नेपाळचा काही भारतीय वृत्तवाहिन्यांवर ‘कारवाई’चा इशारा

नेपाळ टीव्ही

फोटो स्रोत, AFP

    • Author, सुरेंद्र फुयाल
    • Role, ज्येष्ठ पत्रकार, काठमांडू, नेपाळ

नेपाळ सरकारनं भारतातल्या काही वृत्त वाहिन्यांविरोधात 'राजकीय आणि कायदेशीर' कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नेपाळ सरकारच्या म्हणण्यानुसार 'बनावट आणि निराधार' वृत्त या वाहिन्या प्रसारित करत आहेत.

गेल्या काही दिवसांत नेपाळमधल्या चिनी राजदूत हाऊ यांकी नेपाळी कम्युनिस्ट पक्ष या सत्ताधारी पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांना भेटत आहेत. या भेटींसंदर्भात भारतीय वृत्तवाहिन्या करत असलेल्या वार्तांकनावरून नेपाळमध्ये संताप व्यक्त होतोय.

भारतीय वृत्तवाहिन्या आपल्या वार्तांकनात या भेटींची थट्टा करत असल्याचं नेपाळ सरकारचं म्हणणं आहे.

दरम्यान, नेपाळी पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह वार्तांकन करत असल्याचं म्हणत गुरुवारी संध्याकाळी नेपाळच्या केबल ऑपरेटर्सने भारतीय वृत्तवाहिन्यांचं प्रसारणही बंद पाडलं.

कोरोना
लाईन

मॅक्स टीव्ही या केबल नेटवर्कचे ऑपरेटर के. ध्रूव शर्मा म्हणाले, "भारतातल्या काही चॅनल्सवर नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि चिनी राजदूत हाऊ यांकी यांच्याबद्दल अवमानकारक माहिती प्रसारित केली जात आहे."

नेपाळ सरकारचा इशारा

भारतीय प्रसार माध्यमांनी असंवेदनशीलपणे वृत्त प्रसारित केल्याने त्यांच्याविरोधात कठोर 'राजकीय आणि कायदेशीर कारवाई' केली जाऊ शकते, असा इशारा नेपाळ सरकारचे प्रवक्ते डॉ. युवराज खतिवडा यांनी दिला आहे. गुरुवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

के. पी. शर्मा ओली

फोटो स्रोत, REUTERS/Denis Balibouse/File Photo

फ्री मीडियावर आपल्या सरकारचा विश्वास असल्याचं सांगत ते पुढे म्हणाले, "सरकारला प्रसार माध्यमांवर कुठलेही निर्बंध घालायचे नाहीत. मात्र, प्रसार माध्यमांनीदेखील शिस्तबद्ध असावं, अशी आमची इच्छा आहे."

भारतीय प्रसार माध्यमातल्या एका गटात नेपाळविषयी नकारात्मक वार्तांकन केलं जात असल्याकडे लक्ष वेधत ते म्हणाले, "परदेशी प्रसार माध्यमात नेपाळचं सार्वभौमत्व, राष्ट्रीय एकता आणि नेपाळी जनतेच्या सन्मानाला धक्का पोहोचवला जात असेल तर नेपाळ ते कधीही सहन करणार नाही."

खतिवडा यांनी कुठल्याही माध्यम समूहाचं नाव घेतलं नाही. मात्र, अशा प्रकारचं वार्तांकन सुरू राहिलं तर नेपाळ सरकारला त्यांना असं करण्यापासून रोखावं लागेल आणि त्यांच्याविरोधात कठोर 'राजकीय आणि डिप्लोमॅटिक' पावलं उचलावी लागतील, असा इशारा त्यांनी दिला.

ते पुढे म्हणाले, "अशा परिस्थितीत सरकारला राजकीय आणि कायदेशीर मार्गं शोधावे लागतील."

नेपाळमधील राजकीय संकट

गुरुवारी संध्याकाळी नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये नेपाळमधल्या चिनी राजदूत हाऊ यांकी यांनी नेपाळी कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष पुष्प कमल दहल प्रचंड यांची भेट घेतली. ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

नेपाळच्या सत्ताधारी नेपाळी कम्युनिस्ट पक्षात (एनसीपी) अंतर्गत मतभेद वाढत असून पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. याच पार्श्वभूमीवर चिनी राजदूत हाऊ यांकी यांनी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली, माजी पंतप्रधान झालानाथ खनाल आणि माधव कुमार नेपाळ यांच्यासह पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांचीही भेट घेतली होती.

