You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चीन खरंच वीगर मुस्लीम महिलांची नसबंदी करतोय का?
चीनच्या शिनजियांग प्रांतात राहणाऱ्या वीगर मुस्लिमांच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी चीन सरकार या समुदायातील महिलांची जबरदस्ती नसबंदी करत असल्याचं किंवा त्यांच्या शरिरात गर्भनिरोधक उपकरण बसवत असल्याचं एका वृत्तात समोर आलं आहे.
चीनविषयक घडामोडींचे तज्ज्ञ अँड्रियान जेंझ यांच्या वृत्तात ही बाब समोर आली असून त्यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पण हे वृत्त बिनबुडाचे असल्याचं सांगत चीनने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
यापूर्वीही वीगर मुस्लिमांना कारागृहात ठेवल्याच्या आरोपावरून चीनवर सातत्याने टीका होत आली आहे. सुमारे दहा लाख वीगर मुस्लीम आणि बहुतांश मुस्लीम अल्पसंख्याक नागरिकांना चीनने बंदीवासात पाठवल्याचं सांगण्यात येतं. पण चीनचं सरकार याला 'रिएज्युकेशन कँप' संबोधतं.
आपल्या देशात पूर्वीपासून अशा प्रकारचं कोणतंही कँप नसल्याचं चीन आधी सांगत होता. पण नंतर कट्टरवादी विचारसरणी थांबवण्यासाठीचं हे एक पाऊल असल्याचं सांगत त्यांनी या कँप्सचं समर्थन केलं.
काय आहे वृत्तामध्ये?
अँड्रियान जेंझ यांची बातमी स्थानिक आकडेवारी, धोरण आणि नियोजनसंबंधित कागदपत्रं तसंच शिनजियांग प्रांतातील अल्पसंख्याक महिलांच्या मुलाखतीवर आधारित आहे.
वीगर मुस्लीम आणि इतर अल्पसंख्याक समुदायातील महिला गर्भपातास नकार देत असल्यास तिला कँपमध्ये नजरकैदेत ठेवण्याची धमकी दिली जाते, असा आरोप या बातमीत करण्यात आला आहे.
शिवाय, ज्या महिलांना चीनमधील कायद्यानुसार दोनपेक्षा कमी अपत्यं होती, त्यांच्या शरिरात युटेराईन डिव्हाईस बसवण्यात आलं होतं. इतर महिलांना नसबंदी करण्यास भाग पाडण्यात आलं.
बातमीनुसार, 2016 वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यांपासून शिनजियांग प्रांतात अत्याचारास सुरुवात झाली. त्यानंतर राज्यात कडक पोलीस यंत्रणा लागू करण्यात आली. राज्यात सर्वत्रच मुलांना जन्म देण्याच्या विषयात सरकारी हस्तक्षेप वाढू लागला.
अँड्रियान जेंझ यांच्या विश्लेषणानुसार, गेल्या काही वर्षांत शिनजियांग प्रांतातील लोकसंख्या नाट्यमयरीत्या कमी होताना दिसत आहे. 2015 ते 2018 दरम्यान वीगरबहुल प्रांतातील लोकसंख्या वाढीच्या दरात 84 टक्के घट पाहायला मिळाली. 2019 मध्येही ही घट कायम होती.
जेंझ यांनी एपी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं, "याप्रकारची घट अनपेक्षित आहे. ही एक प्रकारची क्रूरता आहे. हा वीगर मुस्लिमांवर निर्बंध घालण्याच्या व्यापक मोहिमेचा एक भाग आहे."
शिनजियांगमधील कँपमध्ये कैदेत राहिलेल्या महिलांना मासिक पाळी बंद होण्यासाठी इंजेक्शन देण्यात आली. गर्भनिरोधक औषधांमुळे त्यांच्या रक्तस्त्राव अनियमित पद्धतीने होत होता, असं तिथल्या महिला सांगतात.
शिनजियांगचे अधिकारी तीन किंवा जास्त अपत्य असलेल्या महिलांची सामूहिक नसबंदी करत असल्याची शक्यता आहे, असं बातमीत म्हटलंय.
चौकशीची मागणी
चीनवर आंतरसंसदीय समितीने (IPAS) यांनी याबाबत एक पत्रक प्रसिद्ध करून शिनजियांगच्या परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय, निःपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अत्याचाराच्या इतर पद्धतींशिवाय सामूहिकपणे बंदीवासात ठेवणं, बेकायदेशीररीत्या कैदेत टाकणं, हालचालींवर पाळत ठेवणं, वेठबिगारी, वीगर धार्मिक स्थळं उद्ध्वस्त करणं यांचे कित्येक पुरावे आहेत, असं या पत्रकात म्हटलं आहे.
