मिशेल ओबामा : 'गर्भपात झाला म्हणून IVFने मुलींना जन्म दिला'

अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांचं आत्मचरित्र वाचकांच्या भेटीला येत आहे. पुस्तकात त्यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्यातल्या आणि मुलं होण्यात आलेल्या अडचणींविषयीही लिहिलं आहे.

'Becoming' असं या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकात स्वतःच्या गर्भपातावर सविस्तर लिहिलं आहे. गर्भपातामुळे मलिया आणि साशा या दोन्ही मुलींच्या जन्मासाठी आयव्हीएफ (In Vitro Fertilisation) उपचार पद्धतीची मदत घ्यावी लागली होती, असा खुलासा मिशेल ओबामा यांनी केला आहे.

20 वर्षांपूर्वी जेव्हा गर्भपात झाला होता त्यानंतर आपल्याला 'हरवून गेल्यासारखं आणि खूप एकटं' वाटायला लागलं होतं, असं मिशेल ओबामा यांनी ABC न्यूज चॅनलच्या Good Morning America या कार्यक्रमात बोलताना सांगितलं.

शिवाय 'माझ्या कुटुंबाची सुरक्षा धोक्यात आणल्याचं' म्हणत त्यांनी अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीकाही केली आहे.

मिशेल ओबामा आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा या दोघांनी त्यांचं लग्नं टिकवण्यासाठी 'कपल थेरपी' म्हणजेच समुपदेशन घेतलं होतं. स्वतः मिशेल ओबामा यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून पहिल्यांदाच ही बाब उघड केली आहे. 426 पानांचं हे पुस्तक येत्या मंगळवारी प्रकाशित होणार आहे.

या पुस्तक प्रकाशनानंतर मिशेल ओबामा लंडनसह दहा शहरांचा दौरा करणार आहेत.

गरोदरपणाविषयी

माजी वकील आणि हॉस्पिटल प्रशासक असलेल्या मिशेल ओबामा यांनी अमेरिकेच्या ABC न्यूज चॅनलला मुलाखत दिली आहे. गर्भपाताविषयी सांगताना त्या म्हणाल्या, "मला वाटलं होत मी अपयशी ठरले. कारण गर्भपात किती सामान्य बाब आहे, हे मला माहितीच नव्हतं. याबद्दल आपण बोलतच नाही."

"आपण आपल्याच दुःखात असतो. मात्र गर्भपात होतात, हे नव्याने आई होणाऱ्या तरुणींना सांगितलं पाहिजे. ते महत्त्वाचं आहे."

त्या म्हणाल्या, "34 वर्षांची झाले होते. आपलं जैविक घड्याळ बरोबर असतं. त्यामुळे बिजांडांची निर्मिती मर्यादितच असते, याची जाणीव झाली होती. त्यामुळे आई होण्यासाठी इन-व्हिट्रो फर्टिलायझेशनची (IVF) मदत घेण्याचा निर्णय घेतला."

ABCच्या Good Morning America कार्यक्रमात सूत्रसंचालक रॉबिन रॉबर्टशी बोलताना त्या म्हणाला, "एक स्त्री म्हणून आपण एकमेकींशी आपल्या शरीराविषयी आणि शरीराच काम कसं चालतं यावर बोलत नाही. हे सर्वांत वाईट आहे."

लग्नाविषयी

स्वतःच्या वैवाहिक आयुष्यात काहीवेळा अडचणी आल्याचा खुलासाही त्यांनी केला. "बराक राजकारणात सक्रीय झाले त्यावेळी मला एकटीलाच घरी आयव्हीएफचे इन्जेक्शन्स घ्यावी लागायची. तो काळ दोघांच्या नात्यातला फार नाजूक काळ होता," असं त्यांनी सांगितलं.

त्यांनी ABC शी बोलताना सांगितलं, "मॅरेज काउंसिलिंग हा आम्हा दोघांमधले मतभेद कसे दूर करावे, हे शिकण्याचा एक मार्ग होता."

"अडचणींचा सामना करणाऱ्या आणि नात्यात काहीतरी चुकीचं घडतंय, असं वाटणारी अनेक तरुण विवाहित जोडपी मला माहीत आहेत. पण एकमेकांच्या आकंठ प्रेमात असलेल्या मिशेल आणि बराक यांनीही वैवाहिक जीवनातल्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केले होते, हे त्यांना कळावं, असं मला वाटतं," असं त्या म्हणाल्या.

"आणि जेव्हा गरज होती तेव्हा आमच्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही योग्य मदतही घेतली," असंही त्यांनी सांगितलं.

शिकागोमध्ये उन्हाळ्याच्या एका रात्री बराक ओबामांच्या प्रेमात पडल्याची आठवणही त्यांनी नमूद केली आहे.

त्या लिहितात, "बराक ओबामांना स्वीकारण्याचा निर्णय मी केला तेव्हा क्षणार्धात माझ्या मनात ओढ, कृतज्ञता, आश्चर्य अशा भावनांची गर्दी झाली."

ट्रंप यांच्याविषयी

Becoming या आपल्या जीवनचरित्रात मिशेल ओबामा यांनी ट्रंप यांच्यावर उघडपणे टीका केली आहे. पती बराक यांचा जन्म अमेरिकेत झालेला नाही, असा प्रचार करून वाद निर्माण करणाऱ्या व्यक्तीला कधीही माफ करणार नाही, असं त्या म्हणाल्या.

त्या लिहितात, "हा सगळा प्रकार फारच मूर्खपणाचा आणि खालच्या पातळीचा होता. यातून त्यांची कट्टरता आणि परदेशी लोकांबद्दल वाटणारा तिरस्कारच दिसून येतो."

"एखादा माथेफिरू बंदूक घेऊन वॉशिंग्टनकडे निघाला असता तर काय झालं असतं? त्याने आमच्या मुलींचं काही बरंवाईट केलं असतं तर? डोनाल्ड ट्रंप यांच्या या कर्कश आणि अविवेकी वक्तव्यांमुळे माझ्या कुटुंबाची सुरक्षाच धोक्यात आली होती आणि यासाठी मी त्यांना कधीच माफ करणार नाही."

ट्रंप यांच्या निवडणूक विजयाने धक्का बसल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, वॉशिंग्टनहून पॅरिसला निघण्यापूर्वी शुक्रवारी ट्रंप यांनी मिशेल ओबामा यांच्या या पुस्तकावर टिप्पणी केली.

ते म्हणाले, "हे पुस्तक लिहिण्यासाठी मिशेल ओबामा यांना भरमसाठा पैसा मिळाला आहे. तुम्ही वाद निर्माण करा आम्ही त्याची परतफेड करू, असं त्यांचं नेहमीच म्हणणं राहिलेलं आहे."

बराक ओबामा यांना उद्देशून ट्रम्प म्हणाले, "अमेरिकेच्या सैन्याला पुरेसा निधी न देऊन त्यांनी आपल्या सैन्याला जी वागणूक दिली आहे, त्याबद्दल मी त्यांना कधी माफ करणार नाही. सैन्याप्रति त्यांनी जे केलं, त्यामुळे हा देश खूपच असुरक्षित झाला आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)