मिशेल ओबामा यांना सौम्य नैराश्य, पॉडकास्टमध्ये दिली कबुली

कोरोना संकट, वर्णद्वेष आणि ट्रंप प्रशासनाचा 'दांभिकपणा' यामुळे आपल्याला नैराश्य आल्याचं अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी म्हटलं आहे. आपण सौम्य स्वरुपाच्या नैराश्याचा सामना करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

'स्वतःला ओळखणं' आणि 'आनंद देणाऱ्या गोष्टी करणं', यातून 'भावनिक चढ-उतार' यशस्वीपणे हाताळता येतात, असंही त्या म्हणाल्या आहेत.

दैनंदिन व्यायाम आणि झोप यांचं रुटीन बिघडल्याचं मिशेल ओबामा यांनी सांगितलं आहे.

त्या म्हणाल्या, "मी कसला तरी खूप विचार करते किंवा मनावर कसला तरी भार असल्यामुळे मला रात्री झोपेतून जाग येते."

मिशेल ओबामा यांनी नुकतंच त्यांचं पॉडकास्ट सुरू केलं आहे. या पॉडकास्टच्या दुसऱ्या भागात त्यांनी अमेरिकी पत्रकार मिशेल नॉरिस यांची मुलाखत घेतली.

या मुलाखतीत स्वतःच्या मानसिक अवस्थेविषयी बोलताना त्या म्हणाल्या, "हा काही खूप चांगला काळ नाही. मी सौम्य नैराश्याचा सामना करत असल्याचं मला जाणवतं."

"केवळ क्वारंटाईनमुळेच नाही तर वर्णद्वेषामुळेसुद्धा. शिवाय दिवसरात्र या प्रशासनाचा कारभार बघणं, त्यांचा दांभिकपणा हे सगळं निराश करणारं आहे."

त्या पुढे असंही म्हणाल्या, "रोज सकाळी उठून कुठेतरी कृष्णवर्णियांचा अपमान केल्याच्या, त्यांना जखमी केल्याच्या, ठार केल्याच्या किंवा खोटे आरोप ठेवण्यात आल्याच्या बातम्या बघणं थकवणारं आहे."

"या सगळ्यांचा एकप्रकारचा भार मला जाणवतो. जो मी यापूर्वी कधीही अनुभवला नव्हता."

मात्र, "वेळेचं नियोजन" ही या सगळ्या भावना नियंत्रणात ठेवण्याची गुरुकिल्ली असल्याचं त्या म्हणाल्या.

त्यामुळे कोरोनासारख्या जागतिक संकटाच्या काळात दिनक्रम कायम ठेवणं, आपल्यासाठी अधिक गरजेचं बनल्याचं त्यांनी सांगितलं.

पॉडकास्टच्या आपल्या पहिल्या भागात मिशेल ओबामा यांनी त्यांचे पती आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांची मुलाखत घेतली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)