You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इराणने कोरोना व्हायरस मृतांची खरी आकडेवारी का लपवली?
इराण सरकारने कोरोना विषाणूमुळे झालेल्या मृत्यूची संख्या लपवल्याचं बीबीसी फारसी सेवेने केलेल्या तपासात उघड झालं आहे. इराण सरकारने मृतांची जी आकडेवारी दिली प्रत्यक्षात त्यापेक्षा तिप्पट मृत्यू झाल्याचं बीबीसीला मिळालेल्या वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट होतं.
इराण सरकारच्या स्वतःच्या अहवालात 20 जुलैपर्यंत देशात कोरोनासदृष्य लक्षणांमुळे 42 हजार लोकांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाने केवळ 14,405 लोकांचा मृत्यू झाल्याचं इराणच्या आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे.
मृतांच्या आकडेवारीप्रमाणेच कोरोना रुग्णांच्या आकडेवारीतही घोळ आहे. कोरोनाग्रस्तांच्या सरकारी आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष आकडेवारी त्यापेक्षा दुप्पट आहे. इराणमध्ये जवळपास 2 लाख 48 हजार जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे. मात्र, सरकारच्या अहवालात ही संख्या दुप्पट म्हणजे जवळपास 4 लाख 51 हजार एवढी आहे.
कोरोना विषाणूने ज्या देशांमध्ये थैमान घातलं त्यात इराणचाही समावेश आहे. गेल्या काही आठवड्यात इराणमध्ये कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्याने कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
इराणमध्ये फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात पहिला कोरोनारुग्ण आढळला होता. मात्र, बीबीसी फारसी सेवेच्या हाती जी यादी आणि वैद्यकीय अहवाल लागला आला आहे त्यानुसार इराणमध्ये कोव्हिड-19 आजाराने पहिला मृत्यू 22 जानेवारी रोजी झाला होता.
कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यापासूनच अनेकांनी इराण सरकारतर्फे सार्वजनिक करण्यात येत असलेल्या माहितीवर साशंकता व्यक्त केली होती.
राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरच्या आकडेवारीत तफावत आहे. शिवाय संख्याशास्त्रज्ञांनीही आपापली वेगवेगळी आकडेवारी दिली आहे.
टेस्टिंगच्या मर्यादा बघता संपूर्ण जगभरातच कोरोनाग्रस्तांची संख्या वास्तविक संख्येपेक्षा कमीच आहे. मात्र, बीबीसीला मिळालेल्या माहितीवरून हे स्पष्ट होतं की इराण सरकारकडे मृतांची संपूर्ण आकडेवारी उपलब्ध असूनही त्यांनी कोरोनाग्रस्तांची दररोज प्रसारित होणारी आकडेवारी कमी सांगितली. याचाच अर्थ जाणिवपूर्वक कमी आकडेवारी सांगण्यात आली.
अहवाल कुठून मिळाला?
इराण सरकारमधल्या एका सूत्राने नाव उघड न करण्याच्या अटीवर हा वैद्यकीय अहवाल बीबीसी फारसी सेवेला दिला आहे.
यात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या सर्व रुग्णांचा संपूर्ण तपशील आहे. यात रुग्णाचं नाव, वय, लिंग, लक्षणं, हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची तारीख, किती दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले, रुग्णाला पूर्वीच एखादा आजार होता का, असा सर्व तपशील आहे.
'सत्य सर्वांसमोर यावं' आणि 'जागतिक आरोग्य संकटावरून सुरू असलेलं राजकारण थांबावं', या हेतूने हा अहवाल देत असल्याचं सूत्राने बीबीसीला सांगितलं.
कोरोनामुळे झालेले प्रत्यक्ष मृत्यू आणि सरकारी आकडेवारी यातलं अंतर आणि जूनच्या मध्यापर्यंत इराणमध्ये झालेले अतिरिक्त मृत्यू (excess mortality) ही दोन्ही आकडेवारी सारखीच आहे.
अतिरिक्त मृत्यू किंवा एक्सेस मॉरटॅलिटी म्हणजे सर्वसामान्यपणे जेवढे मृत्यू होणं अपेक्षित असतं त्यापेक्षा जास्त मृत्यू.
अहवाल काय सांगतो?
कोरोना संसर्गामुळे इराणमध्ये सर्वाधिक मृत्यू राजधानी तेहरानमध्ये झाले आहेत. तेहरानमध्ये कोव्हिड-19 किंवा तत्सम लक्षणं असणाऱ्या मृतांची संख्या आहे 8,120.
