कोरोना व्हायरस : आता संसर्गाची दुसरी लाट येणार?

कोरोना
    • Author, जेम्स गॅलाघर
    • Role, आरोग्य प्रतिनिधी

कोरोनाचं संकट संपायचं नाव घेत नाहीये. अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या साथीने थैमान घातलं आहे पण जिथे याची साथ आटोक्यात आली आहे त्या देशांनाही आता संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची भीती आहे.

साथीच्या रोगांच्या बाबतील संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता अनेकदा खरी ठरते. स्पॅनिश फ्लूच्या संसर्गाची दुसरी लाट (किंवा साथ)पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर होती. मग कोरोना व्हायरसच्या बाबतीत हीच गोष्ट खरी ठरणार का? आणि त्याचे काय परिणाम होतील?

संसर्गाची दुसरी लाट म्हणजे काय असतं?

कल्पना करा तुम्ही समुद्राच्या लाटा पाहात आहात. एक लाट हळूहळू मोठी होत जाते, उंचावते आणि खालावते. साथीच्या रोगांचंही असंच काहीसं असतं.

संसर्गाचा आकडा वाढत जातो आणि मग खाली येतो. मग असं समजा की कोरोना व्हायरसची येऊन गेलेली किंवा येऊ घातलेली साथ ही या लाटेसारखी आहे.

कोरोना
लाईन

युनिव्हर्सिटी ऑफ वॉरविकमधले डॉ. माईक टिल्डस्ले यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "साथीच्या रोगांची अशी लाटांशी तुलना करणं अगदीच शास्त्रीयदृष्ट्या योग्य नसलं तरी ही त्यातल्या त्यात जवळची व्याख्या आहे."

कधी कधी पहिली लाटच वरखाली होते आणि अनेकांना वाटतं की पहिली लाट संपून दुसरी आलेली आहे. सध्या अमेरिकेमध्ये असंच काहीसं घडत आहे.

संसर्गाची पहिली लाट ओसरली आहे असं म्हणण्यासाठी साथ पूर्णपणे आटोक्यात येऊन रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात कमी व्हायला हवा. त्यानंतर दुसरी लाट आली आहे असं म्हणायला जवळपास आटोक्यात आलेल्या संसर्गात पुन्हा सतत वाढ होत राहायला हवी.

न्यूझीलंड, जिथे या जागतिक साथीच्या पहिल्या 24 दिवसात एकही पेशंट नव्हता किंवा बीजिंग, जिथे पहिल्या 50 दिवसात पेशंट नव्हता आणि आता सापडला आहे, ते या व्याख्येत बसत नाहीत.

पण काही शास्त्रज्ञांच्या मते इराणमध्ये आता जी परिस्थिती आहे किंवा जे घडतंय त्याला या साथीची दुसरी लाट म्हणता येऊ शकतं.

यूकेमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट येऊ शकते?

याचं उत्तर पूर्णपणे सरकार कोणते निर्णय घेतंय त्यावर अवलंबून आहे. "सध्या काहीच स्पष्ट नाहीये, नक्की कशाचा अंदाज येत नाहीये आणि यामुळेच माझी चिंता वाढली आहे,"डॉ. टिल्डस्ले म्हणतात.

लाट

फोटो स्रोत, Getty Images

असं नक्कीच होऊ शकतं. कोरोना व्हायरस अजून देशातून हद्दपार झाला नाहीये. तो तितकाच धोकादायक आणि जीवघेणा आहे जितका 2020च्या सुरुवातीला होता.

आतापर्यंत यूकेच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त 5टक्के लोकांना याची लागण झाली आहे, आणि त्या सगळ्या लोकांमध्ये या रोगाविरुद्ध रोगप्रतिकारशक्ती तयार झाली असेलच याची कोणतीही खात्री नाही.

"हातात असलेले पुरावे तर हेच सांगतात की लोक अजूनही धोक्याच्या बाहेर नाहीत. आपण जर सगळी बंधनं काढली तर फेब्रुवारीमध्ये जी परिस्थिती होती तशीच परिस्थिती पुन्हा उद्भवेल,"लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडसिनटचे डॉ. अॅडम कुचार्स्की सांगतात.

"हे म्हणजे मनाचा निग्रह करून खाजवणं थांबवायचं आणि मग पुन्हा खाज येत असलेल्या ठिकाणी कराकरा खाजवायचं असं झालं."

दुसऱ्या लाटेचा धोका कशाने वाढेल?

लॉकडाऊन शिथिल केल्याने नक्कीच वाढेल.

