलाने कोर्टाला सांगितलं की या जहाजात जे सामान आहे ते धोकादायक आहे त्यामुळे त्यांना आपल्या घरी जाण्याची परवानगी देण्यात यावी. कोर्टाने चालक दलाची बाजू मान्य केली आणि त्यांना या जहाजावरून उतरण्याची परवानगी दिली.
वेअर हाऊस नंबर 12
साल 2014 मध्ये बंदराच्या अधिकाऱ्यांनी जहाजातलं अमोनियम नायट्रेट काढून वेअर हाऊन नंबर 12 या गोदामात ठेवलं. या गोदामाच्या शेजारीच धान्याचं मोठं गोदाम होतं. वकिलांचं म्हणणं होतं की या कार्गोचा लिलाव करून ते विकून टाकणं अपेक्षित होतं.
'एमवी रोसुस' या जहाजाचे कॅप्टन बोरिस प्रोकोशेव म्हणतात, "तो कार्गो अतिशय स्फोटक होता. जे लोक बैरूतमधल्या स्फोटात मृत्युमुखी पडले किंवा जे जखमी झाले त्यांच्याबद्दल मला खूप वाईट वाटतंय. पण लेबननच्या स्थानिक अधिकाऱ्यांना याची शिक्षा दिली पाहिजे. त्यांना या कार्गोची अजिबात काळजी नव्हती."
दुसरीकडे या बंदराचे महाप्रबंधक हसन कोरेटेम आणि लेबननच्या कस्टम विभागाचे महानिदेशक बादरी दाहेर दोघांनीही म्हटलंय की त्यांनी आणि इतर अधिकाऱ्यांनी न्यायपालिकेला अमोनियम नायट्रेटच्या धोक्यांबद्दल सांगितलं होतं आणि हा साठा तिथून हलवण्याची किती गरज आहे हेही सांगितलं होतं.
इंटरनेटवर शेअर केल्या जाणाऱ्या कागदपत्रांनुसार कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैरूतच्या एका न्यायाधीशांना 2014 ते 2017 या काळात किमान 6 वेळा पत्र लिहून या केसची ताबडतोब सुनावणी करा अशी विनंती केली होती. त्यांनी न्यायाधीशांकडे या अमोनियम नायट्रेटची विक्री कशी करावी किंवा हा साठा कसा हलवावा, याचं पुढे काय करावं याबद्दलही सल्ला मागितला होता.
राष्ट्रपती मिशेल आउन यांचं वचन
हसन कोरेटेम यांनी स्थानिक चॅनल ओटीव्हीला सांगितलं की त्यांनी राज्याच्या सुरक्षा विभागालाही अशीच धोक्याची जाणीव करून देणारी चिठ्ठी लिहिली होती.
लेबननचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मायकल नज्जर यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच कार्यभार सांभाळला.
मायकल यांनी अल जझीरा चॅनलला सांगितलं की त्यांना या अमोनियम नायट्रेटबद्दल जुलै महिन्याच्या अखेरीस समजलं होतं. त्यांनी सोमवारी, 3 ऑगस्टला हसन कोरेटेम यांच्याशी याबद्दल चर्चाही केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अमोनियम नायट्रेटच्या साठ्याला आग लागली. यानंतर झालेल्या स्फोटात किमान 137 लोक ठार झालेत, जवळपास 5000 हून जास्त जखमी आहेत तर अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत.
लेबननचे राष्ट्रपती मिशेल आउन यांनी म्हटलंय की 'एमवी रोसुस' वर असणारा कार्गो हाताळण्यात पूर्णपणे अपयश आलंय आणि यासाठी जे लोक जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
या साठ्याच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या लोकांवर होती त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)