कोरोना व्हायरस कधीच न संपण्याची शक्यता, WHOने व्यक्त केली भीती

WHO

फोटो स्रोत, Getty Images

कोरोना विषाणूची साथ कधी आटोक्यात येणार? हा विषाणू कधी संपणार? असे प्रश्न आज प्रत्येकालाच पडले आहेत.

मात्र, कदाचित हा विषाणू कधीच संपणार नाही, असा धोक्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी एक व्हच्युअल पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. ट्रेडास अॅडनॉम घेब्रेयेसूस यांच्यासह इतरही तज्ज्ञ उपस्थित होते.

यावेळी बोलताना डब्ल्यूएचओच्या इमर्जन्सी विभागाचे संचालक डॉ. माईक रेयान म्हणाले, "कोरोना विषाणूवर लस विकसित झाली तरीदेखील विषाणूला आळा घालण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील."

जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाने आतापर्यंत जवळपास तीन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे तर 43 लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

डॉ. रेयान म्हणाले,"हे सांगणं महत्त्वाचं आहे. साथीचे आजार पसरवणाऱ्या इतर अनेक विषाणूंप्रमाणे हादेखील एक विषाणू असेल आणि तो आपल्या समाजातून कधीच संपणार नाही. HIV विषाणूही हद्दपार झालेला नाही. मात्र, त्याला कसं हाताळायचं, हे आता आपण शिकलो आहोत."

कोरोना
लाईन

हा विषाणू कधी जाईल, हे कुणीच सांगू शकत नसल्याचंही डॉ. रेयान म्हणाले.

डॉ. रेयान हेदेखील म्हणाले की जगभरात 100 हून जास्त लसींवर संशोधन सुरू आहे. मात्र, आपल्याला माहिती आहे की गोवरसारखे अनेक आजार आहेत ज्यावर लस उपलब्ध आहेत. मात्र, तरीही या आजारांचं समूळ उच्चाटन झालेलं नाही.

तर या विषाणूवर प्रयत्नपूर्वक नियंत्रण मिळवणं अजूनही शक्य असल्याचा आशावाद जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. घेब्रेयेसूस यांनी व्यक्त केला आहे.

ते म्हणाले, "मार्ग आपल्या हातात आहे आणि हे प्रत्येकाचंच काम आहे. हे आरोग्य संकट थोपवण्यासाठी सर्वांनीच हातभार लावला पाहिजे."

जागतिक आरोग्य संघटनेच्याच एपिडेमियॉलॉजिस्ट डॉ. मारिया व्हॅन केरकोव्ह पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, "कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या आरोग्य संकटातून बाहेर पडण्यासाठी काही काळ लागेल, अशी आपण मनाची तयारी करायला हवी."

जगभरातल्या अनेक देशांमध्ये लॉकडाऊनमधून सूट द्यायला हळूहळू सुरुवात झाली आहे आणि अर्थव्यवस्थेचा गाडा पुन्हा रुळावर आणण्यासाठी उद्योगधंदे कसे आणि केव्हा सुरू करता येईल, यावर नेतेमंडळी विचार मंथन करत आहेत. अशावेळी जागतिक आरोग्य संघटनेने हा धोक्याचा इशारा दिला आहे.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

निर्बंध कशापद्धतीने शिथील करायचे, जेणेकरून संसर्गाची दुसरी लाट येणार नाही. तर असा कुठलाही खात्रीशीर मार्ग नसल्याचं डॉ. ट्रेडोस यांनी म्हटलं आहे.

ते म्हणतात, "अनेक राष्ट्र लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत आहेत. मात्र, जागतिक आरोग्य संघटना अजूनही प्रत्येक देशाला अलर्ट राहण्याचा सल्ला देत आहे."

डॉ. रेयान पुढे म्हणाले, "असाही चमत्कारिक मतप्रवाह दिसून येतो आहे की लॉकडाऊनचा चांगला परिणाम दिसून आला आहे आणि त्यामुळे लॉकडाऊन उठवणं योग्य ठरेल. मात्र, यात धोके आहेतच."

डॉ. रेयान यांच्या मते जनजीवन सामान्य होण्यासाठी अजून बराच वेळ लागणार आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)