केपी शर्मा ओली : राम आणि अयोध्येच्या वक्तव्यावरून नेपाळमध्येच वादात अडकले

फोटो स्रोत, Hindustan Times
रामाचा जन्म नेपाळमध्ये झाला होता या नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
सरकारी निवासस्थानी कवी भानुभक्त यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारत आणि नेपाळचे संबंध ताणलेल्या स्थितीत असताना ओली यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
खरी अयोध्या नेपाळमधल्या बीरगंज गावाजवळ आहे, तिथेच रामाचा जन्म झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
नेपाळमधील राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीचे नेते कमल थापा यांनी केपी ओली शर्मा यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे.
"पंतप्रधान पदावरील व्यक्तीने अशा पद्धतीने आधारहीन आणि अप्रमाणित गोष्टींवर वक्तव्य देणं उचित नाही. भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध आणखी बिघडावेत असं ओली यांना वाटत असावं. तणाव कमी करण्याऐवजी ते वाढवत आहेत," असं ते म्हणाले

- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

नेपाळमध्ये काहीजण केपी शर्मा ओली यांच्या वक्तव्याला पाठिंबा देत आहेत. मात्र या वक्तव्याचा अनेकांनी समाचार घेतला आहे.
नेपाळचे माजी पंतप्रधान बाबू राम भट्टाराई यांनी ओली यांच्या बोलण्यावर उपरोधात्मक टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, आदि कवी ओली द्वारा रचित कलियुगातील रामायण ऐका, थेट वैकुंठधामच्या प्रवासाला निघा.
नेपाळमधील लेखक आणि माजी परराष्ट्र मंत्री रमेश नाथ पांडे यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, धर्म हा राजकारण आणि डावपेच यापेक्षा अव्वल आहे. हा भावनाप्रधान विषय आहे. अशा वक्तव्यांनी तुम्हाला लाजिरवाणं वाटू शकतं. खरी अयोध्या बीरगंज आहे मग शरयू नदी कुठे आहे? असा सवाल त्यांनी केला आहे.

फोटो स्रोत, Reuters
ओली यांच्या वक्तव्याने चकित झालेले त्यांचेच माजी प्रसारमाध्यम सल्लागार आणि नेपाळमधल्या त्रिभुवन विद्यापीठाचे प्राध्यापक कुंदन आर्यल यांनीही ट्वीट केलं आहे. ते म्हणतात, ओली हे काय बोलून बसले? भारतीय चॅनेल्सशी त्यांची स्पर्धा आहे का?
नेपाळ कम्युनिस्ट पार्टीचे (माओवादी) उपप्रमुख बिष्णू रिजल यांनी लिहिलं की, एखादी व्यक्ती अप्रमाणिक, पौराणिक आणि वादग्रस्त गोष्टी सांगून विद्वान होते असं म्हणणं म्हणजे एक भ्रम आहे. ओली यांचं वक्तव्य केवळ दुर्देवीच नव्हे तर रहस्यमयही आहे. आगीत तेल पडेल अशी रीतीने ते रोज अशी वक्तव्यं करत आहेत.
नेपाळमधील ज्येष्ठ पत्रकार अमित ढकाल यांनी ओली शर्मा यांच्यावर टीता केली आहे. श्रीलंका नेपाळमधील कोशी या ठिकाणी आहे. तिथे हनुमान नगरही आहे, जे वानरसेनेनं वसवलं असेल. जेव्हा ते पूल तयार करण्यासाठी एकत्र आले असतील.
नेपाळच्या नॅशनल प्लॅनिंग कमिशनचे माजी उपाध्यक्ष स्वर्णिम वागळे म्हणतात, हे राम! पंतप्रधान ओली यांनी भारतीय प्रसारमाध्यमांना चर्चेसाठी मोठाच विषय पुरवला आहे.

फोटो स्रोत, ISABEL INFANTES
नेपाळमधील प्रसिद्ध लेखक आणि राजकीय घडामोडींचे जाणकार कनक मणि दीक्षित यांनी म्हटलं की, रामाचा जन्म कुठे झाला आणि अयोध्या कुठे आहे अशा पौराणिक गोष्टींवर वादाला तोंड फोडणं हा पंतप्रधान ओला यांच्यासाठी मूर्ख प्रयत्न आहे. भारताच्या मनात नेपाळविषयी कटूता आहे. ओली यांच्या वक्तव्यामुळे इथल्या लोकांमध्येही गट पडू शकतात.
ज्येष्ठ पत्रकार धरुबा एच अधिकारी म्हणतात, ओली यांच्या पक्षाचं नाव आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ. नावात कम्युनिस्ट शब्द आहे. कम्युनिझम म्हणजे साम्यवाद. तो धर्म मानत नाही. ओली यांनी जेव्हा शपथ घेतली होती तेव्हा त्यांनी देवाचं नाव घेण्यास नकार दिला होता. जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनकपूरमध्ये पूजा केली, तेव्हा ओली यांनी केली नाही. मात्र आता ओली यांना राम आणि अयोध्येचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो आहे. अजबच आहे हे सगळं.
भारत-नेपाळ संबंध
गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध ताणलेले आहेत. 20 मे रोजी नेपाळने नवा नकाशा जाहीर केला होता. यामध्ये लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कालापानी हे भाग नेपाळने आपले म्हणून दाखवले होते. हे तिन्ही प्रदेश तूर्तास भारतातच आहेत मात्र नेपाळचा या तिन्ही भागांवर दावा आहे.
या नकाशामुळे दोन्ही देशातील संबंध बिघडले. गेल्या वर्षी जम्मू काश्मीरला दोन केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केल्यानंतर भारताने नवा नकाशा जारी केला होता. या नकाशात हे तिन्ही भाग होते. भारताच्या म्हणण्यानुसार कोणत्याही नव्या भागाला नकाशात दाखवलेलं नाही. हे तिन्ही भाग भारतातच आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय मीडियाच्या वृत्तांकनावरून नेपाळमध्ये वाद निर्माण झाला आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा आणि चीनच्या राजदूत हाऊ यांकी यांच्यासंदर्भात काही भारतीय वृत्तवाहिन्यांनी खळबळजनक वृत्त प्रसारित केलं होतं. ओली यांना हनी ट्रॅपमध्ये फसवण्यात आल्याचं वृत्त काही भारतीय वृत्तवाहिन्यांनी दिलं होतं.

फोटो स्रोत, HOU YANQI/TWITTER
नेपाळने या बातम्यांना आक्षेप घेतला होता. केबल ऑपरेटर्सनी आपली जबाबदारी ओळखून भारतीय वृत्तवाहिन्यांचं प्रसारण थांबवावं असं आवाहन करण्यात आलं होतं.
नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ज्ञावली यांनी नेपाळचे भारतातील राजदूत नीलांबर आचार्य यांना यासंदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे कठोर शब्दांत आक्षेप नोंदवण्याची मागणी केली आहे.
भारतीय प्रसारमाध्यमं नेपाळ-भारत संबंधांमध्ये बाधा आणत असल्याचं नीलांबर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान चिनी राजदूतांच्या वाढत्या सक्रियतेवरून नेपाळमध्येही विरोध सुरू झाला आहे.
देशाच्या अंतर्गत राजकारणात परकीय देशाच्या राजदूताचा सहभाग योग्य नाही अशी भूमिका नेपाळमधील विरोधी पक्ष तसंच प्रसारमाध्यमांनी घेतली आहे. गेल्या दीड महिन्यापासून या घडामोडी सुरू आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








