कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या भीतीमुळे आपण भविष्यात हस्तांदोलन करू?

Two hands touching
    • Author, जेम्स जेफ्री
    • Role, लेखक, बीबीसीसाठी

जगभरातली लोक सध्या पिढ्यान् पिढ्या, वर्षानुवर्षं असलेली एक सवय सोडायचा प्रयत्न करत आहेत. ही सवय म्हणजे - दुसऱ्या व्यक्तीला स्पर्श करणं. यामध्ये सगळ्यांत जास्त अंगवळणी पडलेली सवय म्हणजे समोर आलेल्या व्यक्तीशी हात मिळवणं वा हस्तांदोलन करणं.

अनोळखी व्यक्तीशी पहिली भेट असो वा कोट्यवधींचा करार असो, आतापर्यंत हस्तांदोलनाने सगळ्या गोष्टींवर शिक्कामोर्तब होत होतं आणि कोव्हिड-19च्या नंतरच्या जगात वावरताना हीच सवय मोडून काढणं अनेकांना कठीण जाणार आहे.

हस्तांदोलन वा हँडशेकची सुरुवात नेमकी कुठून झाली, याविषयी वेगवेगळे तर्क आहेत.

प्राचीन ग्रीसमध्ये याचा उदय झाला असावा, असा एक मतप्रवाह आहे. दोन व्यक्ती समोरासमोर आल्यानंतर आपल्याकडे शस्त्र नाही हे जाहीर करण्यासाठी 'शांतते'चं प्रतीक म्हणून या प्रथेला सुरुवात झाली असावी.

किंवा मध्ययुगात युरोपात या हँडशेकच्या प्रथेची सुरुवात झाल्याचा अंदाज आहे. योद्धे आपल्यासमोरच्या व्यक्तीचा हात हलवून त्याने शस्त्र लपवलंय का, याचा अंदाज घेत असावेत.

ख्रिश्चन धर्मातील 'क्वेकर्स' गटाने हा हँडशेक लोकप्रिय केल्याचं म्हटलं जातं. वाकून अभिवादन करण्यापेक्षा हस्तांदोलनच्या पद्धतीत समता असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

Shaka sign

हस्तांदोलन म्हणजे 'माणसं एकमेकांशी जोडलेली आहेत' हे सांगणारी क्रिया असल्याचं ऑस्टिनमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासचे मानसशास्त्राचे प्राध्यापक क्रिस्टीन लीगर म्हणतात.

या हस्तांदोलनाचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. म्हणूनच अचानक ही क्रिया थांबवणं सगळ्यांसाठीच कठीण आहे.

"हस्तांदोलनाला पर्याय म्हणून अनेकांनी एकमेकांना कोपराने स्पर्श करणं किंवा एल्बो बम्प (Elbow Bump) करायला सुरुवात केली. यावरूनच लक्षात येतं की, आपल्यासाठी स्पर्श किती महत्त्वाचा आहे. आपल्याला हा प्रत्यक्ष संपर्क गमवायचा नाही," प्राध्यापक लीगर सांगतात.

स्पर्श करण्याची आणि स्पर्श मिळवण्याची ही आस इतर प्राण्यांमध्येही आढळते. रिसस माकडांच्या (Rhesus Monkey) लहान पिलांच्या वाढीसाठी स्पर्श आणि प्रेम किती महत्त्वाचं आहे हे 1960च्या दशकामध्ये अमेरिकन मानसशास्त्रज्ञ हॅरी हार्लो यांनी दाखवून दिलं होतं.

कोरोना
लाईन

याशिवाय प्राणी जगतातलं आणखी एक उदाहरण म्हणजे मनुष्याशी अगदी जवळचं साधर्म्य असणारे चिंपांझी. हे चिंपांझी एकमेकांच्या हाताला हात लावतात, मिठी मारतात आणि कधीकधी एकमेकांचा मुकाही घेतात. जिराफ आपल्या लांब मानेने एकमेकांना स्पर्श करतात. त्यांच्या या कृतीला 'Necking' म्हटलं जातं. यामध्ये नर जिराफ आपल्या माना एकमेकांच्या भोवती गुंडाळून झुलत एकमेकांच्या ताकदीचा आणि आकाराचा अंदाज घेतात. वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रतिस्पर्ध्याचा असा अंदाज घेतला जातो.

हस्तांदोलन लोकप्रिय असलं तर जगभरातल्या अनेक संस्कृतींमध्ये हस्तांदोलनाशिवाय इतरही प्रकारे अभिवादन केलं जातं. दोन्ही हात जोडून हलकंसं झुकत केला जाणारा नमस्कार आता जगाच्या परिचयाचा आहे.

समोआमध्ये समोरच्या माणसाला अभिवादन करण्यासाठी चेहऱ्यावरच्या हास्यासोबतच भुवयाही उंचावल्या जातात.

मुस्लीम देशांमध्ये हृदयावर हात ठेवण्याची कृती हे समोरच्याला केलेलं आदबशीर अभिवादन मानलं जातं.