असोसिएट प्रेसमध्ये सोमवारी (29 जून) छापून आलेल्या बातमीनुसार, शिनजियांगमधील महिलांना गर्भधारणेची मर्यादा ओलांडल्यास दंड तसंच धमक्यांचा सामना करावा लागतो.
या बातमीनुसार, चीनमध्ये जन्मलेल्या कजाक वंशाच्या गुलनार ओमिर्जख यांना तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर इंट्रा युटेराईन उपकरण लावण्याचा आदेश देण्यात आला. जानेवारी 2018 मध्ये लष्करी वेशातील चार तरुण त्यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांनी दोनपेक्षा जास्त मुलांना जन्म घातल्याबद्दल त्यांच्यावर दीड लाख युआनचा दंड ठोठावला.
गुलनाग यांचे पती भाजी विकण्याचं काम करतात. त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये बंदिस्त करण्यात आलं. गुलनार कसंबसं आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे दंड भरण्यासाठी पैसे नव्हते.
या वृत्तानुसार, दंड न भारल्यास पतीसोबत कँपमध्ये पाठवण्यात येईल, असा इशारा त्यांना देण्यात आला.
एपी वृत्तसंस्थेशी बोलताना गुलनार सांगतात, "तुम्हाला मुलं होणं देवाच्या हातात असतं. लोकांना मुलांना जन्म देण्यापासून रोखणं चुकीचं आहे. एक माणूस म्हणून ते आम्हाला नष्ट करू इच्छितात."
चीनने अशा प्रकारची भयानक कृत्यं तातडीने थांबवावीत, असं वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पाँपिओ यांनी केलं आहे. सर्व देशांनी अमेरिकेसोबत मिळून ही अमानवी कृत्यं थांबवण्याची मागणी करावी, असं पाँपिओ यांनी म्हटलं.
त्यांनी ट्वीट करून म्हटलंय, "लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी वीगर मुस्लीम आणि इतर अल्पसंख्याक महिलांसोबत चीन जबरदस्तीने करत असलेल्या कारवाईचा अमेरिका निषेध करते. त्यांनी हे अत्याचार बंद करावेत. आज आपण केलेल्या कृत्यांच्या आधारेच इतिहासात आपली नोंद होईल."
गेल्या काही वर्षांत वीगर मुस्लिमांबाबत चीनच्या भूमिकेवर आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका होत आली आहे. बीबीसीने 2019 मध्ये आपल्या एका वार्तांकनादरम्यान चीनमधील शिनजियांग परिसरातील परिस्थितीचा अभ्यास केला होता. या ठिकाणी मुलांना सुनियोजित पद्धतीने आपल्या कुटुंबीयांपासून वेगळं केलं जात आहे. अशा प्रकारे त्यांना मुस्लीम समुदायापासून वेगळं करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं या रिपोर्टमध्ये निदर्शनास आलं होतं.
चीनने आरोप फेटाळले
या वृत्तावर प्रतिक्रिया देताना चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हा आरोप आधारहीन आणि वाईट हेतूने करण्यात आल्याचं सांगितलं आहे.
शिनजियांगप्रकरणी मीडिया चुकीच्या बातम्या पसरवत आहे, असा प्रत्यारोप चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जाओ लिजान यांनी केलं आहे.
चीनमध्ये अनेक दशकांपासून एकच अपत्य जन्माला घालण्याचं धोरण आहे. पण शहरी अल्पसंख्याकांना दोन तर ग्रामीण भागात तीन मुलांची परवानगी आहे. 2017 मध्ये या धोरणात बदल करून हान चायनीज लोकांनासुद्धा अल्पसंख्याक लोकांप्रमाणेच अपत्य जन्माला घालण्याची परवानगी देण्यात आली होती.
पण एसोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेनुसार, अल्पसंख्याक समुदायासोबत गर्भपात, नसबंदी आणि आययुडी उपकरण शरीरात घालण्यासारखी कृत्यं केली जातात. पण चीनचे मूलनिवासी - हान चायनीज लोकांना याला सामोरे जावं लागत नाहीत.
शिनजियांग प्रांतातील वीगर मुस्लिमांच्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्याची मोहीम ही एखाद्या नरसंहाराप्रमाणे असल्याचं जेंझ यांच्या रिपोर्टमध्ये दर्शवण्यात आलं आहे.
ते लिहितात, सध्या शिनजियांग प्रांतातील चीनची रणनितीवर संयुक्त राष्टाचे नरसंहार रोखण्याबाबतचे नियम लागू होतात. याचे सबळ पुरावे सध्या उपलब्ध आहेत.
हेही नक्की वाचा
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)