तर इराणमध्ये कोरोनाचं केंद्रबिंदू असणाऱ्या क्योम शहरात दर 1000 लोकांमागे 1 मृत्यू झाला आहे. क्योममधल्या मृतांची एकूण संख्या 1,419 इतकी आहे.
- वाचा - युरेका! कोरोनावर प्रभावी औषध सापडलं, डेक्सामेथासोनकडून WHO ला पण आशा
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
विशेष म्हणजे इराणमध्ये जवळपास 1900 बिगर-इराणी लोकांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानसारख्या शेजारील राष्ट्रातून आलेल्या शरणार्थींच्या मृत्यूच्या संख्येतही घोळ असल्याचं दिसतं.
बीबीसीच्या हाती लागलेल्या अहवालानुसार कोरोना संकटाच्या उद्रेकाच्या सुरुवातीच्या दिवसात आरोग्य मंत्रालयाने मृतांची जी आकेडवारी जाहीर केली होती त्यापेक्षा कितीतरी जास्त मृत्यू झाले होते. मार्चच्या मध्यापर्यंत तर सरकारी आकडेवारीपेक्षा पाचपट अधिक मृत्यू झाल्याचं अहवालावरून स्पष्ट होतं.
मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात नवरोज या इराणी नववर्षाच्या निमित्ताने इराणमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यानंतर कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत घसरण झाली.
मात्र, मे महिन्याच्या शेवटी-शेवटी लॉकडाऊन उठवल्यानंतर कोरोनाग्रस्त आणि मृतांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली.
यात सर्वांत महत्त्वाचं म्हणजे इराणमध्ये पहिला कोरोनाबाधित आढळल्याचं जेव्हा सरकारने जाहीर केलं त्याच्या तब्बल महिनाभर आधीच म्हणजेच 22 जानेवारीलाच कोरोनामुळे पहिला मृत्यू झाल्याची नोंद या अहवालात आहे.
इराणमध्ये कोरोना विषाणू दाखल होऊन संसर्ग फैलावत असल्याचं इराणचे पत्रकार सांगत होते आणि वैद्यकीय तज्ज्ञही धोक्याचा इशारा देत होतं. मात्र, त्यावेळी आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी इराणमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचं मान्य करायला तयार नव्हते.
28 फेब्रुवारीला अधिकाऱ्यांनी इराणमध्ये पहिला कोरोनाग्रस्त आढळल्याचं जाहीर केलं. मात्र, प्रत्यक्षात तोवर इराणमध्ये 52 जणांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला होता.
कोण होते व्हिसलब्लोअर्स?
बीबीसीशी बोलताना या विषयाची थेट माहिती असणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की इराणमधल्या सुरक्षा आणि गुप्तचर विभागाचा सरकारच्या आरोग्य मंत्रालयावर प्रचंड दबाव होता.
डॉ. पौलादी (बदललेलं नाव) यांनी बीबीसीला सांगितलं, "मंत्रालय मान्य करायलाच तयार नव्हतं. सुरुवातीला त्यांच्याकडे टेस्टिंग किट्स नव्हते आणि जेव्हा किट्स उपलब्ध झाले तेव्हा त्यांचा व्यापक वापर करण्यात आला नाही. इराणमध्ये कोरोना विषाणू नाही, अशीच सुरक्षा यंत्रणांची भूमिका होती."
क्योममधल्या दोन डॉक्टर बंधूंच्या प्रयत्नांचं यश आहे की इराणच्या आरोग्य मंत्रालयाने पहिल्या कोरोनारुग्णाची अधिकृत नोंद केली.
डॉ. मोहम्मद मोलाई आणि डॉ. अली मोलाई यांच्या तिसऱ्या भावाचा मृत्यू झाला. तेव्हा त्यांची कोरोना चाचणी घेण्यात यावी, यासाठी या दोघांनी आग्रह धरला. अखेर मृतदेहाची कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचं कळलं.
ज्या कामकर हॉस्पिटलमध्ये या डॉक्टरांचे भाऊ भर्ती होते त्या हॉस्पिटलमध्ये भर्ती असणाऱ्या इतर अनेक रुग्णांना तशीच लक्षणं होती. सामान्य उपचारांना ते रुग्ण प्रतिसाद देत नव्हते. मात्र, तरीही त्या रुग्णांची कधीच कोरोना चाचणी घेण्यात आली नाही.
