You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'जियो पारशी'ने कसा वाढतो आहे पारशी समाजाचा जन्मदर
- Author, झुबैर अहमद
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारतातील पारशी समाजाचा जन्मदर इतका घटला आहे की भविष्यकाळात हा समाज नष्ट होईल की काय, अशी भीती एकेकाळी निर्माण झाली होती.
पण केंद्र सरकारने 2014 मध्ये सुरू केलेल्या 'जियो पारशी' मोहीमेनंतर आता परिस्थिती बदलत असल्याचं आशादायी चित्र आहे. या मोहीमेसाठी सरकारवर टीकाही झाली होती. पण नक्कीच या मोहिमेनंतर पारशींच्या जन्मदरात वाढ झाली आहे.
45 वर्षांच्या पारूल गरोदर आहेत. त्यांना मूल व्हावं अशी इच्छा अनेक वर्षांपासून होती. आता त्यांनी जुळं होणार आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
"जेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही आई होणार आहात तेव्हा तर मी आनंदी झालेच होते," पारूल सांगतात
"पण लगेच ते म्हणाले, 'तुम्हाला जुळं होणार आहे'. तेव्हा तर मला इतका आनंद झाला की मी डॉक्टरांनाच कडकडून मिठी मारली. ते म्हणतात ना, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन, अशी माझी स्थिती झाली होती."
असपी आणि पारूल यांचं लग्न उशिरा झालं होतं. त्यामुळे पालक होण्याच्या दृष्टीने ते फार गैरसोयीचं ठरलं होतं. पण जियो पारशी या मोहिमेमुळं त्यांच्या पालक होण्याच्या आशा पल्लवित झाल्या.
"IVF साठी आमच्याकडे पैसे नव्हते. 'जियो पारशी' या मोहिमेअंतर्गत आमचा खर्च रुग्णालयानेच उचलला," असं असपी म्हणतात.
फेरेदिह दोतीवाला एकाच मुलावर समाधानी होत्या. एके दिवशी पेपर वाचत असताना त्यांना या मोहिमेबद्दल कळलं आणि त्यांनी पुन्हा आई होण्याचा निर्णय घेतला.
आता त्यांना दोन मुलं आहेत.
काय आहे जियो पारशी मोहीम?
पारशी लोकांचा कमी जन्मदर पाहून केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती. या मोहिमेअंतर्गत पारशी दांपत्याला पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळते. यामध्ये उपचाराचा खर्च किंवा IVFचा खर्च सरकार उचलते.
तसंच पारशी समाजातील लोकांनी जास्तीत जास्त मुलं होऊ देण्याकडे आपला कल ठेवावा, असं देखील जाहिरातींद्वारे सांगितलं जातं.
कोण आहेत पारशी?
पहिल्या सहस्त्रकाच्या शेवटच्या काळात झोरोस्ट्रियन धर्मियांवर इराणमध्ये हल्ले होऊ लागले होते. त्यानंतर हा समाज भारतात आला आणि गुजरातमध्ये स्थायिक झाला.
भारतामध्ये झोरोस्ट्रियन पारशी म्हणून ओळखले जातात. त्यांची मातृभाषा गुजराती. ते आपल्या धर्माचं काटेकोरपणे पालन करतात.
आतापर्यंत झोरोस्ट्रियन लोकांची संख्या कधीच दोन लाखांच्या वर गेली नाही, असं या समाजातील काही लोक म्हणतात.
पण या समाजातील अनेक लोकांची नावं भारतात घराघरात पोहोचली आहेत. रतन टाटा, जमशेदजी टाटा, होमी जहांगीर भाभा, फिल्ड मार्शल मानेकशॉ या सर्वांचं भारताच्या जडण-घडणीत मोठं योगदान आहे.
हा समाज आता नष्ट होतो की काय, अशी भीती वाटत आहे. कारण त्यांची आज लोकसंख्या केवळ 56,000 आहे.
बहुसंख्य लोक मुंबईत राहतात. 2011 च्या जनगणनेनुसार समाजाचा मृत्यूदर 800 आहे तर जन्मदर 200 इतका आहे.
जियो पारशी मोहीमेनंतर हा आकडा दरवर्षी 240 झाला आहे.
जितकं कौतुक तितकी टीकाही?
ही मोहीम सुरू झाल्यापासून तीन वर्षांमध्ये 110 मुलांचा जन्म झाला आहे. सरकारचं उद्दिष्ट 200 मुलांचं होतं. त्यामुळे ही योजना फसली, असं काही टीकाकार म्हणत आहेत.
या योजनेवर टीका करणाऱ्या ब्लॉगर सिमीन पटेल म्हणतात, "ज्यांची आई पारशी आहे आणि वडील पारशी नाहीत, त्यांची पारशींमध्ये गणनाच होत नाही. जर त्यांची गणना जर आपण पारशींमध्ये केली तर लोकसंख्या आपोआपच वाढेल."
पण या मोहिमेत सक्रिय असलेल्या शेरनाज कामा यांचं म्हणणं वेगळं आहे - "ही मोहिम यशस्वी झाली आहे. ही मोहीम सुरू झाल्यापासून जन्मदर 18 टक्क्यांनी वाढला आहे. ही बाब उल्लेखनीय नाही का?"
मोहिमेच्या जाहिराती या सर्वसमावेशक नसल्याचंही सिमीन पटेल सांगतात.
"जर या जाहिरातींमुळे चर्चेला सुरुवात झाली असेल तर या जाहिरातींचा उद्देश सफल झाला, असं म्हणता येईल," असं या जाहिरातींचे निर्माते सॅम बलसारा यांचं म्हणणं आहे. बलसारा हे देखील पारशी आहेत.
"अनेक वर्षांच्या सुस्तीनंतर हा समाज जागा झाला आहे," असं ते म्हणतात.
"पारशी समाजाचं वेगळं अस्तित्व आहे. या बाहेर येण्याचा समाज कसोशीनं प्रयत्न करत आहे. ही गोष्ट जाहिरातींमुळे साध्य होत असेल तर जाहिरात यशस्वी झाली असं आपण म्हणू शकतो," असं बलसारा म्हणतात.
यासोबतच समाजात जागरूकता निर्माण व्हावी, म्हणून अनेक कार्यक्रम होत असतात. पण या कार्यक्रमांचा खरा उद्देश हा वधु-वर परिचय हाच असतो, अशी टीका सिमीन करतात.
पण जियो पारशीमुळे जन्मदर 18 टक्क्यांनी वाढला आहे, हे मात्र या मोहिमेचे इतर विरोधकही स्वीकारतात.
आज-काल या कार्यक्रमांना छोट्या मुलांचीही हजेरी असते. तर आई-बाबा होण्याची इच्छा असलेल्या जोडप्यांचीही उपस्थिती या ठिकाणी असते. इथं ते आपल्या शंका जियो पारशीच्या स्वयंसेवकांना विचारतात.
ही योजना भविष्यात देखील चालू राहावी, कारण हिचा फायदा भविष्यात नक्कीच मिळेल, असा विश्वास जियो पारशीच्या स्वयंसेवकांना वाटतो.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)