लॉकडाऊनमुळे जगभरातले व्यवहार खंडित झाले. लोकांच्या नोकऱ्या गेल्या,मुलांच्या शाळा सुटल्या आणि अनेकांच्या जेवणाचा प्रश्न उभा राहिला. पण त्याबरोबरीने हे ही खरं की त्यामुळे कोरोनाची साथ आटोक्यात राहिली.

"आता व्यवहार पूर्ववत करताना संसर्ग वाढणार नाही हे समीकरण कसं जुळवायचं हा खरा प्रश्न आहे," डॉ. कुचार्स्की सांगतात.

दुसरी लाट

फोटो स्रोत, Getty Images

आता यातले बरेच नियम टप्प्याटप्प्याने शिथील होतायत आणि या व्हायरसला आटोक्यात ठेवण्याचे नवे मार्ग अंगिकारले जातायत जसं की कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि मास्क घालणं.

युके आणि आसपासच्या देशांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध गरजेपेक्षा जास्त शिथिल केले तर व्हायरसचे हॉटस्पॉट झपाट्याने तयार होऊ शकतात असं कुचार्स्की यांना वाटतं.

जर्मनीमध्ये असं नुकतंच घडलं. या देशातल्या अबाटोयर या ठिकाणी 650 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले.

असे तयार होऊ घातलेले क्लस्टर्स किंवा हॉटस्पॉट योग्य वेळी ओळखून तिथे कडक लॉकडाऊन लागू केला तर या व्हायरसचा पुढे होणारा संसर्ग टाळता येऊ शकतो. पण असं झालं नाही तर यामुळे दुसऱ्या लाटेला नक्कीच आमंत्रण मिळेल.

दक्षिण कोरियाने अशा क्लस्टर्मध्ये पुन्हा संसर्ग वाढल्याने असे निर्बंध लादायला सुरुवात केली आहे.

दुसरी लाट पहिल्या लाटेइतकीच धोकायदायक असेल?

तज्ज्ञांना वाटतंय की पुरेशी काळजी घेतली नाही संसर्गाची दुसरी लाट कदाचित पहिल्या लाटेपेक्षा धोकादायक असेल.

R - म्हणजे लागण झालेला एक माणूस आणखी किती जणांना संसर्ग करू शकतो हा आकडा, या जागतिक साथीच्या सुरुवातीला 3 इतका होता.

पण नंतर आपण काळजी घ्यायला लागलो, सोशल डिस्टन्सिंग पाळायला लागलो, लॉकडाऊन जाहीर झाला आणि हा आकडा कमी झाला. आता R पुन्हा पहिल्याइतका होईल ही शक्यता कमी आहे.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. कुचार्स्की म्हणतात, "ब्राझील किंवा भारतासारखे देश, जिथे कोरोना व्हायरसचा उद्रेक अजून आटोक्यात आलेला नाही, तिथेही R चा आकडा आता 3 इतका नाहीये."

पण दुसरी लाट आदळली तर हा आकडा नक्कीच वाढू शकतो, कारण अनेकांना अजूनही कोरोना व्हायरसचा धोका आहे. "अर्थात असं काही झालंच तर आपण पुन्हा लॉकडाऊन लागू करू शकतो," कुचार्स्की सांगतात.

व्हायरसची तीव्रता भविष्यात कमी होईल का?

कोरोना व्हायरसची दुसरी लाट येणार नाही असं म्हणणारे आणखी एक मुद्दा मांडतात. त्यांचं म्हणणं आहे की जसाजसा काळ जाईल तशीतशी या व्हायरसची तीव्रता कमी होईल. उदाहरणार्थ HIV - या व्हायरसची तीव्रता गेल्या काही वर्षात कमी झाली आहे. म्हणजेच कोरोना व्हायरस लोकांना संक्रमित करेल पण त्यांचा जीव घेणार नाही.

"पण याची काही खात्री नाही. मला तर हा विषाणूतज्ज्ञांचा आळशीपणा वाटतो," युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅममध्ये विषाणूतज्ज्ञ असणारे प्रा जॉनथन बॉल म्हणतात.

विषाणूंची तीव्रता कमी व्हायला मोठा काळ जावा लागतो. कोरोना व्हायरसची जागतिक साथ सुरू होऊन फक्त 6 महिने झाले आहेत. इतक्या कमी काळात या व्हायरस बदललाय किंवा म्युटेट झालाय असं दाखवणारा एकही पुरावा अजून समोर आलेला नाही.

प्रा. बॉल म्हणतात, "सध्या तरी या व्हायरसचं बरंच चाललं आहे म्हणायचं. अनेकदा सौम्य लक्षणं असणारे किंवा कोणतेही लक्षण नसणारे लोकही इतरांना संक्रमित करतात. असंच चालू राहिलं तर या व्हायरसची तीव्रता कमी होऊनही काही फायदा नाही."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)