डॉ. मोलाई यांनी आपल्या दिवंगत भावाचा एक व्हीडियो जारी केला. यात त्यांनी आपल्या भावाच्या आजाराविषयी माहिती दिली होती. त्यानंतर अखेर आरोग्य मंत्रालयाने पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद केली.
मात्र, तरीही सरकारी न्यूज चॅनलवरून डॉ. मोलाई यांच्यावर टीका करण्यात आली. डॉ. मोलाई यांचा व्हीडियो महिनाभरापूर्वीचा होता, अशी खोटी बातमी प्रसारित करण्यात आली.
लपवाछपवी कशासाठी?
1979 साली झालेल्या इस्लामिक क्रांतीचा वर्धापनदिन आणि संसदीय निवडणुकीच्या ऐन तोंडावर इराणमध्ये कोरोना दाखल झाला.
मात्र, त्याआधीच इराण अनेक संकटांचा सामना करत होता. 2018 साली अमेरिकेने अणूकरारातून काढता पाय घेत इराणवर आर्थिक निर्बंध लादले. त्यानंतर जनरल कासिम सुलेमानी यांचा मृत्यू. त्यानतंर युक्रेनच्या विमानावरचा क्षेपणास्त्र हल्ला, या सर्वांमुळे इराणची प्रतिमा मलिन झाली होती. डागाळलेली प्रतिमा पुसण्याची संधी संसदीय निवडणुकीच्या निमित्ताने इराणला मिळाली होती.
मात्र, कोरोना विषाणूमुळे ही संधी हिरावली जाण्याची भीती होती आणि म्हणूनच निवडणुकीत अडथळे आणण्यासाठी काही जण कोरोना विषाणूचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी यांनी केला.
या सर्व घडामोडींमध्ये इराणच्या सार्वत्रिक निवडणुकीत खूप कमी मतदान झालं.
जगात कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक होण्याआधीपासूनच इराण अनेक अंतर्गत संकटाचा सामना करत होता.
नोव्हेंबर 2019 मध्ये सरकारने एका रात्रीत पेट्रोलचे दर वाढवले. या दरवाढीविरोधात सुरू झालेली निदर्शनं सरकारने बळाचा वापर करत मोडून काढली. काही दिवसातच शेकडो निदर्शक मारले गेले.
जानेवारीमध्ये इराणचे सर्वोच्च जनरल कासिम सुलेमानी यांचा अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाला. अयातुल्ला खामेनी यांच्यानंतर कासूम सुलेमानी इराणचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च नेते होते. या घटनेनंतर इराणमध्ये खदखद होती.
यानंतर हाय अलर्टवर असलेल्या इराणच्या लष्करी दलाने चुकून युक्रेनच्या एका विमानावर क्षेपणास्त्र हल्ला केला. तेहरान विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच हा हल्ला झाला. यात विमानातल्या सर्वच्या सर्व 176 जणांचा मृत्यू झाला होता.
सुरुवातीला इराणी अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, जागतिक दबावामुळे अखेर तीन दिवसांनंतर इराणने चुकून विमान पाडल्याची कबुली दिली. या घटनेमुळे संपूर्ण जगात इराणची प्रतिमा मलिन झाली होती.
या सर्व पार्श्वभूमीवर जेव्हा कोरोना विषाणूचा इराणमध्ये उद्रेक झाला तेव्हा सरकारला 'वास्तवाची चिंता आणि भीती वाटत होती', असं इराणचे माजी मंत्री डॉ. नौरोलदिन पिरमोझेन यांनी सांगितलं.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "गरीब आणि बेरोजगार लोक रस्तावर उतरतील, अशी भीती सरकारला वाटत होती."
डॉ. पौलादी म्हणतात, "ज्यांच्यामुळे आज देशाची ही परिस्थिती आहे त्यांना काहीच किंमत चुकवावी लागत नाही. या देशाची गरीब जनता आणि माझे गरीब रुग्ण आपले प्राण देऊन त्याची किंमत चुकवत आहेत."
ते पुढे म्हणतात, "इराण आणि अमेरिका या दोन सरकारांमधल्या संघर्षात दोन्ही बाजूने आम्ही भरडले जात आहोत."
मात्र, इराणमधले कोरोनारुग्ण आणि कोरोनामुळे झालेले मृत्यू यांची जी यादी जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात आली आहे ती पूर्णपणे पारदर्शक असल्याचं इराणच्या आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)