किम जाँग-उन यांच्यानंतर उत्तर कोरियाचं नेतृत्व कुणाच्या हाती? किम यो-जाँग त्यांची उत्तराधिकारी होणार?

फोटो स्रोत, KCNA
- Author, एलिस्टेयर कोलमन
- Role, बीबीसी मॉनिटरिंग
उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन हे गंभीररीत्या आजारी असल्याच्या, अगदी मृत्युमुखी पडल्याच्या बातम्या जगभरातून येत आहेत. मात्र उत्तर कोरियातील प्रसारमाध्यमांमधून सर्व काही आलबेल असल्याचं सांगण्यात येत आहे. दक्षिण कोरिया आणि चीन या शेजारी राष्ट्रांनीही तसेच संकेत दिले आहेत.
किम जाँग-उन यांच्या प्रकृतीबद्दलच्या या चर्चा 15 एप्रिलनंतर सुरू झाल्या, कारण यादिवशी किम त्यांचे आजोबा आणि उत्तर कोरियाचे संस्थापक किम इल-सुंग यांच्या जन्मदिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते.
दक्षिण कोरिया आणि अमेरिकन सरकारनं असं म्हटलं आहे, की उत्तर कोरियामध्ये अशा कोणतीही हालचाली दिसत नाहीयेत, ज्यावरून किम जाँग-उन यांची प्रकृती बिघडली आहे किंवा त्यांचा मृत्यू झालाय हा निष्कर्ष काढता येईल. मात्र जोपर्यंत यावर उत्तर कोरियातील सरकारी माध्यमांमधून अधिकृतपणे कोणतंही भाष्य केलं जात नाही, तोपर्यंत किम यांच्याबद्दलच्या अफवा थांबणार नाहीत.
पण जर या अफवांमध्ये तथ्य असेल आणि किम यांचा मृत्यू झाला असेल, तर त्यांच्यानंतर उत्तर कोरियाची सूत्रं कोण हाती घेणार? किम जाँग-उन यांचा उत्तराधिकारी कोण असेल?
किम यो-जाँग

फोटो स्रोत, Getty Images
किम जाँग-उन यांची धाकटी बहीण किम यो-जाँग यांचं नाव उत्तर कोरियाच्या भावी नेत्या म्हणून आघाडीवर आहे.
31 वर्षांच्या किम यो-जाँग यांनीही आपल्या भावाप्रमाणे परदेशात शिक्षण घेतलं आहे. त्या पॉलिटब्युरोच्या सदस्य आहेत आणि देशातील सर्वात महत्त्वाच्या अशा प्रचार आणि आंदोलन विभागाच्या (Propaganda and Agitation Department) सहायक संचालकही आहेत.
त्यांना जाँग-उन यांच्या 'डायरी सेक्रेटरी' म्हणूनही ओळखलं जातं. किम जाँग-उन यांच्या दैनंदिन कामकाजात त्यांची भूमिका महत्त्वाची असते. धोरणात्मक बाबींमध्ये त्या किम यांना सल्ला देत असल्याचंही बोललं जातं.
त्या "पाएक्तू शिखराच्या पवित्र घराण्याच्या" सदस्य मानल्या जातात, म्हणजेच त्या उत्तर कोरियाचे संस्थापक किम इल-सुंग यांच्या थेट वंशज आहेत. या देशाच्या राजकारणात ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे.
पण किम यो-जाँग त्यांच्या उतावीळ स्वभावासाठी ओळखल्या जातात. त्यामुळेच त्यांच्याकडून देश सांभाळताना चुका होतील, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