नेपाळच्या पंतप्रधानांनी कोव्हिड-19 चा सामना करण्यासाठी उचललेली पावलं आणि लिपुलेख वादानंतर भारतासोबत ताणले गेलेले संबंध या मुद्द्यांवरून नेपाळच्या सत्ताधारी पक्षाच्या स्थायी समितीतल्या बहुतांश सदस्यांनी असमाधान व्यक्त करत पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

आधीच सत्ताधारी पक्षात वाद सुरू होते. त्यात आता आणखी भर पडली आहे. त्यामुळे नेपाळी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षात उभी फूट पडताना दिसत आहे.

हाऊ यांकी, नेपाळमधील चिनी राजदूत

फोटो स्रोत, @PRCAMBNEPAL

ओली यांनी राजीनामा द्यायला स्पष्ट नकार दिलाय. मात्र, त्यानंतर ओली आणि प्रचंड यांच्यात अनौपचारिक चर्चांचं सत्र सुरू झालं. मात्र, या राजकीय संकटातून अजूनतरी कुठलाही मार्ग निघू शकलेला नाही.

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळच्या सीमा भारत आणि चीनला लागून आहेत. त्यामुळे नेपाळमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याचा चीनचा प्रयत्न आहे.

चीनचा प्रयत्न होता की नेपाळमधल्या सर्व कम्युनिस्ट पक्षांनी हातमिळवणी करावी आणि चीनच्या या प्रयत्नांना जवळपास दोन वर्षांपूर्वी मोठं यश मिळालं. तेव्हा नेपाळचे दोन महत्त्वाचे कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी-लेनिनवादी आणि माओवादी या दोघांनी निवडणुकीच्या तोंडावर हातमिळवणी केली आणि संसदेत सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयाला आला.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून चिनी राजदूत हाऊ यांकी यांच्याकडे भारतात साशंकतेने बघितलं जातंय. भारतीय प्रसार माध्यमातल्या काहींनी हाऊ यांकी यांनी नेपाळी कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या घेतलेल्या भेटीची टर उडवली. सोशल मीडियावरही अशा पोस्ट दिसल्या.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

भारतीय प्रसार माध्यमांविषयी चिंता

नेपाळमधले ज्येष्ठ पत्रकार याविषयावर चिंता व्यक्त करतात. त्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या वार्तांकनाचा दोन्ही देशांचे संबंध तसंच नेपाळी आणि भारतीय यांच्यातल्या नात्यावर परिणाम होईल.

नेपाळी पत्रकारांची संघटना असलेल्या नेपाळी पत्रकार महासंघानेही भारतीय प्रसार माध्यमांमध्ये नेपाळमधल्या बातम्यांच्या नकारात्मक वार्तांकनाविषयी गुरुवारी एक निवेदन काढून नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारचं वार्तांकन 'सनसनाटी पत्रकारितेचं उदाहरण' असल्याची कठोर टीका त्यांनी केली.

नेपाळी पत्रकार महासंघाने भारतीय मीडियाला जबाबदारीने वागण्याचं आणि निष्पक्ष राहण्याचं आवाहन करत 'सार्वभौमिक माध्यम स्वातंत्र्याच्या तत्त्वांची थट्टा' करू नये, असंही म्हटलं.

नेपाळच्या पंतप्रधानांचे सल्लागार विष्णू रिमाल म्हणाले, "नेपाळ सरकार आणि नेपाळच्या पंतप्रधानांविरोधात भारतीय प्रसार माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या आणि व्यक्त होणारी मतं आक्षेपार्ह आहेत. आम्ही त्याचा निषेध करतो. अशा बातम्या पत्रकारितेच्या मूलभूत तत्त्वांच्या अनुषंगाने नाहीत."

दुसरीकडे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचे माध्यम सल्लागार सूर्या थापा म्हणाले, "भारतातल्या काही वृत्तवाहिन्यांमध्ये आपल्याविषयी चुकीच्या बातम्या दाखवल्या जात असल्याची पूर्ण कल्पना पंतप्रधान ओली यांना आहे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)