'कोरोना व्हायरसची लस लोकांपर्यंत पोहोचण्यास लागू शकतात अडीच वर्षं'- WHO

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नितीन श्रीवास्तव
- Role, बीबीसी प्रतिनिधी
कोरोना व्हायरसवरची लस जगभरातल्या लोकांपर्यंत पोहोचायला तब्बल अडीच वर्षांपर्यंतचा काळ लागण्याचा अंदाज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)चे कोव्हिड-19चे विशेष दूत डेव्हिड नबारो यांनी व्यक्त केला आहे.
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं, "सगळ्या अंदाजांनुसार सुरक्षित आणि परिणामकारक लस विकसित व्हायला किमान 18 महिने लागतील. आणि अशा अनेक लसींची आपल्याला गरज असेल.
"त्यानंतर या लसीचं उत्पादन आणि वापर सुरू होईल. जगभरातल्या 7.8 अब्ज लोकांपर्यंत ही लस पोहोचायला आणखी वर्षभराचा कालावधी लागेल."
नबारो हे लंडनच्या इंपिरियल कॉलेजमध्ये 'ग्लोबल हेल्थ' विषयाचे प्राध्यापकही आहेत. जगात असेही काही विषाणू आहेत ज्यासाठी अनेक वर्षांपर्यंत सुरक्षित लस विकसित करता आली नव्हती हे लोकांनी लक्षात ठेवण्याची गरज असल्याचं ते सांगतात.
भारताच्या संपूर्ण लॉकडाऊनच्या धाडसी पावलाचं एकीकडे कौतुक करतानाच 'लोकसंख्येच्या घनतेमुळे मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि दिल्लीसारख्या देशांमध्ये सोशल डिस्टंसिंग आणि व्यक्तीगत विलगीकरणासारख्या गोष्टी अपेक्षेपेक्षा जास्त काळापर्यंत करत रहाव्या लागतील, नाहीतर दाटीवाटीच्या भागांमधला रोगप्रसार नियंत्रणात आणणं कठीण जाईल," असा इशारा नबारो देतात.
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भारतामध्ये कोव्हिड 19च्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली. त्यानंतर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 24 मार्चला संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लावण्यात आला, पण तोपर्यंत रुग्णसंख्या 550 पर्यंत पोहोचलेली होती.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?

हा लॉकडाऊन आतापर्यंत तीनदा वाढवण्यात आला. पण या काळात अत्यावश्यक सेवा आणि पुरवठ्याला सवलत देण्यात आली होती. आतापर्यंत देशातल्या रुग्णांचं प्रमाण वाढून 70,756 झालेलं आहे तर 2,293 जणांचा आतापर्यंत यामुळे मृत्यू झालाय.
टेस्टिंगचं प्रमाण वाढल्याने रुग्णांचा आकडा वाढलेला आहे का आणि तो यापुढेही वाढेल का, असं विचारल्यानंतर WHOच्या या कोव्हिड 19 बद्दलची धोरणांची जबाबदारी पाहणाऱ्या विशेष दूतांनी दुजोरा दर्शवत मान डोलावली.

फोटो स्रोत, WHO
डेव्हिड नबारो म्हणाले, "तुम्ही जेव्हा चाचण्या करता, तेव्हाच तुम्हाला रोगाचा शोध लागतो. भारतात आणि जगातही टेस्टिंग सर्वत्र उपलब्ध नाही. पण तरीही काही 'इंडिकेटर्स' आहेत. म्हणजे उदाहरणार्थ, हॉस्पिटल्मध्ये काय होतंय, कोव्हिड 19ची संबंधित रुग्णांचं प्रमाण वाढतंय का? जर याचं उत्तर हो असेल, तर मग याचा अर्थ आपण प्रयत्न करूनही व्हायरस पुढे सरकतोय. शिवाय आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि मेडिकल इन्शुरन्ससेवांच्या संपर्कात राहणंही अशावेळी मदतीचं ठरतं."
भारत सरकारने अचानक जाहीर केलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे लाखो स्थलांतरित मजूर अन्न वा निवाऱ्याशिवाय अडकले. यावर जगभरातून टीका झाली. याविषयी बोलताना डेव्हिड नबारो म्हणतात, "या निर्णयाची मानवी आणि आर्थिक किंमत पाहता असा राजकीय निर्णय घेणं कठीण गेलं असावं."
"जगभरातले लोक सध्या सरकारला प्रश्न विचारत आहेत. अगदी याविषयीची धोक्याची सूचना आधीच का दिली नाही? असा सवाल WHO लाही केला जातोय. याविषयी अधिक त्वरेने पावलं उचलता आली नसती का असं स्पेन, इटली, युके आणि अमेरिकेतील लोक विचारत आहेत.
"अर्थातच आपण जितक्या लवकर याविषयी पावलं उचलू ते फायद्याचं ठरत असल्याचं आपल्याला आता समजलंय. पण विचार करा, जेव्हा भारतात पहिला रुग्ण आढळला तेव्हाच या धोरणाची अंमलबजावणी केली असती तर ताबडतोब त्याचा परिणाम लाखो-करोडोंवर झाला असता. या निर्णयाचं सगळ्या बाजूंनी अवलोकन करताना याकडे राजकीय दृष्टीकोनातूनही पहायला हवं," ते म्हणतात.

फोटो स्रोत, Noah seelam
भारतामधले कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे आकडे ठराविक दराने वाढत आहेत. तर अधिकृत आकडेवारीनुसार भारतातल्या कोरोना व्हायरसच्या नोंदवण्यात आलेल्या एकूण रुग्णांपैकी 50 ते 70 टक्के लोकांमध्ये या रोगाची कोणतीही लक्षणं दिसत नाहीयेत.
रोग प्रतिकारशक्ती चांगली असण्यासोबतच काही इतर कारणांमुळेही या रुग्णांमध्ये संसर्गाची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. पण अशा व्यक्तींची तपासणी होण्याआधीच त्यांच्याकडून या व्हायरसचा प्रसार होण्याची शक्यता असल्याचं तज्ज्ञ म्हणतात.
याविषयी नबारो सांगतात, "भारतातल्या अनेक पॉझिटिव्ह केसेसमध्ये रोगाची लक्षणं अजिबात आढळत नाहीत वा सौम्य आढळत असल्याने या रोगावर नियंत्रण मिळण्यासाठीचं अधिक चांगलं धोरण राबवणं आव्हान आहे. कोणतीही लक्षणं दिसत नसताना लोकांना स्वतःला विलगीकरणामध्ये ठेवायला लावणं किंवा अशा विलगीकरणामुळे त्यांचं उत्पन्न वा काम थांबणं हे कठीण आहे. जगभरामध्ये या रोगाची तीव्रता वेगवेगळी आहे म्हणून या रोगावर नियंत्रण मिळवणं अधिक गुंतागुंतीचं झालेलं आहे," ते म्हणतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








