'जॉर्ज फ्लॉईड': अमेरिकेत कायदा-सुव्यवस्थेतील वर्णद्वेष या आकडेवारीतून दिसतो का?

कृष्णवर्णीय अमेरिकन नागरिक जॉर्ज फ्लॉईड यांचा पोलिस कोठीडत मृत्यू झाल्यानंतर गेल्या आठवड्याभरापासून अमेरिकेच्या अनेक शहरांमध्ये निदर्शनं सुरू आहेत.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसबाहेरही निदर्शनं झाली होती. अनेक ठिकाणी या आंदोलनांना हिंसक वळण लागलं.

अनेक शहरांमध्ये कर्फ्यू लावण्यात आलाय. वॉशिंग्टनमध्येही कर्फ्यूची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलंय.

तर हा हिंसाचार मोडून काढण्यासाठी हजारो पोलीस आणि सैन्यही तैनात करण्यात येणार असल्याचं ट्रंप यांनी म्हटलंय.

तर फ्लॉईड यांच्या शवविच्छेदन अहवालावरूनही वाद निर्माण झालाय.

कुटुंबाने करून घेतलेल्या पोस्टमॉर्टममध्ये त्यांचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाल्याचं म्हटलंय. 'गळा आणि कमरेवर दबाव आल्याने' मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय.

पण सरकारी अहवालात गळा दाबला गेल्याने ऑक्सिजनचा पुरवठा झाला नसल्याचा उल्लेख नव्हता. अधिकृत अहवालात या मृत्यूला 'होमिसाईड' म्हणजेच हत्या म्हटलं गेलंय.

अमेरिकेत वंशद्वेषाबाबत आकडेवारी काय सांगते?

आफ्रिकन-अमेरिकन नागरिकांसोबत अमेरिकेतली कायदा-सुव्यवस्था यंत्रणा नेमकी कशी वागते?

अमेरिकेतली गुन्हेगारी आणि न्याय विषयक आकडेवारी बीबीसीच्या रिअॅलिटी चेक टीमने तपासली. त्यात खालील मुद्दे लक्षात आले -

1. आफ्रिकन-अमेरिकन नागरिकांवर जीवघेणा गोळीबार होण्याची शक्यता जास्त असते.

पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्यांची जी आकडेवारी उपलब्ध आहे, त्यानुसार एकूण अमेरिकन लोकसंख्येमधील प्रमाणाच्या तुलनेत आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या लोकांसोबत अशी घटना घडण्याची शक्यता जास्त आहे.

2019मध्ये अमेरिकेच्या अधिकृत जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येमध्ये आफ्रिकन अमेरिकनांचं प्रमाण 14 टक्क्यांपेक्षाही कमी होतं. पण ज्या लोकांना पोलिसांनी गोळी झाडून ठार केलं होतं, अशांमध्ये आफ्रिकन अमेरिकनांचं प्रमाण मात्र 23% पेक्षाही जास्त आहे. आतापर्यंत 1,000 पेक्षा जास्त जणांना पोलिसांनी ठार केलंय.

2017 पासून या आकडेवारीत सातत्य आहे. पण तुलनेने श्वेतवर्णीय बळींचा आकडा मात्र तेव्हापासून कमी झालाय.

2. ड्रग्समुळे अटक होणाऱ्यांमध्ये आफ्रिकन-अमेरिकनांचं जास्त प्रमाण

श्वेतवर्णीय अमेरिकनांच्या तुलनेत ड्रग्सच्या बाबत अटक केली जाणाऱ्यांमध्ये आफ्रिकन अमेरिकनांचं प्रमाण जास्त आहे. पण या दोन्ही वर्णीय लोकांमधलं ड्रग्स सेवनाचं प्रमाण सारखंच असल्याचं पाहणीत आढळून आलंय.

2018च्या आकडेवारीनुसार दर एक लाख आफ्रिकन अमेरिकनांपैकी 750 जणांना ड्रग्समुळे अटक करण्यात आली होती. श्वेतवर्णीय अमेरिकनांबाबत हे प्रमाण आहे दर 1 लाखांमागे 350 नागरिक.

श्वेतवर्णीय अमेरिकनांमध्येही ड्रग्सचं प्रमाण सारखंच असल्याचं ड्रग्स सेवनाबाबतच्या राष्ट्रीय पाहणीत आढळून आलं होतं. पण आफ्रिकन अमेरिकनांच्या अटकेचं प्रमाण आहे.

मादक द्रव्य बाळगल्या प्रकरणी आफ्रिकन अमेरिकनांना अटक होण्याची शक्यता श्वेतवर्णीयांच्या तुलनेत 3.7 पटींनी जास्त असल्याचं अमेरिकन सिव्हील लिबर्टीज युनियनने केलेल्या पाहणीत आढळलं.

3. आफ्रिकन अमेरिकनां तुरुंगात डांबण्याचं प्रमाण जास्त

श्वेतवर्णीय अमेरिकनांच्या तुलनेत आफ्रिकन अमेरिकनांना तुरुंगात डांबण्यात येण्याचं प्रमाण 5 पटींनी जास्त आहे. तर हिस्पॅनिक अमेरिकनांच्या (स्पॅनिश मुळाच्या) तुलनेत हे प्रमाण दुप्पट असल्याचं ही ताजी आकडेवारी सांगते.

2018 मध्ये अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपैकी आफ्रिकन अमेरिकनांची लोकसंख्या होती 13%. पण अमेरिकन तुरुंगातल्या एकूण कैद्यांपैकी एक तृतीयांश आफ्रिकन अमेरिकन आहेत.

या तुरुंगातल्या कैद्यांपैकी श्वेतवर्णीय आहेत सुमारे 30%. या श्वेतवर्णीयांचं एकूण लोकसंख्येतलं प्रमाण 60% पेक्षाही जास्त आहे.

म्हणजे दर 1 लाख आफ्रिकन अमेरिकनांपैकी 1,000 पेक्षा जास्त जण कैदी आहेत. तर दर 1 लाख श्वेतवर्णीयांपैकी 200 जणांना तुरुंगवास झालेला आहे.

अमेरिकेमध्ये 1 वर्षापेक्षा जास्त काळ फेडरल तुरुंगात किंवा राज्याच्या तुरुंगात असणाऱ्यांना 'इनमेट्स' वा कैदी म्हटलं जातं.

गेल्या दशकभरात आफ्रिकन अमेरिकनांना तुरुंगवास होण्याचं प्रमाण कमी झालं असलं तरी अजूनही तुरुंगात असणाऱ्या एकूण कैद्यांपैकी आफ्रिकन अमेरिकनांचं प्रमाण इतर कोणत्याही वर्णीयांपेक्षा जास्त आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)