कोरोना लॉकडाऊनच्या काळात 'झूम'ची झाली भरभराट

झूमचा वापर

फोटो स्रोत, ZOOM

    • Author, नॅटली शेरमन
    • Role, व्यापार प्रतिनिधी, न्यूयॉर्क

लॉकडाऊनमुळे जगभरात अनेक जण घरून काम करत आहेत. एरव्ही प्रत्यक्ष समोरासमोर बसून होणाऱ्या चर्चा - मीटिंग आणि अगदी ट्रेनिंग्ससाठीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची मदत घेतली जातेय. यासाठी स्काईप, मायक्रोसॉफ्ट टीम्स, झूम असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत.

या व्हिडिओ कॉलिंग - कॉन्फरन्सिंगला मिळणारा प्रतिसाद पाहत गुगलनेही आपली सेवा घाईघाईने लाँच केली, त्यातली अनेक फीचर्स मोफत उपलब्ध करून दिली. तर फेसबुक आणि व्हॉट्सअॅपनेही त्यांच्या व्हिडिओ कॉलिंगसाठीची सदस्य संख्या वाढवली. यातली झूम ही सेवा गेले काही महिने चर्चेत आहे. सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्हं उपस्थित झाल्याचा फटका या कंपनीला बसला असला तरी 'झूम' नावाप्रमाणेच गेल्या काही दिवसांत या कंपनीची वाढ झालेली आहे. एप्रिलमध्ये या कंपनीचं सॉफ्टवेअर वापरणाऱ्यांची संख्या 30 पटींनी वाढली होती. दररोज 30 कोटी पेक्षा जास्त लोक झूमद्वारे व्हर्च्युअल मीटिंग्समध्ये सहभागी होतात. तर पैसे भरून ही सेवा घेणाऱ्या ग्राहकांची संख्याही तिप्पटीने वाढलेली आहे. यावर्षी तब्बल 1.8 अब्ज अमेरिकन डॉलर्सची एकूण विक्री होईल असा अंदाज कंपनीने व्यक्त केलाय. "ही एक अतिशय मोठी संधी आहे," असं कंपनीचे चीफ एक्झिक्युटिव्ह एरिक युआन यांनी मंगळवारी गुंतवणूकदारांना सांगितलं.

कोरोना
लाईन

झूमची सुरुवात कशी झाली?जनसामान्यांसाठी झूमची निर्मिती करण्याचं युआन यांचं उद्दिष्टं नव्हतं. चीनमध्ये जन्म झालेल्या आणि शिक्षणाने सॉफ्टवेअर इंजिनियर असणाऱ्या युआन यांनी अनेक वर्षं WebEx या अमेरिकन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कंपनीत विविध पदांवर काम केलं. 2007मध्ये ही कंपनी 'सिस्को' (Cisco) ने 3.2 अब्ज डॉलर्सना विकत घेतली. त्यानंतर 2011 मध्ये युआन यांनी 'झूम' कंपनीची स्थापना केली. मायक्रोसॉफ्ट आणि सिस्कोसारखे बडे स्पर्धक असताना आणखी एका पर्यायाची बाजारपेठेला गरज आहे का, असं म्हणत गुंतवणूकदारांनी अनेकदा त्यांच्या या कंपनीच्या भवितव्याविषयी शंका व्यक्त केली होती.

एरिक युआन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एरिक युआन

पण मोबाईलवर चालू शकणाऱ्या आणि वापरायला सोप्या सॉफ्टवेअरची बिझनेस जगताला गरज असल्याची खात्री सिस्कोमध्ये काम करून कंटाळलेल्या युआन यांना वाटत होती. तरूण असताना आपल्या भावी पत्नीला भेटण्यासाठी लांबच लांब प्रवास करावा लागल्याने आपला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधला रस वाढल्याचं ते सांगतात. गेल्या वर्षी 'झूम'ने पहिल्यांदाच आपले शेअर्स लोकांना विकले. त्यावेळी या कंपनीचं मूल्य होतं - 15.9 अब्ज अमेरिकन डॉलर्स. यामध्ये झपाट्याने वाढ होत मंगळवारी ( 2 जून) ला या कंपनीचं मूल्य 58 अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त होतं. कॅनालिस कंपनीचे वरिष्ठ संचालक अॅलेक्स स्मिथ म्हणतात, "झूमने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचं तंत्रज्ञान सगळ्या प्रकारच्या उद्योगांसाठी खुलं केलं. अगदी योगासनं शिकवणाऱ्या शिक्षकापासून ते बोर्डरूममध्ये बसलेल्या एक्झिक्युटिव्हपर्यंत सगळ्यांसाठीचं हे तंत्रज्ञान वापरायला अतिशय सोपं आहे."लॉकडाऊन सुरू झाल्यावर झूमने या सॉफ्टवेअरची मोफत व्हर्जन वापरणाऱ्या चीनमधल्या ग्राहकांसाठीचे निर्बंध उठवले. यासोबतच अनेक देशांमध्ये शिक्षणसंस्थांच्या फ्री व्हर्जन वापरातल्या अटी शिथील करण्यात आल्या. परिणामी या सॉफ्टवेअरची लोकप्रियता वाढली. पण या कंपनीचा महसूल अवलंबून आहे तो पैसे भरून सॉफ्टवेअरची 'अॅडव्हान्स' व्हर्जन आणि विशेष फीचर्स वापरणाऱ्या कॉर्पोरेट ग्राहकांवर. गेल्या तीन महिन्यांमध्ये मागच्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 169% विक्री वाढून 328.2 दशलक्ष डॉलर्सची उलाढाल झाल्याचं कंपनीने म्हटलंय. जानेवारीपासून या कंपनीने 10 पेक्षा जास्त नवीन कर्मचारी घेतले असून ग्राहकसंख्येत 1,80,000 नवीन ग्राहकांची भर पडलेली आहे. या कंपनीला गेल्या तिमाहीत 27 दशलक्ष डॉलर्सचा नफा झालाय. आधीच्या संपूर्ण आर्थिक वर्षातल्या नफ्यापेक्षा या तिमाहीचा नफा जास्त आहे.