तर हवाईमधली 'शाका' खूणही लोकप्रिय आहे. यामध्ये हाताची तीन मधली बोटं दुमडून अंगठा आणि करंगळी ताणत हात हलवला जातो.

लाईन

लाईन

पण स्पर्शाचं महत्त्व पूर्वापार चालत आलेलं आहे. लहान मुलांवरचं प्रेम व्यक्त करणं ही फक्त एक भावनिक कृती असून त्याचा इतर काहीही फायदा नसल्याचं 20व्या शतकाच्या पूर्वार्धात मानलं जाई. अशाप्रकारे प्रेम व्यक्त केल्याने रोग पसरण्याचा धोका आहे आणि यामुळे मोठ्यांमध्ये मानसिक आजार निर्माण होतात, असंही याबद्दल म्हटलं जाई.

लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिनच्या 'बिहेवियरल सायंटिस्ट' वॅल कर्टिस यांनी 'डोन्ट लुक, डोन्ट टच' नावाचं पुस्तक लिहीलंय. त्या म्हणतात, "हात मिळवणं वा गालांवर मुका देत अभिवादन करणं याला महत्त्वं मिळालं कारण कदाचित ही समोरच्या माणसावर पुरेसा विश्वास असल्याची खूण होती. पण त्या त्या वेळच्या आरोग्य विषयक सल्ल्यांनुसार अभिवादनाच्या या पद्धती येत - जात राहिल्या."

हस्तांदोलनादरम्यान बॅक्टेरिया एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाण्याचा धोका असतो म्हणून अमेरिकन नागरिकांनी त्यावेळच्या चीनी पद्धतीप्रमाणे एकमेकांचे हात जुळवण्याऐवजी स्वतःचे हात हातात घेत हलवावेत, असा उल्लेख 1920मध्ये छापण्यात आलेल्या अमेरिकन जर्नल ऑफ नर्सिंगमधल्या लेखात आहे.

कोरोना व्हायरसच्या उद्रेकाच्या अगदी काही काळाआधीही हस्तांदोलनाबद्दल आक्षेप घेण्यात आले आहेत. 2015मध्ये UCLA मधल्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांचे ICU हा एक 'हँडशेक फ्री झोन' जाहीर केला. म्हणजे या परिसरात कोणीही हस्तांदोलन करायचं नाही. UCLA मधलं हे धोरण फक्त सहा महिने टिकलं.

Fist bump

जगभरातल्या अनेक मुस्लीम महिलांनी त्यांच्या धार्मिक धारणांमुळे अनेकदा हस्तांदोलनच्या या पद्धतीवर आक्षेप घेतला होता.

पण असे सगळे आक्षेप आणि शंका असूनही 20 वं शतक संपल्यानंतरही हस्तांदोलनाची प्रथा जगभर रूढ होती आणि शिवाय या हस्तांदोलनाला एक 'प्रोफेशनल ग्रीटींग' म्हणूनही ओळख मिळाली.

एका चांगल्या हस्तांदोलनामुळे आपल्या मेंदूच्या कोणत्या भागावर कसा परिणाम होतो याविषयी वैज्ञानिक संशोधनही करण्यात आलेलं आहे.

भविष्यात हस्तांदोलनं होतील का?

जगात आता अनेक ठिकाणी लॉकडाऊनदरम्यान लावण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.

"खरं सांगायचं तर मला वाटतं की आपण पुन्हा कधीही हस्तांदोलन करू नये," व्हाईट हाऊसच्या कोरोना व्हायरस टास्क फोर्सचे महत्त्वाचे सदस्य असणारे डॉ. अँथनी फाऊची एप्रिल महिन्यात म्हणाले होते.

"कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी तर हे उपयोगी असेलच पण यामुळे देशातल्या इन्फ्लुएन्झाचं प्रमाणही बरंच कमी होईल."

सोशल डिस्टंसिंगसाठीचे नियम आता यापुढचा काही काळ काय राहतील. अमेरिकेने आपल्या देशातले व्यवहार सुरू करताना दिलेल्या सूचनांमध्ये तसं म्हटलेलं ही आहे. ज्येष्ठ नागरिक, इतर व्याधींशी सामना करणारे अशा सगळ्यांनाच याविषयी जास्त काळजी घ्यावी लागेल.

पण यामुळे समाजामध्ये एक वेगळीच फूट निर्माण होण्याची शक्यता असल्याचं डेल मेडिकलच्या क्लिनिकल इंटिग्रेशन अँड ऑपरेशन्सचे सह-अध्यक्ष स्टुअर्ट वुल्फ म्हणतात.

"आपण समाजातल्या तरुणाईवर आणि सामर्थ्यावर भरपूर भर देतो. आता वृद्ध आणि कमकुवत व्यक्ती आणि तरूण आणि निरोगी लोकांमध्ये ही नव्याने निर्माण होणारी दरी काहींसाठी अडचणी निर्माण करेल."