फोटो स्रोत, Ankit Panda Twitter
काही महिन्यांपूर्वी किम जाँग-उन आणि डोनाल्ड ट्रंप यांची हनोई इथं भेट झाली होती. या दोघांच्या बैठकीमध्ये चोरून पाहतानाचा त्यांचा एक फोटो प्रसिद्ध झाला होता. किम जाँग-उन यांना खजील करणारी ही गोष्ट होती. पण यो-जाँग यांनी पहिल्यांदाच अशाप्रकारचं वर्तन केलेलं नव्हतं.
अर्थात, किम यो-जाँग यांच्याबद्दल अजून एक प्रश्न उपस्थित होत आहे… उत्तर कोरिया एका महिलेचं नेतृत्व स्वीकारण्यासाठी तयार आहे का? उत्तर कोरियाच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात महिलांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. पण महत्त्वाच्या आणि हुद्द्याच्या जागांवर महिलांना अपवादानेच स्थान दिलं जातं.
त्यामुळे केवळ किम परिवाराची सदस्य या भांडवलावर किम यो-जाँग पितृसत्ताक समाजाच्या आव्हानाला सामोरं जाऊ शकतील?
वाचा सविस्तर - …तर उत्तर कोरियाची धुरा या महिलेच्या हाती जाईल
किम जाँग-चोल

फोटो स्रोत, BBC/JNN
किम जाँग-चोल हे किम जाँग-उन यांचे मोठे बंधू. त्यांच्या वडिलांनी खरंतर उत्तराधिकारी म्हणून किम जाँग-चोल यांचंच नाव पुढे केलं होतं. मात्र त्यांनी राजकारण आणि लष्कराचं नेतृत्व करण्याबाबत फारसा रस दाखवला नाही, त्यामुळेच किम जाँग-उन यांच्याकडे सत्तेची सूत्रं देण्यात आली.
किम जाँग-चोल सार्वजनिक कार्यक्रमातही फारसे दिसत नाहीत. 2015 साली ते लंडनमध्ये दिसले होते. तिथे ते त्यांचा आवडता गिटारवादक एरिक कॅल्पटन याच्या कॉन्सर्टला उपस्थित राहिले होते.
देशाचा नेता म्हणून त्यांच्या हाती सूत्रं येतील, याची शक्यता फारच कमी आहे.
किम प्याँग-इल

फोटो स्रोत, Polish Presidency
माजी नोकरशहा असलेले किम प्याँग-इल हे किम जाँग-उन यांचे काका आहेत. उत्तर कोरियाचे दुसरे राष्ट्रप्रमुख आणि जाँग-उन यांचे वडील किम जाँग-इल यांचे ते सावत्र भाऊ आहेत.
उत्तर कोरियाचे संस्थापक किम इल-सुंग यांचा मुलगा असल्यामुळे तेसुद्धा "पाएक्तू शिखराच्या पवित्र घराण्याचे" सदस्य आहेत. एकेकाळी त्यांच्याकडे किम जाँग-इल यांचे प्रतिस्पर्धी म्हणून पाहिलं जात होतं. म्हणूनच त्यांची नियुक्ती वेगवेगळ्या युरोपीय देशांमध्ये राजदूत म्हणून नियुक्त करून उत्तर कोरियाच्या बाहेरच ठेवण्यात आलं होतं.
66 व्या वर्षी रिटायर झाल्यानंतर गेल्या वर्षी किम प्याँग-इल प्योंगयांगला परतले. त्यांनी नेतृत्वाची कमान हाती घेतली, तर देश सुरक्षित हातात आहे असं समजलं जाईल.
चॉय रेयाँग-हे

फोटो स्रोत, Getty Images
व्हाईस-मार्शल चॉय रेयाँग हे किम जाँग-उन यांच्या अतिशय विश्वासातील मानले जातात. ते उत्तर कोरियाच्या संसदेचे तसंच सुप्रीम पीपल्स असेंब्ली या राष्ट्रीय संसदेचे अध्यक्षही आहेत.
70 वर्षीय रेयाँग यांच्याकडे देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून पाहिलं जातं. किम जाँग-उन यांचं नेतृत्व प्रस्थापित करण्यात त्यांचं योगदान मोठं आहे. त्यामुळेच किम यांनीही त्यांना तो मान दिला आहे.
2012 साली किम जाँग-उन हे कोरियाचे प्रशासक झाल्यानंतर काही महिन्यातच चॉय रेयांग यांना एकापाठोपाठ एक बढत्या मिळत गेल्या. यावरूनच किम जाँग-उन यांच्यासाठी ते किती महत्त्वाचे आहेत, याचा अंदाज येतो.
किम यांच्या कुटुंबातील नसूनही ज्यांचं नाव सातत्यानं उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांमध्ये नियमितपणे येतं, अशा मोजक्या नेत्यांमध्ये चॉय रेयाँग यांचा समावेश होतो.
उत्तर कोरियाममध्ये किम यांच्या कुटुंबाबाहेरचा सदस्यही राष्ट्रप्रमुख होऊ शकतो. अशापरिस्थितीत चॉय रेयाँग हे किम यांचे उत्तराधिकारी ठरू शकतात.
किम जेय रेयाँग

