You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इबोला: डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये पुन्हा या रोगाची साथ, असं पुन्हा पुन्हा का होतं?
गोवर आणि कोरोना व्हायरसशी लढणाऱ्या डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये आता आणखी एक आव्हान उभं राहिलंय. इथे इबोलाची साथ पुन्हा एकदा आलीय.
काँगोच्या मंबडाका भागामध्ये इबोलाने आतापर्यंत 5 जणांचा बळी गेल्याचं वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिलंय.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या आफ्रिकेसाठीच्या विभागीय संचालक डॉ. मात्शिदिसो मोएती यांनी याविषयी एक ट्वीट केलंय.
यात त्या म्हणतात, "मंबडाका भागात इबोलाचा उद्रेक झाल्याने एक नवीन आव्हान उभं राहिलंय, पण हे हाताळण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. WHOने काँगो सरकार आणि आफ्रिका CDC संस्थेसोबत या दिशेने काम केलं असून, या उद्रेकावर पावलं उचलण्यासाठीची तयारी केलेली आहे. या दर उद्रेकाच्या वेळी आता आम्ही अधिक जलद आणि परिणामकारकरीत्या पावलं उचलतोय."
इबोला परत परत का उद्भवतो?
WHOनं दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी इबोलाच्या 44 केसेसची नोंद झाली होती. त्यापैकी 3 लोकांना प्रत्यक्ष इबोलाची लागण झाली होती. काँगोमधल्या इक्वाटूर राज्यात याचा पहिला रुग्ण सापडला होता.
गेल्या दोन वर्षांमध्ये काँगोमध्ये 2,275 पेक्षा जास्त जणांचा बळी गेलाय.
त्यापूर्वी 2014 -2016 दरम्यान डेमोक्रॅटीक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये तीन वेळा इबोलाचा उद्रेक झाला आहे.
वटवाघुळामुळे इबोला खूप लांब अंतरावर पसरू शकतो. आफ्रिकेतल्या बुश प्राण्याचं दूषित मांस खाल्ल्यामुळे माणसाला इबोला होऊ शकतो.
इबोलाची लागण झालेल्या प्राण्याचं रक्त किंवा अवयवाच्या संपर्कात आलेल्या माणसाला इबोला होतो. यामध्ये चिंपाझी, गोरिला, काळवीट या प्राण्यांचा समावेश होतो.
इबोला झालेल्या सगळ्याच प्राण्यांचा नायनाट करणं शक्य नाही. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांना इबोला होत राहणार आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)