झूमचा वापर

फोटो स्रोत, SOPA IMAGES

लोकप्रियतेला फटकाझूमची लोकप्रियता जसजशी वाढत गेली तसं इथल्या मीटिंग्समध्ये हॅकर्स घुसण्याचं, मीटिंग्स हायजॅक होण्याचं प्रमाणही वाढलं. कंपनीच्या तंत्रज्ञानातल्या उणीवा सगळ्यांसमोर आल्या. कंपनीने युजर्सची माहिती फेसबुकला पाठवल्याचं, अॅप एन्ड - टू - एन्ड एन्क्रिप्टेड असल्याचा खोटा दावा केल्याचं उघडकीला आला. शिवाय या कंपनीच्या चीनसोबतच्या संबंधांवरूनही राजकीय चर्चा झाली. कारण चीनमध्ये झूमचे 700 पेक्षा कर्मचारी आहेत. कंपनीची बहुतेक सगळी प्रॉडक्ट डेव्हलपमेंट टीमही चीनमध्येच आहे. सरकारी वापरासाठी हे अॅप सुरक्षित नसल्याचा दावा यामुळे करण्यात आला. अमेरिकेचे नागरिक असणाऱ्या युआन यांनी या सुरक्षाविषयक उणीवांबद्दल एप्रिलमध्ये माफी मागितली आणि त्यावरच्या सुधारणा जारी करण्यात आल्या. शिवाय अमेरिकेचे निवृत्त आर्मी जनरल आणि ट्रंप यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असणाऱ्या एच. आर. मॅकमास्टर यांची नेमणूकही कंपनीने केली. "या सगळ्यातून मार्ग काढण्याचा अनुभव खूप काही शिकवून गेला," युआन यांनी गुंतवणूकदारांशी बोलताना म्हटलंय. पण कंपनी त्यांच्या प्रतिष्ठेवर लागलेल्या या बट्ट्यातून लवकरच सावरेल असं तज्ज्ञांचं मत आहे. "कंपनीकडून चूक झाली पण असं असूनही या कंपनीचं नाव व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तंत्रज्ञानासाठी चर्चेत आहेत यावरूनच त्यांची ग्राहकांवरची पकड आणि त्यांच्याकडे वृद्धीची असलेली संधी दिसून येते." स्मिथ सांगतात. कॉर्पोरेट ग्राहकांकडून कंपनीला पैसा मिळत असल्याने कंपनी या ग्राहकांवर जास्त लक्ष केंद्रित करेल असा जाणकारांचा अंदाज आहे. पण यासोबतच या जागतिक साथीमुळे कंपनीसमोर काही आव्हानंही उभी राहिली आहेत. घरून काम करणाऱ्यांची संख्या वाढल्यानंतर मायक्रोसॉफ्ट आणि सिस्कोसारख्या कंपन्यांनी आपली क्षमता आणि स्रोत वाढवले आहेत. रोझनब्लाट सिक्युरिटीजचे कार्यकारी संचालक रायन कूंट्झ सांगतात, "स्पर्धा वाढलेली आहे आणि गोष्टी पणाला लागल्या आहेत. ही कंपनी योग्य मार्गावर होती. किंबहुना जगाने जेव्हा संपर्कासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर करायचा ठरवलं, तेव्हा ते योग्य वेळी योग्य जागी हजर होते. त्यांच्या ब्रँडचं आता चांगलं नाव झालंय. म्हणूनच आता यानंतर काय करायचं, कोणत्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करायचं हे त्यांना ठरवावं लागेल."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)