कोरोना: रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी लस सापडली?

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जेम्स गॅलाघर
    • Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी लोकांच्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी एक लस सापडल्याचा दावा एका अमेरिकन कंपनीने केलाय. मॉडर्ना असं या कंपनीचं नाव आहे.

ज्या पहिल्या आठ लोकांवर या लशीची चाचणी घेण्यात आली होती, त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज आढळल्याचं कंपनीने म्हटलंय.

ज्या लोकांना कोरोना विषाणूची लागण झालेली आहे, त्यांच्या शरीरातल्या रोगप्रतिकारक शक्तीप्रमाणेच या लोकांच्या रोगप्रतिकारक यंत्रणेने प्रतिसाद दिल्याचं कंपनीने म्हटलंय.

या लशीमुळे कोरोना विषाणूच्या संसर्गापासून संरक्षण प्रत्यक्षात मिळू शकतं का, हे तपासण्यासाठीच्या मोठ्या प्रमाणातल्या चाचण्या जुलैमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.

सध्या जगभरातले 80 गट कोरोना व्हायरसवरची लस शोधण्यासाठी झपाटून काम करत आहेत.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Science Photo Library

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

मॉडर्ना कंपनीने त्यांच्या mRNA - 1273 या प्रायोगिक लशीची चाचणी सर्वांत पहिल्यांदा केली होती.

कोरोना व्हायरसच्या जेनेटिक कोडचा लहानसा भाग या लशीद्वारे रुग्णाच्या शरीरात टोचला जातो.

यामुळे कोव्हिड 19 ची लक्षणं निर्माण होत नाही किंवा रुग्णाला विषाणू संसर्गही होत नाही. पण त्या व्यक्तीच्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती याला प्रतिसाद मात्र देते.

अमेरिकन सरकारच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ अॅलर्जी अँड इन्फेक्शस डिसीजेसने लशीसाठीच्या या चाचण्या घेतल्या. ही प्रायोगिक लस ज्या लोकांना टोचण्यात आली, त्यांच्या शरीरात कोरोना व्हायरसला निष्प्रभ करू शकणाऱ्या अँटीबॉडीज निर्माण झाल्याचं आढळून आलंय.

मात्र, आतापर्यंत फक्त 8 लोकांवर याची चाचणी करण्यात आलेली आहे. या ट्रायलमध्ये एकूण 45 जणांवर चाचणी करण्यात येणार आहे. या प्रयोगामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना कमी, मध्यम वा जास्त प्रमाणात ही लस देण्यात येतेय.

सगळ्यांत जास्त प्रमाणात लस देण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये या सगळ्यात जास्त दुष्परिणाम वा साईड इफेक्ट्स आढळलेले आहेत.

पण कोव्हिड 19 मधून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरातील अँटीबॉडिजचं प्रमाण आणि लसीचा लहान डोस घेणाऱ्यांच्या शरीरातील अँटीबॉडिजचं प्रमाण सारखंच असल्याचं मॉडर्नाने म्हटलंय. तर मध्यम प्रमाणात लस घेणाऱ्यांमधलं अँटीबॉडिजचं प्रमाण हे बऱ्या झालेल्या रुग्णांच्या तुलनेत 'लक्षणीयरीत्या जास्त' असल्याचं कंपनीने म्हटलंय.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

लसीची ही चाचणी सध्या पहिल्या टप्प्यात आहे. या टप्प्यामध्ये ही लस परिणामकारक आहे का पाहण्यापेक्षा लस सुरक्षित आहे का, याचा तपास घेतला जातोय.

या लसीच्या मदतीने लोकांना विषाणूपासून संरक्षण मिळतंय का हे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाचण्या घ्याव्या लागतील.

उंदरांवरही याचा प्रयोग करण्यात आला. उंदरांच्या फुफ्फुसांवर परिणाम करणारा विषाणू या लसीच्या मदतीने रोखण्याच्या प्रयोगात यश आलेलं आहे.

"ही चाचणीच्या पहिल्या टप्प्याच्या मध्यातली माहिती आहे. नैसर्गिक संसर्गानंतर शरीरात जी प्रतिक्रिया उमटते तशीच mRNA - 1273 लशीमुळे उमटत असल्याचं यात आढळलंय," मॉर्डनाच् चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. ताल झॅक्स यांनी सांगितलं.

कोरोना
लाईन

"mRNA - 1273मध्ये कोव्हिड - 19 ला रोखण्याची क्षमता आहे, या विश्वासाला या आकडेवारीमुळे दुजोरा मिळतोय. महत्त्वाच्या चाचण्यांसाठी आता लशीचं प्रमाण (डोस) आम्ही ठरण्याच्या आम्ही आता अधिक जवळ आहोत."

जुलै महिन्यात या लशीची मोठ्या प्रमाणावर चाचणी सुरू करणार असल्याचं मॉडर्नाने म्हटलंय.

ऑक्सफर्डची लस

ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या लशीचीही लोकांवर चाचणी घेण्यात येत आहे. पण या चाचण्यांचे निकाल अजून आलेले नाहीत. पण माकडांवर करण्यात आलेल्या चाचण्यांच्या निकालांविषयी काही शंका व्यक्त करण्यात येत आहेत.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

ज्या प्राण्यांना ही लस देण्यात आली त्यांच्यामध्ये रोगाची तीव्र लक्षणं आढळली नाहीत आणि त्यांना न्यूमोनिया झाला नाही. पण या प्राण्यांचं विषाणूपासून पूर्णपणे संरक्षण झालं नाही आणि ज्या माकडांना ही लस देण्यात आली नव्हती त्यांच्या नाकातून घेण्यात आलेले चाचणीसाठीचे नमुने आणि ज्या माकडांना लस देण्यात आली त्यांचे नमुने, या दोन्हींमध्ये व्हायरसची लक्षणं आढळली.

युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गच्या प्राध्यापक एलानॉर यांनी सांगितलं, "माणसांमध्ये जर अशाप्रकारचे निकाल आढळले तर लशीमुळे ती घेणाऱ्या व्यक्तीला रोगापासून काहीसं संरक्षण मिळेल पण यामुळे समाजामधला या संर्सगाचा प्रादुर्भाव कमी होणार नाही."

म्हणूनच या लशीच्या चाचण्या जोपर्यंत माणसावर घेण्यात येत नाहीत, तोपर्यंतच ते माणसांवर कसं काम करतं हे कळू शकणार नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)