Girl hugging grandmother

समोरच्या स्पर्श करण्याची भावना आपल्यामध्ये खोलवर रुजलेली आहे. असा एक अंदाज आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एका वर्षात साधारण 65,000 व्यक्तींशी हस्तांदोलन करतात.

"सवयी सहजासहजी जात नाहीत. पण दुसरीकडे सवयी आणि सामाजिक चालीरितींमध्ये सामाजिक आणि आर्थिक कारणांमुळे बदल होऊ शकतात आणि तसे झालेही आहेत. सध्याच्या घडीला आरोग्यविषयक गोष्टींची पार्श्वभूमी आहे. चीनमधली पावलं बांधून ठेवण्याची प्रथाही अशाच आरोग्य विषयक कारणांमुळे बंद झाली होती. "

"स्पर्श न करता अभिवादन करण्याचे अनेक पर्याय आहेत. वाकून अभिवादन करण्याची प्रथा जगात अनेक ठिकाणी आहे. कोरोना व्हायरसमुळे थायलंडमध्ये कमी मृत्यू होण्यामागचं हे एक मोठं कारण आहे. त्याशिवाय हात हलवणं, मान डोलावणं, हास्य अशा गोष्टींनी स्पर्श न करताही अभिवादन शक्य आहे."

पण सध्याच्या काळातला विरोधाभासही प्रा. लीगर दाखवून देतात.

"तणावाच्या काळातच स्पर्शाची सगळ्यात जास्त गरज असते. मृत्यूमुळे किंवा काहीतरी वाईट झाल्याने दुःखात असणाऱ्या व्यक्तींना आपण कसा प्रतिसाद देतो? त्यांना मिठी मारून किंवा त्या व्यक्तीजवळ बसून त्यांच्या खांद्याला स्पर्श करून."

डेलिआना गार्सिया सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात काम करतात. यामध्ये संसर्गजन्य रोगांचाही समावेश आहे. म्हणूनच त्यांनी बहुतेक लोकांना हस्तांदोलन करणं थांबवलं होतं. पण असं असलं तरी त्यांनाही काही सवयींवर मात करावी लागणार आहे.

"मला जवळच्या लोकांना मिठी मारायची सवय आहे," गार्सिया म्हणतात. आपल्या 85 वर्षांच्या आईपासून दूर राहणं, सोशल डिस्टंसिंग पाळणं जास्तीच कठीण असल्याचं त्या म्हणतात.

"ती इतकी जवळ आहे, मला तिच्या जवळ जाऊन, तिचा मुका घेऊन, मिठी मारत तिला माझं तिच्यावर किती प्रेम आहे , हे सांगायचंय."

पण असं केल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असल्याची त्यांना जाणीव आहे.

"ती जवळ यायला लागली, की मी सावध होते. माझ्यामुळे ती आजारी पडली तर? म्हणून मग मी मागे जाते. पण ती मागे जायला लागली तर मी तिच्या मागे जाते. लोहचुंबकाच्या दोन समान ध्रुवांप्रमाणे आम्ही वागतो."

People emitting signals

प्राध्यापक वेबर याविषयी म्हणतात, "लोकं यावर 'ओव्हररिअॅक्ट' होतायत असं मला वाटत नाही. टिकून रहाणं, जगण्यासाठी धडपड करणं हा मूळ मानवी स्वभाव आहे. कारण नाहीतर याला पर्याय म्हणजे पूर्वीसारखंच आयुष्य जगायला लागणं आणि आपल्यामध्येच मोठ्या संख्येने वृद्ध, स्थूल किंवा आजारी व्यक्ती आहेत, याकडे दुर्लक्ष करणं. परिणामी 'हर्ड इम्युनिटी' तयार होत नाही तोपर्यंत यांच्यातल्या काहींचा मृत्यू होईल. आणि ही अशी हर्ड इम्युनिटी व्हायला बराच वेळ लागणार आहे."

पण रोगांपासून बचाव करणं हा मानवी स्वभावाचा एक पैलू असला तरी समाधानाने जगणं, समाजासोबत जगणं हा देखील आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा पैलू असल्याचं युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या मानसशास्त्र विभागाचे प्राध्यापक आर्थर मार्कमन म्हणतात.

"मानवी स्पर्श पूर्णपणे टाळण्याऐवजी कदाचित आता आपण नियमित हात धुणं, हँड सॅनिटायझर वापरणं, चेहऱ्याला कमीत कमी हात लावण्याची सवय करणं याकडे लक्ष द्यायला हवं," ते सांगतात.

"खरी काळजी या गोष्टीची आहे की 'न्यू नॉर्मल' मध्ये स्पर्शाला जागा नसली तर आपण आपल्या सान्निध्यातल्या व्यक्तींचा स्पर्श मिळत नसल्याने काय गमावतोय याची आपल्याला जाणीवही होणार नाही."

(जेम्स जेफ्री हे टेक्सास स्थित लेखक आहेत आणि ते बीबीसीसाठी नियमितपणे लेखन करतात.)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)