फोटो स्रोत, Korea Central TV
किम नाव असलं तरी उत्तर कोरियाचे पंतप्रधान किम जेय रेयाँग हे जाँग-उन यांच्या कुटुंबाचे सदस्य नाहीयेत. उत्तर आणि दक्षिण कोरियामध्ये किम हे नाव अनेकांचं असतं.
2016 पूर्वी किम जेय रेयाँगबद्दल फारशी कोणाला माहिती नव्हती. मात्र त्यानंतर ते यशाच्या पायऱ्या चढतच गेले. गेल्याच वर्षी ते उत्तर कोरियाच्या संसदेमध्ये पोहोचले. आणि त्यानंतर त्यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली. त्यांची पॉलिट ब्युरोचे सदस्य म्हणूनही नियुक्ती झाली. सेंट्रल मिलट्री कमिशनमध्येही त्यांना स्थान मिळालं.
किम जेय रेयाँग हे सत्ताधारी कुटुंबाचे सदस्य नाहीयेत, मात्र राष्ट्रप्रमुख पदासाठी कुटुंबातील योग्य उमेदवार पुढे येईपर्यंत ते ही भूमिका पार पाडू शकतात.
उत्तराधिकाऱ्याची निवड कशी होते?
1948 साली स्थापना झाल्यापासूनच उत्तर कोरियामध्ये किम कुटुंबीयांचीच सत्ता आहे. देशाच्या नव्या नेत्याच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा उत्तर कोरियाची संसद सुप्रीम पीपल्स असेंब्ली करते. मात्र वर्कर्स पार्टी आणि समर्थकांचं बहुमत असलेल्या उत्तर कोरियाच्या संसदेची भूमिका ही बरीचशी 'रबर स्टँपसारखी आहे. अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच आधीच देशाचा नेता कोण होणार हे ठरलेलं असतं.

फोटो स्रोत, Getty Images
किम जाँग-उन याचे वडील किम जाँग-इल हे 1994 साली उत्तर कोरियाचे प्रमुख बनले. उत्तर कोरियाचे संस्थापक असलेल्या किम इल-सुंग यांच्या मृत्यूनंतर त्यांनी देशाची सूत्रं हाती घेतली होती. देशाच्या राजकारणात किम कुटुंबाची भूमिका कशी महत्त्वाची राहील, याची दक्षता त्यांनी आपल्या कार्यकाळातच घेतली होती.
किम इल-सुंग यांनी आपल्या मुलाची किम जाँग-इल यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली, तर जाँग-इल यांनी आपल्या मुलाकडे म्हणजेच किम जाँग-उन यांच्याकडे सत्तेची सूत्रं दिली.
किम जाँग-उन यांचं कुटुंब आहे, मात्र अजूनपर्यंत तरी त्यांच्या मुलांना कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात कोणीच पाहिलं नाहीये, सत्ता सांभाळण्यासाठीही कोणाला तयार केलं गेलं नाहीये. किम जाँग-उन यांच्या मुलांची नावंही कोणाला माहीत नाही.
एकूणच उत्तर कोरियात किम जाँग-उन यांची जागा घेण्याच्या दृष्टीने कोणालाही तयार करण्यात आलं नाहीये, त्यामुळेच त्यांचं अकाली निधन झालं तर निर्माण होणारी पोकळी भरून काढणं कठीण होईल.

- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








