You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बीएचयूमधून राष्ट्रवाद हद्दपार होऊ देणार नाही : कुलगुरू
- Author, समीरात्मज मिश्र
- Role, बीबीसी प्रतिनिधी
दिल्ली आणि अलाहाबादमधली काही समाजकंटक बनारस हिंदू विद्यापीठाचं वातावरण दूषित करत आहेत, असं बीएचयूचे कुलगुरू प्राध्यापक गिरीश चंद्र त्रिपाठी यांचं म्हणणं आहे.
शनिवारी रात्री बनारस हिंदू विद्यापीठ म्हणजेच बीएचयूच्या कॅम्पसमध्ये जी पोलीस कारवाई झाली त्याला हिच मंडळी जबाबदार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
बीबीसीला त्यांनी विशेष मुलाखत दिली. त्यावेळी बोलताना ''बीएचयूच्या विद्यार्थ्यांचा मला विरोध असू शकतो, माझे विचारही त्यांना मान्य नसू शकतात. पण, पंडित मदन मोहन मालवीय आणि विद्यापीठाबद्दल ते कधीच वाईट विचार करू शकत नाहीत.''
बाहेरील मंडळी येऊन विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थिनींना भडकावत आहेत. जेव्हा मी त्यांची भेट घ्यायला गेलो तेव्हा त्यांनी माझ्यावर दगडफेक केली. असं त्यांनी सांगितलं.
गेल्या दोन दिवसांपासून विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर धरणं आंदोलन देत असलेल्या विद्यार्थिनींना पोलिसांनी जबरदस्तीनं हटवल्याचा आणि लाठीचार्ज केल्याचा आरोप केला जात आहे.
विद्यार्थिनींचा कुलगुरूंना सवाल
कुलगुरू अजून आमची भेट घ्यायला का आले नाहीत? असा सवाल आंदोलनकर्त्या विद्यार्थिनींनी केला आहे.
यासंदर्भात त्रिपाठी सांगतात, ''मला विद्यार्थिनींना भेटायला काहीच अडचण नाही. मी या आधीच काही जणींना भेटलो आहे. त्यांनी आपल्या वागण्याबाबत पश्चाताप सुद्धा व्यक्त केला होता. शनिवारी रात्रीसुद्धा मी त्यांना भेटायला चाललो होतो. पण, काही समाजकंटकांनी वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न केला.''
ते पुढे सांगतात, ''यामुळेच विद्यार्थ्यांच्या खोल्यांची तपासणी करण्यात आली. त्यात पोलिंसानी कडकपणा दाखवून विद्यार्थ्यांना त्रास दिला असू शकतो. त्याच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. तिचा अहवाल एका आठवड्यात येईल.''
सुटीवरून संभ्रम
या दरम्यान विद्यापीठात तणावाचं वातावरण आहे. विद्यार्थिनी त्यांचं सामान घेवून घरी जात आहेत. तर विद्यार्थी हॉस्टेलच्या बाहेर घोषणाबाजी करत आहेत.
विद्यापीठाला 2 ऑक्टोबरपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसंच विद्यार्थ्यांना रविवार रात्रीपर्यंत हॉस्टेल खाली करण्याचं सांगण्यात आल्याची चर्चा आहे.
त्रिपाठींनी हे वृत्त फेटाळलं आहे. असा कुठलाही आदेश दिला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच दसऱ्याच्या सुट्या एक दिवस आधी सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
विद्यापीठात सक्रिय असलेल्या कथित समाजकंटकांबाबत विचारल्यावर त्रिपाठी म्हणाले,
''व्हीडिओ फुटेजमध्ये अलाहाबादच्या विद्यार्थिनी दिसत आहेत. मी त्यांना ओळखतो. त्या तिकडे पण आंदोलनं करत असतात. आता त्या इथे आल्या आहेत. तसंच दिल्लीतून आलेले काही विशिष्ट विचारधारेचे लोक वातावरण बिघडवत आहेत.''
विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा एक समूह "बीएचयूला जेएनयू होऊ देणार नाही" अशा घोषणा देत होते. त्याच्याशी त्रिपाठी सहमत आहेत.
'बीएचयू राष्ट्रवादी मूल्य रुजवते'
त्रिपाठी म्हणतात, ''जेएनयू त्यांच्या शैक्षणिक दर्जापेक्षा विशिष्ट विचारधारेच्या लोकांमुळे ओळखलं जातं. ज्यांच्यासाठी देश फक्त एक भौगोलिक परिसर आहे. पण, त्याचवेळी बीएचयू विद्यार्थांमध्ये राष्ट्रवादी मूल्य रूजवत आहे. ही परंपरा आम्ही कुठल्याही परिस्थितीत खंडित होऊ देणार नाही.''
पीडित विद्यार्थिनी त्यांच्याबाबत कुठलीही तक्रार नसल्याचं त्रिपाठी सांगतात. तसंच त्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याच आश्वासन तिला दिलं आहे.
वाराणसीमध्ये 21 सप्टेंबरला एका विद्यार्थिनीची कथित छेड काढण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थिनींनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर दोन दिवस धरणं आंदोलन केलं. ज्यांच्यावर शनिवारी रात्री लाठीचार्ज करण्यात आला होता.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)